'स्व'तःचा शोध( भाग 18)

As A Female
आज साक्षीच्या NEET परीक्षेचा दिवस जवळ आला होता.

सकाळपासूनच तिची धावाधाव सुरू होती.

बाबांनी तिला सेंटरवर सोडले. त्यामुळे ती सेंटरवर वेळेत पोहोचली. थोडं लवकर जाऊन ती रिलॅक्स झाली. मनोमन प्रार्थना करत होती , ' मला पेपर सोपा जावा ' .

ती विचार करत होती , ' पेपर कसा असेल ? '

पण मुलांना हे कळत नाही की योग्य दिशेने परीक्षेचा सराव करायला हवा. पेपर पॅटर्न बघूनच त्या परीक्षेची खूप प्रॅक्टिस करायला हवी.

साक्षीने मात्र तसे जास्त काही केले नव्हते.

फक्त प्रार्थना करून काही होत नाही.

योग्य दिशा आणि मेहनतच कामाला येते.

साक्षीच्या हातात पेपर आला.

तिने एकदा मनोमन देवाला प्रार्थना केली. दीर्घ श्वास घेऊन पेपर सोडवायला सुरुवात केली.

पहिले प्रश्न तर तिला ओळखीचे सुद्धा वाटत नव्हते.

मनात म्हणत होती, ' पुढे तरी  प्रश्न सोपे असतील ' .

एक-एक प्रश्न सोडवत ती पुढे चालली होती. पण तिच्या हाती निराशाच येत होती.

अंधाऱ्या खोलीत दरवाजातून कधीतरी कवडसा यावा असं होत होतं.

एखादाच प्रश्न तिच्याकडून सुटत होता. तिला घाम फुटला होता.

पुढचे सगळे दृश्य तिच्यासमोर उभे होते , ' माझे डॉक्टर होण्याचे स्वप्न बहुतेक भंगणार आहे ' .

काय करावे त्या हॉल मध्ये तिला सुचत नव्हते.

एवढ्या मोठ्या हॉलमध्ये मुलांनी गच्च भरलेल्या पण तिला ' एकटेच आहोत ' , असा भास होत होता.

तिने आजूबाजूला कटाक्ष टाकला.

सगळेजण आपापला पेपर सोडवण्यात व्यस्त होते.

तिला वाटत होते, ' ह्या स्पर्धेमध्ये आपला टिकाव लागणार नाही. आपण इतके हुशार पण योग्य दिशेने सराव न  झाल्यामुळे आपल्याला माघार घ्यावी लागणार ' .

ती तिच्या परीने पेपर सोडवण्याचा प्रयत्न करत होती.

पेपर मध्ये सगळे प्रश्न तिला अनोळखीच वाटत होते. एखादाच शब्द ओळखीचा वाटत होता.

तिने जे वाचले होते ते फक्त वाचून काढले होते. मोठे -मोठे प्रश्न असल्यास त्याचे उत्तर कसे लिहायचे हे तिला प्रॅक्टिस होती. पण m.c.q. कसे विचारले जातील त्याची तिने प्रॅक्टिस केली नव्हती.

एम सी क्यू हे सरळ कधीच विचारत नाहीत ते कन्सेप्ट समजला तरच सोडवता येतात.

साक्षीला क्लासमध्ये जेवढा शिकवलं तेवढा तर कळत होते.

पण वर्गातील शिक्षकांपेक्षा ही पुढे जाऊन स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करावा लागतो. हे तिला आता उमगले.

कॉलेजमध्ये फक्त सिल्याबस पूर्ण करून देणे एवढाच अट्टाहास असतो.

सगळेच शिक्षक सिल्याबस च्या बाहेर जाऊन स्पर्धा परिक्षेच्या दृष्टीने शिकवतील असे नाही. त्यामुळे स्वतः आपण बाहेरून माहिती काढून त्या दृष्टीने तयारी करावी लागते.

साक्षी तिथेच कमी पडली होती.

घरातून पाठिंबा न मिळाल्याने अजूनच मनाचे खच्चीकरण होत होते.

साक्षी चे तसेच काहीतरी झाले होते.

