Feb 25, 2024
राज्यस्तरीय करंडक लघुकथा स्पर्धा

ओलावा मायेचा

Read Later
ओलावा मायेचा


ओलावा मायेचा..

विषय: स्त्री आणि परावलंबित्व

स्पर्धा: राज्यस्तरीय लघुकथा स्पर्धा.

झपाझप पावले टाकत सुमती चालत होती. काहीही झाले तरी आज वेळेत पोहोचायचेच होते. चालता चालता तिच्या पायातून कळ आली. मुरगळलेला पाय तो वेग सहन करू शकला नव्हता. पण ही जर गाडी मिळाली नाहीतर पुढचा अर्धा तास वायाच गेला असता. वर कामावर बोलणी बसली असती ती वेगळीच. दुखणार्या पायाकडे दुर्लक्ष करून ती समोर आलेल्या गाडीकडे धावली.. नशीबाने आज तिला बसायला जागा मिळाली. तिला हायसे वाटले. सकाळी घाईघाईत निघताना तिला काही खायला मिळाले नव्हते. आता पटकन तोंडात काही टाकावे म्हणून तिने पर्स उघडली तर डबा नव्हता. तिने डबा भरलेला तिच्या लक्षात होते. "तो पर्समध्ये ठेवायचा विसरले बहुतेक." तिने मनाची समजूत काढली. पोटात भुकेचा डोंब उसळला होता. "कितीवेळा ठरवते एकतरी बिस्किटाचा पुडा जवळ ठेवायचा. पण मेली स्मरणशक्ती साथ देईल तर ना." तिने स्वतःलाच ओरडून घेतले. कसेबसे स्टेशन येईपर्यंत धीर धरला. उतरल्यावर लगेच तिने तिथे बसलेल्या माणसाकडून इडल्या विकत घेतल्या. एका बाईला तिथे एकटी उभी राहून खाताना बघून काहीजण तिच्याकडे बघत बसले.. पण त्यांच्याकडे लक्ष द्यायला सुमतीकडे वेळ कुठे होता? तिने पर्समधला पत्ता काढला. तो शोधत ती निघाली. तिथे पोचली. प्राथमिक प्रश्नोत्तरे झाली. सुमतीला छळणारा प्रश्न समोर आला..
" तुमचे वय काय मावशी?"
" माझे वय??" सुमती अडखळली. शेवटी तिने मनाचा हिय्या केला..
"माझे वय पासष्ट आहे."
" एवढे? आणि तुम्ही राहता कुठे?"
" बदलापूरला.."
" मग तिथून तुम्ही रोज दादरला येणार?"
" मी रोजच येते. माझी दहा कामे चालू आहेत इथे ताई."
"हो. पण मावशी आम्हाला सकाळी दहा वाजता डबा तयार हवा होता. तुम्हाला कसे जमणार? मला जर आधीच तुमचे वय माहित असते तर तुम्हाला हेलपाटा पडू दिला नसता."
" ताई, माझे काम बघा. वय नको.."
" मावशी नकोच.. कारण तुम्हाला एक दिवस जरी जमले नाही तर मला भारी पडेल.. तुम्हाला राग येणार नसेल तर एक विचारू?"
" विचारा.."
" खरेतर हे तुमचे घरी बसायचे वय.. या वयात ही कामे करता?"
" मला घरी करमत नाही म्हणून.." सुमती उठली आणि चालू लागली. खूप निराश झाली होती ती. आधीची दोन कामे सुटली होती. महिन्याची आवक कमी झाली होती. वय जास्त म्हणून बाहेर काम मिळत नव्हते. पण म्हणून घरचे खावटी घ्यायचे काय सोडत नव्हते.. तशीच ती कामाच्या ठिकाणी पोहोचली.. मालतीबाई तिची वाटच बघत होत्या. दरवाजा उघडताच त्यांचा पहिला प्रश्न..
" बाई, आज खायला काय करणार?"
" तुम्ही सांगा ताई.."
" आज ना खूप वरणफळे करा.." त्या बोलेपर्यंत शेजारच्या फ्लॅटमधला त्यांचा नातू आला..
" अर्णव, आज माझ्यासोबत वरणफळे खाशील?"
" नाही आजी.. मी बाहेर चाललो आहे. ममाला निरोप दे. मी फोन केला तर ती इरिटेट करेल म्हणून तुला सांगायला आलो." तो दरवाजा लावून गेला. मालतीताई सुमतीकडे बघून कसनुश्या हसल्या..
" तुम्ही एकीकडे कुकर लावा. दुसरीकडे आपल्या दोघींसाठी चहा करा छान. आणि बाहेरच या प्यायला.." सुमतीला बरे वाटले. दोन तीन तास झाले होते घर सोडुन. सकाळी तो घोटभर चहा घेतला होता तेवढाच. मगाशी इडली खाताना चहाची तलफ आली होती पण उशीर होईल म्हणून तिने घेतला नव्हता, त्याहीपेक्षा इडलीसाठी पैसे घालवल्यावर चहासाठी घालवायचे तिच्या जीवावर आले होते. चहा कसा कोणत्याही घरी तिला मिळायचाच.. तिने पटापट कुकर लावला. चहा ठेवला. एकीकडे कणिक भिजवून ठेवली. चहा होताच दोन कपात घेऊन बाहेर गेली..
