Login

ओवाळणी..

ओवाळणी..


प्रिय दादा,

आज भाऊबीज.. वर्षाचा सण.. पण का कुणास ठाऊक! मन उगीच भरून येतेय. जुन्या आठवणी पिंगा घालू लागल्यात. खरंतर आई नेहमी म्हणते सणासुदीला डोळ्यात पाणी आणू नये पियू.. वर्षभर तसाच नाट लागतो. पण तिला कसं सांगू!! अगं आई.. ओल्या आठवणींचं काय करू? पाझरणाऱ्या डोळ्यांना कसा आवर घालू? आंबटगोड आठवणींना कसं विसरू?

दादा, तुला आठवते का रे? आपली बालपणातली दिवाळी.. आपली भाऊबीज.. दादा, आईने तुला दिलेल्या फराळातल्या लाडवावर पहिला हक्क माझाच असायचा. तुझ्या हाताने भरवलेल्या पहिला लाडवाचा घास.. किती गोड व्हायचा सांगू.!! बाबांनी आणलेले फटाके वाजवताना किती घाबरून जायचे मी.. तुझ्या वाट्याचे फुलबाजे, पाऊस, भुईचक्र, तू खुशाल मला देऊन टाकायचा.. तुला आठवतं दादा? एकदा मी घरात भुईचक्र लावलं होतं आणि ते घरातच फुटलं. जोराचा आवाज झाला होता.. मग आईने पाठीत जोरात दिलेला धम्मकलाडू.. नंतर माझ्याबरोबरीने तुलाही दिलेले फटके.. आतिषबाजी करणाऱ्या फटाक्याइतका नाही पण धमाकेदार आवाज झाला होता ना.. आणि मग ‘गे बाय माजे..’ असं म्हणत माईने घाबरून जवळ घेतलं होतं तुला आणि मला.. दादा, तेंव्हा ना तू माझा हात पकडला होता. जसा एकदा घरातले दिवे गेल्यावर अंधार झाला होता, मी घाबरून जोरात ‘दादा..’ ओरडले होते अगदी तसाच.. “तो तुझा आश्वासक स्पर्श.. ती मायेची ऊब.. आजही आठवतेय रे..

“पियू, घाबरू नकोस. मी आहे ना. काही होत नाही. हे बघ मी फटाके उडवतोय. मला काहीच झालं नाही म्हणजे तुला काहीही होणार नाही.“

असं म्हणत माझ्या मनातली भीती घालवणारा तू.. आजही आठवतोय. पण दादा तुला खरं सांगू.. तेंव्हा तू काय बोललास ते कळलं नाही पण तू सोबत आहेस म्हणजे मला काहीच होणार नाही. हा विश्वास कायम मनात. ‘दादा है तो डर किस बात का?’ असं स्वतःलाच बजावत आले. अगदी आयुष्याच्या प्रत्येक वळणावर..

दादा, तुला आठवतं का रे? मी तुला भाऊबीजेला औक्षण करायचे. म्हणजे आईच्या मदतीशिवाय शक्यच नसायचं ते. आई ताट तिच्या हातात पकडायची मग मी तुझ्या भाळी माझ्या इवल्या इवल्या नाजूक बोटांनी कुंकूवाचा टिळा लावायचे. सोन्याची अगंठी तुझ्या भाळी लावून गोल फिरवून पुन्हा ताटात ठेवायचे. पंचरस धागा तुझ्या हाती बांधायचे. आईने आणलेलं गिफ्ट तुला दयायचे आणि बाबांनी आणून दिलेला फ्रॉक तू मला ओवाळणी म्हणून द्यायचा.. किती खुश व्हायचे मी.. साऱ्या चाळीत ओरडून सांगायचे ‘माझ्या दादाने गिफ्ट घेतलंय.‘ सगळ्यांनी फ्रॉकचं कौतुक केलं की जाम भारी वाटायचं..

दादा, तुला आठवतं का रे? तू तुझ्या पॉकेटमनीतून मला घेतललं पहिलं टिकल्याचं पाकीट.. किती छान होतं ते! माझ्यासाठी खूप अनमोल..! त्यानंतर मग प्रत्येक गिफ्ट तूच घेत आलास.. “पियू, तुला हे छान दिसेल.. हा रंग तुझ्यावर जास्त खुलून दिसतो.” असं म्हणत तुला जे आवडेल तेच तू आणत आलास. मग तुझ्या आवडी निवडी माझ्या कधी झाल्या ते मलाच समजलंच नाही. मग तुझा प्रत्येक निर्णय माझा झाला. मी तशीच घडत गेले.. कधी गुणी.. कधी हट्टी बनत गेले..

मग हळूहळू हातातून वाळूचे कण निसटून जावेत तसं बालपण निसटून गेलं. काळाच्या पडदयाआड सोनेरी क्षण कुठेतरी हरवून गेले. आपण मोठे झालो आणि जबाबदाऱ्या आल्या.. भले बुरे क्षण आले आणि त्यात कुठेतरी आपलं निरागस नातं हरवून गेलं. नात्यातला ओलावा, तो गंध उडून गेला. दादा जबाबदारीच्या ओझ्याखाली दबला गेला. प्रायोरिटीज बदलत गेल्या अगदी नात्यांच्याही. स्वतःच्या वाट्याचा खाऊ, फटाके सहजपणे देऊन टाकणारा भाऊ संपत्तीच्या वाट्यासाठी वाद घालू लागला. उंची भेटवस्तूंची रेलचेल वाढली पण नात्यातली स्निग्धता कमी झाली. ती ऊब कमी झाली. भेटवस्तूंच्या किंमती वाढल्या पण नात्यांची वाढ खुंटून गेली.

आज इतक्या वर्षांनी मला आपली लहानपणीची दिवाळी आठवली. मनाचा कोपरा हळवा झाला. दादा तुला सांगू.. त्या दोन रुपयाच्या टिकल्यांच्या पाकिटाची किंमत कशालाच नाही रे.. अगदी तू आणलेल्या हजारो रुपयांच्या साड्यांनाही नाही आणि म्हणूनच दादा, नकोय मला काही. नको काही ओवाळणी..नको काही उंची उपहार, भेटवस्तू.. द्यायचं असेल तर इतकंच दे.. ती आपली लहानपणीची दिवाळी परत दे. तुझा तो आश्वासक स्पर्श दे. आयुष्याच्या प्रत्येक वळणावर फक्त तुझी साथ दे. दादा वहिनीच्या रूपात आई बाबाची माया दे. तो माझा लहानपणीचा दादा मला परत दे. बस्स अजून काही मागत नाही आईबाबांनंतर तुझ्यातच मला माझं माहेर मिळू दे.. इतकीच मला माझी हक्काची ओवाळणी दे..

पूर्णविराम..
©निशा थोरे (अनुप्रिया)