तिला क्लासमध्ये सर्व ब्रह्मांड आठवत होते.

पण आता काहीच ती करू शकत नव्हती.

साक्षी उदास मनाने घरी परतली होती.

सेंटर प्रत्येकाचे वेगवेगळे असल्यामुळे तिच्या मैत्रिणींची ही भेट झाली नव्हती. तसं तिला मैत्रिणीकडून ही काही अपेक्षा राहिली नव्हती.

' पुढे काय करावे ' , हे तिला सुचत नव्हते.

घरातील वातावरण गढूळ होऊ नये म्हणून साक्षी शांत राहिली.

आपण जर सांगितले की , ' मला पुढे ॲडमिशन नाही मिळणार तर घरातील लगेच माझ्या लग्नाचे बघायला चालू करतील. त्यामुळे दुसरा कोणता मार्ग निघू शकतो का यावर मार्गदर्शन मिळायला हवे. वर्गशिक्षके ला भेटायला जायला हवे ' , असे साक्षीला वाटले.

साक्षीला वाटत होते , ' बरे झाले, वर्गशिक्षिका तरी आमच्या गावामध्ये आहेत. ज्या माझ्यासारख्या मुलींना करियर बद्दल माहिती देऊ शकतात ' .

पण प्रत्येक गावातील प्रत्येक साक्षीच्या नशिबी मात्र नसणार आहे.

त्यासाठी काय करावे लागेल?

प्रत्येक शिकलेल्या स्त्रीने आपल्या परीने आजूबाजूला डोळसपणे पाहून फक्त घरातील शिक्षणाचे वातावरण नसल्यामुळे मुलींचे शिक्षण थांबवली जात असतील तर त्यांना त्या परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी मदत करावी.

ते शक्य झाले नाही तरी त्या मुलीच्या संपर्कात राहून तिच्या मनाची अवस्था समजून घेऊन तयारी असेल तर पुढील शिक्षणाची माहिती नक्कीच द्यावी.

काहीही अडचण आल्यास मला संपर्क कर अशी ग्वाही मुलीला द्यावी. त्यामुळे तिला एक मानसिक आधार वाटेल.

आयुष्यात कधीही तिला शिक्षण घेण्याची उमेद निर्माण झाली तर ती आपल्या आधाराकडे नक्कीच वळून बघेल.

तिला मेडिकल क्षेत्रामध्ये काम करायचे होते त्यामुळे जर NEET परीक्षेमध्ये कमी मार्क भेटले तर इतर मार्ग कोणते आहेत हे तिला वर्गशिक्षीकेला जाऊन विचारायचे होते.

दोन आठवड्यानंतर सी ई टी इंजिनिअरिंग ऍडमिशन साठी प्रवेश परीक्षा होणार होती.

तिला गणित हा विषय तर खूप आवडत होता पण इंजिनीरिंग मध्ये करिअर करण्याची तिची अजिबात इच्छा नव्हती.

तिच्याबरोबर तिच्या मैत्रिणी इंजिनिअरिंग फिल्डमध्ये जाणार होत्या हे तिला माहीत होते.

एक वेळ तिने तो विचार ही केला होता पण तिला मनातूनच इंटरेस्ट नव्हता. तरी ही ती या परीक्षेची तयारी करणार होती.

मनुष्याने प्रत्येक परीक्षेला सामोरे जायला हवे त्यामध्ये आपला इंटरेस्ट असो किंवा नसो. कारण आपण त्या परीक्षेमध्ये कुठपर्यंत पोहोचू शकतो हा तरी अंदाज येऊ शकतो.

जर आवडीच्या क्षेत्राची परीक्षा पास च नाही झालो तर हा एक मार्ग तरी आपल्या हातात उरतो.

काहीच न करण्यापेक्षा जे आवडत नाही ते क्षेत्र त्यामध्ये जर आपली बुद्धी असेल तर ते क्षेत्र आवडून घ्यायला काय हरकत आहे.

आपण आयुष्यामध्ये जे ध्येय ठरवतो ते पूर्ण होतीलच असं नाही.

