साक्षी व सुयोग मध्ये आता सुसंवाद होऊ लागला होता.
संवाद व सुसंवाद यामध्येही फरक आहे.
सुयोग व साक्षीच्या नात्यांमध्ये पहिला फक्त संवादच होत होता. त्यामुळे त्यांचे नाते परिपक्व बनलेले नव्हते.
गैरसमजाचे वादळ उठले की कधीही न बोललेले पण ऐकू जात असायचे.
कोणतेही नाते हे नवीन कापडासारखे स्वच्छ व सुंदर असते. आपण जेवढा जपून त्याचा वापर करू. तेवढे ते व्यवस्थित राहते. पण का त्यामध्ये जर राग, मत्सर, अहंकार, गर्व , द्वेष ची बाधा झाली की तो कपडा खराब व्हायला सुरुवात होते. परत किती ही तो स्वच्छ धुतला तरी पूर्वीसारखा कधीच होत नाही.
तसेच नात्याचे ही असते. त्यामुळे त्याला जपणे प्रत्येकाचे कर्तव्य आहे.
नवरा -बायकोचे नाते तर काचेच्या भांड्या सारखे असते . एकदा तडा गेला की ते पूर्ववत कधीही होत नाही.
आता विषय निघाला च आहे तर साक्षीने ही सांगून टाकायचे ठरवले की येत्या पंधरा दिवसाचा तिचा प्लॅन कसा असेल ते.
" दोन वर्षानंतर पंढरीची वारी सुरू झाली आहे. त्यामुळे आम्ही सर्वांनी मिळून एक मेडिकल कॅम्प वारकऱ्यांसाठी ठेवणार आहोत. जिथून पालखी मार्गस्थ होणार आहे त्या- त्या ठिकाणी आम्ही आमचे कॅम्प उभे करणार आहोत. हे कॅम्प पंधरा दिवसांसाठी असणार आहे. त्यामुळे मला बाहेर राहावे लागेल, " तिने सुयोग ला एका दमात सांगून टाकले.
सुयोग ला ही आता साक्षीचा विरह सहन होत नसल्याने तो विचार करू लागला, ' ती जर मला वेळ देत नसेल तर मी तिच्यासाठी वेळ नक्कीच काढू शकतो '.
त्याने थोडा विचार केला व तो तिला म्हणाला, " मी तुमच्या कॅम्प सोबत येऊ शकतो का? ".
साक्षीचे डोळे चमकले.
पहिल्यांदाच स्वतःहून सुयोग तिच्याबरोबर येण्यासाठी आतुरलेला तिला दिसला.
" हो, का नाही ", ती बोलली.
साक्षीचे मार्गदर्शन तिच्या माहेरच्या गावातील लोकांसाठी मोलाचे ठरलेले होते. त्यामुळे त्या गावातूनही एक मोठा ग्रुप कॅम्प साठी येण्यास तयार झाला होता. त्यामध्ये तरुण-तरुणी व इच्छा असणारे स्त्री-पुरुष सामील होणार होते.
तालुक्याच्या कॉलेज मधून त्यांचा ऑनलाईन मेळावा पार पडला तेव्हा त्यांचा ही ग्रुप बनला होता. त्या ग्रुपमधील ही इच्छा असणारे काही जण त्यांच्या कॅम्पसाठी येणार होते.
ती ज्या हॉस्पिटलमध्ये काम करत होती. तिथेही तिने पंधरा दिवसांची सुट्टी मिळवण्यासाठी परवानगी घेतली. वरिष्ठ डॉक्टर ना आपली कॅम्प योजना समजावून सांगितली व त्यांनी ही तिला कॅम्प साठी लागणारे सर्व साहित्य दिले.
वारीतील वारकऱ्यांसाठी मेडिकल कॅम्प ची कल्पना ही साक्षीची च होती.
सुयोग ला तिने कॉन्टॅक्ट लिस्ट दिली व सर्वांना वेळेत येण्याचे फोन करून सांगायला सांगितले. कॅम्प च्या ठिकाणी सगळीकडे देखरेखीचे काम सुयोग ला दिले गेले होते. तो ही खुश होता हे सगळं करण्यासाठी.
