'स्व'तःचा शोध (भाग 22)

As A Female

पहाटे लवकर जाग आली साक्षी च्या आईला.

तिने पाहिले सगळीकडे निरव शांतता होती.

साक्षी कडे तिने एकदा कटाक्ष टाकला.

मुले कशी साखरझोपेत आहेत.

कोणतीही आई आपल्या पिल्लांना त्रास देऊ शकत नाही. पण चांगले वळण लावण्यासाठी तिला साक्षीला उठावावे च लागले.

भाऊला मात्र तिने उठवले नाही.

नाहीतरी तो उठलाही नसता.

साक्षीला आता तसे ही ॲडमिशन च्या टेन्शनमुळे गाढ झोप लागत नसे.

जाग आल्यानंतर डोक्यामध्ये विचारांची गर्दी होत असत.

' त्यापेक्षा उठून कामाला लागलेले बरे ' , असे तिला वाटत होते.

विचाराने नुसते डोकं बधीर होऊन जातं.

मग मात्र काहीच सुचत नाही.

' त्यापेक्षा स्वतःला कामांमध्ये गुंतवून घेतल्यावर थोडे कमी विचार डोक्यामध्ये येतात ' , त्यामुळे साक्षी घरातील कामावर लक्ष केंद्रित करत होती.

तसे ही पुढे जाऊन तिला घरातील काम करावे तर लागणारच होते ही काळा दगडावरची पांढरी रेघ होती.

स्त्री जातीला घरातील कामापासून सुटका नसणार आहे.

जर ती स्त्री नोकरी करणार असेल किंवा बिजनेस करत असेल किंवा सासरचे लोक गर्भश्रीमंत असतील तरच घरातील कामापासून तिची सुटका होऊ शकते.

नाहीतर हे जवळजवळ अशक्यच.


बाबा आवरून बँकेत निघाले होते.

आईने त्यांना नाश्ता देताना आठवण करून दिली, " आज डी एड ची मेरिट लिस्ट लागणार आहे. साक्षीचे काय होते ते बघून घ्या " .

त्यांनी मानेनेच होकार दिला.

साक्षीने फक्त त्या दोघांचे संभाषण ऐकले.

त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव ही तिने पाहण्याचे टाळले.

कारण तिला माहीत होते, ' दोघांच्याही मनात डी एड करण्याचे च आहे ' .

जे साक्षीला आवडत नव्हते.

फक्त त्यांच्या समाधानासाठी तिने डी एड साठी फॉर्म भरला होता.

' पण आता यांनी जबरदस्ती ने माझे डी एड साठी अडमिशन करू नये म्हणजे झालं. त्यापेक्षा मी तर म्हणेन तुम्ही लग्नाचेच बघा. तिकडे गेल्यावर बघू मग दुसरा कोणता मार्ग आहे का ते ' , असे साक्षी स्वतःलाच समजावत होती.

साक्षी चे बाबा बँकेत निघून गेले.

साक्षी आणि तिच्या आईने घरातील सर्व आवराआवर करून निवांत मेहंदी काढत बसल्या होत्या.

पहिल्यापेक्षा तिच्या आईला मेहंदीच्या भरपूर ऑर्डर मिळत होत्या. तिच्या हातात खरंच कला होती.

पण खेड्यातील मानाने पैसे जास्त मिळत नसायचे.

तिच्या कोणत्या कोर्सला पुरतील एवढे पैसे नक्कीच मिळत नव्हते. पण त्यांच्या संसाराला हातभार लागतील अशी थोडी फार तिची मिळत होती.

पण तिच्या आईचे मत होते , ' थेंबे थेंबे तळे साचे ' .

' साक्षीच्या शिक्षणासाठी खारीचा वाटा तरी मी उचलू शकेन ' , असा आत्मविश्वास तिच्या आईमध्ये निर्माण झाला होता.

तिची आई खुश होती.
                           
