तुमच्या सुखात आमचं सुख

Kind mother-in law

तुमच्या सुखात आमचं सुख

आमच्या अमोलच्या लग्नाला सहा महिने होत आले. एव्हाना सून रुळायला हवी होती! पण कसंच काय. अमिषाला माहेरचा ओढा जरा जास्तच. आता तुम्ही म्हणाल,अशी काय म्हणते ही बया! तसं नाही ओ. 

तिच्या माहेरच्या ओढीबद्दल मला काही म्हणायचं नाही. नव्या नवरीला असतेच ओढ, माहेराची. मलाही होतीच की..होतीच की काय म्हणते.. अजुनही आहेच पण मग माझ्या लेकीला मायालाही असणारच नं. ती यायची म्हंटलं की ही बया आपलं चंबूगबाळं उचलून माहेरी जायला निघायची. 

एकदोनदा बघितलं,मग अमिषाला समजावलं मी,"बाई गं,तुझी नणंद आली की तू माहेरी जाऊ नकोस. त्या आधी किंवा नंतर जा. हवं तेवढं रहा. झालं मिरची झोंबली नाकाला. केवढा राग आला! अगं बाई बाई बाई! डोळ्यातून नुसत्या धारा. बादली भरली असती. मला धडकीच भरली. हिने हिच्या मम्मीला एकात दोन घालून सांगितलं तर! अशा प्रश्नांचा भुगा माझ्या डोक्यात भरुन,ही बया ऑफिसला पसार. मग काय बाम चोपडून बसले गुपचूप. मीच नको ते कूस काढलेलं ना. 

दुपारी अमोलचा फोन,"आई,तू अमिला काय बोललीस? ती गेली तिच्या मम्मीकडे. तिची मम्मी मला बडबडत होती." 

मी म्हंटल,संध्याकाळी बोलू नि फोन ठेवून दिला.

संध्याकाळसाठी तिखट वरण,अळुवडी,वांग्याचं भरीत,पोळ्या,भात हे सगळं बनवण्यात माझा वेळ कधी गेला मला कळलच नाही. 

हे आले. यांना चहा वगैरे दिला. थोड्याच वेळात अमोल आला. त्याने हातपाय धुतले व त्याच्या खोलीत गेला. अमिला मस्का मारत होता वाटतं. मलाही अमिषाचा रागच आला. हीच गोष्ट नाही हो. घरात काही तिला बोलले तर पहिलं मम्मीला फोन करुन सांगते. मला तर नं आम्ही लहानपणी कोणी मोठ्यांनी मारलं तर करंगळीचं एक बोट गोल फिरवून,खालचा ओठ किंचीत पुढे काढून,आईला नाव..आईला नाव असं करायचो त्याचीच आठवण येते हल्ली. 

नाहीतरी माझ्या मायाला माहेरी यायला वेळ कुठे असतो!  दोन मुलं,सासूसासरे,नवरा,नोकरी यात तिचा दिवस कधी उगवतो न् कधी मावळतो तिचं तिलाच समजत नाही. 

अमोलचं जेवण झालं तसं अमोल मला म्हणाला,"आई,तू मोठी आहेस नं अमिपेक्षा. तुच जरा समजून घे तिला."

"अमोल,मलाही मुलगी आहे म्हंटलं. तुला काय मी कजाग सासू वाटले! कधी पाहिलयस मला अमिशी भांडताना? अगदी इथल्या सगळ्या गोष्टींच ब्रिफिंग मम्मीला देत असते ती. 

माझं चुकलं तर खरंच सॉरी पण तुला तरी तुझी ताई घरी येते त्याचवेळी अमि माहेरी जाते हे बरं वाटतं का? हां एकदोनदा माया आली तेव्हा होती अमि घरात तेही का तर तिचे मम्मीपप्पा केरळ टूरला गेलेले त्यामुळे तिचा नाइलाज होता. त्यावेळी आठवतय तुला अमि बेडरुममधून बाहेर आली नव्हती. माझा सगळा स्वैंपाक आवरल्यावर जेवायला बाहेर आली. त्याबद्दल तिला बोलले तर लगेच मम्मीला फोन. तू कधी पाहिलयस मला तुझ्या बायकोशी भांडताना? चार गोष्टी रीतीच्या सांगायला गेलं की टांगायला उठते नुसती."

