जुनं ते सोनं

पत्र- एक आठवण

कथेचे शिर्षक: जुनं ते सोनं

विषय: टपाल

स्पर्धा: गोष्ट छोटी डोंगरएवढी


पेंडसे आजोबा दिवाळी जवळ आल्यामुळे आपल्या रुमची साफसफाई करत होते. यश हा त्यांचा पंधरा वर्षे वयाचा नातू होता. यशला त्याच्या आईने आजोबांची मदत करण्यासाठी पाठवले होते.


"आजोबा आईने मला तुमची मदत करण्यासाठी पाठवलं आहे. काही काम असेल तर सांगा." यशने सांगितले.


आजोबा म्हणाले,

"बरं झालं तू आलास. मी तुला आवाज देणारचं होतो. त्या कोपऱ्यातील लोखंडी पेटी इकडे घे."


यश लोखंडी पेटी आजोबांकडे देत म्हणाला,

"आजोबा ह्या पेटीत काय आहे? तुम्ही खूप जपून ठेवली आहे."


आजोबा पेटी उघडत म्हणाले,

"ह्या पेटीत अनमोल खजिना आहे."


यश पेटीत डोकावत म्हणाला,

"आजोबा ही तर जुनी पत्र आहेत. तुम्ही ह्याला अनमोल खजिना कसा म्हणू शकतात. आजोबा पण तुम्ही ही पत्र जपून का ठेवली?"


आजोबा हसून म्हणाले,

"तुमच्या पिढीला पत्रांची किंमत कळणार नाही. ह्या पत्रांमध्ये जुन्या आठवणी, भावना दडलेल्या आहेत. मला जेव्हा कधी एकटं वाटतं, तेव्हा मी ही पत्र वाचतो. तुम्हाला आजकालच्या पिढीला पत्रांचं महत्त्व कधीच कळू शकणार नाही.


तुझ्या आजीला मी पहिलं पत्र पाठवलं होतं, त्यासोबत एक गुलाबाचे फुल सुद्धा पाठवले होते. आजीला ते पत्र पंधरा दिवसांनी मिळाले होते, तोपर्यंत ते गुलाबाचे फुल सुकून गेले होते. आजीने ते सुकलेले गुलाबाचे फुल कितीतरी वर्षे आमचे प्रेमाचे प्रतीक म्हणून जपून ठेवले होते. पुढील पंधरा दिवसांनी आजीच्या उत्तराची वाट मला पहावी लागली, कारण आजीने लिहिलेले पत्र मला त्यानंतरच्या पंधरा दिवसांनी मिळाले होते.


पत्र वाचताना समोरच्या व्यक्तीच्या लिखाणामुळे एक वेगळीच आपुलकी वाटायची. पत्र वाचताना त्या व्यक्तीच्या भावना सरळ जाऊन हृदयाला भिडायच्या. लग्न होईपर्यंत आम्ही दोघे एकमेकांना पत्रातूनचं भेटायचो. पत्रातून व्यक्त होणारं आमचं प्रेम हे काही वेगळंच होतं.


मी नोकरीच्या निमित्ताने घरापासून जवळपास दहा वर्षे दूर होतो. सुरवातीचे दोन वर्षे आम्ही एकमेकांना खूप पत्र लिहिली. त्यानंतर आमच्या गावात टेलिफोन आले होते. शेजारच्यांकडे फोन असल्याने मी पीसीओ वरुन फोन करुन आजीसोबत बोलायचो. पत्रातून जी बोलण्याची मजा होती, ती फोनवर बोलण्यात नव्हती. पत्र वाचताना एखादा शब्द जर पुसलेला आढळला, तर त्यावेळी आजीच्या डोळ्यात अश्रू आले असतील, हे समजायचं. तो पुसलेला शब्द बघून मला सुद्धा भरुन यायचं. आमचं प्रेम त्या पत्रांमुळेच फुलत होतं.


काही दिवसांनी घरी टेलिफोन आल्यावर पत्र पाठवण्याची आवश्यकताचं भासली नाही. शाळेतील किंवा कॉलेजमधील आम्ही मित्र एकमेकांच्या वाढदिवसाला पत्र लिहून शुभेच्छा द्यायचो. आजही ती सगळी पत्र वाचली की, आपल्या आयुष्यात आपल्यावर प्रेम करणारी किती माणसे होती, हे समजून येतं. 


