Login

'स्व'तःचा शोध (भाग 30)

As A Female

साक्षी हॉस्पिटलमधल्या घटनेनंतर शांत- शांत राहू लागली होती.

तिला पहिल्यापासूनच मुलांशी बोलण्याची सवय नसल्याने हा प्रसंग जेव्हा तिच्यासमोर उभा राहिला तेव्हा ती गोंधळून गेली. यातून कसे बाहेर पडावे जॉब न सोडता हे तिला कळत नव्हते. कारण प्रत्येक गोष्टीवर जॉब सोडून जाणे म्हणजे आपल्याच पायावर दगड मारून घेतल्यासारखे आहे.

कोणताही व्यक्ती त्रास देतो तेव्हा आपण जॉब सोडल्याने त्याला काहीही फरक पडणार नसतो.


बरं आपण दुसऱ्या ठिकाणी जरी गेलो तरी पण त्या ठिकाणी त्या वृत्तीची माणसे नसतील हे कशावरून.

साक्षी चार ही बाजूने विचार करत होती पण ती अजूनच त्यामध्ये अडकत चालली होती.

घरूनही लग्नाचा दबाव तिच्यावर वाढत होता. त्यामुळे तिचं डोकं चालेना असेच झाले.

शेवटी तिने , ' लग्नाचे ठरवावे ' , असा विचार करून नोकरीमध्ये राजीनामा दिला.
                           
घरचे मग लग्नाच्या तयारीला लागले.

थोडक्या हुंड्यात लग्न ठरले व मुलीकडून लग्न करून द्यायचे असे ठरले.

साक्षीला हुंडा देणे आवडत नव्हते.

पण घरच्यांनी समजावून सांगितले , " शासनाने कितीही कायदे काढले तरी समाजामध्ये लोक हुंडा हा घेतातच " .

" मी ही जास्त देत नाही, थोडाफार हा द्यावाच लागतो. मग हातचे हे चांगले स्थळ कशाला जाऊ द्यायचे " , असे बाबांनी समजावून सांगितल्यानंतर साक्षीने होकार दिला.

खरंतर साक्षी लग्नासाठी अजून थांबली असती पण नोकरीच्या ठिकाणाहून नकारात्मक अनुभव आल्याने तिने हा निर्णय घेतला.
                         
एका महिन्यात तिचे लग्न उरकले गेले.

साक्षी बेंगलोरला सासरी निघून गेली.

आतापर्यंत तिच्या संपर्कामध्ये एक ही मैत्रीण राहिली नव्हती. कोण, कुठे आहे हे कोणालाही माहीत नव्हते.

तिचा नवरा, ती आणि सासू एवढेच कुटुंब बेंगलोर शहरामध्ये राहत होते.

नवी नवरी चे सगळे लाड होत होते.

साक्षी ही खूप आनंदात होती.

पहिल्यांदाच घर सोडून ती एवढ्या मोठ्या शहरात आली होती.

तिला कल्पनाही नव्हती , की एवढे मोठे- मोठे शहर आहेत.

घरचे सगळे तिच्यावर प्रेम करत असत.

सध्यातरी नवीन घरात रमण्यात तिचे दिवस चालले होते.

नवरा ही मनापासून तिचे सगळे लाड पुरवत होता.

त्यांचे स्वतःचे असे घर नव्हते. ते भाड्याने राहत होते.

साक्षीला या गोष्टीची कल्पना नव्हती.

नवरा जेव्हा पाहायला आला होता. तेव्हा तो आलिशान गाडीतून उतरला होता.

त्यामुळे तिला वाटलं की, ' वेल सेटलड मुलगा आहे ' .

हळू-हळू तिला सगळ्या गोष्टी लक्षात यायला लागल्या होत्या.

त्या शहरात नवीन असल्याने नवरा ऑफिस वरून आला की दोघे फिरायला जाणे असे सुरू झाले.

नव्याचे नऊ दिवस तिचे भुरकन उडून गेले.

