आमच्या घरचे दोन गणपती!

Family Experience with Ganapati bappa.

गोष्ट छोटी डोंगराएवढी -(९)


विषय - गोष्ट माझ्या गणरायाची

शीर्षक - आमच्या घरचे दोन गणपती!


नेहमी कथा किंवा लेख लिहिणं होतं पण क्वचितच अनुभव लेखन होतं. हा विषय वाचल्यादिवशीपासून वाटलं की अनुभवच लिहावा.
गणेशोत्सव हा माझाही खूप जिव्हाळ्याचा विषय म्हणजे माझ्या व्यक्तिमत्त्वातला जो काही सांस्कृतिक पैलू आहे त्याच्या जडण घडणीत माझ्या शाळेइतकाच गणेशोत्सवाचाही वाटा आहे हे मी मान्य करते.
मुळात स्टेजफियर प्रकार नाही त्यामागे गणेशोत्सवातले कार्यक्रम आहेत. ४-५ इयत्तेपासून तर १० वी पर्यंत डान्स , गाणं , देखावे, आणि सुत्रसंचलन, वेशभूषा वगैरे सगळं केलंय आणि कॉलनीत राहण्याचा एक समृद्ध अनुभव गाठीशी आहे.
त्यानंतर अकरावी ते बी एस्सी पर्यंत जेव्हा जालन्यात राहायला आलो तेव्हा नवी कॉलनी ,नवे लोक आणि तरूण मंडळींचं मित्रमंडळ सुरू करून गणेशोत्सवाची सुरुवात करणार्‍या लोकांमधे मी एक भाग होते. आताही सगळं चालू आहे पण ३०- ३२ वर्षानंतरही आज नाव निघतं. अभिमान वाटतो. सहभागी वरून आयोजक बनले, ती सजावट, त्या स्पर्धा, परीक्षण, निकाल, बक्षिसं , खर्च ,बजेट, मिरवणूक व आनंद या सगळ्याची सांगड घालण्याचं जणु ट्रेनिंग मिळालं.
मग १९९४ माझं लग्न झालं आणि हैदराबाद ला आले.
इथे सगळी उत्सुकता ओढ होती पण मन मात्र सतत जुन्या दिवसांत रमायचं. इथल्यासारखं काहीच नव्हतं पण एक गोष्ट खूप वेगळी होती ती म्हणजे दोन गणपती!
सासरी दोन गणपती बसवले जायचे. डेकोरेशनला मजा आली. गणपतीही आले पण दोन्ही सारखेच !
लहानपणी दरवर्षी गणपती आणायला गेल्यावर कधी कधी २-३ गणपती आवडायचे. पण एकच निवडावा लागायचा.
आता वाटलं अरे छान ,दोन आवडलेले गणपती आणता येतील.
पहिल्यावर्षी सुरळीत झालं मी फक्त मदतनिसाची भूमिका घेतली होती.
सासूबाईंना पुन्हा विचारलं की "दोन गणपती का बसवायचे?"
तर त्या म्हणाल्या की संतोष म्हणजे माझे मिस्टर हे नवसाने जन्मलेले आहेत त्यामुळे तो दुसरा गणपती सासूबाईंचा नवसाचा गणपती!
त्यांनी सांगितलं की त्यांचं लग्न खूप लवकर झालं होतं १४ व्या वर्षी पण लग्नानंतर ९ वर्ष लेकरू बाळ नाही म्टलं की जुन्या लोकांना लगेच काळजी वाटून व्रतंवैकल्य सांगितली जातात. तर असंच कुणीतरी सांगितलं की गणपती विसर्जनादिवशी गणपती विसर्जित न करता त्याला एका खोक्यात लिंपून ठेवा आणि वर्षभरात बाळ झालं की मग पुढच्यावर्षी दोन गणपती बसवा. एक नेहमीचा व एक नवसाचा.
मला हे सगळं खूप एक्सायटिंग वाटलं. त्यावेळी पाळण्यात संतोषचं नाव साईविनायक असं ठेवलं होतं म्हणे. मी चिडवायचे कधी कधी नवसाचा गणपती म्हणून.
