ओवाळणी.

ओवाळणी




रक्षाबंधन हा असा सण आहे ज्यादिवशी बहीण भावाला ओवाळते आणि भाऊ बहिणीला आयुष्यभर तिच्या रक्षणाचे वचन देतो, बहीण भावाच्या नात्यासाठी हिंदू धर्मात दोन सण प्रामुख्याने साजरे केले जातात एक म्हणजे रक्षाबंधन आणि दुसरा भाऊबीज, या दोन्ही सणांमध्ये बहीण आपल्या भावाला ओवाळते आणि भाऊ काही भेटवस्तु म्हणून आपल्या बहिणीला काही तरी देतो, तसेच रक्षाबंधनाला बहीण भावाला राखी बांधते, आणि आपलं भावावरील प्रेम व्यक्त करते.
तसही भावाचं आणि बहिणीच नात हे सर्व नात्यांपेक्षा वेगळं असत.त्यामध्ये भांडण ही होते आणि प्रेम सुद्धा.  एकमेकांना मदत करणे आणि एकमेकांच्या खोड्या सुद्धा, घरात बहीण भाऊ एकत्र असले की दोघांमध्ये मस्ती, गप्पा ह्या सर्व गोष्टी होतातच त्यांचे एकमेकांसोबत भांडण होऊन  सुद्धा  त्यांचं एकमेकांवरील प्रेम कधी कमी होत नाही.
बहीण भाऊ हे फक्त नात्याने बहीण भाऊ नसून ते चांगले मित्र सुद्धा असतात ज्याप्रमाणे मैत्रीत भांडण प्रेम एकमेकांना समजून घेणं या सर्व गोष्टी या नात्यात असतात या नात्याला शब्दांमध्ये व्यक्त करण कठीणच.
भाऊ खूप त्रास देतो, सतत मस्करी करतो, जगातले सगळे प्राणी कमी पडतात त्याला शिव्या देताना पणं आपल्या आयुष्यातील सर्वात मोठा शुभचिंतक आणि आपल्याला चांगल्या-वाईट परिस्थित साथ देणारा आपला हक्काचा माणूस असतो.
सगळ्या नात्यांमध्ये अगदी वेगळं नातं कोणाचं असले तर भावा बहिणीचं! एकमेकांशी भांड भांड भांडतील पण त्यांचं प्रेम कधीच कमी होणार नाही. त्यांचं एकमेकांशी कधीच पटणार नाही पण एकमेकांबद्दल माया खूप असते. म्हणूनच जेव्हा लग्न करून बहिण दुसऱ्याच्या घरी जाते तेव्हा प्रत्येक भावाच्या डोळ्यांत पाणी आल्या शिवाय राहत नाही. लहान भाऊ म्हणून मोठ्या बहिणीसोबत राहणं जरी चांगलं असलं तरी त्यापेक्षा जास्त भारी आहे मोठा भाऊ बनून लहान बहिणीला सांभाळणे. ज्यांना लहान बहिण असते त्यांना कोणत्या मैत्रिणीची सुद्धा गरज भासत नाही.

