Mar 02, 2024
गोष्ट छोटी डोंगराएवढी

एक आठवणीतील दिवस(२१ फेब्रुवारी २०१९)

Read Later
एक आठवणीतील दिवस(२१ फेब्रुवारी २०१९)एक आठवणीतील दिवस ( २१ फेब्रुवारी २०१९ )

ऑगस्ट २०१८ ते जानेवारी २०१९ या सहा महिन्यात खूप काही बदललं होतं आयुष्यात.. नेहमी घरकोंबडा असणारा रिषभ जो शनिवार- रविवार इंजिनिअरिंग कॉलेजला सुट्टी मिळाली की, हमखास घरी पुण्याहून नगरला जाणारा.. पुण्यात असूनही पुण्यातील पब,विकेन्ड्स पार्ट्यांपेक्षा त्याला त्याचं कुटुंब खूप आवडायचं..घरी आज्जी-आजोबा, मम्मी-पप्पा,काका -काकू,अंकल-काकी आणि चार भावंड एवढे सगळी मंडळी असली की कोणाला असं भरलं घर नाही आवडणार ? पण उज्वल भवितव्यासाठी रिषभला देखील त्याच्या घरच्यांना सोडून लांब जावं लागलं ...


कराड मध्ये सनबिम इन्स्टिट्यूट ऑफ सी-डॅक इथे त्याचा नंबर लागलेला.. सोबत मम्मी-पप्पा सोडवायला आलेले ,आता काही चार पाच महिने पोरगा डोळ्यांसमोर नसेल म्हणून त्याच्या मम्मीला गहिवरून आलं ,तिच्यामुळे तोही रडला.. आपल्याला एकट्याला सोडून जाणाऱ्या पाठमोऱ्या आई वडिलांना तो खिडकीतून लांब पर्यंत पाहत होता.. इथं सगळं नवीन होतं, नवीन शहर, नवीन चेहरे, नवीन शिक्षक ..सी डॅक म्हंटलं की सकाळी ७ वाजता आवरून इन्स्टिट्यूट मध्ये गेलं की रात्री ९ होणारच होस्टेलवर येयला .. दिवसभर १०० मुलं सोबत असायची एका वर्गात.. गर्दीतल्या लोकांपैकी काहींसोबतच आपले सूत जुळतात, काहीच व्यक्ती या आपल्या वाटतात आपल्याला. तसंच काहीसं रिषभचं झालं .. त्याचे देखील चांगले सवंगडी, मित्र मैत्रिणी झाले.. तो पकडून आणखी १२जण असा मोठा ग्रुप आहे ,व्हाट्सएपच्या ग्रुपला नावच त्यांनी फॅमिली असं दिलं.. सतत त्यांच्या सोबत राहणे, सोबत अभ्यास करणे, होस्टेलला रात्री उशिरापर्यंत जागून गप्पा मारणे आणि कधी कोणाचा वाढदिवस असला की धुमधडाक्यात साजरा करणे या सगळ्या जिव्हाळ्याच्या मित्रांमुळं आपसूकच रिषभला आता घरची फार आठवण येत नसे, तरी सकाळी एक कॉल आणि रात्री एक कॉल सुरू असायचाच. कधी कधी तर त्याची आई पहाटे उठवायची फोन करून कारण पहाटे उठून अभ्यास करणे याची रिषभला आवड होती म्हणून तो उठला असेल की, नाही झोपेतून यासाठी त्याची आई देखील पहाटे लवकर उठून त्याला कॉल लावायची .. कराडमध्ये खूप अभ्यास केला सर्व मुलांनी आणि आता वेळ होती स्वतःचं कसब आजमवायची , आपण केलेल्या अभ्यासाचं चीज करून दाखवायचं होतं सर्व मुलांना.. वेळ फक्त एक दीड महिना होता. या काळात प्रत्येक विद्यार्थ्याला त्याच्या ऍकॅडमीक गुणवत्तेनुसार ३० इंटरर्व्हिवसाठी पात्रं होऊन त्यात आपलं नशीब आजमायचं होतं त्यासाठी पुणेला एका मोठ्या केंद्रात पहाटे ६ वाजल्यापासून सर्व इंटरर्व्हिवज सुरू होयचे .. सुरुवातीला प्रत्येकाला अपयश येत होतं ..हळूहळू एक एक जण आपल्या स्वप्नांचा पाठलाग करण्यात यशस्वी होऊ लागला आणि आपापल्या घरी जाऊ लागला , ही खरी कसोटी होती बाकीच्यांसाठी .. जरी सोबतीला मित्र जरी नसले तरी आपली लढाई अजून संपली नव्हती म्हणून मेहनतीवर अजून भर दिला , सोबत स्वामी समर्थ तर पाठीशी होतेच. या काळात तारक मंत्र ऐकला की आपसूकच सगळ्यांचे डोळे पाणवायचे .. आधी १० इंटरर्व्हीवमध्ये तर पहिल्या फेरी मधूनच रिषभ बाहेर पडायचा .. पण ११व्या इंटरर्व्हिव पासून हळूहळू पुढील फेऱ्या देखील तो