लग्नाच्या २ वर्षानंतर माझा मोठा मुलगा शशांक जन्मला व सगळं व्यवस्थित चालू होतं.
एकदा गणेशोत्सवाला मी व संतोष गणपती आणायला गेलो व एकसारखे दोन गणपती मिळेचनात. काहीतरी फरक होता. म्हणजे वस्त्राचा रंग वेगळा चालला असता पण प्रत्येक मॉडेल वेगळं. मग मी हळूच मनातली इच्छा बोलून दाखवली म्हटलं दोन वेगळे घेवूयात ना!
पर्याय नाही म्हणून आम्ही घेतले. घरी आल्या आल्या सासूबाईंना सांगितलं की आम्ही वेगळे आणलेत, त्यांचा विरोधच त्या गोष्टीला.
अहो पहा तरी
संतोषने गणपती बाहेर काढले आणो पाहतो तर एका गणपतीचा हात निखळून पडलेला. बापरे!
याला श्रद्धा म्हणावं की अंधश्रद्धा माहित नाही.
पण हे सिद्ध झालं की सारखेच गणपती आणायचे व प्रयोग करायचे नाहीत.
परत गेलो व गणपती परत केले. त्याच माणसाकडे आता नवीन मॉडेलचे एकसारखे गणपती होते. ते घेतले व व्यवस्थित पूजा केली .
पुन्हा असा प्रयोग केला नाही.
दरवर्षी वेगवेगळ्या ठिकाणी का बसवत नाही पण दोनच व सारखे गणपती बसवायचे आणि दर्शनाला येणारे सगळेजण विचारायचे " दोन गणपती? कसे काय?" मग ती नवसाची कथा रिपीट व्हायची.
संतोषला खूपदा मोठा एक गणपती बसवावा वाटे कारण चौरंगावर दोन गणपती बसवायचे म्हणजे आकार छोटाच घ्यावा लागायचा. कारण डेकोरेशन आणि दोन गणपती शिवाय वळीव लाडू व मोदकाने सासूबाईं पार भरायच्या. तर जागा पुरली पाहिजेना!
पण पुढे असं होईल हे कोणाला माहित?
विधिलिखित आपल्याला माहित नसते. आपण अगदी नेहमीसारखेच निवांत रहात असतो.
२०२० चा गणेशोत्सव , कोरोनाची पहिली लाट संपल्यानंतरचा उत्सव . लग्नाला २६ वर्षे म्हणजे माझा २६वा गणेशोत्सव सासरचा. हा दोन गणपतींचा!
सासूबाई खुर्चीवर बसून समोर स्टूल घेवून वळीव लाडू करतायत. मी खाली बसून मोदक भरते आहे . संतोष पूजेची तयारी करताहेत .
आई (सासूबाई)म्हणाल्या, " आमची वयं झालीत आता त्यामुळे एक सांगून ठेवते. ही दोन गणपतींची पद्धत काही आपली पारंपारिक खानदानी वगैरे नाही बरंका! हा माझा नवस होता त्यामुळे संतोष जन्मल्यापासून मी केला. पण उद्याला मला काही झालं तर माझ्या माघारी तुम्ही एकच गणपती आणा व बसवा. हा नैवेद्य तू करत जा चालेल."
"हे ऐकून एक मिनिट खूप वाईट वाटलं . सणादिवशी काय हो आई असं सगळं बोलता?" मी म्हणाले.
"तसं नाही गं, माहित असावं, पिकलेली पानं आम्ही गळून पडायचेच."
"तुमच्या २४ वर्षी पहिला मुलगा झाला तर तो पण नवसाने आणि आता बघा २४ वर्षाला ते मुली लग्नाचा विचारही करत नाहीत ." असं काहीतरी बोलून विषय मिटला.
गौरी आल्या, सगळं साग्रसंगीत झालं.
पण त्यावर्षीच्या हे गौरीपूजन माझं व त्यांचं शेवटचं किंवा दोन गणपतींचं विसर्जन शेवटचं हे कुठे माहित होतं.
