Login

ओंजळीत माझ्या सुखाचे चांदणे (भाग १०)

कथा मालिका
ओंजळीत माझ्या १०

अद्वैतने काही दिवसांची सुट्टी टाकली आहे हे कळताच केतकी अस्वस्थ झाली होती. ती सुध्दा काही दिवसांची सुट्टी टाकून काॅलेजमधून निघते.
पण अद्वैतसोबत काय बोलायचे? आता तर तो माझा तिरस्कार करत असणार. एवढा चांगला व्यक्ती, मित्र जर आपल्याला आयुष्यभर साथ देत असेल‌ तर आपण का मागे हटत आहोत. असे विचार तिच्या मनात येऊ लागले. पण ठाम निश्चय करून ती अद्वैत च्या घरी गेली.
पाहुया पुढे...

केतकी सरळ अद्वैतच्या घरीच जाते.‌ तो गावाला निघण्याची तयारी करत होता.

दार उघडेच होते.

"अद्वैत, "

"केतकी तुम्ही इथे. आता कशाला आलात?"

"साॅरी."

"आता तुम्ही साॅरी कशाला म्हणताय."

"मीच साॅरी. माझ्यामुळे तुम्ही दुखावल्या गेल्या. माझ्या बद्दल तुमच्या मनात गैरसमज झाला आहे. तुम्ही स्वतः ला खूप त्रास करून घेत आहात. पण यापुढे असं काही होणार नाही. मी आता तुमच्या पासून खूप दूर निघून जात आहे."

"पण का? "

"मी माझं आयुष्य तुमच्यावर लादणार नाही. तुम्ही तुमचा निर्णय घेण्यासाठी मोकळ्या आणि मी सुध्दा आणि मी माझा निर्णय घेतला आहे.‌ मी ही नोकरी सोडून देणार आहे. मला इथल्या कोणत्याच आठवणी नको आहे. "

"माझी सुध्दा."

"काही म्हणालात का? "

" हो, माझी आठवण सुद्धा येणार नाही का?"

"हो, कारण तुमची आठवण येण्याचे काहीच कारण नाही. मी आता नव्याने आयुष्य जगणार आहे. तुम्ही माझ्या कोण लागता ? आपले काही नाते आहे का? आपण फक्त चांगले मित्र आहोत. चला या आता तुम्ही, माझी टॅक्सी येईलच."

"अद्वैत, खरच तू दूर जाणार आहे माझ्यापासून. तू आनंदी राहू शकशील."

"मला माहिती नाही. आनंदाने जगेल की नाही माहिती नाही. पण जगेल नक्कीच. आत्महत्या करण्याइतकी माझ्यात हिंमत नाही."

"मला तुझ्याशी महत्वाचे बोलायचं आहे."

"आता काय बोलायचं?"

अद्वैतने केतकीकडे थोडं आश्चर्याने पाहिलं. तिचा स्वर गडबडलेला आणि तिच्या चेहऱ्यावरचा ताण स्पष्ट दिसत होता.

"अद्वैत, मी जे काही बोलणार आहे, ते ऐक. त्यानंतर तू काहीही निर्णय घे," केतकीने थोडा श्वास घेतला. "माझ्या मनात खूप गोंधळ आहे, पण एक गोष्ट मात्र स्पष्ट आहे. मी तुला दुखावलं, त्याचं मला खूप दु:ख आहे."

अद्वैत शांत होता, पण त्याचा चेहरा कठोर दिसत होता.

"तुझ्या आणि माझ्या नात्याबाबत मी कधीच ठाम नव्हते. पण आता मला एक गोष्ट कळली आहे, अद्वैत. मी तुझ्या मनाला ओळखण्यात चुकले आणि तुला समजून घेण्यात अपयशी ठरले. हे सगळं समजल्यावरही मी काहीच केलं नाही. आणि हेच माझं मोठं चुकलं."

अद्वैतने हातातील बॅग बाजूला ठेवली आणि तिच्याकडे एकटक पाहू लागला.