दोन दिवसांनी ते कॅम्प साठी रवाना झाले.
साक्षीला अजून ही आठवत होते की लग्न झाल्यानंतर हनिमून साठी ते दोघे बाहेर पडले होते व त्यानंतर आज.
सगळेजण वेळेत ठरलेल्या ठिकाणी पोहोचले व आपला मेडिकल कॅम्प तयार ठेवून वारकऱ्यांची वाट पाहत बसले होते.
तेवढ्यात एवढा मोठा जनसागर समोरून येत होता. त्यांनी वारकऱ्यांसाठी खाण्याची- पाण्याची व्यवस्था केली होती. तिच्या कॅम्पमध्ये एक -दोन डॉक्टर ही होते. त्यांच्या देखरेखीखाली वारकऱ्यांची सेवा सुश्रुषा चालू होती. त्यांच्या पायांना तेल किंवा औषधाने मालिश करून देण्याचे काम काहीजण करत होते. अंगदुखी, डोकेदुखी , जुलाबाचे त्यांना औषधे देऊ केली होती. सॅनिटायझर व मास्क चे ही प्रबोधन केले गेले होते. स्वच्छतेचे महत्व ही पटवून दिले गेले होते. साक्षीने स्वतः जातीने सगळी व्यवस्था केलेली होती. स्वतः ही ती वारकऱ्यांची सेवा करत होती.
सुयोग ही सगळे साहित्य पुरवत होता पण लक्ष मात्र साक्षीकडेच होते. एकाच वेळी ती किती सगळं सांभाळून घेत होती.
हळूहळू पालखी पुढे सरकू लागली तसं वारकऱ्यांची गर्दी ही कमी होऊ लागली. त्या परिसरातील स्वच्छता करून हे कॅम्प पुढे पालखी येण्या अगोदर जाऊन थांबत असत व तिथे हेच काम करत.
सगळ्यांच्या चेहऱ्यावर एक आत्मिक समाधान झळकत होते.
सुयोग ला वाटले होते की, ' हे सगळेजण स्वतःच्या कामांमध्ये व्यस्त असणार आहेत. मला तर तिथे खूप कंटाळवाणे वाटेल '.
पण आता सुयोग ची अशी व्यवस्था झाली होती की त्याला श्वास घ्यायलाही वेळ मिळत नव्हता. त्याचे त्यालाच हसू येत होते.
आपण जेव्हा इतरांना मदत करतो तेव्हा त्याचे समाधान हे वेगळेच असते.
त्या कोणत्याही कामाची सर या कामाला कधी ही येणार नाही.
सगळे वारकरी तर भक्तमय होऊन गेलेले होते. सगळ्यांच्या चेहऱ्यावर एकच भाव होता..
' भेटी लागे जीवा लागलीसे आस,
पाहे रात्रंदिवस वाट तुझी || '
ते पंधरा-वीस दिवस कसे गेले हे कोणालाही कळाले नाही. दरवर्षी असा ' मेडिकल कॅम्प ' आपण वारीमध्ये घेऊन यायचा असे सर्वांच्या मताने ठरले गेले.
त्यांचा ग्रुप एक नवे चैतन्य घेऊन आपापल्या घरी परतला होता.
सुयोग व साक्षी घरी परतले तेव्हापासून ते खूप खूश होते.
कोरोना काळात ' कोरोना योद्धा ' ने दिलेल्या योगदानाबद्दल सरकारने गौरव करण्याचे ठरवले होते. त्यासाठी प्रत्येक केंद्रावरून एक लिस्ट मागवली गेली होती.
प्रथम स्थानावर साक्षीचे नाव होते.
तिच्या माहेरच्या तालुक्याच्या ठिकाणी हा सत्कार समारंभ होणार होता. ठरलेल्या वेळी सत्कार समारंभ पार पडला तेव्हा जनसागर लोटला होता.
