Overthinking म्हणजेच अतिविचार नावाचे व्यसन

There are loads of disadvantages of Overhinking, let's figure it out how to overcome on the over thinking in this blog.

Overthinking म्हणजेच अतिविचार नावाचे व्यसन:-

त्या संध्याकाळी निनाद (नाव बदललेले आहे) माझ्याकडे आला..
त्याला माझ्याशी खूप काही बोलायचे होते. पण सुरूवात करता येत नव्हती.
मी त्याला बोलू द्यायला बराच वेळ दिला आणि शेवटी त्याने सुरुवात केली. 

तो मला म्हणाला,"सर, मला खूप त्रास होत आहे"
"कसला त्रास?" मी त्याला विचारले.

"नाही कळत आहे मला. डोक्यात खूप विचार येतात..सतत येत असतात. काही कळतच नाही की का असे होते..विचारांची साखळी तयार होते. त्याने खूप नकारात्मकता येते. मन अस्वस्थ होते. पहिला जो विचार आलेला होता तो शेवटचा विचार होईस्तोवर असंख्य विचार येऊन जातात ज्यांचा एकमेकांशी काहीच संबंध नसतो. 

"अजून काय होत असते..?"

"एकच विचार बऱ्याच वेळा मनात घोंगावत राहतो. खूप वेळ मी एकाच विचारावर काम करत राहतो आणि त्यामुळे मेंदू पूर्णपणे थकून जातो.. काय करू मी कळत नाही आहे.."

निनाद सारखी अवस्था आज बऱ्याच लोकांची आहे. अतिविचार करून स्वतःला त्रास करून देणे ही सवय झाली आहे.

बऱ्याच अंशी आपल्या मनातील काळजी, चिंता आणि अशांतता ही या ओव्हरथींकिंग ला जवाबदार असते. तसेच जर काही लोकांना जर एखाद्या गोष्टीचा निर्णय घ्यायला अवघड जात असेल तरी ओव्हरथींकिंग घडते.
काही लोक जी अति संवेदनशील असतात, त्यांना दुसऱ्यांच्या वागण्याने खूप त्रास होतो.. असे लोक दुसऱ्यांच्या वागण्याचेच विचार करत राहतात.

असेही लोक मी पाहिले आहेत की एखाद्या घडणाऱ्या किंवा कदाचित कधीही न घडणाऱ्या गोष्टींचा विचार करून स्वतःला त्रास करून घेतात. 'असे झाले तर काय होईल? तसे झाले तर कसे होईल? मग माझे कसे होणार?' असे विचार करणाऱ्या लोकांचा काळजी करत राहणे हा बेस पक्का असतो आणि त्यातून बाहेर न पडता आल्यामुळे ते अतिविचार करून काळजी करत राहतात.

आता यावर उपाय काय हे पण पाहुयात:-
1. सगळयात महत्वाचे जाणा की काळजी आणि वास्तवता यात काय फरक आहे? तुमची काळजी करणे आणि वास्तवात हे घडणे यात जर खूप अंतर असेल तर तुमची काळजी ही तुम्ही अवाजवी निर्माण केली आहे हे ओळखा.

2. त्या क्षणात जगायला शिका कारण तो क्षण आपल्याला वर्तमानात ठेवतो. काळजी ही कायम घडून गेलेल्या कुठल्या गोष्टींची किंवा घडणाऱ्या गोष्टींची वाटत असते आणि म्हणूनच त्या वर्तमान क्षणात जगता आले पाहिजे.

3. समस्येच्या बाजूने गोल गोल फिरण्यापेक्षा त्या समस्येचे काय निश्चित उत्तर असेल याचा विचार करा. हे उत्तर मिळाले की तुमचा त्या समस्येला सामोरा जाण्याचा आत्मविश्वास पण वाढेल. 

4. स्वतःच्या भावनांना नियंत्रित ठेवा. जे जर तुम्हाला जमले तर तुम्ही अनेक गोष्टींवर विजय मिळवू शकतात. भावनांना जर लगाम लावता आला तर सर्वात उत्तम, कारण यामुळेच आपल्याला कुठे नक्की थांबायचे हे कळू शकते.

5. भूतकाळातील काही गोष्टींना सोडून द्यायला शिका. बऱ्याच वेळेला आपण असे झाले असते तर किंवा मी तसे केले असते तर ह्याच विचारात स्वतःला त्रास करून घेतो. घडून गेलेली गोष्ट आपण   बदलू शकत नसतो तरी त्यावर विचार करत बसतो. भविष्यात चुका  टाळण्यासाठी आपण भूतकाळातून काही शिकले जरूर पाहिजे पण भूतकाळात अडकून पडायला नको.

अतिविचार करणे हे माणसाला लागलेले एक व्यसनच आणि त्यामुळेच ह्या व्यसनापासून मुक्ती आपण लवकरात लवकरात मिळवायलच हवी.

काळजी करू नका, काळजी घ्या!

©®अमित मेढेकर