'स्व'तःचा शोध (भाग 26)

As a Female

साक्षीने कॉलेजमधून आल्यानंतर सगळी माहिती बाबांना सांगितली. कॉलेजमधील बऱ्याच शिक्षकांना पुढील शिक्षणाची माहिती होती. त्यांची मित्रमंडळी ही त्या क्षेत्रामध्ये असल्याने त्यांना वेळोवेळी माहिती मिळत होती.

साक्षी कॉलेजमध्ये गेल्याने त्याचा फायदा झाला.

" शासकीय प्रायव्हेट कॉलेजेस मध्ये ऍडमिशन मिळू शकते. तुम्हाला पाहिजे त्या कॉलेजमध्ये ऍडमिशन मिळवण्यासाठी फॉर्म भरून द्यावा लागतो.

चार वर्षाचा डिग्री कोर्स आहे, बीएससी नर्सिंग.

डिग्री पूर्ण झाल्यानंतर तुम्ही प्रायव्हेट किंवा शासकीय हॉस्पिटलमध्ये नर्स स्टाफ म्हणून नोकरी करू शकता.

कोणत्याही हॉस्पिटल मध्ये ऍडमिनिस्ट्रेटर व वेगवेगळ्या डिपार्टमेंट मध्ये काम करू शकता.

पेशंटची सेवा करू शकता.

मुलांना शिकवण्याची आवड असेल तर कॉलेजमध्ये ही असिस्टंट प्रोफेसर म्हणून नोकरी करू शकता.

कॉलेजमध्ये पुढील बढती पाहिजे असेल तर मास्टर किंवा कोणत्याही विषयांमध्ये स्पेशलायझेशन करत पीएचडी करू शकता. डॉक्टरेट ही पदवी मिळते.

कॉलेजमधील अनुभवानुसार व डॉक्टरेट पदवी मिळाल्यानंतर तुम्ही प्रिन्सिपल बनू शकता.

बारावीनंतर नर्सिंग साठी वेगवेगळ्या डिप्लोमा कोर्सेस पण आहेत. त्यानंतर ही डिग्री कडे वळू शकता.

ह्या कोर्सला परदेशात तर खूप डिमांड आहे. तिथे पगार पण भरमसाठ मिळतो.फक्त तो जॉब तिथे करण्यासाठी त्यांची एक परीक्षा असते ती पास करावी लागते.

आयुष्यमान भारत 2018 पासून अजून एक नवीन शासकीय पद निर्माण करण्यात आले होते.

CHO(COMMUNITY HEALTH OFFICER) हे पद गावागावांमध्ये शासनाने निर्माण केले होते.

पेशंट ची तपासणी करणे व त्यांच्या लेव्हलला खूप जास्त सिरीयस नसेल तर ते औषधोपचार करत " , साक्षीने हे सगळं एका दमात सांगून टाकले.

पण साक्षीचा गावामध्ये हे ऑफिसर अजून आलेले नव्हते.
बहुतेक सुरुवात झाली असावी अजून त्याची वाढ दिसून आली नव्हती.

साक्षी सुरुवातीपासून असे सांगत होती तसे सगळेजण लक्ष देवून ऐकत होते.

आईला तर साक्षी डॉक्टर झाल्यासारखीच भासली.

बाबांनी सर्व ऐकून घेतले.

बाबांनी तिला हिरवा कंदील दाखवला.

" जवळच्याच कॉलेजमध्ये कुठेतरी ॲडमिशन घेऊ " , असे बाबांनी तिला आश्वासन दिले.

तिने कम्प्युटर सेंटर मध्ये जाऊन ऑनलाइन फॉर्म भरून घेतला.

तिच्यासोबत आता तिची मैत्रीण पण नसायची.

त्या मैत्रिणी चे लग्न ठरले होते व जवळच्याच गावामध्ये तिचे सासर होते. मैत्रिणीचा होणारा नवरा मुलगा शेतकरी होता. जशी मैत्रिणीची परिस्थिती होती तशीच परिस्थिती नवऱ्या मुलाची ही होती.

इतर सर्वांना माहीतच आहे की जसे नवर्या मुलीकडे परिस्थिती असते त्याच तोला मापाचे येणारे समोरून ही स्थळ असते.

क्वचितच मोठ्या घराचे स्थळ चालून येते.