सासूबाई सोबत तर तिची छान गट्टी जमली होती.

तिला जणू स्वर्गात असल्याचा भास होत होता.

प्रत्येक जोडप्याचे असेच होते. नवीन - नवीन 1 -2 वर्ष आनंदात जातात.

जेव्हा संसार वाढायला लागतो. तेव्हा आर्थिक चणचण जाणवू लागते व भांडणाला सुरुवात होते.

साक्षीच्या बाबतीत ही तसंच झालं.

ती नवीन असल्याने घराबाहेर एकटी पडण्यास भीत असायची.

घर आवरता -आवरता तिचा दिवस कसा जात होता, हे तिला तिचेच कळत नसायचे.

पाच -सहा महिने असेच निघून गेले.

साक्षीच्या नवर्‍याने हळूच तिच्या जॉब बद्दल विषय काढला.

साक्षीला ही बरे वाटले, ' आपण घरातून बाहेर पडून चार पैसे कमवावे. आपण स्वतःच्या करिअर साठी च तर शिक्षण घेतले आहे. मग त्याचा योग्य उपयोग व्हायला नको का.

का आपले शिक्षण आपण असेच घरामध्ये वाया घालवणार आहोत.

आपण शिक्षण फक्त चांगला नवरा मिळावा तो पण वेल सेटल्ड असे तर नव्हते ना ' .

दोघांच्या संमतीने जॉब शोधणे सुरु झाले.

तिच्या घरापासून हॉस्पिटल्स बरेच लांब असल्याने जाण्या - येण्याचा प्रश्न निर्माण झाला.

एका हॉस्पिटल मधून तिला बोलावण्यात आले.

तिथे ही दोन शिफ्टमध्ये काम करावे लागणार होते.

तिने तसं घरी सांगितले.

घरचे तर अगोदरच एका पायावर तयार होते.

सासूने ही जास्त आढेवेढे न घेता परवानगी देऊन टाकली.

' घरचे सगळे करून जाणार असशील तर मला काहीच प्रॉब्लेम नाही ' , असे सासूने सांगितले.

नवऱ्याकडून तर अगोदरच हिरवा कंदील मिळाला होता.

साक्षीला खूप आनंद झाला म्हणजे , ' आपले करिअर सुरू राहणार ह्या गोष्टीचा ' .

तिने ' आपल्या पैशाचा काय करायचे तर स्वतःच्या खर्चासाठी व भविष्यातील निर्वाहासाठी जमा करून ठेवायचे ' , असे तिचे प्लॅनिंग डोक्यामध्ये होते.

पण घरच्यांचे प्लॅनिंग अगोदरच ठरलेले होते, हे साक्षीला माहित नव्हते.
                           
साक्षी ने एक टॅक्सीच बुक करून टाकली होती, कामावर येण्या -जाण्यासाठी.

तिला आजूबाजूला खूप सार्‍या मुली, स्त्रिया स्कूटी किंवा फोरविलर मधून जाताना दिसत असायच्या.

तिला त्याचा हेवा वाटायचा, ' आपण स्कुटी शिकलो नाही. लहानपणी सायकलच शिकता आले नाही तर स्कुटी कुठून शिकणार होतो.

घरामध्ये तर सगळे कडक शासन.

लहानपणीच काय ते बाहेर खेळायला गेलो होतो पण जसे कळायला लागले तसे घरा बाहेर पडलोच नाही.

शाळा जवळ असल्याने चालतच जायचो.

घरचे एवढे हौशी नव्हते की त्यांनी सायकल शिकण्यासाठी प्रयत्न केले.

त्यांना तरी काय माहित होतं पुढे हा दिवा शहरांमध्ये जाऊन काहीतरी बनेल ' .

' आपल्याला स्कुटी चालवता येत नाही ' , याची तिला खंत वाटत असायची.

तिला शिकण्याची ही इच्छा झाली होती पण गर्दी एवढी असायची की तिला या गर्दीची च भीती वाटायची.

