'स्व'तःचा शोध (भाग 23)

As A Female

साक्षीची आई समजावत होती की, " बघ, तुझ्या मैत्रिणीला करण्याची इच्छा असून तिला ऍडमिशन भेटले नाही तुला तर इतक्या सहज मिळाली आहे. ती सुवर्णसंधी का सोडतेस तू " .

पण साक्षीचे मन काही केल्या तयार होत नव्हते.

तिची आवड आणि निवड ठरलेली होती.

साक्षी ही हट्टाने पेटून उठली होती.

भविष्यात आपल्या पदरात काय पडणार आहे हे कोणीही सांगू शकत नाही.

साक्षीला ही हे माहीत नव्हते की एवढी मोठी सुवर्णसंधी चुकल्यानंतर पुढे तिच्या नशिबी काही लिहिले गेले आहे.

तसा तर नशीबावर विश्वास ठेवणे चुकीचे आहे.

आपण जे काय कष्ट करतो त्यानुसारच आपल्याला फळ मिळत असते.

फक्त योग्य वेळी योग्य दिशा ओळखून निर्णय घेणे शहाणपणाचे ठरते.

साक्षी आपल्या निर्णयावर कायम राहिली.

दोन आठवड्यानंतर सीईटी व नीट परीक्षेचा रिझल्ट येणार होता.

साक्षीची आतुरता शिगेला पोहोचली होती.

तिची मैत्रीण तिला घरी भेटायला येत असे. तिच्या घरी लग्नाविषयी बोलणी सुरू झाली होती. अशी तिची मैत्रीण लग्नासाठी तयार झाली होती. कारण आता पुढे कोणता मार्ग तिच्यासमोर नव्हता.

एक तर परिस्थिती बेताचीच होती आणि दुसरा कोणता कोर्स करायचा म्हटला तरी ते तेवढे फी भरू शकणार नव्हते , हे तिला माहीत होते.

उगाच कशाला अग्नीची परीक्षा म्हणून तिने शेवटी लग्नाचा च निर्णय स्वीकारला.

तसे ही पुढे जाऊन लग्न हे तर ठरलेलेच आहे.

त्यापासून सुटका होणे जवळजवळ अशक्यच.

' आपल्या घरची परिस्थिती नुसारच आपल्याला येणारे स्थळे असणार आहे ' , याची कल्पना तिच्या मैत्रिणीला होती.

त्यामुळे होणारे सासर विषयी तिच्या फार काही अपेक्षा नव्हत्या.

साक्षीची आई मैत्रिणीला समजावत होती की, " तुला कोणता छंद असेल तर तो मनापासून जोपास " .

तिची मैत्रिण डोक्यामध्ये वेगवेगळे कपडे शिवण्याचे डिझाईन्स तयार करत असे.

कारण बऱ्याच वेळा साक्षी आणि तिची मैत्रीण जेव्हा कपडे शिवण्यासाठी टेलर कडे जात तेव्हा तिची मैत्रिण नेहमी गोंधळ घालत असे.

टेलर ने सांगितल्यापेक्षा ही तिच्या मनाचे च डिझाईन्स टेलर कडून शिवून घेत. 

साक्षीने ओळखले होते की , ' तिच्या मध्ये कपडे शिवण्याची कला आहे. त्यामध्ये ती नवीन डिझाइन्स बनवून काहीतरी वेगळे स्वतःचे स्थान निर्माण करू शकेल ' .

पण तिच्या मैत्रिणीचे डोके बधिर  झालेले असल्याने तिला या गोष्टीची कल्पना ही सुचली नव्हती.

ती आपली सहजच मन मोकळे करायला साक्षीच्या घरी येऊन बसली होती.

साक्षीने तिला सुचवले, " तू , वेगवेगळ्या डिझाइन्स शिवण्याची प्रॅक्टिस का करत नाहीस " .

तेव्हा तिची मैत्रीण जवळ -जवळ किंचाळली च.

" खरंच ! हे माझ्या लक्षातच आले नाही मेली च्या. साक्षी, खरंच ! तू खूप हुशार आहेस " , असा शेरा तिच्या मैत्रिणीने तिला दिला व ती आनंदाने घरी परतली.

