'स्व'तःचा शोध ( भाग 39)

As A Female

           

 सकाळी साक्षी आरामातच उठली.कोणतीही घाई गडबड न करता ती सावकाश पणे घर आवरत होती. तिने सुट्टीचे घरी सांगितलेच नाही.

' नाही तरी कोणाला कौतुक असणार आहे ' , म्हणून ती गप्पच राहिली. 

सुयोग ही तिच्याशी गप्प- गप्पच राहत होता. तसाही तो अबोल स्वभावाचा होता.

' बोलणाऱ्या माणसांच्या मनात काय आहे हे तरी समजते पण अबोल असणाऱ्याच्या मनामध्ये नेमकं काय चालू आहे हे तर ब्रह्मदेवालाही समजत नसेल ' साक्षी म्हणाली व हसली.

दोन-चार दिवस असेच निघून गेले. साक्षी आपलं घर आवरण्यात दंग झाली होती.

सासूला मात्र आता राहावत नव्हतं.

तिला वाटले , ' हिने नोकरी सोडली की काय? आता घराचा सगळा भार माझ्या मुलावर येऊन पडेल? ही बया फक्त ऐती बसून खाणार की काय? ' .

सासूच्या मनातले ओठावर आले व शेजार्‍यांकडे पडले.

ते साक्षीच्या कानावर यायला उशीर लागला नाही.

साक्षीच्या डोक्यातही आले नाही की , ' सासू असा विचार करत असेल '.

मग साक्षीची ट्यूब पेटली व तिला वाटले की , ' सासू ही या घरामध्ये लग्न करून आली आहे. तिने तर कोणतीही नोकरी केली नाही. मग तिच्या बाबतीत काय म्हणावे लागेल '. असे मनात येताच, साक्षी हसली.

साक्षी मनाला गप्प करत होती , ' लहानपणापासून ह्या मनाची अशी च सवय आहे उलट- सुलट प्रश्न डोक्यात येण्याची ' .

साक्षी मन लावून आपलं घर आवरत होती. तिला गाणे ऐकण्याचा ही नाद होता. त्यामुळे तिने मस्त गाणी लावली व घर आवरायला घेतले. तिचा मस्त वेळ चालला होता. 

 खरंतर सुख-दु:ख मानणं हे आपल्या हातात आहे.

कारण आपण जे विचार करतो ते आपल्या मनात राहतं व त्यानुसार आपण सुखात आहोत की दुःखात हे ठरतं.

जर आपण दरवेळी सकारात्मक विचार केला तर ते सुखच असतं. 

साक्षीही सकारात्मक विचारांची होती.

ती कधीही उद्धटपणे कोणाशी वागत नव्हती. पण आपले विचार स्पष्टपणे व्यक्त करत होती.

खोटं बोलून मागून वार करण्यापेक्षा खरं बोलून समोरच्याशी दोन हात करावे असा तिचा स्वभाव होता.

तिलाही शेजार्‍यांकडे सासर बद्दल गैरसमज पसरायला वेळ लागला नसता. पण तिने घरातील गोष्टी बाहेर न जाऊ देता समोरा -समोर बोलायची.

हेच घरातील व्यक्तींना खटकत होते बहुतेक.

' तसंही आपल्या घरातील प्रश्न शेजारी तर सोडवणार नव्हते मग त्यांना कशाला सांगायचे ' , असे साक्षीला वाटत होते. 

साक्षी ही आधुनिक काळातील नारी होती.

' नारी म्हणजे कधीही हरणारी '.

तिला आपले मत समोरच्याला पटवून देणे, चांगले जमत असायचे. तिची ती एक जमेची बाजू होती. त्यामुळे कितीही राग आला तरी सुयोग ला समजावण्यात तिला यश येत असायचे.

पण ह्यावेळी असे काय झाले की सुयोग ला समजावण्यात ती कमी पडू लागली होती. तसं त्यांचा सहवास कमी होत चालला असल्याने त्यांना बोलण्यासाठी निवांत असा वेळच भेटत नव्हता. त्यामुळे संवाद ही कमी होऊ लागला असल्याने गैरसमजाचे वादळ निर्माण झाले होते. 