एकतर नवरी मुलगी सुंदर असावी किंवा मोठी शिकलेली असावी किंवा नोकरी करणारी असावी तरच मोठे स्थळ येते.

त्यामुळे प्रत्येकाला समोरून येणाऱ्या स्थळाचा अंदाज हा असतोच.
                           
साक्षीला प्रतिक्षा फक्त आता कॉलेज मिळण्याची होती.

एक आठवड्यानंतर कोणत्या कॉलेजला नाव आले आहे हे वेबसाईटवर पाहायला मिळणार होते.

कॉलेजमधील बऱ्याच मैत्रिणींनी वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये पदार्पण केले होते.

काही मैत्रिणींनी संसारात उतरायचे ठरवले होते.

आपल्या -आपल्या परीने सगळ्यांनी आपली पुढील वाट धरलेली होती.

साक्षीच्या हातामध्ये ही कला होती ते सहजच म्हणून आईकडून मेंदीचे डिझाइन्स शिकून घेतली पण तिला नवीन -नवीन अजून डिझाईन्स खूप छान प्रकारे काढता येऊ लागल्या होत्या.

आईला ही लेकीचे चे खूप कौतुक होते.

तालुका ठिकाणाहून तिच्या मैत्रिणीच्या लग्नाचे ऑर्डर तिच्या आईसाठी आले होते पण साक्षीने जायचे ठरवले.

बाबांनी तिला परवानगी दिली कारण तिची मैत्रीण होती म्हणून. ती ही आनंदाने जायला तयार झाली.

 मग साक्षीच्या लक्षात आले की ' आई, जर गावाच्या बाहेर जाऊ शकत नसली तर मी तर नक्कीच जाऊ शकते. बाबा सुरूवातीला थोडे आढेवेढे घेतील पण आलेला ऑर्डर्स कशाला सोडायचा ' .

दहावीपासूनच घरातील मोठे मंडळी तिच्या शिक्षणाला आडवे येत होते तेव्हापासून साक्षीने समोरच्याला समजावत- समजावत इथपर्यंत कसेतरी मजल मारली होती.

साक्षी च्या ध्यानात आले होते की , ' माझ्या मध्ये अजून एक गुण आहे ते म्हणजे समोरच्याला पटवून देणे . त्यामुळे हा गुण जोपासणे खूप महत्त्वाचा आहे. भविष्यामध्ये कामी येऊ शकतो ' .

साक्षी मनाशीच हसली.

एक महिन्यानंतर गावातील साक्षीच्या मैत्रिणीचे लग्न झाले.

साक्षीच्या जीवाभावाची होती ती मैत्रिणी तिच्यापासून दूर गेली.

साक्षीला खूप एकटे वाटत होते.

' कधी एकदा कॉलेज सुरू होते ' , असे तिला झाले होते.

एक दिवस अचानक सुट्टी दिवशी आत्या कुटुंबाला घेऊन आमच्या घरी दाखल झाली.

आईला ही वाटले होते , ' ती अशीच आजीला भेटायला आली असेल ' .

सगळा पाहुणचार झाल्यानंतर आत्याने हळूच बाबांपुढे तिच्या मुलाबद्दल ' साक्षी विषयी ' विचारणा केली.

बाबांना तर आकाश ठेंगणे वाटू लागले होते.

त्यांना ते स्थळ ही बरे वाटले.

साक्षीला जेव्हा ह्याविषयी कळाले, तेव्हा तिचा तिळपापड झाला.

तिने त्याला स्पष्ट नकार दिला.

ती तावातावात बोलत होती, " वर्षानुवर्षे मी त्याला राखी बांधत आली. आपला भाऊ मानला आहे. त्या मुलाचा आपण नवरा म्हणून स्वीकार कसा करू शकतो.

हे तर विचित्रच आहे.

तसं ही नात्यात कधीच संबंध जोडू नयेत नाहीतर देणे-घेणे यावरून उगाच अबोला होतो.

आम्ही कॉलेजमध्ये असताना शिकलो होतो जर अनुवंशिक काही आजार असतील तर ते तसेच पिढ्यानपिढ्या आजार सुरू राहतात.

त्यामुळे नात्यात शक्यतो लग्न टाळावे " .

आत्या आल्या पावली निघून तर गेली पण जाताना आजीचे कान भरून गेली.