" बसा बाई.." मालतीताई बोलल्या.
सुमती खाली बसली. कितीदा सांगितले तरी ती सोफ्यावर बसायची नाही. मालतीताईंनी तिकडे दुर्लक्ष केले.
" आज जाणार होता, ते काम झाले नाही वाटते." मालतीताईंनी विचारले.
" तुम्हाला कसे समजले?"
" बाई, आज इतकी वर्षे तुम्ही आमच्याकडे येताय. तुम्ही तोंडाने काही नाही बोललात तरी चेहरा बोलतो तुमचा सगळा.. सांगा काही अडचण आहे का?"
" अडचण म्हणजे.." सुमती परत अडखळली.. ती आणि मालती, दोघी एकाच वयाच्या.. दोघींची मुलेही. फरक एवढाच मालतीला एक मुलगी आणि सुमतीला मुलगा. सुमतीला नेहमी वाटायचे आपल्याला मुलगा आहे याचा सुक्ष्म हेवा मालतीला वाटतो.. आणि मालतीचे सुखवस्तूपण कुठेतरी सुमतीला खुपायचा.
काय सांगायचे हिला, की जो मुलगा आहे म्हणून हिला माझा हेवा वाटतो तोच माझ्याच घरात मला राहू देण्यासाठी माझ्याकडेच खायचे प्यायचे पैसे मागतो. ज्या वयात मी निवृत्त व्हायचे त्याच वयात घराघरात स्वयंपाकाची कामे करायला लावतो. घर नावावर करून देत नाही म्हणून सतत भांडणे उकरून काढतो. किती आणि काय सांगायचे? आणि कसे सांगायचे..
" तुम्हाला अवघड वाटत असेल तर नका हो सांगू." मालतीताई म्हणाल्या.
" तसे नाही ताई. त्यांनी माझे वय बघून नकार दिला."
" पण मग तू तरी कशाला फिरतेस इथेतिथे? रहा की एका जागी.." मालतीताई बोलून गेल्या..
" कशी राहणार बाई? पोटाला अन्न लागते. त्याच्यासाठीच ही वणवण. प्रिशाबेबीसारखा नाही माझा लेक.."
" प्रिशाबेबी.." मालतीताई खिन्नपणे हसल्या.
" झाकली मूठ सव्वालाखाची असते सुमती.. प्रिशाबेबी तिच्या संसारात मग्न आहे. आई बाजूला राहते म्हणून फक्त डोकावते ग.. नशीबाने माझ्याकडे पैसे आहेत. शरीर हलते आहे.. ना आर्थिक परावलंबन ना शारिरीक.. पण हे भावनिक परावलंबन वाईटच ग. माणूस पैसा कमावू शकतो पण हे आपल्या माणसांना दूर जाताना बघणे वाईटच. सख्खी मुलगी बाजूला राहते पण रात्री एकटी थंडगार भात मी पोटात ढकलत असते.. तुझे बरे आहे ग. रागाने का होईना मुलगा बोलतो तुझ्याशी. माझ्या लेकीला तर बघणे पण जीवावर येते माझ्याकडे.."
" बाई, भावनिक परावलंबन श्रीमंत गरीब नाही बघत. आपली माणसे असणे ही प्रत्येकाची गरज असते. मग त्यासाठी काहीजण उतारवयात घरघर फिरतात तर काही एकटी राहतात.." सुमती बोलली..
दोघीही शांत बसल्या.. कुकरची शिट्टी झाली. सुमती गॅस बंद करायला आत गेली. मालतीताई विचार करत बसल्या होत्या.
असेच काही दिवस गेले. एक दिवस मालतीताईंनी सुमतीला थांबवून घेतले. "सुमती उद्या येताना तुझे सगळे सामान घेऊन ये. तू यापुढे इथेच राहणार आहेस."
" म्हणजे?" आश्चर्यचकित झालेल्या सुमतीने विचारले.
" आता इथे तू , मी आणि अजून दोघीजणी रहायला येणार आहेत. तू ही आता फक्त आराम करायचा.. वाटले तर स्वयंपाक कर नाहीतर नको करूस."
" पण बाई पैसे?"
" मी माझी गावची जमीन, सोनेनाणे सगळे विकले. ते पैसे आणि अजून दोघी आहेत त्यांचे पैसे. असे मिळून घर चालवू. एकमेकांना भावनिक आधार देत..गरज पडली तर दोन माणसे ठेवू. होईल तोपर्यंत एकमेकांच्या आधाराने राहू. चालेल तुला?" मालतीताईंनी हसत विचारले.
" बाई जगण्याच्या रखरखाटात जर असा मायेचा ओलावा मिळत असेल तर कोण सोडेल?" सुमतीच्या डोळ्यात पाणी होते.
" पुस ते डोळे आणि यापुढे मला बाई म्हणायचे नाही.. मालती म्हणायचे.."
दोघीही एकमेकींकडे बघून प्रेमाने हसल्या. दोघींचेही भावनिक परावलंबन संपले होते..


कथा कशी वाटली ते नक्की सांगा..
सारिका कंदलगांवकर
दादर मुंबई
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
//