Feb 25, 2024
गोष्ट छोटी डोंगराएवढी

दीड तिकीट

Read Later
दीड तिकीट

संध्याकाळची वेळ होती, चाकरमानी लोकांची घरी जायची गडबड सुरू होती. त्या महानगरातला तो शेवटचा बस स्टॉप होता. त्या बस स्टॉपवर एक म्हातारे आजोबा एका हातात बाल गणेशाची मूर्ती घेऊन पर चढले, पण वय जास्त असल्यामुळे त्यांना व्यवस्थित वर चढता येत नव्हतं, कंडक्टरने त्यांना हात दिला आणि आत मधे घेतलं. बस मध्ये खरच खूप गर्दी होती, त्यामुळे कंडक्टर ने स्वतःची जागा त्या म्हातार्‍या आजोबांना दिली. तो इतर प्रवाशांचे तिकीट घ्यायला तो पुढे निघाला. सगळ्या प्रवाशांचे तिकीट घेता घेता इतर प्रवासी आजोबांच्या हातातल्या मूर्तीकडे कुतुहलाने आणि भक्तिभावाने बघत होते. त्या बालगणेशाच्या चेहऱ्यावर इतके सुंदर भाव होते की, त्याला बघणाऱ्याच्या मनात आपोआपच श्रद्धा जागृत व्हायची.अनेकांनी त्या मूर्तीला हात जोडले. कंडक्टर आता आजोबांजवळ आला आणि म्हणाला-


कंडक्टर -"आजोबा कुठे जायचं आहे? "


आपल्या गावाचं नाव सांगून आजोबांनी तिकीटासाठी पॅंटच्या खिशात हात घातला परंतु बसचा वेग आणि हातातल्या गणेशाच्या मूर्ती मुळे त्यांना पैसे काढता आले नाही. कंडक्टर म्हणाला-"असूद्या आजोबा, थोड्यावेळाने पैसे द्या".


त्या बाल गणेशाच्या मूर्तीकडे एकटक बघत एका महिलेने न रहावून आजोबांना शेवटी प्रश्न विचारलाच-" आजोबा तुमचं वय झालं आहे, आजकाल तर गणपतीच्या मूर्ती सगळीकडेच मिळतात.तुमच्या गावाकडे गणेशाची मुर्ती मिळतच असतील ना? मग आता या वयात एवढे लांब येऊन, उन्हातान्हाची एवढी दगदग करून गणेशाची मूर्ती घरी नेणं म्हणजे जरा कसरतच! हो ना? "


 त्यावर आजोबा थोडं मंदस्मित हसले आणि खरी गोष्ट सांगू लागले…..आजोबा-" साधारण पंधरा वीस वर्षांपूर्वी मी आणि माझी पत्नी या शहरात आलो होतो. थोडासा काही काम धंदा करून चार पैसे गाठीला मिळावे हाच त्यामागचा उद्देश होता. खरं तर माझ्या बायकोला लहान मुलांची फार आवड पण देवाने आम्हाला अपत्यसुख दिले नाही. अनेक उपचार झाले, अनेक डॉक्टरांचे उंबरठे झिजवले, उपास-तापास, नवस-सायास सगळं करून झालं, पण आमची झोळी मात्र रिकामीच राहिली. असंच एकदा गणेशोत्सवात माझ्या पत्नीला एका गणपतीच्या स्टॉलवर ही गणेशाची मूर्ती दिसली आणि तिच्यातलं मातृत्व जागृत झालं. तिने धावत जाऊन बाल गणेशाच्या या मूर्तीला आपल्या छातीशी कवटाळले आणि म्हटलं \"माझं बाळ ते! किती गोंडस आहे". त्या वर्षी पासून आम्ही बाल गणेशाची आमच्या घरी दरवर्षी प्रतिष्ठापना करतो. मी तर स्टॉल वाल्याला सांगून ठेवलं आहे की, \"बाबारे! दरवर्षी याच साच्याची बाल गणेशाची मूर्ती बनवूनदे!माझी बायको तर स्वतःचं मातृत्व या दहा दिवसात पूर्णपणे जगून घेते. आता मी घरी जाईल ना तर तिने दारासमोर सडा-रांगोळी केली असेल, दारावर आंब्याचे तोरण लावलं असेल. मी दरवाजात आल्यावर मीठ मिरचीने ती या बाल गणेशाची नजर काढील, आमच्या बाल गणेशासाठी वेगळी छोटी ताट, वाटी,तांब्या, चमचा,पेला सगळ आहे बरं का! आणि वर्षभर माझी पत्नी या गणेशासाठी विविध कपडे शिवत असते.बाल गणेशा चे कपडे ठेवण्यासाठी तिने वेगळी छोटी बॅग सुद्धा बनवली आहे. या दहा दिवसात मी आणि माझी पत्नी मातृत्व-पितृत्व सुखाचा आनंद उपभोगतो".आजोबांची ही गोष्ट ऐकून बसमधले सगळे प्रवासी भाऊक झाले होते.


त्यातच एका महाशयांनी विचारलं- "मग आजोबा मूर्तीचे विसर्जन करता की नाही?"


त्यावर आजोबा म्हणाले- "करतो तर! प्राणप्रतिष्ठा केली आहे तर दरवर्षी विसर्जन करतो. गेले कित्येक वर्ष मी आणि माझी पत्नी ही मूर्ती दरवर्षी घरी घेऊन जातो, पण कोरोना काळामध्ये तिची तब्येत ढसळली आणि आता तिचे पायही तिला साथ देत नाही, त्यामुळे यावेळी मी एकटाच मूर्ती घरी घेऊन जातो आहे.पण तरीही मनात भाव मात्र आजही तेच आहेत." तेवढ्यात बसचा कंडक्टर तिथे आला आणि त्याने त्या आजोबांना तिकिटाचे पैसे मागितले,


आजोबांनी -"मला दिड टिकीट हवे आहे."


त्यावर कंडक्टर म्हणाला -"आजोबा तुम्ही तर एकटेच आहात!मग अर्ध तिकीट कुणासाठी?"


आजोबा म्हणाले -"मी एकटा कसा? हा बालगणेश नाही का माझ्यासोबत? "


कंडक्टरच्या डोळ्यातील आश्चर्याचे भाव ओळखून आजोबा म्हणाले -"अरे बाब! ज्या बाल गणेशाला बघून माझ्या पत्नीच्या मनात मातृत्व भाव जागृत झाला, जो गणेश दहा दिवस आम्हाला माता पिता होण्याचं सुख देतो, तो केवळ एक मातीचा पुतळा आहे का? नाही तो तर खरा आमचा मुलगाच आहे! आणि जो मनुष्य मातीच्या मूर्ती मध्ये देव बघू शकत नाही तो भक्त कसा म्हणावा? तो तर नास्तिकच म्हटला पाहिजे ना!"समाप्त.


जय हिंद.


*********************************************


 वाचकहो कथा कशी वाटली नक्की कळवा 
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
//