'स्व'तःचा शोध (भाग 6)

As A Female

साक्षीला आज दररोज पेक्षा लवकर जाग आली. रात्री ती विचार करून झोपली पण खूप वेळ जागीच होती तिला विचाराने झोपच येत नव्हती. शिक्षण पूर्ण करून कधी एकदा मी डॉक्टर होते असं तिला झालं होतं. तिला गावासाठी खूप काही करायचे होते. पण आपण कसं करणार हाच यक्ष प्रश्न तिच्या पुढे उभा होता?

ती पटापट आवरून बाबांची वाट पहात बसली. बाबा ही आवरून तयार होत होते. त्यांना आज ऑफिसला लवकर निघायचे होते. मुलीचं शिक्षण म्हणून त्यांना काय एवढा रस नव्हता. फक्त नावापुरतं त्यांना शिक्षण द्यायचं होतं आणि लग्न करून देऊन आपल्या जबाबदारीतून मुक्त व्हायचं होतं.

आईने तो पर्यंत बाबांना नाश्ता आणून दिला आणि चहाच्या तयारीला गेली. साक्षी ही आपली तिथून फेऱ्या मारत होती. मुद्दाम बाबाच्या समोरून इकडे तिकडे जात होती. बाबांच्याही हे लक्षात येण्यास वेळ नाही लागला. त्यांनी साक्षी ला जवळ घेतले आणि विचारले. तू जो काही निर्णय घेतला असेल तो विचार करूनच घेतला असेल. साक्षी आता शहाण्या बाळासारखं वागत होती. साक्षी घरामध्ये मोठी असल्यामुळे मोठ्या माणसांसारखं तिला वागावे लागत असे. म्हणजे तशी घरच्यांची अपेक्षा होती.

साक्षीने सांगितले,"मला सायन्स शाखेमध्ये ऍडमिशन घ्यायचे आहे. अकरावी- बारावी पूर्ण करून मेडिकल ला ऍडमिशन घ्यायचे आहे. मला डॉक्टर होण्याची इच्छा आहे."

बाबाने नाश्ता करता करता घास तसाच हातात ठेवला, ते माझ्या कडे एकटक बघू लागले. तू घरात मोठी आहे तेव्हा शहाण्या सारखाच निर्णय घेशील असं मला वाटलं होतं. डीएड बीएड करून एखाद्या शाळेत शिक्षिका म्हणून का काम करू नये. असं तिचे बाबा म्हणाले. अकरावी -बारावी नंतर दोन वर्षाचा कोर्स आणि त्यानंतर लगेच नोकरी मिळेल तुला. मीही थोडीफार माहिती माझ्या वरिष्ठांकडून काढलेली होती. त्यांचंही असंच म्हणणं होतं. मुलींच्या शिक्षणात जास्त वेळ घालवू नये. तेच त्यांच्या दृष्टीने योग्य आहे. डॉक्टर होण्यामध्ये खूप वर्ष लागतात. डॉक्टर होण्यासाठी पैसाही खूप लागतो. त्याची फी मी भरू शकणार नाही.

साक्षीला आता काय बोलावे ते सुचत नव्हते पण तिला शिक्षिका हे आवडत नव्हते. कारण तिचं स्वप्न वेगळं होतं.ती काहीच बोलत नाही हे पाहून तिचे बाबा म्हणाले ,"परत एकदा विचार कर".

साक्षी मानेनेच हो म्हणाली. तिची आई लांबून हे सगळं ऐकत होती. तिला जास्त काही यातला माहित नव्हतं. पण तिला असं वाटत होतं की बाबाही योग्य तेच निर्णय घेतील. तिलाही परिस्थितीची जाणीव होती. मुलीची ही तळमळ तिला कळत होती. परिस्थिती म्हणजे नक्की काय तर आर्थिक चणचण अस ना. मग आपण का प्रयत्न करू नये तो दूर करण्यासाठी. आई विचार करू लागली. जो हा विचार कधी तिने केला नव्हता.

आहे ती परिस्थिती जर बदलायची असेल तर आपल्याला आर्थिक वाढवावे लागेल.आपल्याला कोणी काही म्हणेल या भीतीने शांत राहणे पेक्षा काहीतरी काम करून अर्थार्जन करावे. आपली परिस्थिती सुधारल्यानंतर लोकांची तोंडही आपोआप बंद होतात. लोकांच काय ते दोन्हीकडून बोलत राहतातच. खायला 5-6 आणि कमावणारे एकच, परिस्थिती कशी सुधारणार. शेती तर फक्त नावापुरती होती. पण शेतीतले कुणाला काही देणंघेणं नव्हतं. साक्षी च्या आईला पण शेतातील एवढी माहिती नव्हती. आजी-आजोबांनी तर संसारातून पुर्ण लक्ष काढून घेतले होते.

आजी- आजोबा तर एवढेच बोलायचे तुमचा संसार तुम्ही करा. पण नको त्या गोष्टींमध्ये नाक खूपसायचे काही सोडत नसायचे.साक्षीला दिसत होतं आई बाबांच्या भांडणांमध्ये प्रत्येक वेळी आजी-आजोबा बाबांकडून उभे राहायचे. त्यांचा संसार आहे असं म्हणता तर मग त्यांनाच करू द्या तुम्ही कशाला त्याच्यामध्ये पडता. असं साक्षीला बोलू वाटायचे पण आपलं वय पडलं लहान कशी बोलणार. हे तर मोठ्यांनाच कळायला पाहिजे ना.