साक्षीला कळत नव्हते की , ' मेरीट लिस्ट मध्ये तिचे नाव आहे की नाही. कारण आता बरीच मुले डी एड साठी वळली होती. प्रत्येक जण कोणत्या ना कोणत्या कोर्सला नावे हा ठेवतच असतो पण बघावे तिकडे गर्दी ही प्रचंड असते. कारण लोकसंख्या ही जास्त आणि स्पर्धाही तीव्र असते. त्यामुळे फुल ना फुलाची पाकळी असा म्हणून डी एड कडे वळतात ' .

पण साक्षीला मात्र फरक पडत नव्हता तिच्या मनातच नव्हते शिक्षक बनण्याचे.

तिच्या शेजारच्या काकूंनी तिच्यासाठी एका शिक्षकाचे स्थळ सुचवले होते.

साक्षीने त्यास साफ नकार दिला.

तिच्या काकूंनी मात्र तिच्या मैत्रिणी कडे बोलून दाखवले, " हिला कोणी मोठा बिजनेस मेन च मिळणार आहे " .

साक्षी पर्यंत ही बातमी पोहोचली होती.

साक्षीला कळत नव्हते की  , ' लोकांना काय करायचे आहे आजूबाजूच्या घरामध्ये कोण कोणाशी लग्न करते ते.

जमत असेल तर सहकार्य करावे किंवा साफ दुर्लक्ष का करत नाहीत ही समाजातील लोकं.

ह्या अशा शेजारांमुळे समाजातील चालीरीती बदलत नाहीत.

लोकं नावं ठेवतील म्हणून त्या तशाच प्रथा चालू राहतात ' .

साक्षीने घरामध्ये बजावून ठेवलं होतं की , ' मी पुढचं शिक्षण घेतल्याशिवाय अजिबात लग्न करणार नाही.

जर तुम्हांला लग्न करून द्यायचं असेल तर मी मुकाट्याने ते करेन ही पण आयुष्यामध्ये कधी ही सुखी राहणार नाही.

घराकडे ही कधी फिरकणार नाही ' .

साक्षीच्या धमकी वजा बोलणे त्यामुळे आई घाबरली होती.

तिने तसेच बाबांना ही सांगितले.

बाबा हे सगळे निर्विकार चेहऱ्याने ऐकत राहिले. त्यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही.

फक्त एवढेच म्हणाले , " मेरिट लिस्ट मध्ये साक्षीचे नाव आले आहे. साक्षीची संमती असते तर ऍडमिशन घेऊन टाकू. डी एड पूर्ण झाल्यावर मग आपण लग्नाचे पुढे बघू " .

आईच्या मदतीने साक्षी पर्यंत ही बातमी पोहोचली.

पण त्याचा काही उपयोग झाला नाही.

साक्षीचे मन तयारच नव्हते.

' माझ्या वर्गातील मैत्रिणी कुठे- कुठे पोहोचतील आणि मी एक जिल्हा परिषदेत शिक्षक बनून राहू हे माझ्या बुद्धीला न पटणारे होते ', असेच साक्षीचे मन खात राहिले.

पण खरंच आपण आपल्या मैत्रिणींचा विचार करायला हवा का ?

प्रत्येक जण घरच्या परिस्थितीनुसार व बुद्धिमानानुसार पुढे शिकत राहतो व जोडीदार मिळत राहतो.

कोणा बरोबर अशी तुलना करू नये करियर बाबतीत आणि जोडीदार मिळण्याबाबत.

प्रत्येकाचे राहणीमान वेगळे असते.

त्यानुसार जोडीदार मिळत राहतो.

कोणतेही काम हलके कधीच नसते. हलके असतात ते आपले विचार असतात.

पण हे साक्षीला कोण सांगणार.

गावातील तिची मैत्रीण तिचं मेरिट लिस्ट मध्ये नाव आले नव्हते.

ती साक्षी ला भेटायला घरी आली होती.

तिने साक्षीला विचारले , " तुझे मेरी लिस्टमध्ये नाव आले तर तू ॲडमिशन घ्यायला पाहिजे. तू दुसऱ्या ही परीक्षा दिलेल्या आहेत पण त्यांना अजून वेळ आहे नाहीतर तेल ही गेले नी तूप ही गेले , हाती आले धोपाटणे अशी गती होऊन बसायची " .

साक्षी फक्त ऐकून घेत होती.

तिचे ही मन आता चलबिचल होऊ लागले होते.

मैत्रीण उदास झाली होती. तिला फक्त हेच करियर निवडायचे होते आणि त्यात तिला यश मिळाले नव्हते.

घरच्यांनी आता लग्नाचे बघावे असा निर्णय घेतला होता.

तिला ही काही कळत नव्हते की आपण दुसरे काही करू शकतो का?

साक्षीची आणि तिची अवस्था जवळजवळ सारखीच होती.

तिला घरातील कामे मात्र सगळी जमत होती. तिला तशी आवड ही होती.

साक्षीचे मात्र तसे नव्हते.

साक्षी फक्त आता सीईटी व नीट चा रिझल्ट ची वाट पाहत राहिली.

तिचे मन सांगत होते की , ' माझ्यासाठी चांगलं नक्कीच काहीतरी होईल. पण मला डी एड मध्ये गुंतायचे नाही ' .

तिच्या मामांकडून ही एक स्थळ सुचवले गेले होते.

ते व्यवसाय करत होते . त्यांचे कपड्याचे शॉप होते. त्यांचा व्यवसायामध्ये चांगला च जम बसलेला होता.

साक्षीने मामा शी तर जवळ-जवळ अबोलाच धरला.

' काका, मामा, मावशी ,आत्या ह्या शिक्षणासाठी पुढे काय मार्ग निघतो का त्यामध्ये मार्गदर्शन किंवा मदत न करता फक्त लग्नाचे च यांना कसे काय सुचू शकते.

लग्न पेक्षाही इतर विषय यांच्या साठी महत्वाचे का नाहीत?

आयुष्यामध्ये करण्यासारखे असे बरेच मार्ग आहेत.

असे वर्तमानपत्रात किंवा रेडिओ वरती सांगितले जाते मग ही मोठी मंडळी तो मार्ग का सुचवू शकत नाहीत ' , असे साक्षीला वाटत होते.

 तिचा भाऊ दहावीला होता पण तो विशेष असा काही अभ्यास करत नसे.

आईला वाटत होते , ' तो पोलिस खात्यात मोठा ऑफिसर बनावा ' .

बाबांना वाटायचे , ' त्याने सरकारी नोकरी मिळवावी ' .

आजी -आजोबा ना तर खूप मोठी अपेक्षा होती , ' त्याने मोठा काहीतरी बिझनेस करून चार चाकीतून फिरावे ' .

माझ्या बाबतीत मात्र सगळ्यांचे एकमत होत असे, ' लग्ना बाबतीत ' .

' समाजामध्ये मुलीचा जन्म झाला की फक्त लग्न हाच तिच्याबाबतीत चिंतेचा विषय ठरू शकतो का?

पहिल्या काळामध्ये हुंडा दिला जायचा त्यामुळे बर्‍याच पालकांचा तो चिंतेचा विषय ठरलेला होता.

पण आता काळ बदललेला होता तरी मुलगी झाली की बऱ्याच कुटुंबामध्ये निराशा च दिसत होती.

सरळपणे हुंडा न मागता किंवा न देता तो अदृश्य स्वरूपात तरी अजून ती प्रथा दिसून येत च होती.

लग्नासाठी होणाऱ्या खर्चामुळे च बहुतेक मुलींच्या शिक्षणाकडे  पालक दुर्लक्ष करत असतील ' , असे साक्षीला वाटत होते.

99% हे नक्कीच खरे होते.

क्रमशः

                         

🎭 Series Post

View all