Feb 26, 2024
वैचारिक

ओवाळणी ...

Read Later
ओवाळणी ...
ओवाळणी ..

"आई चलं ना गं लवकर ,मला सान्वी, रूद्र यांच्यासोबत खेळायचं आहे. खूप खूप मजा करायची आहे."

अन्वी आपल्या आईला मामाकडे जाण्यासाठी घाई करत होती. आज भाऊबीज त्यामुळे
अन्वीची आई गौरीला ही माहेराची ओढ लागलेली होती.

सासरी कितीही सुख असले तरी प्रत्येक स्त्रीला माहेराची ओढ कायम असतेचं आणि रक्षाबंधन, भाऊबीज सणांच्या प्रसंगी तर ती जास्तच जाणवते.
गौरी आपल्या माहेरचे नेहमी कौतुक करायची आणि तिला माहेरचा खूप आधार ही मिळायचा. पण आता तिला पहिल्यासारखी ओढ वाटत नव्हती. आपलेपणा जाणवत नव्हता. कारणही तसेच घडले होते...

गौरी तीन भावांची लाडकी बहिण. त्यातही मोठ्या भावाची जास्तच लाडकी!
भाऊ पेक्षा तर तो वडीलच जास्त!
वडील सारखे आजारी असायचे त्यामुळे घरातील सर्व जबाबदाऱ्या त्याला कमी वयातच पार पाडाव्या लागल्या होत्या. वडिलांचा व्यवसाय, भावाबहिणीचे शिक्षण ,लग्नकार्य सर्व काही त्याने व्यवस्थित सांभाळले होते आणि त्याला बायको ही साथ देणारी मिळाली होती.गौरीला तर जणू एक मैत्रीण,एक बहिणचं मिळाली होती! सर्व काही छानचं सुरू होते. आनंदी आनंदचं होता!
पण त्यांच्या या आनंदाला कोणाची तरी नजर लागावी असेच झाले.

गौरीच्या वडिलांचे आजारपण वाढतच गेले ,सर्वांनी त्यांची खूप सेवा केली. औषधोपचार केले पण त्यांना यश मिळाले नाही. ते हे जग सोडून गेले.
सर्वांना खूप दुःख झाले. या दुःखातून सावरत असतानाच कुटुंबावर अजून एका दुःखाची छाया येत होती.
सगळीकडे कोरोनाचा हाहाःकार पसरला होता आणि गौरीच्या माहेरच्या कुटुंबातील व्यक्तिंना ही कोरोनाची लागण झाली. सर्व जण घरीच क्लारंटाईन होते पण मोठ्या दादाला खूप त्रास होत असल्याने हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करावे लागले. सर्वांना वाटत होते की, तो ही चांगला होऊन घरी येईल पण डॉक्टर खूप प्रयत्न करूनही त्याचे प्राण वाचवू शकले नाही.
वडिल तर सर्वांना सोडून गेले होतेचं पण दादाच्या जाण्याने पितृरूपी छत्रही हरवले होते.कुटुंबाचा आधारस्तंभच नियतीने हिरावून घेतला होता.
गौरी तिच्या सासरी आनंदी होती. दोन्ही भाऊही आपल्या संसारात रमलेले होते. पण आता दादा गेल्यानंतर वहिनी आणि त्याच्या दोन्ही मुलींचे काय होणार ? वहिनीचा जीवनसाथी व मुलींचा लाडका बाबा त्यांच्यापासून खूप दूर गेला होता ..कधीही परत न येण्यासाठी.
गौरीला आणि सर्वच नातेवाईकांना वाटत होते की, दोन्ही भाऊ वहिनीला व दोन्ही मुलींना सांभाळून घेतील. पण दादा गेला आणि कुटुंबातील प्रेमही गेले. असेचं वाटू लागले.

पैसा नात्यात प्रेमही वाढवतो आणि नात्यात दुरावाही आणतो.
आईवडिलांनी काही कमवून ठेवले नाही तरी मुलांमध्ये वाद होतात आणि खूप कमवून ठेवले तरी वाटणीसाठी वादविवाद होतात.

वडिलांची खूप संपत्ती होतीच पण दादानेही आपल्या मेहनतीने ती वाढवली होती. गौरीचे लग्न ,दोन्ही भावांना व्यवसाय, घरदार सर्व काही व्यवस्थित करून दिले होते. गौरीला तिच्या अडचणीच्या काळात नेहमी मदतही केली होती. रक्षाबंधन, भाऊबीज या निमित्ताने ओवाळणी म्हणून तो तिला नेहमी मदत करायचा.
आपली बहिण सुखात असावी. असेच त्याला वाटायचे.
वडील गेल्यानंतर आणि दादाच्या जाण्याने आई दुःखात होतीच पण ती ही वहिनीशी प्रेमाने न वागता आपला सासूपणा दाखवायला लागली होती.
वहिनीला व मुलींना पैशाबरोबर भावनिक आधाराची ही गरज होती.पण वडिलांची जागा कोणी घेऊ शकत नाही हे त्यांना जाणवू लागले होते.

जे नाते संकटात कामात येते, आधार देते ..तेचं खरे नाते असते.

