ओंजळभर मोगरा..!

वृद्धाश्रमातील एक हृदयस्पर्शी कथा!


ओंजळभर मोगरा!


आज सकाळपासूनच घरात लगबग सुरू होती. नातेवाईकांनी घर भरले होते. शेजारमंडळी जमली होती. कारणही तसेच होते. वसुच्या सासऱ्यांना जाऊन वर्ष लोटले होते आज त्यांचे वर्षश्राद्ध होते. पुजापाठ झाल्यावर अल्पोहार घेऊन शेजारी परतायला तर लागली पण त्यांच्या चेहऱ्यावर मात्र प्रश्न होते. कारण रात्रीच्या जेवणाचे रीतसर निमंत्रण कोणालाच नव्हते.

"बाबा गेल्याला वर्षच झालेय. कोविडमुळे ते गेले. आम्हाला शेवटचं दर्शनसुद्धा घेता आले नाही. त्यांच्या आठवणीत मोठा कार्यक्रम आयोजित करता आला असता पण आम्ही तो टाळला. आजची सायंकाळ आम्ही सर्व एका वृद्धाश्रमात घालवणार आहोत. तेव्हा क्षमस्व! आणि आता इथे आलात त्याबद्दल आभार."
प्रकाश सगळयांसमोर नम्रपणे हात जोडून उभा होता. कोणी त्याच्या निर्णयाचे कौतुक केले तर कोणी नाक मुरडली.
वसुही त्याच्याबाजूला हात जोडून उभी होती.

महिन्याभरापूर्वीचा त्यांच्यातील संवाद तिला आठवला.


"वसू, बाबांचा कार्यक्रम करायचा विचार सुरू आहे. सांग ना कसा करायचा?" प्रकाश तिला विचारत होता.


"प्रकाश माझ्या मनात खूप दिवसांपासून होतं, बघ तुला पटते काय तर?" ती.


"काय?"


"घरी जेवणाचा कार्यक्रम करण्यापेक्षा एखाद्या अनाथाश्रमाला किंवा वृद्धाश्रमाला भेट देऊन ही रक्कम तिथे दान दिली तर? तुला काय वाटतं?" तिने त्याच्या कोर्टात चेंडू भिरकावला.


"वसू, खूप चांगली कल्पना आहे. माझी बायको शोभतेस बघ. माझ्या मनातदेखील काहीसे असेच होते." तिच्याकडे बघून तो म्हणाला.


"पण घरचे? ते तयार होतील ना?" तिचा प्रश्न.

"काळजी करू नकोस. इथे खर्च केला काय किंवा तिकडे दान केले काय, पैसे तर मलाच लावायचे आहेत ना? मग कोणाला काय प्रॉब्लेम असेल? तरी सगळ्यांना सांगूच की आपण." प्रकाश.

त्याने घरी आई, भावांना आपला निर्णय सांगितला. त्यांनी होकार दिला. ह्यावेळी अनाथाश्रमापेक्षा वृद्धाश्रमात जाऊन तिथे वेळ घालवायचा ह्यावर सर्वांचा शिक्कामोर्तब झाला.

"तिथे जाऊन करायचं काय?" छोट्या निनादला प्रश्न पडला.

"गेल्यावर बघू. मम्मा तू काय करणारेस गं?" रोहिणी त्याला समजावत वसुला विचारत होती.

"हे बघा, मी एक छोटासा मेडिकल चेकअप चा कॅम्प घेणार आहे. त्यांचे शुगर बीपी चेक करेन. लागल्या तर त्यांना काही मेडिसिन देईन. तुम्ही मला तिथे असिस्ट करू शकता ना." वसू.

"म्हणजे?" रोहिणीच्या डोळ्यात प्रश्न होता.


"म्हणजे तुम्ही तिथल्या आजी आजोबांना त्यांचे नाव, वय विचारू शकता. तू ते नोट करू शकतेस." वसू रोहिणीकडे बघून म्हणाली. रोहिणीला मम्माचा प्लॅन आवडला हे तिच्या चेहऱ्यावरून दिसत होते.

घरची आणि नातेवाईक असे पकडून साधारण चाळीस माणसं. सगळी सायंकाळी सहाच्या दरम्यान तिथे पोहचली.
तेथील वृद्धांचे चेकअप, त्यानंतर सहभोजन असा कार्यक्रम ठरला होता.

वृद्धाश्रमात पोहचल्यावर तिथल्या वृद्धांची भिरभिणारी नजर बघून वसुला अस्वस्थ वाटू लागले. एका गोष्टीने मात्र मनाची मरगळ दूर झाली. तिथे चारी बाजूला बहरलेला मोगरा आणि त्याच्या सुगंधाने भारलेले तिथले वातावरण!