तिचा कौतुक सोहळा पाहण्यासाठी माहेरकडील ,सासरकडील मंडळी तर होतीच पण तेथील गावकऱ्यांनी मोठ्या संख्येने जमा होऊन गर्दी केलेली होती. कोरोनाचे सर्व नियम पाळत हा मोठा भव्य -दिव्य सत्कार समारंभ पार पडला होता.
तिच्या आई -बाबांचे डोळे दिपून गेले होते. आज खऱ्या अर्थाने त्यांना आपली मुलगी मोठी झाल्याचे समाधान लाभले होते. ते देवाचे आभार मानत होते, ' आपल्या पदरी कन्यारत्न दिल्याबद्दल '.
साक्षीच्या यशामुळे तिच्या गावातील तरुण-तरुणींना प्रेरणा मिळत होती.
स्वतःचे आरोग्य महत्त्वाचे असल्याने त्याची योग्य ती काळजी घ्यायलाच हवी.या क्षेत्रामध्ये नवीन येणाऱ्यांचे स्वागतच होते.
साक्षी मुळे घर, गाव, तालुका प्रगती करत होते.
एक साक्षी शिकली तर एवढा मोठा बदल समाजामध्ये होतो. जर घराघरातील साक्षी शिकल्या तर देश का पुढे जाणार नाही.
साक्षीच्या संपर्कात येणाऱ्या परिसराचे सोने व्हावे असे तिचे कर्तुत्व होते.
ती वेगवेगळ्या परीक्षा व मुलाखती ही देत होती. सर्व स्तरातून तिचे गुणगानच केले जात होते. त्यामुळे शासनाने तिची पद बढती केली होती. तिला सी एच ओ हे पद मिळाले होते.
गावाच्या ठिकाणी तिला शासकीय डॉक्टर म्हणून काम करावे लागणार होते. तिच्या लेव्हलला कमी आजारा चे पेशंट ती तपासू शकणार होती व जास्त सिरीयस पेशंट इतर डॉक्टर कडे रेफर करणार होती. गावामध्ये वेगवेगळे शिबिरे घेऊन त्यांना स्वच्छतेचे व आरोग्याची माहिती पुरवणे व सल्ला देणे हे काम असणार होते. पेशंटची सेवा करणे हा मुख्य उद्देश असणार होता.
शेवटी साक्षीला शासकीय नोकरी मिळाली होती. याचा तिला खूप आनंद झाला होता व अभिमान ही वाटत होता.
तिने ही आनंदाची बातमी आईला सर्व प्रथम फोन करून सांगितली व आपल्या सगळ्या मैत्रिणींना ही व्हाट्सअप ग्रुप वर सांगितले. सगळयांकडून तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत होता.
सुयोगला तर तिला कुठे ठेवू आणि कुठे नाही असे झाले होते. सासूला मात्र पेढा पण कडूच लागत होता. ती आतून पूर्णपणे घाबरली होती की, ' आता सगळं साक्षीच्या हातात जाणार व आपला मुलगा तिच्या मताप्रमाणे वागणार '. त्यामुळे तिला कोणताही आनंद होत नव्हता.
साक्षीला ज्या खेडेगावात नोकरी मिळाली होती. त्या खेडेगावात तिची सासू येण्यास तयार नव्हती.
ती स्वतःच्या लेकाला आपण येथेच राहू व तिला जायचे असेल तर जाऊ दे असा सांगण्याचा प्रयत्न करत होती. पण तो तिचा प्रयत्न असफल झाला.
सुयोगने साक्षीची साथ न सोडण्याचे वचन दिले होते.
नशीब त्याला लग्नात घेतलेल्या वचनांची आता तरी आठवण झाली.
सुयोग ने जर साक्षीची साथ दिली नसती तर तिच्या घरातील एक घाव दोन तुकडे करायला तयार झाले होते. पण सध्याची परिस्थिती पाहून त्यांनी माघार घेतली होती. त्यांना कळून चुकले होते की आता ते शक्य नाही. त्यामुळे शांत राहण्यातच सगळ्यांचं भलं होतं.
क्रमशः