गावामध्ये टेलर बहुतेक करून पुरुषच होते.

तिच्या मैत्रिणीची पंचायत झाली.

स्त्री टेलर तिला कुठेही भेटली नाही. तिने या गोष्टीवर पहिला कधी विचार केला नव्हता.

तिने ठरवले , ' तालुक्याच्या ठिकाणी जाऊन आपण शिवण क्लास व वेगवेगळे डिझाईन्स शिकून घ्यावे. म्हणजे लग्नानंतर ही कपडे शिवण्याची कोणतीही अडचण येणार नाही ' .

ती तयारीलाही लागली होती.

साक्षी च्या मोबाईल वर मेसेज आला होता मैत्रिणीकडून.

कॉलेजमधील एका मैत्रिणीचे लग्न ठरले होते.
तिने साक्षीला आमंत्रण दिले होते लग्नासाठी.

साक्षी ला आश्चर्याचा धक्का च बसला होता.

तिची मैत्रीण अभ्यासामध्ये तिच्याच एवढी हुशार होती.
मग ' हिने लग्नाचा इतक्या लवकर निर्णय कसा काय घेतला ' , याची तिला उत्सुकता लागली.

ती मोबाईल फक्त बाबा घरी आल्यानंतरच वापरत होती.

संध्याकाळ खूप झाल्यामुळे तिला फोन करता आला नाही. मग तिने मेसेज करून च याची विचारणा केली.

" मुलगा परदेशामध्ये वेल सेटेलड आहे तर घरच्यांनी ते स्थळ जाऊ द्यायचे नाही असे ठरवून लग्न ठरवले व तिकडे जाऊन पुढील शिक्षण घे म्हणून मी ही तयार झाले " , तिच्या मैत्रिणीने उत्तर पाठवले होते.

तिच्या आत्याचा च मुलगा होता.

साक्षीला ही परदेशात जाण्याची इच्छा होती.

पण जाणार कसे हा भला मोठा प्रश्न तिच्यासमोर उभा होता ?

तिने इतिहासाच्या पुस्तकांमध्ये वाचलं होतं , ' अगोदरच्या काळातील बरेच क्रांतिकारी लोकांनी परदेशात जाऊन शिक्षण घेतले होते ' .

' त्यांना हे कसे शक्य झाले असेल ? 

आपण काळाचे कितीतरी पुढे आलो आहोत तरी परदेश म्हटलं की खूपच अडचणीचे वाटते.

पूर्वीच्या काळी जाण्यासाठी ही साधने नव्हती तरी ती लोकं पाण्यातून जहाजामध्ये बसून कितीतरी दिवस प्रवास करून दुसऱ्या देशात पोहोचले होते.

तेव्हा ही त्यांना खूप खर्च हा आलाच असणार आहे.

पण सध्याच्या घडीला ही आपल्याला परदेशात जाणे शक्य होत नाही.

एवढी साधन सुव्यवस्था असतानाही आपण तिकडे शिक्षणासाठी जाऊ शकत नाही.

परदेश तर सोडाच आपल्या भारत देशामध्ये ही महाराष्ट्र सोडून तरी दुसऱ्या ठिकाणी शिक्षणासाठी पाठवायला आपल्या घरातील मोठी मंडळी तयार होतील का?

मुलांसाठी ते तत्पर असतील पण मुलींसाठी मात्र नक्कीच विचार करण्यासारखे आहे ' , साक्षीचे मन बोलत होते.

' माझ्या घरातील तर कधीच पाठवणार नाहीत.

जिल्ह्याच्या ठिकाणी तरी पाठवतील की नाही हीच शंका आहे ' , असे तिला वाटत होते.

तिच्या कॉलेजमधील मैत्रिणीं बऱ्याच सुशिक्षित घरातील असल्याने त्यांना पुढे जाण्यासाठी मार्ग खुले होत आहेत.

पण आपल्या नशिबी मात्र बहुतेक खेडं च ठरलेलं आहे.

ह्या विचाराने साक्षीचे डोके मात्र सुन्न झाले.

