'स्व'तःचा शोध ( भाग 36)

As A Female

 साक्षी माहेरी अडकून पडली होती.

तिकडे मात्र सुयोग चा जळफळाट होत होता. नव्याचे नऊ दिवस संपून साक्षी व सुयोग मध्ये गैरसमज व्हायला लागले होते. ते गैरसमज आता वाढतच चालले. त्यावर फुंकर घालणारे आजूबाजूला बरेच जण होते.

कोणत्याही नात्यात विश्वास महत्वाचा असतो. जर विश्वासच नसेल तर कोणतेही नाते पुढे जाऊ शकत नाही.

साक्षीचे क्षेत्र असे होते की, त्यामध्ये तिला घरापेक्षा नोकरीच्या ठिकाणी जास्त वेळ द्यावा लागत होता.

त्यामुळे होणाऱ्या सासरकडील मंडळींनी ही स्वतःची मानसीकता ठेवायला हवी. आपण जी मुलगी सून म्हणून घरी आणणार आहोत ती कोणत्या क्षेत्रातील आहे. तिच्या नोकरीच्या वेळा अगोदरच समजून घ्यायला हव्यात. नंतर तिला त्रास देण्यात काहीही अर्थ नाही.

साक्षीने परत जायचे ठरवले. तिने बॅग ही भरायला घेतली होती.

पण अचानक आजीची तब्येत बिघडली. तिचे वयही झाले होते फक्त अंथरुणावर पडून राहायची. साक्षी ने तिला चेक केले तर तिला सौम्य कोरोना ची लक्षणे दिसून आली. तिने घरीच निगराणी खाली औषधोपचार चालू केले. पण आजीचा त्रास वाढतच चालला होता. तिला तालुक्याच्या ठिकाणी हलवावे लागणार होते.

गावातीलदवाखाना मध्ये ऑक्सिजनचा पुरवठा खंडित झाल्याने तेथे ऑक्सिजन उपलब्ध नव्हता. त्यामुळे सर्वांनी तिला तालुक्याच्या ठिकाणी घेऊन जायचे ठरवले.

 शेजारी-पाजारी कुजबुज सुरू झाली होती.

' मुलीला शिकवून यांनी मोठे कामच केले आहे. तिच्यामुळेच आजीच्या जीवावर बेतले.

आली मोठी शहाणी सगळ्या मुलांना एकत्र करून गावभर नुसती हिंडत असते. नवऱ्याबरोबर पटत नसेल म्हणून माहेरी येऊन राहिली असेल. ईकडे येऊन तरी कुठे शांत राहते.

स्वतः डॉक्टर असल्यासारखी नुसते उपदेश करत राहते. आता आमच्या मुलींना ही बिघडून सोडेल. ही पीडा इथून लवकर गेलेली बरीच आहे ' , असे एक ना अनेक टोमणे तिच्या कानापर्यंत पोहोचत होते.

पण साक्षीला आता सवय झाल्याने तिने त्याकडे साफ दुर्लक्ष केले.

  साक्षीला त्याचा चांगलाच अनुभव आला होता लहानपणापासून. आपण काही चांगले काम केले तरी लोकं नावं ठेवतात. नुसते बसून राहिले तरी नावं ठेवतात. मग काम करत राहण्यात काय हरकत आहे. आपला वेळही सत्कारमी लागतो आणि चार पैसेही मिळतात.


   आजीला दवाखान्यात नेले गेले पण दोन दिवसातच आजीची ज्योत मालवली. तिचे तेरावे होईपर्यंत तरी साक्षीला आता इथून निघता येणार नव्हते. तिला आता घराबाहेर पडता येणार नव्हते त्यामुळे ती घरा मध्येच वेळ घालवत होती.
                     
 माहेरी असल्यामुळे तिला आता मैत्रिणींची तीव्र आठवण येत होती. तालुक्याच्या ठिकाणी कॉलेजमधील माजी विद्यार्थ्यांचा online मेळावा होणार होता.

सध्या Whatts app, Facebook ,Instagram, twitter  असे अनेक सोशल मीडिया वापरत असल्याने एकमेकांच्या संपर्कात आले होते. तसा तिच्या कॉलेजमधील मैत्रिणींचा ही ग्रुप बनवला होता. त्यामुळे कितीतरी वर्षांनी सगळ्या मैत्रिणींच्या संपर्कात राहता येत होते.

