'स्व'तःचा शोध (भाग 19)

As A Female
                             साक्षी ची आई तिला बोलत होती,"तू अजिबात धीर सोडू नकोस. कोणी नसलं तरी मी तुझ्यासोबत खंबीर उभी राहीन. तू फक्त तुझा अभ्यास चालू ठेव. कमी मार्क्स भेटले तर बघू नंतर काहीतरी मार्ग नक्कीच सापडेल."
                              आईच्या मांडीवर डोके ठेवून साक्षी शांतपणे पडली होती. आईच्या बोलण्याने साक्षीला आता कुठे धीर आला होता. तिने पटकन उठून आईला मिठीच मारली. साक्षी मध्ये आत्ता हत्तीचे बळ आले होते. काहीही झालं तरी आई आपल्या सोबत आहे. त्यामुळे मला जगाची फिकीर नाही असं साक्षीला वाटत होतं. हे प्रत्येकाच्या बाबतीत अगदी खरं आहे. जेव्हा आपली आई आपल्या सोबत ठामपणे उभे राहते तेव्हा आपल्याला जग जिंकल्यासारखे च वाटते.
                        साक्षीला मैत्रिणीकडून मेसेजेस येत होते. तुला पेपर कसा गेला असं त्या विचारत होत्या. पण साक्षीने एकाही मैत्रिणीला रिप्लाय दिला नाही. कारण त्यांनाही माहीत होतं. साक्षी आता सीईटी चा अभ्यास जोमाने करत होती. दोन दिवसानंतर तिचा सीईटीचा पेपर होता.तिला अजूनही आठवत होतं NEET एक्झाम हॉल मधील तो दिवस. त्यामुळे तिने ठरवले होते की त्यावेळेस सारखी स्थिती आता आपली होऊ द्यायची नाही. तिने युट्युब वर मार्गदर्शन घ्यायला सुरुवात केली. मनाची स्थिती ढळू न देता पेपर कसा सोडवावा अशा बरेच व्हिडिओज ती पाहत होती. आतून स्वतःला स्ट्रॉंग बनवत होती.
                            वर्ग शिक्षिकेने  मार्केट मधून CET परीक्षेच्या सरावासाठी एक पुस्तक भेट म्हणून तिला दिलं होतं. साक्षीला खूप आनंद झाला. ती दिवस रात्र एक करून अभ्यास करत होती.
                            आज परीक्षेचा दिवस उजाडला. ती खूप सकारात्मक वाटत होती. पेपर कसा का असेना पण माझी आत्मस्थिती मी ढळू देणार नाही. असं तिने मनाशी ठरवले होते. सगळ्यांच्या पाया पडून ती परीक्षेला निघाली. बाबांनी तिला एक्झाम सेंटर वर सोडले. घरूनच नाश्ता करून निघाल्यामुळे तिचं मन शांत होतं. गेल्या पेपरच्या वेळी टेन्शनमुळे तिने काहीही न खाता पेपरला गेली असल्याने तिचं मन अस्वस्थ झालं होतं. जर पोट भरलेला असेल तर पेपर ही शांतपणे सोडवता येतो. पोट रिकामा असेल तर डोक्यामध्ये काहीही शिरत नाही. मन चलबिचल होते. पाण्याची बॉटल ,हॉल तिकीट , आयडी आणि पेन बरोबर घेऊन ती हॉलमध्ये शिरली. तिने अजून पेपर ही पाहिला नव्हता पण तिच्या चेहऱ्यावर समाधान दिसत होते.