पार करू लागला आणि अखेर तो दिवस उजाडला .. मध्यरात्री १२ वाजता सर्वांनी जागून त्यांच्या मैत्रिणीचा वाढदिवस त्या वातावरणात देखील साजरा केलेला तरीही पहाटे ५:३० ला रिषभ उठला ,अंघोळ झाल्यावर औदुंबरच्या झाडाखाली लावलेल्या स्वामींच्या फोटोजवळ दिवा त्याने नेहमीप्रमाणे लावला आणि स्वामींचा आशीर्वाद घेऊन तो जाणारच पण कोणास ठाऊक का आज त्याला त्या फोटोजवळ असलेलं फुल उचलून स्वतःच्या शर्टाच्या खिशात ठेवावं वाटलं .. दररोज ज्या मार्गाने तो इंटरर्व्हिवला जायचा त्या मार्गात एक महादेवाचे मंदिर होतं पण रोजच तिथे बाहेर दरवाजाला कुलूप लावलेलं दिसायचं पण आजचा दिवस जणू खास होता ,चक्क आज तो दरवाजा उघडा होता ..रिषभ पटकन आत गेला आणि त्याने महादेवाच्या पिंडीचे दर्शन घेतलं .. मुलाखत केंद्रावर पोहचताच त्याच्यावर त्याचे मित्र चिडले कारण होतं त्याने घातलेला काळ्या रंगाचा शर्ट ,सर्व बोलले "इंटरर्व्हिव ला कधीही काळा रंग घालू नये, बॅड इम्प्रेशन पडतं " , "आधीच सिलेक्शन होत नाहीये याचं आणि त्यात हा काळा रंग घालून आलाय आजही रिकाम्या हाताने जावं लागणार याला " असं बोलून काहीजण अनोळखी चेहरे हसले ..पण तरीही रिषभचा आत्मविश्वास काही ढासळला नाही .. आज दुसरी आणि तिसरी फेरी होती एका कंपनीची .. दुसरी फेरी सुरळीत पार पडली आणि आता होती शेवटची तिसरी फेरी ..आता मात्र रिषभला थोडी भीती वाटू लागली त्याने शर्टाच्या खिशाला हात लावला आणि "श्री स्वामी समर्थ" असं पुटपुटू लागला कारण त्या खिशात स्वामींचे फुल होते ,त्याला शेवटच्या फेरीसाठी आत हॉलमध्ये बोलावण्यात आलं .. माहीत नाही कसं पण सगळी उत्तरे आत्मविश्वासाने इंग्रजी भाषेत एकदम भेदडक देता आली ,असं वाटलं ज्याच्या डोळ्यात आत्मविश्वासाचं प्रभावी अंजन असेल तो चकाकल्या शिवाय राहूच शकत नाही .. तो हॉल मधून बाहेर आला आणि तोच त्याला मोबाईलला कॉल आणि व्हाट्सएपला मेसेजेस येऊ लागले ,कारण चालू इंटरर्व्हिव मध्येच इंटरर्व्हिव घेणाऱ्या साहेबांनी रिषभच्या प्राध्यापकांना निकाल कळवला होता आणि त्याच्या सरांनी तोच मेसेज पुढे फॉरवर्ड केला होता " Mr. Rishabh Ratnakar Kondke placed in Gep. Pvt. Ltd mumbai with 5 LPA" असा मेसेज मीही वाचला आणि जणू आकाश ठेंगणे झालंय असं वाटलं .. सगळ्या मित्रांनी खूप शुभेच्छा दिल्या . रिषभने घरी मुद्दाम खोटं सांगितलं की , आजही सिलेक्शन नाही झालं. त्याची आई नेहमीप्रमाणे म्हणाली " हरकत नाही ,लढाई अजून संपली नाही कारण अजून तू जिंकला नाहीस " .. आधी पुण्यातील दगडू शेठ गणपतीजवळ,स्वामींच्या फोटोजवळ मानाचा पहिला पेढा ठेवून ..मिळेल त्या गाडीने त्याने लगेच आपलं घर गाठलं ,रात्रीचे ९ वाजले होते सर्वजण एकत्र जेवत होते तेवढ्यात तो पेढे घेऊन गेला.. आपल्या माणसांच्या चेहऱ्यावरून आपल्यामुळे आनंद ओसंडून वाहने , याहून दुसरं सुख नाही ..बास आणि काय हवं मग ?..

तर ही होती गोष्ट रिषभची अर्थात माझी ,माझ्या आयुष्यातील एका अविस्मरणीय क्षणाची..कशी वाटली तुम्हाला ही गोष्ट हे जरूर कळवा कंमेंट्स मधून आणि तुमचेही अनुभव लिहायला विसरू नका ,आवडेल मला सर्वांचे अनुभव वाचायला..

©® मित्र रिषभ
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
Circle Image

मित्र रिषभ

Writer

Like to write fictional stories

//