ही पत्र फक्त भावनाचं व्यक्त करत नव्हते, तर आम्हाला वाट बघायला सुद्धा शिकवत होते. आमच्या पिढीत जे पेशन्स आहेत, ते यामुळेच आहेत. नाहीतर तुमची आजकालची पिढी व्हाट्सएपवर मॅसेज केल्यावर समोरच्याचा रिप्लाय लवकर आला नाही, म्हणून रुसून बसतात. तुमच्यातील इगो दुखावला जातो. व्हाट्सएपवर मॅसेज लिहिताना तुम्ही सगळे शब्द टाईप करण्याचे कष्ट सुद्धा घेत नाहीत. तुम्ही एक अक्षर टाईप केलं की, गुगल तुम्हाला चार ते पाच शब्द सुचवतं, मग तुम्ही त्यातील एक शब्द सिलेक्ट करतात. 


तुझी आजी जाऊन दोन वर्षे झाली, पण मी तिची पत्रे वाचल्यावर ती इथेच माझ्यासोबत आहे असं वाटतं. आता तू म्हणशील की, तुम्ही सुद्धा मॅसेज सेव्ह करुन ठेवतात किंवा त्याचे स्क्रीनशॉट काढून ठेवतात, पण ज्यावेळी तुमचा मोबाईल मधील डेटा डिलीट होतो, तेव्हा ह्या सगळ्या आठवणी डिलीट होऊन जातात.


आमची पत्रे अशी नाहीयेत. जोपर्यंत आम्ही त्यांना सांभाळू तोपर्यंत ती आमच्यासोबत राहतील. तंत्रज्ञान विकसित झाल्याने नवनवीन गोष्टी जरुर याव्यात, पण जुन्या गोष्टींना विसरु नये. आपल्या घरी आता पत्रं येतात, पण ती फक्त बँकेची किंवा सरकारी खात्यातील असतात. 


तुझ्या मित्रांचा ग्रुप आहे ना, तर तुम्ही एखाद्या वेळेस थ्रिल म्हणून एकमेकांना पत्र पाठवून बघा. पत्र लिहिणं एक कला आहे, हे तुम्हाला सुद्धा त्यावेळी जाणवेल. 


मला फक्त एवढंच वाटतं की, पत्र ही संकल्पना इतिहास जमा होऊ नये. जुनं ते सोनं असतं, हे कायम लक्षात ठेवावं."


यश मान हलवून रुममधून निघून गेला. पेंडसे आजोबा जे काही बोलले ते अगदी खरं होतं. व्हाट्सएप, फेसबुकच्या युगात पत्र कोणीच कोणाला लिहीत नाही. मला आठवतंय की, माझ्या लहानपणी जेव्हा पोस्टमन काका पत्र घेऊन घरी यायचे, तेव्हा पत्र कोणाचंही असूदेत, पण ते पत्र वाचण्याची ओढ खूप वाटायची. पंधरा ते वीस ओळींचे ते पत्र कितीतरी वेळा वाचले जायचे. व्हाट्सएपवरील मॅसेज वाचण्यात ती ओढही नाही आणि मजाही नाही. 


एक उदाहरण द्यायचं झालं तर आपल्यापैकी बरेचजण मित्र मैत्रिणींच्या वाढदिवसाला ग्रिटींग कार्ड गिफ्ट देतो. त्या कार्डवर मोजून चार ते पाच ओळी लिहिलेल्या असतात, पण त्या मनाला जाऊन भिडतात. व्हाट्सएपवर कितीही मोठा मॅसेज करा, पण त्या ग्रिटींग कार्डवरील ओळींना त्याची सर येणार नाही.


पेंडसे आजोबांनी जसं यशला त्याच्या मित्रांना एक थ्रिल म्हणून पत्र लिहायला लावलं. अगदी तसंच आपणही आपल्या मित्र मैत्रिणींना पत्र लिहून ती मजा अनुभवू शकतोच ना. 


©® Dr Supriya Dighe