१५. ओली सांजवेळ

Husband's memories of his late wife.



#मखमली कवडसा


१५. ओली सांजवेळ



डोळ्यात  सांजवेळी, आणु नकोस पाणी, या अरूण दातेंच्या आर्त सुराने माधव  आणखीनच  भावनिक झाला.

ओल्या डोळ्यात, ओल्या आठवणी तुझ्या!

अशाच काही भावनांनी ओतप्रोत  भरलेला माधव खिन्न होऊन आरतीच्या फोटोकडे पहात होता!
" आरू , तुला  किती वेड होतं पावसाचं. . बघ ना कसा पडतोय  आता! ३-४दिवसांपासून सूर्य दर्शनही नाही! मला मात्र तुझं दर्शनही नशीबी नाही.
कशी इतकी दूर निघून गेलीस! वेड्यासरखं भिजायचं , पावसांच्या ठिकाणी जायचं, पावसात कुडकुडत चहा प्यायचा !
ते लोणावळ्याला सोबत खालेल्ल मक्याचं कणीस अजूनही विसरलो नाहीय!
खरं सांगू आरू. . कधी कधी राग यायचा गं तुझा ! कधी चिडचिड  व्हायची! इतकं कसं सकारात्मक असतं कुणी ! इतकं?
तुला कॅन्सर झाल्याचं कळालं तेव्हा  पायाखालची जमीन सरकली!
तुला मात्र जगायची धडपड! सगळं मनसोक्त करून घ्यायचं. . मग ते झेपो की नाही! तुला असं आयुष्य ओरबाडून जगताना पाहून मी तिळ- तिळ तुटत होतो."

"जाऊ यात ना हो. . पुन्हा पुढच्या वर्षीपर्यंत  मी असेन . . नसेन . .!"  तुझ्या या वाक्याने प्रत्येकवेळी पोखरून निघालो.

लोकं , मित्र . . मला वेडा म्हणत राहिले. . दवाखान्या ऐवजी हिलस्टेशनला का नेतोयस म्हणून.

पण तुला सगळं अनूभवायचं होतं ना ते. . डोंगरावरून ओरडून प्रतिध्वनी  ऐकायचा. . सूर्यास्ताला दोघांनी एक शाल घेवून पायी फिरायचं. . समुद्रकिनारी  ओल्या वाळूत अनवानी चालायचं. . जंगलात दोघच काही न बोलता मुक्यानं चालायचं अन निसर्गाचा आवाज ऐकायचा!

जगवेगळच तुझं!

खाणं पिणं , सोनं , दागिने , कपडे याचा सोस नाही. . सोस त्या अनुभवण्याचा ! सोस तो जगण्याचा !

मग अचानक गेलीस! तुला दवाखान्यात शेवटचा श्वास नको होता म्हणून किती डॉक्टरांशी .  . .घरच्यांशी भांडून तुला डिस्चार्ज  घेतला होता मी !

"पावसाळा कधी येणार ?" असं विचारलं होतंस तू २२ मे ला भर उन्हाळ्यात.
कदाचित त्या ओलेपणात तुला जायचं होतं. .
मी ही वेड्यासारखं म्हणालो होतो..
." बस्स ! अजून दोनच दिवस ! "तू खिन्न हसलीस. .

आणि काय आश्चर्य  दुसर्या दिवशी अवकाळी वारा अन पाऊस . . गर्मीने तापलेल्या धरेला गारांचा स्पर्श!

खिडकीचा पडदा सारून तुला किती वेळ पाऊस दाखवला. . तुझा हातही बाहेर पकडून ठेवला.  तुझ्या हातावर चार थेंब पडले पावसाचे मग आठ - दहा थेंब पडले ते माझ्या डोळ्यातले.

तू तशीच गारठली होतीस , माझ्या मिठीत . . ओल्या सांजवेळी तीच आपली शेवटची सोबत!

आता प्रत्येक पावसाळा अन प्रत्येक ओली सांजवेळ अशीच तुला अर्पण आरू!

माधव पत्नीच्या फोटोसमोरून सरकला व खिडकितल्या पावसाला पहात बसला. . . प्रसन्न मनाने. . आरती सारखंच. . . .  जणु तिच्या डोळ्याने !
समाप्त.

©®सौ. स्वाती बालूरकर देशपांडे , सखी.
लेखन  दिनांक १९.०८. २०२०
पुनः  प्रकाशन १३ .०५ . २०२२

🎭 Series Post

View all