'स्व'तःचा शोध (भाग 20)

As A Female

आज पहाटे साक्षी लवकरच उठली.

तिने ठरवले होते की , ' आई सारखेच आपल्याला लवकर उठण्याची सवय लावायची आहे ' .

ती दहावीत असल्यापासून तसा प्रयत्न करत होती पण आठ दिवसानंतर जैसे थे.

भल्या पहाटे फक्त तिची आईच उठत असे. पहाटे पासूनच तिच्या कामाला सुरुवात होई.

त्यानंतर बाबा उठून बाहेर राऊंड मारून येत असत. शरीराला व्यायाम हवा म्हणून बाहेर फेरफटका मारायला जात.

' फक्त पुरुषांनीच व्यायाम करून शरीर सुदृढ बनवावे का ? ' , असा प्रश्न साक्षीच्या डोक्यात येत असे.

तिने त्याबाबत आईलाही विचारले होते.

पण आईने तो विषय टाळला.

' घरातील कामे करून स्त्रियांच्या शरीराची हालचाल होते मग वेगळा व्यायाम कशाला करायला हवा ' , असे तिने उत्तरे दिली होती.

तरी पण साक्षी आईचा पिच्छाच सोडत नसे.

कधी- कधी मग नाईलाजाने साक्षीची आई तो विषय टाळण्यातच आपला शहाणपणा आहे असे मानत होती.

आजी-आजोबा सावकाश उठत असत. त्यांना कुठे बाहेर जाण्याची घाई नसायची आणि कामे करण्याची सक्ती नसायची. त्यामुळे ती दोघं जागी जरी असली तरी बिछान्यावर पडून राहात.

सगळ्यात शेवटी तिचा भाऊ उठत असे. रात्री तो बाहेरून उशिरा येत मित्रांकडून.

त्याने आजोबांकडून हट्टाने मोबाईल घेतला होता. घरी आल्यानंतर तो मोबाईल मध्ये तोंड खुपसून बसत असे. खूप जागरण झाल्याने तो सकाळी कधीच लवकर उठत नसत.

बाबांना ते आवडत नव्हते त्यामुळे ते आईला सतत बोलत, " सगळ्यांना लवकर उठण्याची सवय लागावी.

सकाळी लवकर उठले की आरोग्य, धनसंपदा, आयु मिळते.

चिरंजीवांना थोडसं लवकर उठायला सांगा " .

आई मात्र हसत विषय टाळत असे.

माझी मात्र लवकर उठन्यापासून सुटका कधी झाली नाही.

जेव्हापासून कळायला लागले,  तेव्हापासून मला लवकरच उठवले जाई.

मला आठवत नाही की मी उशिरापर्यंत कधी झोपून राहिले.

मला आठवते की, ' जेव्हा मी उशिरा उठायची तेव्हा आई माझा राग- राग करत.

बाबा तर तोंड ही पाहत नसत.

त्यामुळे मला कळून चुकले होते की आपल्याला लवकरच उठावे लागेल ' .

तसे ही घरातील कामे भरपूर असतात त्यामुळे आई मला रोजच लवकर उठवत.

म्हणून तर मला वाटायचे की , ' आई भाऊला का घरातील कामे सांगत नाही ?

त्याला ही पोट आहे, बाहेर चे सध्यातरी जास्त कामं नाहीत मग घरातील कामे करायला काय हरकत आहे ' .

' आपला भारत देश हा पुरुष प्रधान संस्कृतीचा देश आहे.

मोडेल पण वाकणार नाही अशी पुरुषांची गत आहे ' , असे साक्षीला वाटत होते.

बाबा ही सकाळी लवकर उठत पण विशेष असे काम करत नसत.

ते तर कधी पाण्याचा ग्लासही भरून घेत नसत.

आईच सगळं त्यांच्या हातात देत होती. म्हणजे तशी सवय आजीने बाबांना लावून ठेवली होती.

' घरातील कामे काय कमी होती का आई पण सगळं बाबांच्या हातात स्वतःहून नेऊन देत होती.

निदान तिने तरी या गोष्टीला विरोध करायला हवा होता. असो. ' , असे साक्षी स्वतःशीच बोलत होती.

बाबांना सकाळी वेळच वेळ असतो त्यामुळे ते व्यायाम करायला बाहेर पडत.

आई मात्र सकाळपासून कामाच्या रहाटगाडग्यात अडकलेली दिसत.

पिढीने पुढे असेच चालत राहणार.

जोपर्यंत कोणी त्याला विरोध करत नाही तोपर्यंत.

पहिल्या काळात आदराने सगळे पुरुषांच्या हातात दिलं जात व पुरुष ही बाहेर कष्टाची कामे करत असत. त्यामुळे बहुतेक ही परंपरा चालत आली होती.

आता जरी पुरुषांनी घरातील कामे करायला सुरुवात केली तर त्यांचा तो आदर कमी होणार नाही.

जर खरंच त्यांचा त्यांच्या घरातील सदस्यांवर प्रेम असेल तर कामात मदत करायला काहीच हरकत नाही.

उलट समोरच्याचा भार थोडा हलका होईल व त्याला आराम ही भेटेल. 
                           
साक्षी ला वाटत होते की , ' होणारा माझा नवरा तरी घरातील कामे करणारा असावा ' .

पण तिने जीभ चावली आणि तो विषय डोक्यामध्ये च जिरावला.

' असं काही होणार नाही हे त्रिवार सत्य आहे असे मानून च पुढे जावे लागेल.

आपण काही महाराष्ट्राच्या बाहेर किंवा देशाच्या बाहेर लग्न करून जाणार नाहीत. त्यामुळे घरोघरी मातीच्या चुली ' , असा ती विचार करत होती.