आपल्या नवऱ्याने एक मुलगा म्हणून ,भाऊ म्हणून सर्व कर्तव्ये पार पाडली. आणि आता तो गेल्यानंतर त्याच्या बायको व मुलींना आधाराची गरज आहे. तर भाऊ जबाबदारीपासून दूर पळत आहेत. याचे गौरीच्या वहिनीला वाईट वाटायचे.
एवढ्या दुःखात वहिनीला एक सुखाची किनार लाभली होती ,ती आपल्या नणंदकडून.
नणंद त्यांना भावनिक आधार तर देतचं होती. पण तिच्या वडिलांनी तिला वडिलांच्या संपत्तीत मुलीचा हक्क म्हणून जे काही दिले होते ..ते तिने आपल्या वहिनीला दिले. भाऊ गेल्यानंतर कमवण्याचे साधन काहीच नव्हते. वहिनी जास्त शिकलेली नव्हती त्यामुळे नोकरी वगैरे करणे थोडे अशक्य वाटत होते आणि मुलींकडे लक्ष देणेही महत्त्वाचे होते. मुलींचे शिक्षण ,घरखर्च आणि अनेक खर्च यासाठी पैसा तर हवा होताच. दादाने स्वकमाईचे कमावलेले होतेचं आणि वडिलांच्या संपत्तीतील बराचसा भाग भावांसाठी खर्च केला होता आणि आता थोडीफार जी संपत्ती होती त्यावरून दोन्ही भावांत वाद सुरू होते.
दादाने जसे स्वतःच्या कर्तृत्वाने पैसा,माणूसकी मिळवली होती. तसे दोघी भाऊ स्वतः काही का करत नाही? वडिलांच्या संपत्तीवरून वाद घालतात, आपल्या दादाच्या परिवाराकडे लक्ष देत नाही.आईही तशीच. त्यामुळे गौरीला आता माहेरी जाऊच वाटत नव्हते. पण आपल्या मुलांवर चांगले संस्कार व्हावे, त्यांना नाते कळावे. त्यामुळे ती माहेरी येत जात होती.
आजही ती बहिणीच्या नात्याने भाऊबीजेला दोन्ही भावांकडे जाणार होती. पण त्या अगोदर ती दादाच्या घरीही जाणार होती. दादा जिंवत असताना ती रक्षाबंधन, भाऊबीज या दिवशी दादाचे प्रेमाने औक्षण करायची . दादाही तिला ओवाळणी म्हणून कधी पैसे,कधी साडी ,कधी छानशी भेटवस्तू आणि एकदा तर तिला घरही घेऊन दिले होते.
नात्यात देणेघेणे यापेक्षा प्रेम असणे महत्त्वाचे असते. हे दादाला माहित होते.
पण आपल्या बहिणीला तो दुःखात बघूही शकत नव्हता. म्हणून काही तरी निमित्ताने तो तिला मदत करायचा.
दादाचे आपल्या कुटुंबावर खूप प्रेम होते. सर्वांना अडीअडचणीला मदतही करायचा.
यामागे उद्देश एकच होता की, सर्वांनी आनंदी राहवे.
कुटुंब, नाते यासाठी तर असते की, एकमेकांना मदत करून आनंद देणेघेणे. आणि सणवार यासाठी तर असतात की, सर्वांनी एकत्र यावे.नात्यांचा आनंद घ्यावा.

दादाप्रमाणेच गौरीचेही असेच विचार होते.
दादाने आपल्या साठी खूप काही केले आहे. याची तिला जाणीव तर होतीच पण आता दादा गेल्यानंतर त्याच्या कुटुंबाला आधार देणे आपले कर्तव्य आहे. हे ती जाणत होती. आणि दोन्ही भावांना ही हे समजावे यासाठी ती प्रयत्न करत होती. त्या दोन्ही भावांचेही गौरीवर प्रेम होते पण संपत्तीच्या लोभाने ते भरकटत चालले होते.
पण एक दिवस त्यांना निश्चितच पश्चाताप होईल . असे गौरीला वाटत होते.

गौरी दादाच्या घरी आल्यानंतर , जेव्हा दादाच्या फोटोला ओवाळत होती तेव्हा दादा तिला समोर असल्याचाच भास होत होता. आणि गौरी त्याला सांगत होती,
"दादा, भाऊ म्हणून तू मला नेहमी मदत केली. तुझ्या मदतीमुळे, तुझ्या आशीर्वादाने माझे आता सर्व व्यवस्थित आहे. आता बहिण म्हणून मी माझे कर्तव्य पार पाडत आहे. ओवाळणी म्हणून तू फक्त तुझे आशीर्वाद दे. आणि आपल्या दोन्ही भावांनाही सद्बुद्धी मिळू दे. यासाठी देवाकडे प्रार्थना कर. "
दादाच्या फोटोशी बोलताना गौरीच्या डोळ्यात होते आठवणींचे ,प्रेमाचे आणि कृतार्थतेचे भाव !


भाऊबीजेचा सण असतो
बहिणभावाच्या नात्याचा
नात्यांमधील दुरावा संपून
प्रेम,आपुलकी जपण्याचा


समाप्त


नलिनी बहाळकर
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
//