जेव्हा आपण जास्त तयारी करतो कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तेव्हा आपला आत्मविश्वास आपोआपच वाढतो. सारखा प्रश्न जरी आला नसला तरी त्याच्या आजूबाजूचा प्रश्न विचारला गेला तरी त्या मार्गाने आपण विचार करून सोडवण्याचा प्रयत्न करू शकतो हा आत्मविश्वास सरावामुळे येतो. ते अगदी खरंच आहे. त्यामुळे सिल्याबस संपल्यानंतर प्रश्न सोडवण्याचा सराव हा वेळ लावून करायलाच हवा. हे साक्षीने ओळखले होते. ती फक्त पेपर ची च वाट पाहत होती. पुढल्या क्षणी पेपर तिच्या पुढ्यात आला. तिने तो पेपर शांतपणे एकदा नजरेखालून घातला. तिच्या चेहऱ्यावर स्मित हास्य झळकले. आजचा दिवस माझा आहे असे मनोमन जाणले. पेपर सोडवायला तिने सुरुवात केली. एक- एक प्रश्न करीत ती पुढे सरकत होती. 10 चे 20 ,30 ,50 ,100 कधी पोहोचली कळलंही नाही तिला. पेपर बऱ्यापैकी तिचा कव्हर होत आला होता. मध्ये- मध्ये थोडे प्रश्न तिने सोडले होते. वेळ कमी आणि प्रश्न जास्त असल्यामुळे तिला जेवढे कमी वेळेत सोडवता येतील ते प्रश्न अगोदर उचलले.राहिलेल्या प्रश्नांकडे तीने आता शेवटच्या वीस मिनिटा मध्ये  मोर्चा वळविला. 70 प्रश्नांची उत्तरे तिचे एकदम परफेक्ट सोडवलेले वाटत होते. पण आपल्याला आपलाच बरोबर वाटतं. त्यामुळे जेव्हा उत्तरतालिका येईल तेव्हा कन्फर्म होऊन जाईल. उरलेल्या पैकी अजून दहा वीस प्रश्न तरी तिचे सोडवून पाहिजे होते. ती जीवाचा आटापिटा करून सोडवत होती. मोठे वाटलेले प्रश्न पण तिला चुटकीसरशी सोडवता येत होते. नकारात्मक विचार करायला तिला वेळच भेटला नाही. आपल्याला जेव्हा प्रश्नपत्रिकेमधले प्रश्न येतात तेव्हा आपण त्यामध्ये पूर्णपणे गढून जातो. स्वतःला झोकून देतो.जेव्हा आपण एखाद्या कामामध्ये स्वतःला झोकून देऊन काम करतो तेव्हा त्या कष्टाचे फळ निश्चित मिळते.
                                  80 प्रश्न तिचे पूर्ण झाले होते. वीस प्रश्नाबद्दल शाश्वती देऊ शकत नव्हती. त्यामुळे ते न सोडवलेले बरे. तिने आता जास्त ताण न घेण्याचे ठरवले. जेवढा सोडवला आहे त्यावरून एकदा नजर फिरवली. बस एवढा ठीक आहे. स्कोर चांगला येईल बहुतेक. मनाशीच बोलत होती. परीक्षेच्या वेळ संपला. पेपर जमा करून ती हॉलच्या बाहेर पडली. तिच्या कॉलेजमधील दोन मैत्रिणी तिच्या नजरेस पडल्या. त्यांनीही तिला पाहिले होते. त्या जवळ आल्या व एकमेकींना भेटल्या. खूप दिवसांनी या तिघींची भेट झाली होती.दोघीं ना घ्यायला घरून त्यांचे पालक येणार होते. एका मैत्रिणीचे वडील आणि दुसऱ्या मैत्रिणीची आई घ्यायला आले होते. आल्या -आल्या मुलींनी आपल्या पालकांना पेपर कसा गेला त्याबद्दल भरभरून सांगू लागल्या.त्यांच्या चेहर्‍यावरचा आनंद पाहून पालकांनाही समाधान वाटत होते. साक्षी मात्र एका ठिकाणी शांत उभी राहून बघत होती. आपला नशिबात मात्र हे सुख नाही.साक्षीला मात्र रिक्षा करून बसने घरी जाण्यास सांगितले.
                           जीवनामध्ये डोळ्यासमोर असे अनेक प्रसंग उभे राहतात. ज्यामध्ये मुलासोबत पालक त्यांच्या प्रसंगांमध्ये सोबत असतात. अशी मुले समाजामध्ये वावरताना डगमगत नाहीत. त्यांना त्यांच्या पालकांचा खूप मोठा आधार असतो.