' या गर्दीतून माणसाला नीट चालता येत नाही आणि आपण स्कूटी कसे चालवणार ' , या विचाराने तिचा स्कुटीचा विषय जिरला.
                         
साक्षी संसारामध्ये रमली होती.

पण आता मात्र तिची ओढाताण होऊ लागली.

घरचा स्वयंपाक, घराची स्वच्छता आणि जॉब अशी तिची तारेवरची कसरत सुरू झाली.

सासू वयाने फार दमलेली नव्हती, पण ती बसून आरामच करत असायची कारण ती ' सासू ' होती.

कधी -कधी तिला जॉब वरती वेळेवर पोहोचता येत नसायचे कारण घरामध्ये बरीच कामे पडलेली असायची.

सासू मात्र लांबून सगळं न्याहाळत राहायची.

एकाही कामाला हात लावत नसायची.

नवऱ्याला काही ही घेणे- देणे नव्हते. त्याला स्वयंपाक तर जमतच नव्हता व त्याला करण्याची ही इच्छा नव्हती.

सासू बद्दल तिने त्याला एक- दोन वेळा सांगण्याचा प्रयत्न केला.

पण त्याने ठामपणे सांगितले की , " माझी आई काहीही करणार नाही. मी लहान असताना तिने बऱ्याच खस्ता खाल्ल्या. त्यामुळे ती आता आरामच करेल " .

साक्षीला माहित होते , ' अजून विषय वाढत जाईल व भांडणे होतील. त्यापेक्षा गप्पच रहावे ' .

असं करता- करता एक वर्ष निघून गेले.

साक्षीवर कामाचा ताण दिसत होता.

शिफ्ट मध्ये ड्युटी असल्यामुळे तिला नाईट ड्युटी ही करावी लागत असायची.

लग्ना अगोदर तिला ' जॉब ' हा एक पर्वणीच वाटत असायचा.

तिने तो खूप आनंदाने स्वीकारला होता. कारण तिला घरातील कोणतेच काम करावे लागत नव्हते.

तिला आता आईची खूप तीव्रतेने आठवण येत होती.

साक्षी ने ठरवले की, ' घरी स्वयंपाकीण बाई लावू. म्हणजे घरचा भार तरी हलका होईल ' .

पण घरच्यांनी त्यास साफ नकार दिला.

' पैसे गोळा करून आपल्याला पहिले स्वतःचे घर घ्यायचे आहे . त्यामुळे आपण दोघेही नोकरी करतो. मौज -मजा करण्यासाठी नोकरी करत नाही ' , असे सुयोग बोलला.

साक्षीला जी नोकरी अगोदर आवडत होती ती आता तिला सजा वाटू लागली होती.

कामाच्या ठिकाणी गेल्यावर ही तिचे लक्ष नसायचे.

घरातील प्रसंग आठवून तिची तंद्री लागायची , ' आपण नवऱ्या मुलाच्या रूपावर भाळलो. आतले विचार आपल्याला कधी कळालेच नाहीत ' .

आता त्याचे परिणाम दिसायला लागले होते.

' म्हणजे सासरच्या लोकांनी आपल्याला कमावते आहोत ,     म्हणूनच पसंत केले ' , हे तिच्या लक्षात आले होते. 

 ' दिसायला सुंदर होतो ही पण एक जमेची बाजू झाली ' , असा विचार साक्षी करत होती.

साक्षीला आता स्वतःचाच राग येत होता.

' आपण शिकून स्वतःच्या पायावर उभे राहून ही सासरच्या लोकांसमोर आपले मत ही मांडू शकत नाही ' ,याची तिला खंत वाटत होती.

' माझी काय अपेक्षा आहे, हे तर कोणी विचारले ही नाही ' , असे साक्षीला वाटत होते.

घरी तर चार दिवस सासूचे व चार दिवस सुनेचे असे सुरू झाले होते.