साक्षी पटापट आवरून क्लासचा वेळ गाठत होती.

MS-CIT ची परीक्षा पण दोन आठवड्यावर घेऊन ठेपली होती. या परीक्षेचं तिला काही टेन्शन नव्हते.

तिला सगळे लक्षात राहिले होते.

कंप्युटर कसे हाताळावे याचे कमांडस त्याबद्दल पेपर होता.

दोन महिन्यांमध्ये क्लासमध्ये ही चांगली तयारी करून घेतली होती.

तिला वाटत होते , ' टायपिंग करून ठेवावा की नको पण क्लार्क, लिपीक पोस्ट म्हणजे आपल्या बुद्धीवर अन्याय करण्यासारखे आहे.
नको . आपल्यात क्षमता आहे तर मग दुसर्‍या मोठ्या पदाचा का प्रयत्न करू नये ' .

पण साक्षीला याचा अंदाज नव्हता की कोणतीही पोस्ट छोटी किंवा मोठी नसते.

सगळे काही आपल्या मानण्यावर आहे.

आई बरोबर ती मेहंदी चे डिझाईन शिकू लागली. तिला मेहंदीचा सुगंध खूप आवडत असे.

सुरेख रांगोळ्या पण ती काढू लागली.

देवपूजा, देवासाठी हार बनवणे, उपास-तापास असले की पूजेची सर्व तयारी साक्षीच करत असे. त्यामुळे साक्षीच्या मनामध्ये भक्तीभाव हा आईकडूनच रुजलेला होता.

' उपास-तापास सगळे आईलाच असतात बाबांना का नसतात ?

साक्षी -साक्षी बस कर जास्त डोकं नको लावूस नाहीतर डोकं फुटण्याची वेळ येईल ' , असं बोलून काही -काही वेळा साक्षी तो विषय विचार करण्याचा टाळत असे.

समाजामध्ये असे कितीतरी घटक आहेत ज्याचा विचार नक्कीच करायला हवा.

जे सकारात्मक व सगळ्यांच्या दृष्टीने योग्य आहे तो घटक पुढे चालू ठेवायला काही हरकत नाही.

पण असे घटक जे नकारात्मक व काहींच्या दृष्टीने अयोग्य असतील तर ते तिथेच थांबायला हरकत नसावी.

पण असे घटक ओळखून निर्णय घेण्यासाठी समोरचा जातीचा असावा.

हे येड्या गबाळ्याचे काम नाही.

गावातील कम्प्युटर सेंटर मध्ये च साक्षी एम एस सी आय टी चा कोर्स पूर्ण करत होती.

तिथे तिच्या च वयाची बरेच मुले -मुली कोर्स करायला येत असत.

मुलींशी तिचं बोलणं होत होतं मात्र मुलांकडे ती ढुंकूनही पाहत नसत.

घरातील कडक वातावरणामुळे तिला आता मुलांचा तिटकारा वाटू लागला होता.

मुले दिसले की तिला आतूनच राग येत असे.

तिला वाटत होते की , ' या मुलांमुळे च माझ्यावर बंधने येत आहेत. असे असेल का की मुलांनी मुलीशी बोलले तर मुलावर ही बंधने लादली जातील.

काय माहित.

भाऊ ला विचारून बघू का ?

तुला बाबा कधी काही मुलीवरून बोलले आहेत का?

पण भाऊ तर कधीच कसला थांगपत्ता लागू देत नाही.

तो असा वागतो की त्याला सगळे जग मोकळे आहे फिरायला.

मला मात्र बंधनाच्या बेडीत अडकवून ठेवले आहे.

मला घराच्या बाहेर पडायचे असले की एक तर आई, आजी किंवा मैत्रिणी सोबत जावे लागतं.

मी तरी जाऊन- जाऊन कुठे जाणार.

शेजारी असलेल्या काकूंकडे ,मैत्रिणीकडे किंवा मंदिरामध्ये ' .

गावामध्ये जागो-जागी दगडाने बांधलेले कट्टे आहेत.
त्याच्याशेजारीच भले मोठे झाड आहे.

कधी-कधी मध्ये झाड ठेवून त्याच्या सभोवती दगडाचा गोल कट्टा बांधला गेला होता. त्यामुळे त्या झाडाची दिवसभर सावली राहत. त्या कट्ट्यावर फक्त वृद्ध पुरुष किंवा मध्यम वयाचे पुरुष किंवा तरुण मुले बसलेली दिसत.

तिला जेव्हा पासून कळते तेव्हापासून तिथे कोणी लहान मुली पण त्या कट्ट्यावर बसलेल्या दिसल्या नाहीत.

मोठ्या स्त्रियांचा तर प्रश्नच येत नाही.

ती पण कधी त्या कट्ट्यावर जाऊन बसली नाही.

लाईट गेल्यावर तर तो कट्टा सगळ्यांचा हक्क असल्यासारखे सगळे जण तिथे जाऊन बसायचे.

' मग घरातील स्त्रियांना गरम होत नाही का?

त्यांना उकाड्याचा त्रास होत नाही का? ' , असे बरेच प्रश्न साक्षीच्या मनात सतत घोळत असत.

त्यामुळे तिला छोट्या- छोट्या गोष्टीतही सतत स्त्री-पुरुष , मुलगा- मुलगी असा भेदभाव दिसत असत.

पण ती सध्या काहीच करू शकत नव्हती.

पुढे जाऊन तरी ती काही करू शकेल का ?

हा प्रश्न उरतच होता.

क्रमशः

🎭 Series Post

View all