हार मानून हात खाली ठेवण्यापेक्षा आहे त्या परिस्थितीला तोंड देत राहावे असं वाटतं.

त्यातून नक्कीच चांगला मार्ग मिळू शकतो.

साक्षीला वाटत होते, ' आपला जन्म का खेड्यामध्ये झाला. खेड्यामध्ये झाला तर झाला पण अशा कुटुंबांमध्ये झाला जिथून कोणत्याही शिक्षणाविषयी आशेची किरणे दिसणे अशक्य.

खेड्यामध्ये , शिक्षणाविषयी रस न असलेल्या कुटुंबामध्ये आणि आता तर अजून एक भला मोठा प्रश्न उभा राहिला आहे जो जातीविषयी ' .

आरक्षणाचा हा काय प्रकार आहे हे तिला अजून कळत नव्हतं.

पण फॉर्ममध्ये दिसलेला तो कॉलम तिच्या डोळ्यासमोर होता. पण तिला अजून हे माहीत नव्हतं की तिच्याबरोबर शिकणाऱ्या मुलं- मुली मार्कांनी कमी असलेले पण आरक्षण घेणारे आता तिच्या पेक्षा पुढे जाणार आहेत.

तिच्या आयुष्यामध्ये उलथा- पालथ करून जाणारे अशी बरीच वळणे पुढे येणार आहेत याची तिला कल्पना नव्हती.

तिला फक्त सरळ जाणारा आयुष्यातील मार्ग दिसत होता.

' आपण हे ठरवणार आहोत , असे करणार आहोत आणि असेच होणार आहे ' , हे तिचे मन बोलत होते.

पण तिच्या आयुष्यामध्ये वेगळेच घडणार होते.

म्हणजे तिच्या पचनी पडणारे नसणार आहे.

घरातील सगळ्यांनी, " पेपर कसा गेला विचारले होते ? "

" बरा गेला " , असं म्हणून तिने तो विषय टाळला.

आईला मात्र साक्षीच्या डोळ्यातील खरे भाव दिसले होते.

तिने हेरले होते की , ' नक्कीच साक्षीच्या मनासारखे झालेले नाही. पण ती काही बोलत नव्हती. थोडे दिवस जाऊ देत साक्षी आपोआप मन मोकळे करेल माझ्यापाशी ' , असे तिला वाटले.

झाले ही तसेच एक आठवड्यानंतर साक्षीचे दाटलेले ढग मोकळे व्हायला सुरुवात झाली.

साक्षी खूप निराशा ने आईशी बोलत होती.
     
"आई , मला वाटते परीक्षेत चांगले मार्क मिळणार नाहीत. माझ्या मैत्रिणी ही पुढे निघून जातील. मी मात्र तुझ्या सारखीच घर कामात अडकणार आहे " , साक्षी बोलली.

आता मात्र आईला रहावले नाही.

कोणत्याही आईला आवडणार नाही आपल्या मुलाने हार मानलेली.

निसर्गामध्ये आपण पाहतोच पक्षी सुद्धा आपल्या मुलांना उडायला शिकवतो.

आपण तर चालते -बोलते बुद्धिमान मनुष्यप्राणी आहोत.

प्राण्यांपेक्षा आपल्याला खरंच बुद्धी जास्त आहे. मग त्याप्रमाणे त्याचा वापर व्हायला नको का.

आई ती आईच असते तिच्या शिवाय पंखामध्ये बळ कोण भरणार. तिच्या पिलां ना ही आई पेक्षा मोठा आधार कोणाचाही वाटत नाही.

त्यामुळे प्रत्येक वेळी आपले मूल जेव्हा अडचणीत असते तेव्हा आईनेच मोठा आधार द्यायला हवा.

साक्षीच्या आईने ही हेच केले.

तिला तर वाटत होते की , ' तिने दुसऱ्या कोणत्याही क्षेत्रात न जाता डी.एड.च करावे ते तिच्यासाठी भले आहे ' .

पण साक्षीची ही अवस्था बघून तिने तिला धीर देण्याचे ठरवले.

क्रमशः



🎭 Series Post

View all