आश्रमात जवळपास तीसएक वृद्ध व्यक्ती होत्या. काही बायका आणि काही पुरुष. कोणी पन्नास -साठीतले तर कुणी सत्तर- अंशी- नव्वदीकडे झुकलेले.
एक पिंजरलेली आजी तिच्या मते तर चक्क शंभरी पार केलेली. तरीही तिच्या चेहऱ्यावर सळसळता उत्साह होता.भूतकाळातील घटना जशाच्या तशा आठवणीत.

"बाबासाहेब आंबेडकरांनी दिक्षा दिली तेव्हा मी सहा वर्षांचे होते."दोन्ही हातांची सहा बोटे नाचवत ती सांगत होती.
अलीकडे तिला मात्र साऱ्यांचे विस्मरण होऊ लागले होते. तिचा गाणारा गोड गळा, पण तिला लळा लावणारे असे कुणीच नव्हते. कितीतरी जुनी गाणी तिने गाऊन दाखवली पण वसूने दिलेली औषधं कशी घ्यायची हे अर्ध्या तासात दहा वेळा तरी विचारून झाले. अगदी छोट्या छोट्या गोष्टीही ती विसरून जात होती.


"इथे किती वर्षांपासून आहेस गं?" वसुने विचारलेला साधाच प्रश्न, त्याचे उत्तर मात्र तिच्याकडे नव्हते.


अशा कितीतरी तिथे होत्या. कुणी मुलबाळ नसल्याने कोणाचाच आधार नाही म्हणून आलेल्या तर कोणी स्वतःच्याच मुलांनी घराबाहेर काढलेल्या. एक आजी जवळपास साठीची. चेहरा सुजलेला. विचारल्यावर कळलं की आठ दिवसांपूर्वी मुलाने मारहाण केली. सरकारी इस्पितळात भरती झाल्यावर सरळ इकडे दाखल झाली.


'मुलं इतकीही कृतघ्न असतात की आपल्याच जन्मदात्रीला मारहाण करावी?' रोहिणी आणि निनाद वसुकडे तर कधी त्या आजीकडे बघून डोळ्यांनीच एकमेकांना विचारत होती.


बायका निदान त्यांची दुःख तरी सांगत होती. पुरुषांचे काय? मुलाने रडायचे नसते हे बालपणापासून मनावर बिंबलेले. ह्या वयात त्यांच्या डोळ्यात कसे पाणी येईल? मनावर दगड ठेऊन तिथे राहणारे, नातवंडांच्या आठवणीत व्याकुळ होणारे अनेक आजोबा तिथे होते. पण सांगणार कोणाला?


रोहिणीकडे बघून "माझी नात देखील अशीच आहे. गोरीपान, हिच्यासारखीच सुंदर!" असे बोलणाऱ्या आजोबांच्या चेहऱ्यावरचे भाव आणि "आजोबा, मग मलाही तुमची नातंच समजा. " असे रोहिणीच्या तोंडून ऐकल्यावर त्यांच्या डोळ्यातील अगतिकता, हळूच लपवू पाहणारे अश्रू.. खूप काही सांगून जात होते.

ते किमान बोलले तरी. बाकीच्यांनी वसुकडून चेकअप तेवढे करून घेतले. शरीराचा त्रास सर्वांनीच सांगितला, मनाचा त्रास सांगताना मात्र चलबिचल होत होती. ज्यांनी त्यांच्या डोळ्यात वाचून ओळखलं त्यांनाच ते कळले असेल. बाकी आपल्याच मुलांना कोण वाईट म्हणेल? शेवटी आपलेच दात नी आपलेच ओठ!


इथेच भेटली एक पंच्याहत्तरीची आजी, प्रभाआजी! पांढऱ्याशुभ्र केसांची, गोऱ्यापान चेहऱ्याची. मुखावर एक प्रसन्नता त्यामुळेच की काय ती सर्वांच्यात वेगळी भासत होती.

"आजी, तुला गं काही टेंशन नाहीये का? मस्त आनंदी दिसतेस?" वसुने शेवटी विचारलेच.


"मला कसले टेंशन? इथे मस्त मला खायला प्यायला मिळते. गप्पा मारायला मैत्रिणी आहेत. आणखी काय हवे?" तिनेच वसुला उलट प्रश्न केला.


"तुला तुझ्या घराची आठवण येत नाही का?" छोट्या निनादने विचारले. त्याच्या प्रश्नावर वसूने त्याच्याकडे डोळे मोठे करून पाहिले. आपले काय चुकले हे त्या लहानग्याला समजेना.


