'स्व'तःचा शोध (भाग 33)

As A Female


साक्षी हॉस्पिटल ते घर आणि घर ते हॉस्पिटल करून -करून थकली होती. तिला आता विश्रांतीची गरज होती.

तेवढ्यात सगळीकडे covid-19 ची चाहूल लागली.

एक नवा व्हायरस चीनमधून सर्व देशांमध्ये पसरला होता.

त्याने भारतात ही प्रवेश केला होता.

सुरुवातीला शासनाने covid-19 च्या उपचारासाठी केंद्रे स्थापन केली होती पण हळू-हळू पेशंट स वाढत चालल्याने सगळे हॉस्पिटल्स उपलब्ध करून द्यायला सांगितली गेली. त्यामुळे सगळ्याच हॉस्पिटलचा भार वाढला गेला.

साक्षी ज्या हॉस्पिटल मध्ये काम करत होती. तेथे ही कोरोना पेशंट ऍडमिट करायला सुरुवात झाली.

सगळेच घाबरून गेले होते. डॉक्टर पण पेशंटला चेक करण्यासाठी टाळाटाळ करू लागले.

सुरुवातीला कोणते औषध उपचार चालू करायचे हेच मार्गदर्शन नसल्याने सगळ्यांची तारांबळ उडाली.

पण सगळ्यात अगोदर त्या कोरोना पेशंटच्या सेवेला ' नर्स स्टाफ ' च उपलब्ध होता.

कोणी ही पुढे येण्यास तयार नसायचे अगदी घरातील सदस्य सुद्धा.

फक्त टेस्ट केल्यावर रिपोर्ट पॉझिटिव्ह आला की सगळे दूर पळायचे. तेव्हा याच नर्स स्टाफने धैर्याने सगळ्या पेशंटची सेवा केली.

जे लोकं समाजामध्ये नर्सला वेगळ्या दृष्टिकोनातून पाहत होते. त्यांचा जीव वाचवण्यात याच नर्स स्टाफचं मोलाचे योगदान ठरले.

अगोदर त्यांच्याकडे फक्त ' रक्त -लघवी तपासणारे नर्स ' म्हणूनच पाहिलं जात होतं.

काय लय मोठा हुद्दा गेला अशा तुच्छतेने बघितले जात होते.

थोडक्यात तिच्या आईने तेच अगोदर तिला पण म्हणले होते.

या क्षेत्राकडे वळण्यापासूनही तिला परावृत्त केले गेले होते. पण साक्षीने जिद्दीने या क्षेत्रात पाऊल टाकले होते.

 covid-19 च्या स्वरूपात सगळ्या जगावर संकटाचे सावट आले होते.

सगळ्या डॉक्टर्स व नर्स स्टाफ त्या संकटाला धैर्याने सामोरा जात होता.

साक्षी च्या घरी तर तिला येण्याची बंदी केली होती. सुयोग व सासूने साक्षीला हॉस्पिटलमध्येच राहायला सांगितले.

साक्षी ही घाबरली होती.

' माझ्यामुळे पण कोणाला त्रास होऊ नये ' , अशी तिची ही अपेक्षा होती.

मग सगळ्या नर्सने मिळून हॉस्पिटल मध्येच तळघरातल्या मजल्यावर एक रूम केली. सगळ्या मिळून तिथेच राहू लागल्या. त्यांना 24 तास पेशंटची सेवा अशी ड्युटी लागली.

काही सिरीयस पेशंट ची तर अवस्था पाहावत नव्हती. उपचाराला सुरुवात करण्यापूर्वीच काहीजण दम तोडत होते. त्यांना होणारा श्वासोश्वासाचा त्रास बघूनच समोरच्याला घाम फुटत होता.

एवढ्या संख्येने रोज पेशंट येत होते पण नाईलाजाने जागा कमी पडत असल्याने परत पाठवावे लागत होते.

मोजकेचव्हेंटिलेटर उपलब्ध होते व ऑक्सिजनचा पुरवठा पण मोजकाच असल्याने फक्त सिरीयस पेशंट ऍडमिट करून घेतले जात असायचे.

जे तरुण व जास्त आजारी नसलेले पेशंटला गोळ्या -औषधे देऊन घरी पाठवले जात होते अंडर ऑब्झर्वेशन खाली.

जे पेशंट गेले आहेत, त्यांचे नातेवाईक त्यांना घ्यायला येत नसल्याने ते महानगरपालिकेच्या स्वाधीन केले जात होते.

साक्षीने पहिल्यांदा च मृत्यूला एवढा जवळून पाहिले होते.

ती कधी पिक्चर मध्ये जरी तो सीन आला तरी इकडे- तिकडे पाहत राहायची पण टीव्ही पाहण्याची तिच्यात हिम्मत नसायची.

आता मात्र दिवस -रात्र तोच सीन रिपीट -रिपीट होत होता. ती तो सिन टीव्हीवर नसून प्रत्यक्षात उघड्या डोळ्यांनी पहात होती.

साक्षी मनातून हादरून गेली होती. तिला घरच्यांची सर्वांची आठवण येत असे.

सासर ने तर तिच्यासाठी घर बंद केलेच होते. त्यांची एकच अट होती की , ' तो जॉब सोडून घरी राहिला ये ' .

पण साक्षी तो काही जॉब सोडायला तयार नव्हती.

बाबांनी तिला फोन करून घरी येण्याची विनंती केली.

साक्षीने माहेरी जाण्याला ही नकार दिला.

साक्षीला वाटले , ' ज्या आतुरतेने मी बाबांच्या फोनची वाट पाहत होते त्यासाठी covid-19 ला यावे लागले. हे माझे दुर्दैवच ' .

साक्षीला सरकारने स्थापन केलेल्या केंद्रावर ही ड्युटी लागली.

कोरोना काळात जे डॉक्टर व स्टाफ योगदान देणार नाहीत. त्यांचे लायसन्स रद्द करण्यात येईल असे शासन निर्णय आला होता. त्यामुळे प्रत्येकाला कामावर जाणे भागच होते.

पण तेवढेच खरे आहे की प्रत्येकाला आपला जीव प्रिय होता.

कोणी कधी स्वप्नातही पाहिले नसेल की आपणच आपल्या घरातील सदस्यांपासून भिऊन राहू.

साक्षी 6 महिने झाले बाहेरच राहत होती.

केंद्रावर ही कोरोना योद्धा म्हणून त्यांची वेगळी व्यवस्था केलेली होती.

पेशंटची सेवा करता- करता साक्षी ही त्या आजाराला बळी पडली. तिच्याच मैत्रिणीने तिची सेवा केली. तो नर्स स्टाफच काय तो त्यांचा जिवाभावाचा झाला होता.

बाकी घरातील कोणीही त्यांच्या आजूबाजूला फिरकलेही नाहीत.

प्रत्येकजण आपल्या जीवाला घाबरत असे.

कधी तरी सुयोग चा फोन साक्षीला येत होता.

तिला वाटत होते, ' खरंच सुयोग चे प्रेम राहिले आहे की नाही '.

तिला माहित होते, ' घरच्यांचे म्हणणे मी ऐकले नसल्याने ते नाराज झाले आहेत ' .

पण तिला हे ही कळत होते की , ' मी जर हा जॉब सोडून गेले तर माझे लायसन्स रद्द होईल व मी घरी फक्त एक कामवाली बनून राहील.

हे कोणी प्रेमळ व्यक्ती नाहीत आयुष्यभर माझा लाड पुरवतील.

खरंच त्यांचं प्रेम असतं तर ते आता ही पाठीशी उभे राहू शकले असते ' .