सगळेच आता वयाने व विचाराने ही मोठे झाले होते. कॉलेजच्या दिवसांमध्ये एकमेकाला मदत न करणारे मित्र- मैत्रिणी आता एकमेकाला जीवाला जीव देण्यास तयार झाले होते.

काळ व वेळेप्रमाणे बरेच जण बदलतात. हा बदल चांगला आहे.
                         
 अचानक मध्यरात्री साक्षीच्या दारावर कोणीतरी ठोठावत होतं. सगळेजण खडबडून जागे झाले.

शेजारच्या काकू साक्षीला बोलवायला आल्या होत्या.

त्यांच्या सुनेला दिवस गेलेले होते व तिच्या पोटात दुखू लागले होते. डिलिव्हरी ला तर अजून दिवस बाकी होते. पाचवा- सहावा महिना सुरू होता. तिला ते सहन होत नसल्याने ती रडत होती. घरातील लोकांना काय करायचे कळत नव्हते. त्यामुळे त्यांनी साक्षीला बोलवण्याचे ठरवले.

ज्या शेजाऱ्यांना साक्षी आगाऊ वाटत होती. त्यांना आत्ता तिची गरज लागली होती.

साक्षीला त्या दिवसाचे सगळ्यांचे बोलणे आठवत होते. पण आपण घेतलेला आत्मसमर्पणाचा- सेवेचा भाव आपल्यातला शांत बसत नसल्याने तिने तिथे जायचे ठरवले.

तिने कॅम्प साठी लागणारे सर्व साहित्य जवळ ठेवल्याने तिच्याकडे आपात्कालीन स्थितीत प्राथमिक औषधोपचार उपलब्ध होते.

तिने तिचा बीपी व बाळाचे ठोके चेक करून तिला गोळ्या दिल्या. तिने जास्त प्रमाणात तेलकट व तिखट खाल्ल्यामुळे त्रास होत होता. काळजी घेण्यास सांगितले व ती तिथून निघून गेली.
 
दुसऱ्या दिवशी शेजारच्या काकू व चार -पाच बायका ज्यांनी तिला बोल‌ लावले होते. त्या तिला येऊन भेटून गेल्या.

आता मात्र तिचे गुणगान गाताना थांबत नव्हत्या.

हे बघून मात्र तिचे बाबा व आई चिडले होते . ते मनातच बोलले, ' कोणाच्याही मुलीवर शिंतोडे उडवणे अगोदर विचार करावा '.

साक्षी मात्र शांत राहिली. ना तिला त्यांच्याबद्दल राग येत होता ना आपुलकी वाटत होती. फक्त त्यांच्या विचारांची कीव येत होती.
                         
 दोन दिवसांनी साक्षी बेंगलोरला जायला निघाली पण तिच्या वहिनीला उलट्यांचा त्रास झाल्याने परत तिचे जाणे लांबले.

तिची वहिनी तापाने ही फणफणलेली होती. त्यामुळे सर्वांना शंका आली म्हणून त्यांनी साक्षीला ठेवून घेतले.

साक्षीने स्वतःच्या परीने तिला चेक केले व ती प्रेग्नंट आहे असे सांगितले. ती खूप अशक्त असल्याने तिला त्रास होत होता.

गावामध्ये तर सगळेच पेशंट असल्याने कळतच नव्हते की सामान्य कोण आणि कोरोनाचे कोण त्यामुळे तिने जाण्यास मनाई केली.

तिने फोन वरच वरिष्ठ डॉक्टरांशी संपर्क साधून सर्व कंडिशन सांगून औषध मागवून घेतले.

तिने भावाला सांगितले , " सध्यातरी मी ह्या गोळ्या देते, पण तिला महिन्याच्या- महिन्याला वेळेवर वेळोवेळी चेकिंग ला दवाखान्यामध्ये घेऊन जायला लागेल ".

भावाने आता तिच्या समोर तोंड उचकले होते.

तो म्हणाला, " मला तिला लेडीज डॉक्टर कडे घेऊन जायचे आहे. असे कोणी तुझ्या संपर्कातील आहे का? तालुक्याच्या ठिकाणी व गावात कोणी ही लेडीज डॉक्टर नाही " .

