एक उनाड दिवस 

Sometimes to refresh mind it's necessary

एक उनाड दिवस 

तिच्या आयुष्यात काही कारणांमुळे,तिने आज खूप मोठा डिसीजन घेतला होता ,खूप दिवसांनी ती एका निर्णया पर्यंत पोहोचली होती,आता जरा तिला मोकळं वाटत होतं ,नाही तर दोन महिन्यांपासून ती खूप द्विधा मनस्थितीत होती ,पण आई वडिलांच्या साथीमुळे एवढा मोठा निर्णय,म्हणजे त्याला सोडण्याचा निर्णय तिने घेतला होता ,आज आकाश तिला स्वच्छ दिसत होतं,मनावर जी मरगळ आली होती ,ती तिला झटकून टाकायची होती ,म्हणून तिने छान आवरलं आणि आरशात पाहिलं , आरशात पाहताना ती मनाशीच म्हणाली ,

का नेहमी दुस-या कुणासाठी तयार व्हायचं,आज मी माझ्यासाठी तयार झाली आहे ,छान दिसतेस ,असं म्हणून पर्स घेतली आणि निघाली .रिक्षा करून मॉलमध्ये पोहोचली ,तिला विंडो शॉपिंग करायला खूप आवडायचं पण त्याला आवडायचं नाही ,म्हणून मनाला नेहमी मुरड घालावी लागायची ,आज मात्र तिला कुणाचीच फिकिर नव्हती ,प्रत्येक सेक्शन मध्ये जाऊन ती मनसोक्त नयनसुख घेत होती ,मजा लुटत होती , नंतर मात्र पोटात कावळे ओरडायला लागले,घड्याळात पाहिलं तर एक वाजला होता ,जाता जाता पाहिलं तर पावणे दोन चा मराठी पिक्चर होता ,तिने जाऊन तिकिट बुक केलं ,नंतर मैक डी मध्ये जाऊन आवडीचं बर्गर खाल्लं,तो पर्यंत दिड वाजले होते ,आता तिची पावलं,थिएटर कडे वळली ,थिएटर मध्ये ती तिच्या सीटवर जाऊन बसली ,पिक्चर छान होता ,मध्यंतर झाला तेव्हा छान कॉफी पिली ,महाग होती तरी ,इतर वेळी तिच्या बरोबर नेहमी कुणी ना कुणी असायच ,मग खर्च जास्त होईल म्हणून नाही प्यायची,आणि त्याला पिक्चर थिएटर मध्ये पाहणे ,म्हणजे फालतू खर्च वाटायचा,आज ती एकटीच होती,कुणीही तिला काही बोलणारं नव्हतं.पिक्चर संपल्यावर बाहेर आली तर समोर सलून दिसले ,कोणताही कट 199 मध्ये ,मग काय घुसली सलून मध्ये ,एक छानसा कट केला,स्वत:ला आरशात पाहिलं आणि स्वत:वरच खुश होत बाहेर पडली , आता पाच वाजले ,एकटीच फिरत फिरत लोकल मार्केटला पोहोचली ,मनसोक्त फिरली ,सात वाजता सैंडविच खाल्लं,नंतर आइस्क्रीम खाल्ली ,आज तिला नव्यानेच कळालं होतं की ,एकटं फिरताना ही मजा येते ,रिक्षातून घरी जाताना सगळा दिवस तिच्या डोळ्यासमोरून झरकन सरकला आणि तिच्या मनाने एक वेगळीच उभारी धरली होती ,तिला आता खूप जगायच होतं ,ते ही भरभरून,स्वत:साठी,तिला तिचं मोकळं आकाश साद घालत होतं.

कसा वाटला उनाड दिवस ,कधीही स्वत:ला फ्रेश करायच असेल तर मनमुराद एकटे फिरून बघा ,खूप मजा येते आणि त्या नंतरच्या आयुष्यात वेगवेगळे रंग भरण्याची कलाच आत्मसात होते.

धन्यवाद,लेख आवडला असेल तर नावासहित शेअर करू शकता आणि अभिप्राय अवश्य द्या.

रुपाली थोरात