साक्षीचे आज घरातील कोणतेही कामात लक्ष लागत नव्हते.

तिला हा एकच विचार सतावत होता की  ' आपला जन्म का खेड्यात झाला आहे. नी त्यातून बाहेर पडण्यासाठी कोणतेही मार्ग उपलब्ध नाहीत.

एक तर शिक्षणानिमित्त बाहेर पडता येईल किंवा लग्नानिमित्त.

पुढील शिक्षणासाठी तर घरातील तयार नाहीत आणि लग्न हे खूप मोठ्या शहरांमध्ये तर जमू शकणार नाही.

कारण शहरातील मुलांनाही शहरातीलच मुली आवडतात.

शहरातील आणि खेड्यातील मुलींच्या वावरण्यात फरक असतो.

त्यामुळे जास्तीत जास्त जिल्ह्याच्या ठिकाणापर्यंत मी पोहोचू शकेन. त्यापुढे बहुतेक नाही ' .

नीट परीक्षेचा रिझल्ट वेबसाईट वर धडकला होता.

तिला मैत्रिणीकडून तसा मेसेज आला.

बाबांनी रात्री तिला मेसेज दाखवला.

तिला कसे रिझल्ट पाहतात हे माहीत नव्हते, त्यामुळे तिने उद्या कम्प्युटर सेंटर मध्ये जाऊन रिझल्ट पाहायचा ठरवला.

तिच्या मनामध्ये धाकधुक होत होती.

त्या रात्री ती खूप अस्वस्थ होऊन झोपी गेली.

भल्या पहाटे तिला अचानक जाग आली.

आपलं जर मन बेचैन असेल तर आपली रात्री झोप ही नीट होत नाही.

साक्षीला रात्रभर नीट झोप लागली नाही, ती सारखं तळमळत होती.

घरचं पटापट आवरुन ती मैत्रिणीच्या घरी गेली.

ती मैत्रिणीला घेऊन कम्प्युटर सेंटर मध्ये पोहोचली. तिथे सकाळपासूनच बरीच मुलांची गर्दी होती रिझल्ट पाहण्यासाठी.

आजूबाजूच्या खेड्यातील मुले ही तिथे जमा झाली होती. त्यांच्या गावामध्ये कम्प्युटर सेंटर नसल्यामुळे.

तिने सोबत रोल नंबर आणला होता, तो कम्प्युटर मध्ये टाकून रिझल्ट चेक केला.

तिने मार्क्स पाहिले आणि ती अवाकच झाली.

तिच्या अपेक्षा पेक्षा तिला मार्क कमी भेटले होते.

तिच्या डोक्यामध्ये विचारांची गर्दी झाली , ' MBBS , BHMS किंवा BAMS ला ऍडमिशन मिळणे जवळ-जवळ अशक्यच आहे ' .

तिचे डॉक्टर होण्याचे स्वप्न आता धुळीला मिळणार होते.

पाहिलेल्या स्वप्नापैकी हे एक स्वप्न तिच्या हातातून निसटून गेले होते.

अभ्यासामध्ये हुशार होती पण योग्य तो सराव न करता आल्याने तिच्या हाती निराशाच पडली.

ती निराश होऊनच घरी परतली.

मैत्रिणीला ही काही जास्त बोलली नाही.

तिच्या मैत्रिणीला वाईट वाटत होते .

' मला पुढे शिकता आले नाही पण साक्षीला तरी पुढचे शिक्षण मिळू दे , देवा ! ' , अशी मनोमन प्रार्थना करत होती.

त्या दोघी ही घरी परतल्या.

साक्षी चा तर सगळा मूडच गेला होता.

घरी आल्यापासून ती गप्प -गप्पच राहत होती.

आईने तिला खोदून- खोदून विचारले पण तिने फक्त " मार्क्स कमी भेटले " , एवढेच सांगितले.

ती दुपारी नीट जेवली ही नाही.

माणसाची मनस्थिती व्यवस्थित नसली की बोलण्याची ही इच्छा होत नाही.

अशीच अवस्था साक्षी ची झाली होती.


क्रमशः

🎭 Series Post

View all