                            साक्षी बस मधून प्रवास करत निघाली होती. तिने आता कुठे पुस्तकातून डोके वर करून जग पाहायला सुरुवात केली होती. रोजच्या आजूबाजूला दिसणाऱ्या गोष्टी ती आता नव्याने पहात असल्यासारखं तिला वाटत होते. रोज -रोज दिसणाऱ्या आजूबाजूला दृश्य तिला वेगळेच जाणवत होते. फक्त एका निरीक्षणाची गरज आहे. त्या दृश्यामध्ये आपल्याला बऱ्याच सकारात्मक व नकारात्मक दृश्य दिसतात. आपला त्यावेळी मूड कसा आहे त्यावर अवलंबून असतात. साक्षीला पेपर चांगला गेला होता पण पालक आपल्या सोबत नाहीत ह्या भावनेने ती दुखावली गेले होती.तिला माहित आहे आपली आई सोबत आहे पण ती घराच्या बाहेर निघून कधीही सोबत करणार नाही. कारण ती घराच्या- गावाच्या बाहेर कधी पडलेलीच नाही. म्हणतात ना सरड्याची धाव कुंपणापर्यंतच. असंच काहीसं माझ्या आई बाबतीत लागू होतं.
                            साक्षी घरी पोहोचली तेव्हा संध्याकाळ होत आली होती. आई स्वयंपाकाच्या तयारीला लागलेली होती. आजी- आजोबा टीव्ही पाहण्यात दंग होते. भाऊ नेहमीप्रमाणेच मित्रांबरोबर बाहेर फिरायला गेलेला असणार. साक्षीने घरात प्रवेश केला. ती आलेली बघून आईने पाणी देऊन चहा करायला घेतला. चहा करता- करता त्यांच्या गप्पा सुरु झाल्या. साक्षी पेपर बद्दल सगळं सांगत होती.आईला तिच्या चेहऱ्यावरून च कळालं होतं की तिला पेपर सोपा गेला आहे. कसं असतं ना आपला चेहरा बघूनच आपले आई-वडील ओळखतात आपण त्रासात आहोत की आनंदात. आई वडिलांपेक्षा कोणीही भविष्य ओळखणारा असू शकत नाही. आपल्याला नेमकं काय होते ते. पण प्रथेच्या पुढे जाऊन ते ही मदत करू शकत नाही. कधी आर्थिक बाजू अडचणीचे ठरते तर कधी प्रथा अडचणीची ठरते.समाजात राहायचा असेल तर पारंपरिक प्रथेप्रमाणे प्रत्येक मनुष्याला चालावे लागते. नाहीतर समाज चार शब्द बोलून वाळीत टाकतो.
                           साक्षीला आज नव्याने साक्षात्कार झाल्यासारखा वाटत होता. घरातील कामे ती रोजच्या पेक्षा खूप ऊर्जेने करत होती. संध्याकाळी लवकर आवरून तिला आई बरोबर गप्पा मारायचे होते. तिला सांगायचे होते की मला ही मेहंदीचे डिझाईन्स शिकव. तुझ्या ऑर्डर मिळवण्यासाठी मी ही मदत करेन.आपल्या मनासारखं थोडं जरी का हे घडलं तरी आपण प्रत्येक गोष्ट सकारात्मक स्वीकारायला शिकतो. मनासारखं नाही घडलं की आपण सकारात्मक गोष्टी ही नकारात्मक दृष्टीने प्रत्येक गोष्टीकडे पाहू लागतो. त्यामुळेच आपल्याला सगळीकडे भकास दिसू लागतं.मनासारखं कधी काही घडले नाही तर थोडे दिवस जाऊ द्यावे त्यानंतर ढगाळलेले वातावरण निवळायला सुरुवात होते. स्पष्ट दिसणाऱ्या वातावरणामध्ये च आपण काही निर्णय घेऊ शकतो. सगळेजण निवांत झोपी गेले.

क्रमशः

🎭 Series Post

View all