जाता - जाता आत्याने बाबांनाही सुनावले, "  मी पण बघते,  मोठा ऑफिसर च येणार आहे तुझ्या हाताला " .

आजीने मग आईला व साक्षीला त्रास द्यायला सुरुवात केली.

आई तर आपली शांतच राहिली होती.

आमच्या कोणाच्याही बोलण्यात ती मध्ये पडली नव्हती तरी पण तिला आता त्रास सहन करावा लागत होता.

बाबांना ही साक्षी चा राग येत होता पण ते गप्प राहिले.

त्यांनी तो राग आईवर काढला.

" काय हरकत आहे, माझी बहीण स्वतःहून तिला सून करून घ्यायला तयार होती. आपली मुलगी तिच्या घरात सुरक्षित ही राहिली असती व डोळ्यासमोर ही. तुझीच फुस असेल तिला " , बाबा रागा - रागात आईला बोलत होते.

आईला वाटले होते उलट उत्तर द्यावे पण ती शांत राहिली.

' दिसतं तसं नसतं. आपलेच दात आणि आपलेच ओठ पुन्हा आपण कोणाला काही ही बोलू शकलो नसतो. जर तिच्या संसारामध्ये काही कमी-जास्त झाले असते तर ' , असं आईला वाटले होते.

साक्षीने परत तो विषय कधीही काढला नाही.

एकदाचे ऍडमिशन प्रोसेस सुरू झाली.

कराडचे कॉलेज मध्ये साक्षी चे नाव आले होते.

साक्षीचे बाबा एवढ्या लांब मुलीला शिक्षणासाठी पाठवायला तयार नव्हते.

त्यांनी तिला बजावून सांगितले की, " जवळच कोणत्यातरी कॉलेजमध्ये ऍडमिशन घे. म्हणजे तुला वाटेल तेव्हा घरी येता येईल व आम्हांलाही लक्ष ठेवता येईल " .

साक्षीने परत कॉलेज बदलून जिल्ह्याच्या ठिकाणी च ऍडमिशन घेण्याचे ठरवले.

' बरे झाले, वर्गशिक्षिका ही त्याच शहरात असल्याने परत त्यांच्या संपर्कात मला राहता येईल ' , असे साक्षीला वाटत होते.

साक्षी बाबासोबत जाऊन ऍडमिशन घेऊन आली.

फी तर भरमसाठ होती पण हप्त्याहप्त्याने देण्याचे ठरले.

ऍडमिशन घेते वेळी ही फॉर्म वरती तिला आरक्षण हे दिसून आले होते. तिला त्या आरक्षण या शब्दाचा ही त्रास होत होता. त्याच कॉलेजच्या कॅम्पसमध्ये होस्टेलला ऍडमिशन झाली होती.

एक आठवड्याने कॉलेज सुरू होणार होते.

साक्षीने भावाला ' चांगला अभ्यास कर ' , असं सुचवले होते.

सगळ्यांशी गोड बोलून साक्षीने घरातील वातावरण पुन्हा आनंदाचे केले.

आजी सोबत ही गप्पा मारत -मारत तिचा राग शांत केला व ती कॉलेजला राहिला निघाली.

दोन दिवसांनी ती कॉलेजला होस्टेलला निघणार होती.

तेवढ्यात तिचे आजोबा वया मानाने वारले.

घरातील वातावरण परत शोकाकुल बनले.

आजी एकटी पडली होती. सगळे मिळून आजीला आधार देत होते.

नातेवाईक सगळे भेटायला येत असल्यामुळे साक्षीला पंधरा दिवसांनी कॉलेजला जायला मिळाले.

पहिल्यांदाच साक्षीने मृत्यू हा जवळून बघितला होता.

अचानक सर्व गोष्टी झाल्यामुळे तिचे मन सुन्न झाले होते.

जेवढ्या उत्साहाने ती कॉलेजला जाण्यास अगोदर तयार होती तो उत्साह मात्र ओसरला होता.

जन्म- मरण तर येणारच होते.

हे अटळ आहे.

ते कोणीही चुकवू शकत नाही.

जन्मानंतर मरण येईपर्यंत मधले जे जीवन आहे तेच सुखी -समाधानाने जगावे.

तेवढ्यासाठीच माणूस धडपडत असतो.

साक्षी ही धडपडत होती.

क्रमशः

🎭 Series Post

View all