'स्व'तःचा शोध (भाग 41) [ अंतिम भाग ]

As A Female

                            साक्षीला तसं ही खेडेगावात जन्म झाल्यामुळे सवय होती.

तिला ज्या गावामध्ये शासकीय ड्युटी मिळाली होती. ते गावही छोटेसे टुमदार खेडेगाव होते.

ते सुरुवातीला गावामध्ये चार खोल्यांचे घर भाड्याने घेऊन राहू लागले.

आतापर्यंत सुयोग व साक्षीने जी पैशांची जमवा-जमाव केली होती.त्याच गावामध्ये त्यांनी प्रशस्त बंगला बांधायचे ठरवले.

निसर्गाच्या सानिध्यात तिला जसा पाहिजे तसा तिचा स्वतःचा स्वप्नातला बंगला ती तिथं उभारू शकत होती.

नाहीतर शहरांमध्ये करोडो पैसे ओतले तरी मोठमोठ्या बिल्डिंग निर्जीव असल्यासारख्याच भासतात.

ती जेव्हा शहरामध्ये गेली होती तेव्हा तिचा दम घुटत असे. पण आता ते या खेडेगावामध्ये मोकळा श्वास घेऊ शकत होते.

आयुष्यभर तिथेच राहण्याचा दोघांनीही निर्णय घेतला होता.

प्रत्येक स्त्रीचा नवरा हेच जग असतं तसं साक्षीचं ही होतं. त्यामुळे ती स्वतःच्या जगात रममान झाली होती. 

सुयोगच्या नोकरीवर जाण्या- येण्याचा प्रश्न निर्माण झाला होता. त्यानेही स्वतःची नोकरी बदलून घेतली होती.

यु एस ए ची एका मोठ्या कंपनी मध्ये त्याला ऑफर मिळाली होती. पण त्याचे काम तिथल्या वेळेनुसार आपल्याकडे संध्याकाळी करावे लागणार होते.

जेव्हा साक्षीला सांगण्याची वेळ आली तेव्हा त्याला टेन्शन आले होते.

' कारण नाईट ड्युटी वरून आपण तिला किती त्रास दिला , आता माझी ती वेळ आली आहे. ती कशी प्रतिक्रिया देईल , सांगता येत नाही ' ,  असा सुयोग विचार करत होता. 

एकदाचे त्याने साक्षीला सांगूनच टाकले.

साक्षीने फक्त मोठे डोळे करून त्याच्याकडे पाहिले.

पण ' नवऱ्याला साथ देणे ' हे पत्नीचे कर्तव्य आहे.

हे तिच्या आईने शिकवले असल्याने तिने त्याला साथ दिली.

रात्रीच्या त्याच्या ऑफिसच्या कामांमध्ये तिने कसलाही व्यत्यय आणला नाही. उलट त्याच्या सोबत बसून ती स्वतःचा आवडता छंद जोपासण्याचे काम करू लागली.

तिने मेहंदी डिझाइन व नवीन रेसिपीसाठी एक वेबसाइट व ॲप सुरू केले होते. तिने त्यासाठी आईची मदत घेण्याचे ठरवले व तिला भागीदारी देऊ केली.

आईला ही मोठमोठ्या ऑफर येऊ लागल्या होत्या. कारण तिच्या हातामध्ये कला होती.

तिच्या वहिनीने आईला मदत केली. वेबसाईटवर जगातला कोणतीही व्यक्ती पाहू शकत होता. हे बघून तिच्या आईला तर खूप नवल वाटत होते. तिला लेकीचा खूप -खूप अभिमान वाटत होता. तिचा छोटासा व्यवसाय आता मोठा रूप धारण करत होता. या तिघी मिळून त्याला मोठा आकार देत होत्या. तिच्या आईला तिच्या सुनेचा ही खूप अभिमान वाटत असे. घरकाम ती व्यवस्थित सांभाळून आईच्या कामात ही नेहमी तत्पर असे.

साक्षी कडे तो उपजतच गुण होता, स्वतः बरोबर ती तिच्या संपर्कात येणाऱ्या लोकांनाही साक्षर करून सोडत असे.

तिला नेहमी वाटत असे की , ' नवीन -नवीन गोष्टी लोकांपर्यंत पोहोचायला हव्यात. ज्या गोष्टी मिळवण्यासाठी मला त्रास झाला तसा लोकांना होऊ नये ' . अशी तिची त्यामागची भावना असायची.

साक्षीचे जेव्हा त्या गावामध्ये नेमणूक झाली व ते खेड्यात राहायला जाणार असे सुयोग व साक्षीने ठरवले. तेव्हा तिची सासू नाराज झाली.

लागलीच तिने आपला मुक्काम स्वतःच्या लेकीकडे हलवला. सुयोग ने ही तिला जास्त गळ घातली नाही.

