बुडगी भाग 5 अंतिम

एका स्त्रीचा आत्याबाई पासून ते बुडगी बनण्याचा प्रवास


" कशी येऊ मा तुया संग मी. आयुष्य गेलं माय या घराच्या भिंती उभ्या करता करता. मातीचं होतं तवा सारवलं. आता सिमेंटचं झालं म्हणून पुसते. कायी झिजत नायी वं म्या या एवढुश्या कामानं." आजी उत्तरली.

"आजी मलाही काही वाटलं नसतं जर विषय फक्त कामाचा असता तर. पण या तुला मानही देत नाहीत. तू मालकीण आहे या घरची. पण मोलकरणी सारखं वागवतात तुला ह्या. किंबहुना तिच्यापेक्षाही खालच्या दर्जाची वागणूक देतात तुला ह्या. बिनपगारी मोलकरीण वाटतेस तु यांना." गौरी कळवळून म्हणाली.

"अरे बापरे किती चुटूचुटू बोलतेय. ही आताची पोरगी आपल्याला शिकवते सासूला कसं वागवायचं." मधली मामी म्हणाली.

"असू दे ग लग्न झाल्यावर आपणही बघू किती समजूतदारपणा दाखवते ही आपल्या सासू सोबत आणि किती प्रेमाने वागवते आपल्या सासूला." मोठी मामी बोलली.

गौरी काही बोलणार तोच आजीने तिला आवरलं, "गौरी जाय मा आता. या घरात तुह्या आजोबाच्या आठवणी हाय. त्याईले सोडून म्या कुठच जायची नाय. लगीन कर. चांगला संसार थाट. सासरच्याईले त्याईचा मान दे. माही कायजी करू नको. म्या मरायची न्हाय तुवं लेकूर पायल्या बिगर."

आसवांनी डबडबलेल्या डोळ्यांनी गौरीने आजीचा निरोप घेतला. गौरी थोडी दूर गेल्यावर तिची माम बहिण श्वेता तिच्या मागे येऊन तिला म्हणाली,

" ताई आजीची काळजी करू नको. आम्हा भावंडांना सगळं कळतं. आई काकूचं चुकतेय. त्यांना माफ कर. बाकी काळ आहेच त्यांना धडा शिकवायला. मी करते आजीची मदत सर्व कामात."

गौरीने श्वेता आपल्या मिठीत घेतलं.

" थँक्यू बाळ. काही अडचण असली तर फोन कर. मी लगेच हजर होईल." का बोलून आजीच्या विचारातच गौरी तिच्या वाटेला लागली.

पिहू झाल्यावर आजीला खूपच आनंद झाला. बाळाला बघायला आलेल्या आजीला, गौरीने परत तिच्या सोबत तिच्या घरी चलायचा आग्रह केला. पण तब्येत आता तितकी साथ देत नव्हती. म्हणून आजीला घर सोडून दोन दिवसाच्या वर कुठेही राहावे वाटत नव्हते. कारण जुन्या काळातील वैचारिक बाई ती. तीन तीन मुलं असतांना मुलींकडे किंवा नातवांकडे आपला मृत्यू झाला तर लोकं शेण घालतील मुलांच्या तोंडात. नावं ठेवतील. म्हणतील,

"मुलांकडून शेवटच्या दिवसातही सेवा करणं झाली नाही मायची."

तर माम्यांना वाटत होते मोकळीक मिळावी म्हणून बुडगीने तिच्या मुलींकडे किंवा नातवांकडे काही दिवस तरी राहायला जावे.

कसली मोकळीक तेच गौरीला कळेना. सर्व कारभार तर कधीचाच त्यांच्या हातात देऊन दिला होता आजीने.

"आवं गौरी तुमची लाडकी आजी गेली वं आपल्याले सोडून." मधली मामी गौरीला बघताच तिच्या गळ्यात पडून रडायचं ढोंग करू लागली.

खूप खदखद भरली होती तिच्या मनात. पण ती शांत होती. गच्चं डोळे मिटून. कारण या लोकांना ती काहीही बोलली तरीही कसलीच जाणीव होणार नव्हती ना आजी परत येणार होती.

हा एका स्त्रीचा आत्याबाई पासून ते बुडगी बनण्याचा प्रवास मागील वर्षी नोव्हेंबर महिन्यात देवाला प्रिय झालेल्या माझ्या आजीला समर्पित.

धन्यवाद!

©®अर्चना सोनाग्रे वसतकार

🎭 Series Post

View all