साथ....सात जन्माची........

my first vatpornima

                                माझी पहिली वटपोर्णिमा

        आपण आज २१ व्या शतकात जरी वावरत असलो ,तरी आपल्या भारतीय संस्कृतीमधील ज्या पुरातन काळापासून चालत आलेल्या  रूढी, परंपरा प्रथा आहेत, त्यांचा आपल्या इथे तितकाच आदर केला जातो. आपण अगदी आनंदाने, उत्साहाने आणि भक्तिभावाने सर्व सण साजरे करतो.

          महिलांच्या अगदी जवळची प्रथा म्हणजेच वटपोर्णिमा ही होय. इतर प्रथा, परंपराना जशी ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे, तशीच काहीशी पुरातन काळातील एक पुरातन ऐतिहासिक कथा प्रचलित आहे. ती म्हणजेच सावित्री आणि सत्यवान यांची. पतिव्रता सावित्रीने आपला पती सत्यवान याचे प्राण यमराजांकडून कसे परत आणले? सावित्री किती पतिव्रता होती! आणि जसे सावित्रीने आपल्या पतीचे रक्षण केले अगदी त्याचप्रमाणे आजच्या काळातील प्रत्येक स्त्रीने आपल्या पतीच्या रक्षणासाठी वटपौर्णिमेच्या दिवशी व्रत करून वटाची पूजा करावी, अशी थोडक्यात ती कथा आहे.

          हा झाला ऐतिहासिक भाग, आजही आपल्या संस्कृतीमध्ये हिंदू पंचांगात जेष्ठ महिन्यात येणारी पोर्णिमा हा दिवस ‘वटपोर्णिमा’ म्हणून साजरा केला जातो. यादिवशी जवळजवळ सर्वच विवाहित स्त्रिया वटपोर्णिमा नावाचे व्रत करून या व्रतादरम्यान आपल्या पतीला उत्तम आरोग्य लाभावे, दीर्घायुष्य प्राप्त व्हावे याकरिता वटाची पूजा करतात.

         मला अजूनही आठवते, मी लहान असताना प्रत्येक वटपौर्णिमेला आईला पुजेची तयारी करायला मदत करायचे आणि तिच्यासोबत घरापासून जवळच असलेल्या वटाची पूजा करणेकरिता जायची. तिथे बऱ्याच स्त्रिया हीच पूजा करणेकरिता एकत्र जमायच्या. डेरेदार वटवृक्षाचे झाड दोरांचे फेरे मारल्यामुळे पांढऱ्या दोऱ्यात लपेटून गेल्यासारखे भासायचे.

         मला हे सर्व पाहताना खूप छान वाटायचे. एक वेगळीच गम्मत वाटायची सगळ बघताना. मी नेहमीच माझ्या आईला प्रश्न विचारायचे, “मम्मी, मी हे व्रत कधी करणार ग? मला पण वटाला असेच फेरे मारायचे आहेत.” ती मला म्हणायची, “तुझे जेव्हा लग्न होईल ना तेव्हा तू हे व्रत नक्की कर पण श्रद्धा ठेऊन, तेव्हा नको म्हणू मला हे पटत नाही वगैरे... ”

         आईचे ते शब्द ऐकून मी मनाशी निश्चय केला होता कि आपण कितीही शिकलो, पुढारलो, तरी जी आपली संस्कृती आहे, परंपरा आहे ती श्रद्धेने जपायची. चांगल्या भावनेने हे व्रत आपण नक्की करायचे.

         ८ डिसेंबर २०१९ ला माझे लग्न झाले. नवरा अगदीच प्रेमळ मनासारखा मिळाला. लग्नाला दोन ते तीन महिने होत नाहीत तोवरच कोरोना या महामारीने भारतासकट संपूर्ण देशात थैमान घातले. मार्च मध्ये आलेली ही महामारी जून महिना आला तरी होतीच. २०२० ची वटपोर्णिमा ६ जून २०२० ला आली,  जी माझी पहिलीच वटपोर्णिमा होती.   

          आम्ही दोघेही शासकीय कार्यालयात तेही अत्यावश्यक सेवेत कार्यरत असलेने कोरोना आपत्तीच्या कालावधीत सुट्टी घेण्याचा प्रश्नच येणार नव्हता. पण अगदी लहानपणापासूनच ‘वटपौर्णिमेचे व्रत करायचेच’, हा जो निश्चय केला होता तो आठवला. आम्ही ज्या कार्यालयात कार्यरत आहोत, तेथून जवळच्या गावीच माझ्या नंदुबाई राहतात. मी याबद्दल त्यांना बोलले, आणि काहीही झाल तरी मला माझी पहिली वटपोर्णिमा साजरी करायचीच आहे, अस त्यांना सांगितले. त्यांनी मला सकाळच्या सत्रात रजा टाकायचा सल्ला दिला. म्हणजे सकाळच्या सत्रात पूजा आटोपली कि दुपारच्या सत्रात पुन्हा ऑफिसला जाता येईल.