"नको गं त्याच्यावर रागाऊ. आता सवय झाली या प्रश्नाची." त्याच्या केसांना कुरवाळत वसुकडे बघून प्रभाआजी म्हणाली.
"सुरुवातीला यायची आठवण. खूप यायची. मग एकदा इथून घरी गेले. आत नाही, अंगणातच. तिथे असलेल्या मोगऱ्याचे रोपटे इकडे घेऊन आले. तेव्हापासून नाही येत मला त्या घराची आठवण."


वसुला काही कळले नाही. 'मोगऱ्याचा नी घराच्या आठवणीचा काय संबंध?'

तिचा तो चेहरा आजीने अचूक हेरला. "अगं, आम्हा म्हाताऱ्यांना काय हवे असते गं? आयुष्यभर घरासाठी, लेकरांसाठी खस्ता खाल्ल्यावर शेवटच्या वेळी हवे असते ते त्यांच्या मायेची ऊब. मुलांचे प्रेमाचे दोन शब्द आणि त्यांच्या सुखी संसाराचे नेत्रसूख!"

"आयुष्यभर झिजून आपण ही संसारवेल फुलवायची आणि आपणच फुलवलेल्या फुलांच्या ओंजळभर गंधाला आपण पारखे व्हावे ह्यापेक्षा आणखी दुसरे काय वाईट?
इथल्या कित्येकांची हीच कहाणी आहे."

"मला माझ्याच मुलांनी जेव्हा इथे आणून सोडले तेव्हा अगदी सैरभैर झाले होते मी. डोळ्यातून सारखे पाणी गळायचे. मग एकदा गेले इथून निघून, नातवांना अंगणातूनच डोळाभर पाहिले आणि तिथे कधीकाळी आवडीने लावलेला आणि आता काहीसा सुकलेला मोगरा इथे घेऊन आले. इथल्या मातीत तो रुजला, बहरला. सुगंधाची बरसात करू लागला. त्या सुगंधाने मी माझे घर विसरले. माझ्यासारखेच इथे येणाऱ्या सगळ्यांनी ते विसरावे असे मला वाटते."
किती भरभरून ती बोलत होती.

बच्चेकंपनीला ती काय सांगतेय हे नीटसं कळलं नाही पण वसुचा ऊर दाटून आला.

"तुला कशाला रडू येतेय, चला मुलांनो नाचायचे का?" तरुणाईला लाजवेल अशा जोशात ती शंभरी पार केलेल्या आजीसोबत नाचायला लागली. गाणेही तिनेच सुचवले.

'घुंघट में चांद होगा
आँचल में चांदणी
चुपकेसे देखेगी साजन को सजनी..'

तिच्या चेहऱ्यावरचा निखळ आनंद बघून वसूच्या ओठावर स्मित आले.

रात्रीचे अकरा वाजत आले होते. तिथून पाय निघवत नव्हता पण परत जावे लागणारच होते. जाताना सायंकाळीच तोडून ठेवलेल्या मोगऱ्याची फुलं प्रभाआजीने वसुच्या ओंजळीत टाकली. वसुच्या मनात काय आले कोणास ठाऊक? तिने वळून त्या ओंजळभर फुलातील दोन दोन फुलं तिथल्या प्रत्येक आजी आजोबांच्या हातात ठेवली.

"असेच सुगंध पसरवत राहा, आनंदी राहा!" तिथून निघताना प्रभाआजीने आशीर्वाद दिला.


आज तिच्या अंगणातला मोगरा पुन्हा फुलला असावा.. कदाचित!


                  -समाप्त -

           ******************


©®Dr. Vrunda F.(वसुंधरा..)

           *साहित्यचोरी गुन्हा आहे.*

                   *******



वृद्धाश्रमाची खरंच गरज असावी का? हा मनाला पडलेला प्रश्न.

ह्या म्हाताऱ्या माणसांना काय हवे असते? दोन वेळचे जेवण आणि प्रेमाचे दोन शब्द! ज्यांनी आपल्याला लहानाचे मोठे केले, आपल्या पायावर उभे राहायला शिकवले. त्यांनाच त्यांच्या आयुष्याच्या सांजवेळी अशी वागणूक का मिळावी? होतही असेल त्यांच्या हातून कधी चूक, करत असतील आपल्या मुलांच्या आयुष्यात ते लुडबुड म्हणून त्याची एवढी मोठी शिक्षा? लहान असताना मुलांनी केलेल्या लुडबुडीला, त्यांच्या चुकांना आईवडिलांनी माफ न करता त्यांनाही असेच आपल्यापासून दूर ठेवले तर..?

मनात आलेला हाही एक अनुत्तरीत प्रश्न!
*******

फोटो गुगल साभार.