साक्षीने आता मात्र आपला रोख दोघांच्या दिशेने वळवला,  भाऊ आणि तिच्या बाबांकडे.

तिला काय म्हणायचे आहे हे तिच्या बाबांनी हेरले होते कारण तिच्या डोळ्यांमध्ये स्पष्ट दिसत होते.

ती म्हणाली , " जेव्हा मुलीला शिकवण्याची वेळ येते,  तेव्हा तुम्ही पैशाचे कारण सांगून व लग्नाचे आमिष दाखवून तिला शिक्षणापासून वंचित ठेवता व  आता तुमच्या बायकांना लेडीज डॉक्टरच का पाहिजे मग.

तुम्ही त्यांना शिकण्याची संधी च नाही दिली तर लेडीज डॉक्टर कुठून येणार " ?

तिच्या बाबांना झालेली आपली चूक आता पावलोपावली जाणवत होती.

त्यांच्या मनामध्ये आतापर्यंत जे खदखदत होते ते त्यांनी आत्ताच कबूल करून टाकले सर्वांसमोर.

ते म्हणाले, " मी शब्द देतो की,  मला नात किंवा नातू कोणीही होऊ दे. त्याला मी डॉक्टर नक्कीच बनविन ".

हे ऐकल्याने साक्षीला समाधान मात्र वाटले. पण ती डॉक्टर न झाल्याची सल तिच्या मनामध्ये कायम राहिली.

ती आनंदाने बेंगलोरला निघून गेली.

 बेंगलोरला परत आल्यानंतर तिचं तेच रुटीन सुरू झाले.

सुयोग ला आता तिची नाईट ड्युटी करू न देण्याची अट समोर आली होती. त्यावरून त्यांच्यात खटके उडत होते.

त्यामध्ये अजून तिची नणंद भर घालत होती , " काय माहित तुझ्या बायकोला च नाईट ड्युटी ची हौस असेल ". हे सुयोग कडून साक्षीला कळाले होते.

तिला मात्र सुयोग च्या हलक्या विचारांची कीव आली.

तिने ही सुयोग ला सुनावले , " काळ कुठे गेला आणि तू कुठे आहे अजून. तू ही कंपनीमध्ये ओव्हर टाइम करण्यासाठी थांबतो तेव्हा ते काय असते " ?

तिने मग सासू कडे मोर्चा वळवला व स्पष्टच सांगितले , " ज्यांना कोणाला नाईट ड्युटी ची हौस बघायची असेल त्यांनी प्रत्यक्ष माझ्या सोबत यावे.

जी पेशंट ऍडमिट करून घेतलेले असतात. त्यामध्ये वृद्ध, लहान मुले, नवजात बालके व डिलिव्हरी ला आलेल्या बायका ऍडमिट असतात. त्यांना प्रत्येक तासाला किंवा वेळोवेळी जाऊन बीपी चेक करणे किंवा सलाईन पाहणे व त्यांना लागेल ती सेवा पुरवणे हे रात्रभर आमचे काम ठरलेले असते.

पगार काही आम्हांला असाच फुकट मिळत नाही.

रात्रभर आमच्या डोळ्याला डोळा लागत नाही.

कधीही इमर्जन्सी येते , तेव्हा आम्हांला तत्पर च राहावे लागते.

आमच्या हलगर्जीमुळे जर कोणाचे बरे- वाईट झाले तर हॉस्पिटलची इमेज खराब होते व त्या डॉक्टरवरचा ही विश्वास उडाला जातो.

त्यामुळे सुसज्ज हॉस्पिटल सगळ्या स्टाफ सोबत तयारच राहावे लागते.

तरीही कोणाला काही अडचण असेल तर माझ्यासोबत येऊन पाहू शकता व वाटलं तर मदत ही करू शकता ".

तेव्हा मात्र सासूने ऐकून न ऐकल्यासारखे केले.

कारण साक्षीला माहीत होते , ' सुरुंग तर हा घरातूनच पेरला गेला आहे. त्यामुळे त्यावरच वार करणे योग्य होईल '.

क्रमशः

🎭 Series Post

View all