"केतकी, मला कळतंय की तू मोठ्या अडचणींना सामोरी गेली आहे. तुझ्या मना विरुद्ध जगली आहे. पण जेव्हा नात्याचा प्रश्न येतो, तेव्हा फक्त स्वतःच्याच नाही, तर दुसऱ्याच्या भावनांचा विचार करणं गरजेचं असतं."

केतकीच्या डोळ्यात पाणी आलं होतं. तिने थोडं पुढे होत अद्वैतच्या समोर उभं राहत म्हटलं, "हो, मी माझ्या निर्णयांनी तुला सतत दूर केलं. पण आता मला कळतंय, अद्वैत... मी तुला गमावू इच्छित नाही. तुझ्याशिवाय आयुष्याची कल्पना करणंही मला शक्य नाही."

अद्वैत क्षणभर स्तब्ध झाला. तिच्या डोळ्यातलं दु:ख आणि प्रामाणिकपणा त्याला जाणवला. पण त्याच्या मनातला राग आणि दु:ख सहज संपणार नव्हतं.

"केतकी, तू खूप उशीर केला आहेस. मी तुझ्यासाठी आयुष्यभर वाट पाहू शकत नाही. पण खरं सांगायचं तर मला वाटतं, मी या नात्याचा शेवट मानून पुढे जाण्याचा निर्णय घेतलाय."

केतकीच्या डोळ्यातली आशा तुटल्यासारखी वाटली. ती थोडीशी घाबरून अद्वैतला म्हणाली, "तू एकदा तरी माझ्यावर विश्वास ठेवून बघ. मी खरंच माझे विचार बदलायला तयार आहे."

अद्वैतच्या चेहऱ्यावर एक सूक्ष्म हसू उमटलं. "तुझ्या शब्दांवर विश्वास ठेवणं मला अजून जड जातंय, केतकी. पण आता तुला आणि मला या गोंधळातून बाहेर पडायला हवं."

केतकी त्याचं बोलणं ऐकत होती, पण आतून तिला वाटत होतं की तिने अद्वैतला पुन्हा एकदा विश्वास दिला पाहिजे.

"अद्वैत, मी तुला एका गोष्टीसाठी विनंती करते. तू मला पुन्हा एक संधी देशील का?"

अद्वैत तिच्याकडे पाहत म्हणाला, "संघर्ष करणं हे तुझ्या स्वभावात आहे, केतकी. पण हे तुझं स्वत्व आहे. तुझ्या मनात खरोखर मला जागा असेल, तर ही संधी मी तुला नक्की देईन. पण त्यासाठी तू स्वतःचा निर्णय घ्यावा लागेल."

अद्वैतने केतकीच्या डोळ्यातले अश्रू पुसले.

"साॅरी, मला तुला दुखवायचे नव्हते."

"मी माझ्या प्रेमाची जाणीव तुला करून देईन, अद्वैत. पण तुला पुन्हा कधीच दुखावणार नाही."

अद्वैतच्या चेहऱ्यावर एक हलकं समाधान दिसलं. तो म्हणाला, "मग मी वाट पाहतोय, केतकी. तू मला तुझे विचार बदलण्याची प्रामाणिक इच्छा दाखवशील, तेव्हाच आपण पुन्हा नव्याने सुरुवात करू शकतो."

"अद्वैत, आता मला वाट बघायची नाही. आपण आपल्या सहजीवनाची नवीन सुरुवात करु या. मी आयुष्यभर तुझी साथ देईल. तू कोर्टात नोंदणी करून घे. आपण लवकरच लग्नाच्या बेडीत अडकू."

केतकीने अद्वैतला वचन दिले.

अद्वैतला क्षणभर विश्वासच बसला नाही. पण त्याला केतकीकडे बघून हायसे वाटले.

"येऊ मी आता."

"थांब मी सोडतो घरी. काही खाल्लं!"

"अं... नाही."

"ठीक आहे. आपण आधी काही तरी खाऊ या."

ते तुम्ही टॅक्सी कॅन्सल....'

"हो राहिलेच. करतो कॅन्सल..." तो हसला.