तिला वाटत होते , ' सुयोग तिच्या तालावर नाचेल पण मला ते जमणार नाही '  म्हणून ती लेकीकडे राहिला निघून गेली.

पण आठ दिवसातच ती आपलं सामान घेऊन परत साक्षी व सुयोग कडे राहायला आली.

ज्यांना कष्टाची सवय नसते त्यांना आपले ही खपत नसतात. फक्त लांबून फोनवर गोड -गोड बोलणं जमत असतं.

दुरून डोंगर साजरे.

एका वर्षामध्ये त्यांचा प्रशस्त तीन मजली बंगला तयार झाला होता. तो बंगला ही हात जोडून नम्रपणे साक्षीच्या सेवेसाठी उभा होता.

ठरलेल्या मुहूर्तावर सगळ्यांनी त्या बंगल्यामध्ये प्रवेश केला.

तिने पहिल्या मजल्यावर करिअर मार्गदर्शन म्हणून मोठे ऑफिस तयार करून घेतले होते व छोटे क्लिनिक ही चालू केले होते इमर्जन्सी पेशंट साठी.

दुसऱ्या मजल्यावर स्वयंपाक घर व मोठा हॉल तयार करण्यात आला होता.

तिसऱ्या मजल्यावर मोठ- मोठ्या बेडरूम्स तयार करण्यात आल्या होत्या.

गच्चीवरती मोठा झोपाळा व टेबल -खुर्च्या अशी आसन व्यवस्था करण्यात आली होती.

सगळीकडे मोठ्या गॅलरी उघडण्यात आल्या होत्या.

सकाळच्या दिन कराचे दर्शन त्यांना रोज होत असे.

सासूबाईंनी जेव्हा तो भव्य बंगला पाहिला तेव्हा त्यांचे डोळेच दिपले. 

' मी तर फक्त हिच्याकडून एका वन बीएचके ची अपेक्षा केली होती. हिने तर मला राजासारखा महालच उभा करून दिला ' , असे सासू पुटपुटली.

ती थोडी निवळली होती.

साक्षीने 1-2 स्वयंपाक व बंगल्याची साफसफाई करण्यासाठी मदतनीस पण ठेवले होते. पण तिच्यामध्ये कोणताही मालकिणीचा गर्व नव्हता.

बंगल्याच्या पुढे छोटीशी बागही तयार केली होती. साक्षीने तिच्या हाताने फुलांची रोपे आणून लावली होती. 

' राग आल्यावर थोडं थांबलं आणि चूक झाल्यावर थोडं नमलं, तर आयुष्यातील अनेक समस्या वर मार्ग काढता येतात..' याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे ' साक्षी '.

साक्षी नेहमीच स्वतःबद्दल शोधत राहिली. लहानपणापासून ते आतापर्यंत ' स्व '  साठी लढत राहिली म्हणून ती इथपर्यंत यशाची शिखरे पादाक्रांत करत - करत पोहोचली. जर तिने      ' स्व ' तःचा विचार कधी केला नसता व आहे त्या परंपरेनुसार पुढे जात राहिली असती तर ती कधीही यश गाठू शकली नसती.

समाजामध्ये जनजागृती ही होऊ शकली नसती.

जो भाजतो त्यालाच पोळते व तो पेटून उठतो मग आजू बाजूचा परिसर जागा होतो.

तेच साक्षीच्या बाबतीत घडले होते. तिने इतिहास रचला होता. 

आधुनिक काळामध्ये ' स्त्री ' ला शिक्षणाची व करीयरची सांगड घालणे खूप महत्त्वाचे आहे.

जसे पाण्याविना झाडे उन्मळून पडतील तसे करिअर विना ' स्त्री ' ही कोलमडून पडेल.

श्वासाविना जीवन तसेच ' स्त्री ' विना पुरुष ही अधुरा आहे.

त्यामुळे एकमेकांची साथ मिळाली तर ते नक्कीच समाजासाठी योगदान देतील. 

साक्षी व सुयोग चा संसार बहरत होता.

दोघांनाही आता वाटले की , ' आपला आपल्या नोकरीमध्ये चांगला जम बसला आहे व घराचाही प्रश्न मिटला असल्याने आयुष्यामध्ये पुढे जाण्यास काही हरकत नाही '.

लग्नाच्या तब्बल सात-आठ वर्षांनी त्यांनी आई-बाबा होण्याचा निर्णय घेतला होता व तो योग्यही होता.

लग्न झाल्या - झाल्या जर तिने आई होण्याचा निर्णय घेतला असता तर स्वतःची व मुलांची ही फरपट नक्कीच होणार होती.

त्यात राहते घर ही स्वतःचे नसल्याने व मुलांचा खर्च वाढणार असल्याने त्या दोघांचीही तारांबळ उडाली असती.

एखादी ठिणगी जरी पडली असती तर त्याचा भडका उडाला असता व त्या भडक्याची झळ अख्या कुटुंबाला सहन करावी लागली असती व त्यामध्ये कधीकधी अख्खे कुटुंब ही उध्वस्त होऊन जातात.

त्यापेक्षा पूर्ण प्लॅनिंग करून जर भविष्यामध्ये वाटचाल करत राहिलो तर ते सुखकारच होईल.

सोनेरी किरणांनी साक्षी च्या बंगल्या मध्ये पाऊल टाकताच तिच्या दिवसाची सुरुवात होत असे.

गावाकडची सकाळ एक वेगळाच मनाला उभारी देणारा क्षण असतो.

ती सर्वांसाठी एक ज्वलंत ऊर्जेची मशाल होती. तिच्याकडे कोणी पाहिले तरी ते स्वतःला स्फूर्ती मिळाल्यासारखे वागत असत.

उठल्यापासून घरात कामाची धांदल उडत असे पण ती व्यवस्थित सगळ्या गोष्टी हाताळून आपल्या नोकरीच्या ठिकाणी वेळेत पोहोचत असे.

आजूबाजूच्या खेड्यातील लोकं ही तिच्याकडे स्वतःचे आजारपणे घेऊन येत असत.

तिचा नम्र स्वभाव हाच लोकांना आपलेसे करून घेत असे. वयाने ज्येष्ठ व्यक्ती तर तिला भरभरून आशीर्वाद देत असत.

कामाची वेळ संपल्यानंतर ती घरी आल्यावर ही स्वतःच्या क्लिनिकमध्ये थांबत असत. त्या ठिकाणी फक्त ती लोकांचा मान म्हणून  एक रुपया फी घेत असत. कारण तिचा स्वभाव पैसा कमावणे नसून माणसांना ' सेवा देणे ' हाच होता.

कारण सारखे च शिक्षण तर प्रत्येकालाच मिळते पण कोणाचा हेतू कसा असतो ते त्यांचे त्यांनाच माहीत.

सासू ही मग हळू-हळू तिच्या क्लिनिक मध्ये येऊन बसू लागली होती व तिच्यासोबत छान गप्पाही मारत असे. तिच्या नकळतपणे येणाऱ्या लोकांना ती स्वतः उपदेश करत असत व तिचा छान वेळ ही जात असत.

सासू तर सगळ्या नातेवाईकांना फोन करून -करून घरी येण्याचे आमंत्रण देत असत कारण तिला स्वतःच्या लेकाचा व सुनेचा संसार दाखवण्याची इच्छा होत होती.

साक्षीला मात्र हसू येत असे.

तिने स्वतःची पकड घरावर न ठेवता प्रत्येकाला स्वतःच्या मर्जीप्रमाणे जगण्याची सवय लावून दिली होती. त्यामुळे तिच्या सानिध्यात राहून ही प्रत्येक जण मोकळा श्वास घेऊ शकत होता.

साक्षीला सकाळपासूनच मळमळ व उलट्यांचा त्रास होऊ लागला होता. सासूची धावपळ सुरू होती तिच्यासाठी.

सुयोग ला ही आई मध्ये झालेला बदल बघून आश्चर्य व समाधान वाटत होते. त्याला ही जाणवले जर मी साक्षी सोबत उभा राहिलो नसतो तर आज चित्र वेगळेच असले असते. त्याला तो विचार ही सहन झाला नाही. आपल्या तंद्रीतून बाहेर येत तो ही आईची मदत करू लागला.

साक्षी स्वतः डॉक्टर असल्याने तिला उलट्यांच्या मागचा कारण लगेच समजले.

ती सुयोग कडे पाहून लाजली व सांगितले की , " आता लाथा -बुक्या खाण्यासाठी तयार रहा " .

ही आनंदाची बातमी ऐकून सगळ्यांना आकाश ठेंगणे वाटू लागले होते.

घरातील सगळेजण मिळून साक्षी ची आणखीनच काळजी घेऊ लागले होते.

सुयोग व साक्षीच्या वेलीवर कळी फुलणार होती.

साक्षीला आता कसलेही टेन्शन नव्हते , ' मुलगा असो की मुलगी '.

कारण तिने घरामध्ये तसे वातावरण करून ठेवले होते. त्यामुळे होणाऱ्या बाळाला कोणताही त्रास होणार नव्हता.

मुलगी असेल तर तिचे स्वागतच !!

सुयोग व साक्षी आपल्या येणाऱ्या बाळाच्या स्वप्नामध्ये रमून गेली होती.


समाप्त.



टीप - पूर्व अनुभव नसताना हा माझा पहिलाच प्रयत्न होता. स्पर्धेचे शीर्षक बघितले , नारीवादी ( स्त्री) म्हणजे हा आपला आवडता विषय असल्याने मनाने उचल खाल्ली व लिहायला घेतली. 

वाचकांनी वेळात वेळ काढून आपली प्रतिक्रिया नक्की नोंदवावी.

🎭 Series Post

View all