२०२१ चा उन्हाळा, आम्ही सुट्टयांमधे हैदराबादला आमच्या फ्लॅट वर महिना दीड महिन्यासाठी गेलो. ६ जणांचा परिवार आई बाबा, मी संतोष व दोन मुलं.
पुढे जे झालं ते अकल्पित व अकथनीय आहे.
कोरोनाची दुसरी लाट वादळागत आली , सहाजण इनफेक्ट झालो, आणि होत्याचं नव्हतं झालं.
सव्वा महिन्यात घरातली ३ माणसं गेली.
बाबा प्रथम त्यानंतर पंधराव्या दिवशी माझे पती संतोष व त्यांच्या एकविसाव्या दिवशी सासूबाई!
मी व दोन मुलं वाचलोत. उद्ध्वस्त झालेल्या अवस्थेत दोन महिन्यांनी परत औरंगाबाद ला आलो.
सहाजण गेलो होतो तिघेजण परत आलो.
सावरणं अशक्य होतं त्याबद्दल यात लिहू इच्छित नाही.
पण पुन्हा गणपतीचे दिवस आले.
गुरूजींनी सांगितलं की कुलधर्म सोडू नका. मुलांच्या हाताने गणपती बसवा.
मुलाला एकच गणपती आणायला सांगितला व अक्षरशः अश्रूंच्या अभिषेकात आम्ही तिघांनी गणपतीची स्थापना केली.
इतक्या वर्षात कधीच असा एक गणपती बसवला नव्हता शिवाय ज्या लोकांमुळे घरात सणाचा गलगलाट असायचा ते तिघेही असे एकदमच जगातून नाहिसे झाले होते. सणाची ती हौस, ती सजावट ते पावित्र्य काहिच राहिलं नाही.
दुखात राहून गणपती बसवल्यापेक्षा ५ दिवसात गणपती विसर्जित करूयात असा निर्णय घेतला.
शिवाय २४ वर्षे मी केलेल्या उभ्या गौरी पण नाही. यामुळे माझं वैयक्तिक दुख तर अकथनीयच!
दक्षिण भारतात घरातला सद्स्य गेला तर एक वर्ष कुठलाच सण करीत नाहीत . मग आम्ही तो नियम पाळला.
पण घडलेल्या घटनेविषयी आठवताना मला व माझ्या मोठ्या मुलाला राहून राहून एकच गोष्ट कळत नव्हती की हे असं झालं यात त्या नवसाचा काही अंश होता का?
म्हणजे संतोषचा आई बाबांवर अतोनात जीव आणि त्यांचाही यांच्यावर. मग नवसाने मुलगा बोलावून घेतला व जाताना तिघेही एकत्रच गेले. शिवाय जाण्याचा क्रम पाहिला तर बाबा व आईंच्या मधे संतोष गेले होते.
त्यामुळे मुलगा म्हणाला "आई तू विचार कर ना, पप्पांनी फक्त त्यांच्यासाठी जन्म घेतला होता. आई वडिलांसाठी जगले आणि जाताना त्यांचं बाळ म्हणजे बाप्पा ते सोबत घेवून गेले. आपण तर असेच त्यांच्यासोबत जोधले गेलो."
अगदी खरं आहे. ५२ वर्ष ते फक्त ते जणु आईवडिलांसाठिो जगले होते.
त्याची करणी त्यालाच ठाऊक!
पण हे मरेपर्यंत न विसरणारं दुख घेवून जगणं नशीबी आहे.
यावर्षी मनाने परिस्थिती स्वीकारून एकच गणपती बसवला आहे. लिखाणाचा विषय वाचल्यापासून हे सगळं मनात घोळत होतं. आज अनुभव स्वरूपाने मांडून खूप रिलॅक्स वाटत आहे.
पुढे काय लिहिलंय हे माहित नाही पण त्या दोन गणपतींची मजाच न्यारी होती.
गणपती बाप्पा मोरया!
©® स्वाती बालूरकर देशपांडे , सखी
दिनांक ०४ . ०९ .२०२२