सुयोग च्या ही आता लक्षात आले होते की साक्षी घरीच आहे.

तसं तिच्या सासूने सुयोग कडे विचारणा ही केली होती. पण त्यालाच काही माहीत नसल्याने तो गप्प राहिला.

त्याने शेवटी मनाचा हिय्या करून तिला विचारायचं ठरवलं.

आता त्याची पंचायत झाली होती. तो तिच्याशी बोलत नसल्याने सुरुवात कुठून करणार. त्यालाही सुट्टी असल्याने तो घरीच थांबला होता. आता दोघांनाही निवांत वेळ भेटला होता पण त्यांचा अबोला चा फुगा कधी फुटणार. देवच जाणे !

साक्षीची घालमेल  ही होत होती. तिला ही सुयोग शी बोलायचे होते. पण कुठून सुरुवात करणार म्हणून ती ही गप्पच होती.

 सासूला ही ते जाणवत होतं , कारण घरात सगळेच उपस्थित असून शांतता होती.

एका अर्थाने तिला बरंच वाटत होतं , ' सुयोग त्याच्या बायकोशी काही ही बोलत नाही म्हणजे त्याचा अर्थ त्याला साक्षीचे वागणे पटत नाही बहुतेक. आतातरी तो तिला लगाम घालेल. आत्ताच तिला आवरले नाही तर पुढे जाऊन ती आपल्या हाताबाहेर जाईल ' .

तिची सासू तिच्यासोबतही बोलत नसल्याने त्या दोघींचा संवाद कधीचाच बंद झाला होता.  

जेव्हा नवरा -बायकोचे भांडण झालेले असते. तेव्हा घरातील मोठ्या मंडळींना मात्र नवऱ्यासोबत बोलण्यासाठी खूप चेव येत असतो. कारण तेव्हा सून ही त्यांची शत्रू झालेली असते. जर समोरच्या शत्रूला नमवायचे असेल तर त्यांना त्यांच्या स्वतःच्या मुलांना पाठिंबा द्यावा असे वाटत असेल.

कारण त्यांना सून व मुलगा यांमध्ये निवड करायची असेल तर कधीही मुलगा त्यांच्या जवळचा राहणार आहे.

ही च गोम तिच्या सासूने बरोबर ओळखली होती व ती सुयोग ला बोलण्याचा प्रयत्न करत होती.

पण सुयोग मात्र टाळाटाळ करत होता व तो हॉलमध्ये न बसता सरळ बेडरूम मध्ये जाऊन पहुडला.

आता मात्र सासूला शांत बसण्याशिवाय पर्याय नव्हता.

साक्षी फक्त निरीक्षण करत आपलं घर आवरत होती.

 तेवढ्यात दारावरची बेल वाजली.

शेजारची पाच -सहा वर्षाची गोड सोनाली साक्षी कडे आली होती. ती तिच्या घरी एकटीच असल्याने ती कधी-कधी आजूबाजूला खेळायला जात असायची.

जेव्हा- जेव्हा साक्षी घरी असायची , तेव्हा ती हमखास तिच्याकडे येऊन खेळत बसायची.

सोनालीने सोबत खेळ आणला होता. ती बेडरूम मध्ये जाऊन खेळत बसली. आता मात्र साक्षीला बेडरूममध्ये जाणं भाग च होतं. कितीवेळ ती किचनमध्ये दम काढणार होती. तसंही तिथे सुयोग असल्याने ती जाणे टाळत होती.

' काय माहित संवाद झाला तर भांडणे मिटतील, नाहीतर वाद होऊन अजून भांडणे पेट घेतील ' , असं तिला वाटलं. त्यामुळे बेडरूम मध्ये जाण्याचे ती टाळत होती.

सोनाली हट्टाने तिला बेडरूम मध्ये घेऊन गेली तिच्या सोबत खेळण्यासाठी.  