त्यांच्यासाठी त्यांची बहिणीच बेस्ट फ्रेंड असते. पण तुम्हाला एक गोष्ट माहित आहे का लहान बहिणींना मोठा व समवयीन भाऊ असण्याचा एक मोठ्या फायदा आहे. ज्या बहिणींना मोठा वा समवयीन भाऊ असतो त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे गुण अधिक खुलतात.
दिवसभर भावासोबत असल्याने बहिण सतत त्याच्याशी संवाद साधत राहते. यामुळे पुरुषाशी बोलण्याची एक सवय तिला लागते. याच कारणाने कोणत्याही पुरुषाशी बोलताना ती लाजत नाही. ज्या मुलींना भाऊ नसतो त्यांच्यात हा कमीपणा लगेच दिसून येतो. पुरुषांशी संवाद साधण्याबाबत त्या लाजऱ्या बुजऱ्या बनतात. पण ज्यांना भाऊ असतात त्यांना अनेक वर्ष एकत्र राहिल्याने पुरुषांशी कसे बोलावे, काय काय चुका टाळाव्यात या गोष्टी कळतात, भाऊ सुद्धा जिथे जिथे त्या चुकतात तिथे चुका दाखवून देतात. त्यामुळे पुरुषांशी त्या अधिक आत्मविश्वासाने बोलू शकतात.
ज्या मुलींना भाऊ असतो त्या मुली अधिक प्रेमळ आणि दयाळू असतात याचे कारण म्हणजे त्यांना लहानपणापासून आपल्या भावाची सोबत मिळालेली असते. एकटे राहणे व एकांतपणा त्यांनी कधी अनुभवलेला नसतो. ज्यांच्या नशिबी एकटेपणा असतो त्या मुली अधिक चिडखोर आणि रागीट असतात. त्यांना माणसे नकोच असतात. या उलट ज्यांना भाऊ असतो त्यांना नात्यांची , लोकांची किंमत माहित असते. त्या सदा आनंदी राहतात, त्यामुळे त्यांचा स्वभाव पण तसा घडत जातो.
कोणतीही गोष्ट असो ती शेअर करायला भाऊ असल्याने साहजिक मनावर कोणता भर राहत नाही. प्रत्त्येक गोष्टीमध्ये भाऊ सदैव मागे उभा असतो यामुळे कोणतंही संकट आलं तरी बहिणी निश्चिंत असतात. यामुळेच अशा बहिणी अजिबात ताण तणावाखाली नसतात. या उलट ज्यांना लहान भाऊ असतो किंवा ज्या मुली एकट्या असतात त्यांना मात्र आपल्या मनातील गोष्टी शेअर करायला कोणी नसल्याने त्या मोठ्या प्रमाणावर ताण तणावाखाली येतात. अशावेळी घरंच्याचा सुद्धा सपोर्ट नसले तर त्या डिप्रेशन मध्ये सुद्धा जाऊ शकतात. त्यामुळेच एक मोठा वा समवयीन भाऊ असणे चांगले!
हा एक मोठा फायदा लहान बहिणींना मिळतो. भाऊ हुशार असेल आणि अभ्यासात काही अडलं तर त्यांना अजिबात टेन्शन नसतं कारण घरच्या घरी एक शिक्षक उपलब्ध असतो. या शिवाय भाऊ जर खूप यशस्वी असले तर त्याचा आदर्श बहिणींना डोळ्यासमोर ठेवता येतो. त्यांच्या सारखं मला व्हायचं आहे हि जिद्द त्यांना सतत प्रेरणा देते. यामुळे अशा बहिणी आयुष्यात नक्कीच यशस्वी होतात. करियरच्या बाबतीत सुद्धा घराच्या घरी भावाकडून प्रत्येक ठिकाणी मार्गदर्शन मिळत असते. एकंदरीत ,मोठा भाऊ असणे हा उज्ज्वल भविष्याचा पाया आहे.
मोठ्या भावांसोबत राहून बहिणींमध्ये एक हिम्मत निर्माण होते. मोठे भाऊ आपल्या बहिणीला कोणत्याही संकटाला सामोरे कसं जायचं, कसं लढायचं ते शिकवतात. काही झालं तरी मी नेहमी सोबत आहे हि गोष्ट मनात बिंबवतात. यामुळे मुलींच्या मनातील भीती सुद्धा दूर होते आणि त्या बिनधास्त होतात. आयुष्यात कोणतीही संकटे आली तर त्याला हसत हसत समोरे जाऊन लढण्याची जिद्द त्यांच्यात असते. तर या आणि अशा अनेक गोष्टी मिळून बहिणीचे व्यक्तीमत्त्व अधिक खुलते.
इतके फायदे आयुष्यात बहिणीला असतात तर मला सांगा ओवाळणीची, भावाची खिसे कापण्याची, तो काही देत नाही म्हणून रुसून बसण्याची काय गरज आहे.  आपण आधीच प्रॉफिट मध्ये आहोत. अभिमान वाटायला हवा की आपल्याला भाऊ आहे.
माझ्याकडे आहे ही भावाची ओवाळणी तुमच्याकडे आहे का.?