          मी त्याप्रमाणे कार्यालयातील वरिष्ठांना रजेचे कारण सांगून त्या दिवसाची अर्धी रजा घेतली. आणि माझ्या सर्व साहित्यासह दिदिंकडे गेले. प्रथम आम्ही दोघींनी स्वतःचे आवरून घेतले. आता महिलांचा सण तोही अगदी खास, त्यात दोन महिला एकत्र आल्या, म्हटल्यावर आवरायला जरा जास्तच वेळ लागला.मी सोबत दोघींसाठी गजरा देखील घेऊन आले होते. माझ्या मिस्टरांनीच तो मला घेऊन दिला होता. कार्यक्रमाच्या दिवशी मला गजरा माळायला खूप आवडते, हे त्यांना माहित असलेने ते मला अश्यावेळी आवर्जून गजरा घेतातच. सर्व तयारी झाल्यावर प्रथम आम्ही दोघींनी मस्तपैकी आमचे फोटोशूट केले. आता एवढ छान आवरलय म्हटल्यावर इतना तो बनता है ना!

        त्यानंतर आम्ही दिदींच्या इतर जावांसोबत चालतच जवळच्या वटाची पूजा करणेकरिता गेलो. तिथे एक नव्हे, दोन नव्हे तर तब्बल चार-चार वटाचे मोठ-मोठे वृक्ष होते. आमच्या आधी तिथे बऱ्याच स्त्रिया पूजा करायला आलेल्या होत्या. आम्ही एका वटवृक्षाजवळ जाऊन थांबलो. आजूबाजूचे वातावरण खूप शांत आणि अध्यात्मिक असे होते. माझे मनही खूप उत्साही भासत होते. एक वेगळीच ऊर्जा मी अनुभवू शकत होते.

        थोड्याच वेळात आम्ही आमची पूजा मांडून घेतली, मनोभावे वटसावित्रीची प्रार्थना करून दोऱ्याने वटाला सात  फेरे मारले. खरच मी हे सगळ आजपर्यंत फक्त पिक्चरमध्येच बघत आले होते. मात्र आता मी ते सगळ स्वतः अनुभवत होते.

                                जरीची साडी नेसून कवरी सुंदर दिसशील गो  

                                  माझे नावाचा फेरा तू वराचा मारशील गो.

        हेच गाण माझ्या मनात मी तेव्हा गुणगुणत होते. माझे मिस्टर लग्न झाल्यापासून हे गाण माझ्यासाठी नेहमीच गुणगुणायचे. आज ते खऱ्या अर्थाने सत्यात उतरले होते.

        वटाची पूजा झालेनंतर आम्ही सर्वजणी एके ठिकाणी थांबलो आणि प्रत्येकीला हळदी-कुंकू देऊन ओटी भरली. थोडा वेळ त्याच शांत आणि अध्यात्मिक वातावरणात आम्ही बोलत बसलो आणि मग घरी निघून आलो.

        हा दिवस माझ्यासाठी खरच खूप खास आणि अविस्मरणीय असा ठरला होता. अगदी लहानपणापासून मनाशी केलेला निश्चय आज सत्यात उतरला होता. मी खूप खुश होते. बऱ्याच दिवसांपासून कोरोना महामारीमुळे जे नैराश्य, जी उदासीची छाप मनावर होती, ती या दिवसामुळे कुठल्या कुठे पळून गेली. इथून पुढे येणारी प्रत्येक वटपोर्णिमा करायचीच अस मनाशी ठरवून मी घरी आले.

        घरी येऊन बघते तर माझे पती, माझं सौभाग्य ज्यांच्यासाठी मी हे वटपोर्णिमेचे व्रत केल होत ते माझी वाट बघत बसले होते. त्यांना पाहताक्षणी मला खूप आनंद झाला. त्यांनी मला पाहून एक कमेंट दिली, “जरीच्या साडीमध्ये खरच खूप सुंदर दिसतेस ग !”

         हे त्यांचे शब्द ऐकून तर माझे पाय जमिनीवरून वर तरंगायला लागले. आम्ही दोघांनी सोबत थोड फोटोशूट केल.

           खरच माझी पहिली वटपोर्णिमा अगदी कायमस्वरूपी लक्षात राहील अशी साजरी झाली.