"हे बघ आई,तुम्हाला आवडलेल्या मुलीशीच लग्न केलंय मी. प्रेमविवाह वगैरे केला नाहीए. तुम्हा दोघींच तुम्ही बघून घ्या काय ते. एकतर तो बॉस नुसता पाठी पडलेला असतो. त्यात ह्या अमिच्या आईचे फोन. असं का केलंस..तसं का केलस! मीपण कंटाळून जातो गं."

असेच साताठ दिवस गेले. यांच्या सेवानिवृत्तीचा दिवस उजाडला. आम्ही यांच्या ऑफिसातल्या व गाडीतल्या स्नेहींसाठी एक छोटी मेजवानी आयोजित केली होती. माया,तिचे सासूसासरे,अमि,तिचे मम्मीपप्पा साऱ्यांना बोलवायचं ठरलं.

मी अमोलला आवाज दिला,"मी आज फोन करुन बोलावते अमिला नि तुझ्या सासूसासऱ्यांना. का तू लावतोस फोन?"

"नको हां. तुच लाव."

"बरं जेवणाची ऑर्डर देऊन ये पंचपात्रेंकडे."

अमोल मान हलवत गेला. हल्ली वाळत चाललय लेकरु माझं. कोरपोरेटमधला जॉब..सदा बिझी असतो त्यात हे मम्मीच्या अम्मिचं टेंशन.

पार्टीच्या दिवशी सकाळीच अमि हजर झाली. हळूहळू एकेकजण येऊ लागले. माया व तिचे सासरचे आले. काही स्नेही यांच्याबद्दल चारशब्द बोलले . मला खरंच भरुन आलं होतं. सगळीजणं गेल्यावर अमि व अमोलही निजायला गेले. आम्ही दोघंच होतो हॉलमधे. रंगीबेरंगी फुलांच्या बुकेनी हॉल सजला होता. 

हे मला म्हणाले,"वसु, माझ्या बदलीच्या नोकरीमुळे मी सतत फिरत राहिलो. तू मात्र कधी तक्रार केली नाहीस. मुलांच शिक्षण,माझे आईवडील..सगळं सांभाळलंस..माझ्या डोक्याला कधी घोर लागू दिला नाहीस." 

यांनी एक गुलाबी फुलांचा बुके माझ्या हातात दिला व म्हणाले,"या सन्मानाला तुही माझ्याइतकीच पात्र आहेस."  किचनमधे अमिच्या पैंजणांचा आवाज आला. मला पडद्यामागे तिचा पायरव जाणवला. म्हंटलं,आली असेल पाणी प्यायला. हे आपल्याच धुंदीत बोलत होते,"आता उर्वरित दिवस फक्त तुझ्यासाठी..तुझ्या सेवेत हजर असणार मी."

मी म्हंटलं,"पुरे आता,चला झोपायला."

आम्ही ठरवलं..जे जे धकाधकीच्या पर्वात करता आलं नाही ते सगळं करायचं.  सकाळी उठून दोघं फिरायला जाऊ लागलो. घरी आल्यावर मी आमच्या दोघांचा नाश्ता करायचे. अमोल व अमि त्यांचे डबे घेऊन ऑफिसला निघायचे. दुपारचं जेवणंही दोघांचच. पहिलं मी दुपारी एकटीच असायचे, जेवायला. आता सोबतीला हे असल्याने बरं वाटू लागलं. संध्याकाळचा स्वैंपाक आवरून परत जरा हवेला जाऊन बसायचो पार्कात. बाकीच्या कामांना बाई होती. 

एके दिवशी हे मला दुकानात घेऊन गेले. तिथे मी दोनचार कुरते..यांच्याच आवडीचे व लेगिंग्स घेतल्या. त्यावर मेचिंग इमिटेशन ज्वेलरी घेतली. घरी आलो तर अमि आलीच होती. ती कॉफी पित होती. मी नवीन ड्रेस घालून पाहिला. ह्यांनी हाताची बोटं जुळवून छान दिसत असल्याची खूण केली. 

मी अमिकडे बघितलं..मला वाटलं..तिला विचारावसं..कसा दिसतोय वगैरे पण तिने मुद्दामहून मान फिरवली. यांनी टेरेसमधे दोन आरामखुर्च्या आणल्या. मला म्हणाले,"यात बसून कॉफी पित जाऊ." रोज कामं आवरली की आम्ही टेरेसमधे बसू लागलो. पार्कात खेळणारी मुलं,येणारेजाणारे फेरीवाले दिसायचे पण आमचं हे बसणंसुद्धा अमिच्या मनाला येत नव्हतं. 