" ए काकी, तू घरी होती मग मला आवाज का दिला नाही. मला कधीपासून तुझ्याकडे खेळण्यासाठी यायचे होते " , सोनाली छोटे- छोटे हात वर करत साक्षीला भांडत होती.

साक्षी हसली.

तिच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाली, " घर साफ करत होते . मग सगळीकडे धूळ होईल. तुला धुळीचा त्रास होईल म्हणून बोलावले नव्हते ".

आता मात्र सोनालीने सुयोग कडे मोर्चा वळवला.

ती उठली व सुयोग कडे जात असताना बोलली, " ते काम सुयोग काका, तुम्ही करत जा ना. मला थोडाच वेळ भेटतो काकी सोबत खेळायला."

असं म्हणून तिने आपले छोट्या हाताची कडी बनवून त्याच्या गळ्यात टाकली. 

इतका वेळ सुयोग मोबाईल मध्ये तोंड खुपसून बसलेला होता. पण लक्ष मात्र साक्षी व सोनाली कडे च होते.

त्याला आता काहीतरी सोनालीला उत्तर द्यावेच लागणार होते. मनामध्ये खूप साचलेले असल्याने ते बाहेर पडण्याचा मार्ग तो सकाळपासून शोधत होता.

मग त्याने कोड्यात बोलायला सुरुवात केली.

हळूच त्याने सोनालीची छोटी हाताची कडी सोडवून घेत स्वतःला मोकळे केले व तिचे गाल ओढत तिला म्हणाला,        " काकी तुझ्यासोबत थोडा वेळ तरी खेळते, पण माझ्यासोबत तर कधी च खेळत नाही ".

हे बोलणे साक्षीच्या कानावर पडताच साक्षीचे डोळे चमकले.

ती लाजून चूर झाली होती.

सुयोगने तिच्याकडे एक कटाक्ष टाकला तर त्याला लाजलेली ती साक्षी पहिल्यांदा पाहिलं होतं तेव्हा त्याला पाहून लाजली होती तशीच भासली.

साक्षी सुयोगची नजर चोरत उठली व सोनालीला बाजूला घेत सुयोगला म्हणाली, " जिभेला हाड आहे की नाही काही. उचलली जीभ लावली टाळ्याला . लहान मुलांसमोर काहीही बोलता."

सोनाली मात्र दोघांच्या तोंडाकडे पहात होती.

तिला मोठ्यांच्या बोलण्यातला अर्थ कळाला नव्हता. तिला प्रश्न पडला होता की , ' हे दोघे असे का हसत आहेत '.

साक्षीला जे वाटत होते ते अजिबातच खरे निघाले नाही.

ह्या एका वाक्यावरून साक्षीला कळून चुकले की , ' सुयोग , मला सोडून देणे शक्य नाही. मी उगाचच आपला काहीतरी वाईट विचार करत होते ' .

तिला तिच्याच विचाराचा आता राग येत होता.

घरात जेव्हा वातावरण तापलेले असेल व बाहेरचे कोणीतरी व्यक्ती आपल्या घरी आली तर त्या व्यक्तीला हसून- खेळून बोलण्याशिवाय घरातील लोकांपुढे पर्यायच उरत नाही.

बोलता- बोलता मग सगळ्यां च्या मनातील राग विसरायला मदत होते व वातावरण निवळायला सुरुवात होते.

तसेच सुयोग व साक्षी मधील गैरसमजाचे ढग जिरायला सुरुवात झाली होती. 

बराच वेळ सोनालीने त्यांच्यासोबत घालवला.

ती तिथे असल्यामुळे सुयोग -साक्षीचे बोलणे सुरू झाले.

सोनाली आपल्या खेळण्यात दंग झाली.

दोघांनाही बोलण्यासाठी निवांत वेळ भेटला व दोघांनाही काही सांगायचे होते ते एकमेकांना सांगू लागले. त्यांच्या लक्षात ही आले नाही सोनाली तिथून कधी निघून गेली होती. एवढे ते दोघं भरभरून बोलत होते.

साक्षीच्या सुट्टीचा खरा फायदा त्यांना आता झाला होता.

क्रमशः        


🎭 Series Post

View all