आईला उन्हाळी काम छान फार येत होतं आणि विणकाम ही जमत होतं. तिला मेहंदी काढण्याची खूप हौस असायची. मग तिने हळूहळू हे काम हाती घेण्याचं ठरवलं. सध्यातरी पैसे नव्हते पण तिने तिच्या बाबांना सांगायचे ठरवले.

बाबा ऑफिसला निघून गेले. साक्षी आणि आई दोघीही घर कामात मग्न झाल्या. साक्षीला कळत नव्हतं की शिक्षणापेक्षा घरकाम हे खूप महत्त्वाचं आहे का?

बाकी घरातील इतर मोठ्या व्यक्तींना विचाराल तर त्यांचा उत्तर हो असेच असेल. शिक्षण न घेता घर काम करून आपण पोट भरू शकतो का? शिक्षण घेऊन घरकाम न करता आपण पोट भरू शकतो का? घर काम म्हणजे फक्त आपल्या घरातीलच काम करायचे होते. साक्षीला हे असे उलट सुलट प्रश्न पडायला लागले. तिला कळतच नव्हतं की नक्की योग्य काय आहे ते?

घरातील व्यक्ती शिक्षणापेक्षा घरातील कामावरच जास्त भर देत होते. त्यामुळे साक्षीला असे प्रश्न सतावत होते. तिने ठरवले आपल्याला जे काही प्रश्न पडतील ते वर्गशिक्षिके कडे जाऊनच सोडवायचे. त्याही नोकरी करत होत्या आणि स्वतःचे घर आवरत होत्या. त्यामुळे त्या चांगलं आपल्याला समजावून सांगू शकतील.

साक्षी च्या आईने सांगितले तुला जे योग्य वाटतं ते शिक्षण घे. मीही फी च्या पैशासाठी काहीतरी तजवीज करीन. पण साक्षी तेव्हा इन होते तिला योग्य किंवा अयोग्य अजून काही समजत नव्हते. फक्त डॉक्टर व्हायचं एवढंच तिला माहित होतं.डॉक्टर होताना कोणत्या कोणत्या टप्प्यातून तिला जायचे हे तिला माहित नव्हतं.

संध्याकाळी ऑफिस मधून बाबा आले. पण ते कोणत्याही बोलण्याच्या परिस्थितीमध्ये नव्हते. साक्षीला हे कळालं होतं कि जेव्हा मोठ्यांच्या मनासारखं छोट्या नी नाही ऐकलं की मोठे हा असाच आविर्भाव आणतात. गप्प राहण्यामागे हाच हेतू असतो की मोठ्यांचे म्हणणे मान्य करावे. पण साक्षीला तिचे मन शांत बसू देत नव्हते.

आईने सगळ्यांची जेवण उरकले नंतर बाबांना सांगितले की तिला अकरावी-बारावी करू द्या पुढचं पुढे बघू. साक्षीला समजत होतं की अकरावी-बारावी हेच करिअरचे टर्निंग पॉईंट आहेत. तेच योग्य नाही निवडले तर पुढे जाऊन पश्चाताप च होईल.आपल्या घरचे जर निर्णय घेणारे योग्य नसतील तर आपली पुढची भविष्य वाट ही भरकटत च जाणार. पण ती सध्या गप्प राहण्यातच शहाणपण आहे असं समजून शांत राहिली. अकरावी- बारावी पर्यंत आपण शांतच रहावे. तिने ठरवले की उद्या वर्गशिक्षिकेला जाऊन भेटून यावे. पण साक्षी सर्वकाही आनंदाने करत होती. बाबांनी पुढे शिकवण्याचा निर्णय घेतला हाच तिच्यासाठी खूप मोठा सुखद धक्का होता.

मुलींना एखाद्या गोष्टीमध्ये परवानगी मिळाली की जग जिंकल्यासारखा वाटते. ह्याचा अनुभव साक्षीने पहिल्यांदाच घेतला. साक्षी झोपण्याचा प्रयत्न करत होती पण तिच्या डोक्यामध्ये विचार चक्र फिरत होते. आता तर आपली सुरुवात झाली आहे अजून काय काय आयुष्यामध्ये पाहावे लागणार माहीत नाही. घरातील लोकांच्या विचारांशी लढून -लढूनच आपली बहुतेक शक्ती कमी होणार. बाहेरचे लोक कसे असतील काय माहित? बाहेरच्या जगातील लोकांच्या विचाराशी लढण्या मध्ये अजून शक्ती खर्च होणार. गावातील लोकांसाठी साक्षीला काहीतरी करायचे होते. तिला असे वाटत होते की सरकारने ही मुलांच्या शिक्षणासाठी  खेड्यापाड्यातील पालकांसाठी जनजागृती करावी.निदान मुलींच्या पुढील शिक्षणासाठी तरी पालकांमध्ये सकारात्मक बदल होतील असे काहीतरी उपाययोजना कराव्यात. कारण  मीच एक अशी साक्षी नाही आहे जगामध्ये अशा किती तरी साक्षी आहेत. माझ्याच घरातील परिस्थिती सारखे अशा अनेक साक्षीच्या घरांमध्ये सुद्धा परिस्थिती असू शकतील. प्रत्येकालाच माझ्या वर्गशिक्षिकेसारखी सल्ला देणारे कोणी  भेटतीलच असे नाही. मला माझ्या शिक्षकाकडून चांगले मार्गदर्शन मिळत स्वतःला भाग्यवान च समजते. असा विचार करत करत साक्षीला कधी डोळा लागला कळालं नाही.


🎭 Series Post

View all