आणि एके दिवशी अमोल म्हणाला,"आई,आम्ही घर घेतलं. आम्ही तिकडे शीफ्ट होतोय." अमोलच्या मागून आलेली अमि मला आज बऱ्याच दिवसांनी खूष दिसत होती. 

हे काही बोलणार इतक्यात मी यांना थांबवल व अमोलला म्हंटलं,"खुशाल जा. सुखात रहा तिथे. काही गरज लागल्यास कळवा आम्हाला."

तेव्हापासून अमोल,अमि वेगळे राहू लागले. आता अमि येते..माझ्याशी गोड बोलते..ह्यांची विचारपूस करते..मी मनात म्हणते,"अगं पोरी,वेगळं रहायचं होतं तर मला तसं सांगायचं होतंस . कशाला उगाच चिडचिडत राहिलीस. शेवटी काय तुमच्या सुखातच आमचं सुख."

खरंतर मुलांशिवाय रहायचं म्हणजे बोअर होत होतं पण मग विचार केला,"आपल्याकडे निदान घर तरी आहे, स्वतःचं. दैनंदिन गरजा पुरवण्यास लागतो तेवढा पैसा आहे. पुरेशी बचत बचतखात्यात जमा आहे पण अशा आईवडिलांच काय होत असेल जे मुलावर,सुनेवर आर्थिकदृष्ट्या, निवाऱ्यासाठी अवलंबून असतील! सेपरेट रहाण्यासाठी त्यांना बाहेर काढलं तर ती कुठे जात असतील नि काय खात असतील. म्हातारपणात खाण्यापिण्यास लागतात त्याच्या चौपट पैसे औषधगोळ्यांस लागतात. म्हंटलं सुखी आहे मी देवा. माझ्या लेकरांनाही सुखात ठेव." 

आम्ही दोघं मधे अष्टविनायक यात्रा करून आलो. पंधरवड्यातून एकदा कुठेतरी बाहेर जाणं व्हायचच. माया कधी दोनचार दिवस येऊन रहायची. तिच्या मुलांत छान वेळ जायचा आमचा. मायाच्या छोटूसोबत हे अगदी लहान मूल होऊन खेळायचे. घोडा काय नं बैल काय. अमि आता मायाशीही छान बोलू लागली होती. 

कधीकधी तर दोघी मिळून यायच्या. मी दोघींना त्यांच्या आवडीचं खायला करुन घालायची. 

एकेदिवशी सकाळीच अमोलचा फोन आला.

"आई,तू लवकर ये अगं. अमिच्या हाताला फ्रेक्चर झालय."

मग काय. दोघंही गेलो. महिनाभर तिथेच राहिलो. स्वैंपाक मी करायचे. बाकीच्या कामांना बाई होती. अमिचा उजवा हात फ्रेक्चर झाल्याने अमिला मला भरवावं लागायचं म्हणजे सकाळी नि दुपारीच हं. रात्रीचं जेवण तिला अमोल भरवायचा.  

चारआठ दिवसांनी अमिची मम्मी येऊन जायची. तिला इथे येऊन रहाणं तसं शक्य नव्हतं. घरी अमिचा भाऊ व वडील होते. त्यांचं सगळं करावं लागायचं. अमिच्या मम्मीतही आता मला खूप सकारात्मक बदल जाणवत होता. मी अमिच्या करत असलेल्या सेवेमुळे का होईना अमि मला आपलं माणूस समजू लागली होती. तिचं प्लास्टर काढल्यावरही आम्ही आठवडाभर तिथेच राहिलो. तिच्या दुखावलेल्या हाताला काही दिवस आरामाची गरज होती म्हणून.

मग मात्र एका रविवारी आम्ही आमच्या घरी निघालो तशी अमि माझ्याजवळ आली व म्हणाली,"सॉरी,आई मी तुम्हा दोघांना फार चुकीचं समजत होते. तुमची एकमेकांशी असलेली मैत्रीही मला बोचत होती कारण माझ्या मम्मीपप्पांना मी सतत हमरीतुमरी करतानाच पाहिलय.  आईबाबा,तुम्ही प्लीज इथेच रहा का आम्ही येऊ परत आपल्या घरी?"

मी अमिला जवळ घेत म्हंटलं,"अगं अमि तू बोललीस त्यातच आलं सगळं. तुम्ही इथेच रहा आणि अधनामधना या घरी. आम्हीही येत जाऊ. तुम्ही सुखी रहा एवढंच हवं आम्हाला."

-----सौ.गीता गजानन गरुड.