ओळख स्वतःची

लघुकथा


गोष्ट छोटी डोंगराएवढी

विषय_ माझ्या आयुष्यातील अविस्मरणीय प्रसंग

शीर्षक _ ओळख स्वतः ची


जेव्हा पासून लेखणी हातात घेतली. तेव्हापासून माझे आयुष्य बदलले. आपण लिहू शकतो. यावर स्वतः चा कधी विश्वासच बसत नव्हता. पण, जेव्हा जेव्हा कौतुकाचा वर्षाव होत होता. तेव्हा मात्र समजले की आपण नक्कीच चांगलं लिहू‌ शकतो. तसेच या लिखाणामुळे आपल्याला मान सन्मान देखील मिळतो.
असाच एक प्रसंग माझ्या आयुष्यात आला. परीक्षकाचे काम करण्याचा. आयुष्यात असा कधी प्रसंग कधी आलाच नाही आणि परीक्षकाचे काम, तेही एका नावाजलेल्या शाळेत.
माझे मिस्टर सुहास मिश्रीकोटकर वेरूळ (एलोरा) येथील \"गुरूदेव समंतभद्र विद्यामंदिर\" येथे कार्यरत आहेत. त्यांना लेखणीची सुरवातीपासूनच आवड. पण, मी‌ देखील लिहू शकते यावर माझा स्वतः चा विश्वास बसत नव्हता. पण, त्यांनी मला प्रोत्साहन दिले आणि आज माझा प्रगतीचा आलेख चढता आहे.
एके दिवशी ते शाळेतून घरी आले. घरात पाय ठेवतच नाही आणि मला ते काही सांगणारच तर त्या शाळेचे मुख्याध्यापक श्री. बोराळकर सर यांचा फोन आला. "उद्या सकाळी तुम्हांला आमच्या शाळेत होणाऱ्या वक्तृत्व स्पर्धेचे परीक्षकाचे काम बघायचे आहे."

मी क्षणभर शांत झाले. अचानक आलेल्या फोन मुळे काय उत्तर द्यायचे. हे काही सेकंद कळलेच नाही.

पण, सर मी हे काम करण्यास ‌....

त्यांनी मला बोलूच दिले नाही.

"नाही म्हणू नका. आम्ही तुमचे लेखन वाचतो. आम्हांला देखील अभिमान आहे, विश्वास की आम्ही तुमची परीक्षक म्हणून निवड केली आहे."

सर, "मी या योग्यतेची आहे. असे मला नाही वाटत. माझ्या पेक्षा अनेक चांगले लोक तुम्हांला परीक्षक म्हणून मिळतील."

पण, "आम्ही तुम्हांला निवडतोय. त्यामागे आमचा उद्देश वेगळा आहे. तुमची योग्यता आम्ही ठरवणार. तुम्ही आमचे आमंत्रण स्वीकारा आणि सकाळी नऊ वाजेपर्यंत तयार रहा. आमच्या सोबतच तुम्हांला यायचे आहे."

नाही म्हणूनच शकले नाही. "ठीक आहे ,सर मी येते."

अहो, "काय हे? मला अचानक असे परीक्षकाचे काम झेपेल की नाही शंका आहे ?"

पण, "माझ्या मिस्टरांनी मला विश्वास दिला आणि तू हे काम नि:संकोचपणे कर. मी तिथे आहे म्हणून तू कशी करशील? असे विचार करु नकोस."

मला मात्र मनात सारखी धाकधूक होती. एका फोन मुळे माझी झोप उडाली होती. खरं तर आपल्या आयुष्यात खूप दुःखद प्रसंग घडून गेले. पण, अशा आनंदी प्रसंगी मला स्वतः ला सिध्द करायचे होते. दिवस पुढे सरकत होता. पण, मन‌ मात्र थरथरत होते. आतल्या आत मला काय होतं होते. ते मी मिस्टरांकडे बोलूच शकले नाही.

कशीबशी रात्र सरली. दुसऱ्या दिवशी सकाळी ‌उठून मुलांचे डबे, मिस्टरांचा डबा करून घेतला. पण, मला मात्र एक घासही जाईना. सकाळी नऊ वाजेपर्यंत तयार झाली. माझे मिस्टर ज्या गाडीत जातात. त्यांच्या सोबत माझा प्रवास सुरू झाला. गाडीत बसलेले‌ सर्व शिक्षक ओळखीचे आणि काही अनोळखी चेहरे सुध्दा. पण, मनात मात्र सतत शंका. की हि जबाबदारी आपण पार पाडू शकणार नाही.

पंचवीस मिनीटांचा प्रवास पण, फारच शांत बसून केला. शाळेच्या पहिल्या प्रवेशद्वारा जवळ एक कार्यालय आहे. तिथे गाडी थांबविण्यात आली. सगळे जण उतरलो. सरांनी आत येण्यास विनंती केली.

मी अहोंकडे बघीतले. तर म्हटले तू येथेच थांब. नंतर सगळ्यांच्या सोबत ते. बापरे, असे वाटले जणू वाघाच्या पिंजऱ्यात सोडून आले. सर्व काही ओळखीचे असूनही तेव्हा मात्र मला असुरक्षिततेची जाणीव झाली.
पण, काहीच करू शकत नव्हते. सोबत एक शाळेतील शिक्षिका आणि एक अनोळखी पाहुणी महिला होती. तेथून वेगळ्याच प्रवासाला सुरूवात झाली. मोठ्या मान सन्मानाने आम्हाला ऑफिस मध्ये बोलावले. मुख्याध्यापकांनी अतिशय मार्मिक शब्दांत आमचं स्वागत केलं. सोबतच चहापाणी. नंतर माझा प्रवेश शाळेत झाला आणि शाळेतील मुलांनी बॅड वाजवून स्वागत केले. पंधराशे विद्यार्थ्या मधून आपण एका मोठ्या व्यक्तीप्रमाणे आम्ही सर्वजण चालत येऊन स्टेजवर स्थानापन्न झालो. तिथेही स्वागत समारंभ ,ओळख करून दिली आणि मग माझी कसोटी सुरू झाली. एका गृहिणीला अशा प्रकारे मानसन्मान लाभला हेच माझ्यासाठी खूप प्रेरणादायी होते.‌ हातात सहभागी स्पर्धकांची नावे ,आणि गुणांचे नियोजन केलेला कागद दिला गेला. सुरवातीला क्षणभर मनात धास्ती वाटत होती. पण, एकापेक्षा एक सरस स्पर्धकांनी आपले वक्तव्यं सादर केले. त्यानंतर परीक्षण केले गेले. दुपारी तीन वाजेपर्यंत ही स्पर्धा चालली. अखेर मी ते काम यशस्वी पुणे कार्य केले. अशी पोचपावती मिळाली.
अशाप्रकारे माझ्या आयुष्यात हा अविस्मरणीय असा प्रसंग घडून गेला.

©® आश्विनी सुहास मिश्रीकोटकर
२५/९/२०२२