ओलावा

लेख
ओलावा
दिवाळीमधील सर्वात मोठा,महत्त्वाचा आणि शेवटचा सण म्हणजे भाऊबीज असतो.या सणामुळे हे नातं अधिकाधिक घट्ट होत जातं. याच दिवशी बहीण भावाला ओवाळणी करते. यावेळी भाऊ-बहीण एकमेकांना भेटवस्तू देऊन एकमेकांविषयीचं प्रेम व्यक्त करतात.
या सणाच्या निमित्ताने भाऊ बहिणीच्या घरी जाऊन तिथे भाऊबीज साजरी करतो. तस आता सध्या ऑनलाईनच्या युगात जर भाऊ-बहीण दूर असतील तरीही आपण भाऊबीज साजरी देखील करु शकतो आणि एकमेकांना शुभेच्छा देऊ शकतो.
पवित्र नाते
बहिण भावाचे,
लखलखते राहू दे,
दीप जिव्हाळ्याचे..|

बंध भावनांचे
बंध अतूट विश्वासाचे
नाते भाऊ-बहिणीचे..

बहीण भावाच्या जिव्हाळ्याचे, आपुलकीचे नाते अतूट राहावे यासाठी हा सण साजरा करण्याची रीत आहे.

भाऊबीज म्हणजे भाऊ-बहिणीच्या प्रेमाचा, आपुलकीचा दिवस, भाऊ-बहिणीच्या प्रेमळ नात्याचा उत्सव|

सण बहीण भावाचा आनंदाचा उत्साहाचा
निखळ मैत्रीचा.. अतूट विश्वासाचा

मायेचे अन् विश्वासाचे राहिल सदैव जन्म-जन्माचे आपणास भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा!

भाऊ-बहिणीच्या पवित्र नात्याचा
हा बंध आहे प्रेम आणि विश्वासाचा

भाऊबीज हा भाऊ-बहीण ऋणानुबंध दृढ करण्यासाठी साजरा होत असलेला एक सण आहे. हा सण कार्तिक शुद्ध द्वितीया (यमद्वितीया) या दिवशी असतो. हा महाराष्टीयन पद्धतीच्या दिवाळीतला सहावा दिवस असतो. या सणास हिंदीत भाईदूज म्हणतात.

या दिवशी बहिणीच्या किंवा स्वतःच्या घरी भाऊ गोडधोड भोजन करतो आणि सायंकाळी चंद्राची कोर दिसल्यानंतर बहीण प्रथम चंद्रकोरीस व नंतर भावाला ओवाळते. भाऊ मग ओवाळणीचे ताटात \"ओवाळणी\" देऊन बहिणीचा सत्कार करतो.
कायस्थ समाजाचे लोक या दिवशी चित्रगुप्ताच्या देवळात जाऊन दौत-टाकाची आणि चित्रगुप्ताची पूजा करतात. या दिवशी यमराजाने आपली बहीण यमुनेच्या घरी जाऊन तिला वस्त्रे अलंकार इत्यादी वस्तू देऊन तिच्या घरी भोजन केले म्हणून या दिवसाला यमद्वितीया म्हणतात. या दिवशी यमुना नदीत स्नान करणे अत्यंत पवित्र मानतात म्हणजे असे केल्यामुळे त्यावर्षी यमापासून तरी भय नसते असा समज आहे. यम आणि यमी या भावा-बहिणीच्या प्रेमाबद्दल अशी कथा आहे की यम मृत्यू पावला त्यावेळी यमीला एवढे दुःख झाले की ती आपली रडणे व डोळ्यांतील अश्रू काही केल्या थांबवेना. तेव्हा शेवटी दिवस संपला हे दाखवण्यासाठी देवाने रात्र निर्माण केली आणि मग यमीचे भावा बद्दलचे दुःख थोडेसे हलके झाले तेव्हापासून भाऊबीजेची प्रथा पडली. आपल्या भावाचे आयुष्य वाढावे म्हणून बहिणीने यमराजाची पूजा आणि प्रार्थना करावयाची.
यदिवशी बहीण भावाला आरती ओवाळून त्याची पूजा करीत असते त्याला प्रेमाचा टिळा लावते तो टिळा बहिणीच्या निस्वार्थी प्रेमभावना व्यक्त करीत असतो.भावाची पूजा म्हणजे यमराजाच्या पाशातून म्हणजे मृत्यूपासून भावाची सुटका व्हावी व तो चिरंजीव राहावा हा यामागचा उद्देश असतो. भाऊ आपल्या यथाशक्तीप्रमाणे पैसे कापड दागिना असे वस्तू ओवाळणी टाकतो. या दिवशी घरी जेवण करू नये व पत्नीच्या हातचे जेवण करू नये असे धर्मग्रंथात सांगितले आहे. जवळचा किंवा दूरचा भाऊ नसल्यास चांदोबास ओवाळण्याची पद्धत आहे आपल्या सणामागे असलेल्या कल्पनांची विशाल पण यावरून दिसून येते.
आज आधुनिक व धावपळीच्या युगात भाऊबीजेचे स्वरूप पूर्णपणे बदललेले आहे.
विभक्त कुटुंबपद्धती, परगावी किंवा परदेशात नोकरी, स्वतःचे छोटे कुटुंब व स्वार्थीपणा यातच मनुष्य गुरफटलेला आहे.
आपल्या रक्ताच्या नात्यातली व हक्काची बहीण आहे हे मानव विसरत चालला असून या सणाला फक्त औपचारिकता शिल्लक राहिल्याचे आज सर्वत्र दिसत आहे.
स्वतःला अतिशय व्यस्त करून घेतलेला भाऊ वेळेअभावी बहिणीकडे न जाता फक्त ऑनलाईन संदेश पाठवून भाऊबीज व शुभेच्छा देऊन भाऊबीज साजरी करण्याचा केविलवाणा प्रयत्न करतांना दिसत आहे.
मानव जर थोडासाही वेळ जर बहिणीसाठी काढू शकत नसेल तर यासारखी शोकांतिका नाही.
ऋणानुबंध जोपासणे व दृढ करणे हे भाऊ व बहीण दोघांचेही कर्तव्य आहे.
परिस्थितीनुसार बदलणे ही काळाची गरज असली तरी काळानुसार नात्यांची वीण घट्ट करण्यासाठी प्रत्येक प्रयत्न हा यशस्वी प्रयत्न झाला पाहिजे तरच नात्यात प्रेम , सहानुभूती,ओढ, ओलावा व आपुलकी कायम राहील व वृद्धिंगत होईल.

©® श्री सुहास अजितकुमार मिश्रीकोटकर औरंगाबाद