पण सासरचे लोक फक्त जेवढ्यास तेवढाच फोन करत होते.

साक्षीला ही आता घरच्यांकडून कोणतीही अपेक्षा राहिली नव्हती.

' जगलो -वाचलो तर माझा जॉबच मला तारेल किंवा मारेल ' , तिचं मन तिला समजावत होतं.

साक्षीची अवस्था खूप खराब झाली होती. तिची तब्येत खालावत चालली होती. खूप जागरण केल्याने ती अशक्त बनली होती.

आईचा तिला रोज फोन होत असे. तिच्या बोलण्याने तिला उभारी मिळत होती.

साक्षी ची आई समजावत होती , ' काही ही करून तू गावाकडे निघून ये .आपल्याला कोणतेही पैसे नको.

आपला जीव महत्त्वाचा.

तुझे सासरचे लोक लक्ष देत नाहीत, पण तू आमची मुलगी आहेस.

आम्ही तुला असं वाऱ्यावर कसं सोडून देऊ ' .

साक्षीची आई धायमोकलून रडत होती.

तिला विनविण्या करत होती. आई ऐकत नाही हे पाहून साक्षीने , " येते " असं सांगितले. 

साक्षीचे दोन-तीनदा टेस्ट करण्यात आली पण रिपोर्ट पॉझिटिव्ह च येत होता.

जॉब करताना तिची खूप ओढाताण झाल्याने तिने प्रकृतीकडे लक्ष च दिले नव्हते. त्याचे परिणाम आता दिसत होते. ती लवकर रिकव्हर होत नव्हती.

डॉक्टरने ' काही शाश्वती नाही ' , असे सांगितले.

रंतर साक्षी ची लढाई कोरोना सोबत नसून आतील भावना व विचारांबरोबर सुरू होती.

डॉक्टर ही पेशंटला औषध उपचार करताना सकारात्मक विचार करायला सांगत होते.

पण साक्षीच्या वाट्याला सकारात्मक विचार करण्यासारखे परिस्थितीच नव्हती.

ती बेडवर पडल्या -पडल्या तिच्या डोळ्यासमोरून सगळे प्रसंग जात होते.

' आपण कसे हट्टाने बाबांच्या मागे लागून शिक्षणाची वाट धरून इथपर्यंत पोहोचलो. कोणी कल्पनाही केली नव्हती की असा भला मोठा भयंकर रोग अचानक येऊन सगळ्यांचे आयुष्य उध्वस्त करेल.

समोर दिसणाऱ्या शत्रूला मारता तरी येतं पण ह्या अदृश्य शत्रूला कोण कसे हरवणार.

जगापुढे हा मोठा प्रश्न पडलेला होता.

तसेच काहीसे सासरचे देखील आहे.

सासरकडील लोकं समोर गोड तर बोलत होती पण मागून अदृश्य स्वरूपात वार ही करत होते.

आपण ते पतीला सांगू ही शकत नव्हतो आणि तसा त्याचा विश्वास ही आपल्यावर असायला हवा ' , साक्षी विचार करत - करत तंद्रीत गेली.

साक्षी आपल्या विचाराच्या तंद्रीतून बाहेर आली.

तिने आईला दिलेल्या वचनामुळे तिला जगण्याची उर्मी मिळाली.

ती हळूहळू औषधाला प्रतिसाद देऊ लागली होती.

सुयोग चे वर्क फ्रॉम होम चालू होते.

' सासूबाईला कधीही न जमणारा स्वयंपाक आता जमत होता.

नणंद सईबाई च्या घरी नोकर-चाकर होते, पण आता त्याचा उपयोग नव्हता. तिला आता स्वत: च सगळे करावे लागत असणार.

कोरोना हा वाईट रोग आहे पण त्याने सगळ्यांची जिरवली होती ' , साक्षी मनातल्या मनात विचार करून एकटीच हसत होती.

क्रमशः

🎭 Series Post

View all