ती म्हणाली ," किती वेळ द्यायचा असतो रे देवाला ? अगदी तीन तास सासूबाई देवासमोरून उठत नाहीत. देव बोलत असतील का त्यांच्याशी ? इतका वेळ देवपूजा करायची असते का ?"
"अग तुला काय करायचं असावरी ? तिला आवडते पूजा करायला. तुझ्यासारखा उठल्यानंतर मोबाईल नाही लागत तिला आणि हे जे तुझे नखरे चालू आहेत ना ते फक्त मी आईमुळे सहन करतोय हे लक्षात ठेव."
"त्या मला उठसूठ बोल लावतात ते तुला नाही दिसणार. पण मी त्यांच्याविषयी जरा काही बोलले तर तुला लगेच मिरच्या झोमणार हे मला माहीतच होते." असावरी तावातावाने म्हणाली.
"आई जे सांगते त्याला समजून सांगणे म्हणतात. बोल लावणे नाही. या अवस्थेत जरा सांभाळून राहायचे असते. तो हिल्स असलेला सॅंडल नको घालूस आणि बाहेरचं खायचं जरा कमी कर हेच बोलते ना आई तुला ? आणि यात काही चुकीचे आहे असे मला बिलकुल वाटत नाही." सोहम म्हणाला.
"मला माहितीये तुला नेमका कशाचा राग येतोय ते ? मी सगळ्या कामाला मावशी लावलीय म्हणून. तुझ्या आईसारखी सर्व कामे मी स्वतःच्या हाताने करावी अशीच तुझी इच्छा असेल पण सॉरी मी नोकरी करते हे लक्षात ठेव. तुझी आई घरी बसायची म्हणूनच ही सर्व कामे ती आवडीने करत असेलही." आसावरी म्हणाली.
"हो का ? काय माहित आहे गं तुला माझ्या आईविषयी ? ती ही त्याकाळात एम. ए. इंग्लिश झाली होती पण आजीआजोबाचे आजारपण आणि मी लहान असल्यामुळे तिला नोकरी सोडावी लागली होती हे लक्षात ठेव." सोहम म्हणाला.
"जाऊ दे. मी ही उगाच तोंडाची वाफ वाया घालवतोय. जी बाई आपलंच म्हणणं खरं म्हणते तिच्यापुढे बोलून तरी काय उपयोग ?" असे म्हणून सोहम बाथरूममध्ये गेला.
थोड्या वेळानंतर आसावरी ऑफीसला जाण्यासाठी तयार होऊन खाली येत होती.
"असावरी , जिन्याच्या पायऱ्या उतरताना मोबाईल नकोस पाहत जाऊस. सावकाश पायऱ्या उतरत जा. " अचानक आलेली आसावरीची आई आपल्या लेकीला समज देत म्हणाली.
पण ऐकेल ती असावरी कसली ? ती लगेच म्हणाली , "आई , या पायऱ्या मी रोज चढते आणि उतरते त्यामुळे सवयीच्या आहेत माझ्या. तू नकोस काळजी करू. बरं तू कशी आलीस आज ?"
"काही नाही सहजच हे लाडू केले होते तुला आवडतात म्हणून. घेऊन आले तुझ्यासाठी." आसावरीच्या आई म्हणाल्या.
"बरे झाले आलात म्हणून. खूप दिवस झाले चक्कर नव्हती मारली तुम्ही. छान वाटले तुम्हाला भेटून. " सोहमच्या आई आसावरीच्या आईला पाणी देत म्हणाल्या.
"सासूबाई , आज मी टिपीनला लाडूच घेऊन जाईन." आसावरी म्हणाली.
"अगं आता तू एकटी नाहीस. दोघांचा विचार करून आहार घ्यायला हवा तुला. लाडूही घेऊन जा पण ती पोळी भाजी बनवलीय तीही घेऊन जा." सासूबाई प्रेमाने म्हणाल्या.
"हो." म्हणून अगदी धावतच तिचे काहीतरी विसरले म्हणून आसावरी जायला निघाली आणि मावशीनी नुकत्याच पुसलेल्या फरशीवरून पाय घसरून पडली.
"आई गं!" म्हणून आसावरी रडू लागली.
सोहमने तिला उचलले. गाडीत बसवून ताबडतोब हॉस्पीटल गाठले. सर्वचजण चिंतेत होते. आसावरीही खूप घाबरली होती. डॉक्टरांनी ताबडतोब आसावरीला चेक केले. काही वेळ बाळाची हालचाल जाणवत नव्हती. आसावरीच्या सासूबाई हॉस्पीटलमधील गणरायासमोर हात जोडून प्रार्थना करत होत्या. \"माझी सून आणि तिचे होणारे बाळ सुखरुप असू दे.\" म्हणून विनवणी करत होत्या.थोड्याच वेळात डॉक्टरांनी बाळ आणि बाळाची आई दोघेही सुरक्षित आहेत हे सांगितले. सगळ्यांच्या जीवात जीव आला. थोड्या वेळानंतर आसावरीला भेटायला सगळेजण आत गेले. आसावरी खाली मान घालून आपले अश्रू टिपत होती. तिला तिच्या वागण्याचा चांगलाच पश्चाताप झाला होता हे तिने आज पहिल्यांदाच माफी मागून सिद्ध केला होता.
"सासूबाई मला माफ करा. आता यापुढे तुम्ही सांगाल ते ऐकेल मी. " आसावरी हात जोडून म्हणाली.
"अगं असावरी चुका या माणसाकडूनच होतात. जो चुकीतून शिकतो तोच खरा माणूस. आम्ही तुझ्यापेक्षा जास्त पावसाळे अनुभवलेत म्हणून तुला तेच सांगत असतो जे तुझ्या भल्यासाठी असतं." सासूबाई म्हणाल्या.
"अनुभव हाच खरा गुरू आहे. या गुरूने तुला आज ज्ञानरूपी वसाच दिलाय तो कायम स्मरणात ठेव." आसावरीच्या आई म्हणाल्या.
असावरीने स्मितहास्य करत होकारार्थी मान हलवली. उशीरा का असेना आसावरीचे डोळे उघडले म्हणून सोहम मनापासून देवाचे आभार मानत होता.
सौ. प्राजक्ता पाटील
# गोष्ट छोटी डोंगराएवढी- गुरुने दिला ज्ञानरूपी वसा..
# गोष्ट छोटी डोंगराएवढी- गुरुने दिला ज्ञानरूपी वसा..
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा