ओळखं एकांताची

ऐकांत किती गरजेचा आहे हे माझ्या मित्राने समजावून सांगितले जे गरजेचे होते

शिर्षक - ओळख एकांताची
लेखन : - उज्वल बायस


" काय साला वैताग आहे ? "

माझ्या दिवसाची सुरवात हे नेहमी अशी व्हायची . आणि त्यात पण पावसाळा आला कि जीव अगदी मेटाकुटीला येतो . रात्री पासूनच पावसाने नुसता धुव्वा उडवून टाकला होता . मंथ एन्ड असल्यामुळे ऑफिस ला जाणे भाग होते . मी वैतागून स्टेशन गाठले . पावसामुळे रोज भरधाव धावणाऱ्या लोकल शेम्डया पोरा सारख्या रांगत होत्या . वरून पाऊस आणि बाजूने माणसाचा नुसता पूर स्टेशन वर आला होता . पाठोपाठ दोन लोकल सोडल्या . त्या इतक्या भरून येत होत्या कि मूंगीला देखील आत शिरायला जागा नव्हती .

तिसरी लोकल हि जवळपास सोडली होती इतक्यात दाराजवळ सॅम उभारलेला दिसला . सॅम माझा लंगोटी यार . त्याने मला हात दाखवला आणि मी धावतच त्याचा हात पकडला . त्याने मला डब्यात ओढून घेतले . सॅम दात काढत म्हणाला
" हाय हाय सेनोरिटा पावसात भिजून एकदम कातिल दिसतोय ."

मी थोडे फार नाराजीनेच म्हणालो
" खरंच कातीलच व्हावंस वाटतंय . किती ती गर्दी ? किती ते लोक आणि वरून हा दरिद्री पाऊस . बाहेर उभा राहिलो तर पावसाने भिजायचे आणि आत असले तर घामाने भिजायचे . वैताग नुसता "

सॅम हसत हसत माझ्या कडे निरखून पाहत होता . मी पुन्हा चिडलो
" तुला काय झालं दात काढायला ? "

" तुझा ATM झाला आहे ? "

मी बुचकळ्यात पडलो .
" ATM म्हणजे ? "

सॅम हसला आणि म्हणाला
" एक सांग लास्ट टाईम तू स्वतः साठी काय केलं होतं ? "

मी म्हणालो
" सगळं स्वतःसाठीच करतो आहे ना ? दुसऱ्या साठी करायला वेळ कुठे आहे ? "

सॅम कुत्सितपणे हसत बोलला
" हो का ? पुन्हा विचार करून सांग "

" मी तर सांगतिले , आता तू सांग तुला काय म्हणायचे आहे "

सॅम सुरु झाला
" हे बघ तू सध्या धावतो आहे ते टार्गेट व्हावे म्हणून , टार्गेट झाले तर इन्सेन्टिव्ह मिळेल . इन्सेन्टिव्ह म्हणजे पगारी शिवाय चा पैसा जो तू घरासाठी खर्च करतो . आणि पूर्ण पगार मधून बँक चे हप्ते आणि रुटीन लाईफ चे खर्चात जातात . थोडी फार सेविंग सण हौस मौज . मला सांग यात तू कुठे आहे ? "

" म्हणजे ? "

एखादा जादूगार कसा टोपीतून ससा काढतो त्या प्रमाणे सॅम बोलला
"तू कुठे आहे म्हणजे तू वयक्तिक तुझ्या साठी किंवा असे म्हण कि स्वतःवर काय खर्च करतो . "

एखाद्या मध्यमवर्गीय माणसाला शोभेल असे मी म्हणालो
" इथे गरजा भागवायला पैसे कमी पडतात स्वतः वर काय खर्च करणार डोंबल ? "

सॅम बोलला
" पैसे खर्च करणे म्हणजे स्वतः साठी जगणे आहे का ? पैश्या शिवाय आजून पण आहे जे स्वतः वर खर्च करू शकतो "

" मग काय करायचं ? पैस्या शिवाय काय होऊ शकतं ? "

सॅम बोलला " अर्थातच पैसे हे हवेतच पण बऱ्याच गोष्टी पैस्या शिवाय करता येतील ना "

" उदाहरण सांग ? "

" मला सांग शेवटचे पुस्तक तू कोणते वाचलं ? निवांत बसून एखादं गाणं कधी ऐकलं ? गॅलरीत बसून पाऊस कधी पाहिलास ? एखाद्या दिवशी सगळं सोडून झकास ताणून कधी दिलीस ? आठवत नाही ना ? आपण आपल्या वर टाईम देखील खर्च करू शकतो ना ?"

मी खरंच विचारात पडलो .
" म्हणून तुला मी ATM बोललो "

मी कुतूहलाने विचारले
" ATM च का ? "

सॅम माझ्या खांद्यावर हात टाकत म्हणाला
" ATM मशीन कडे म्हणजे त्याच्या आत खूप पैसे असतात पण ATM ला त्याचा काहीच उपयोग होतं नाही . दुसरेच येतात आणि कार्ड टाकून पैसे घेऊन जातात . तू ATM बनू नकोस . अगदी थोडा सा का होईना स्वतःला वेळ दे . स्वतःशी बोल . ती एकमेव अशी सोबत आहे जी सदैव तुज्या सोबत राहील ."

मी डोके खाजवत विचारले
" स्वतःशी कस बोलायचे ? स्वतः शी बोलायला लागलो तो लोक दगड मारायला लागतील "

तो हसला
" त्या साठी तुला हवा एकांत . मग हा एकांत तुला घरी मिळू शकतो एखाद्या हिलस्टेशन वर मिळू शकतो नाही तर एखादा दिवस बिना कामाचे कुठे हि भटकला तरी मिळेल . अगदीच काही नाही मिळालं तर संध्याकाळी समुद्रा काठी एकट बसून सूर्यास्त बघ . स्वतःची सोबत तुला बरेच काही शिकवेल , एक नवीन ऊर्जा देईल रोजच्या जीवनासाठी . तुझी चिडचिड कमी होईल . किरकिर वाटणारा पाऊस देखील तुला सूंदर वाटू लागेल . त्या साठी आधी एकांत मिळव . सुरवातीला एकांत शोधायला जड जाईल पण एकदा का तो तू शोधला आणि स्वतःशी तुझी ओळख झाली कि नंतर तू अगदी लोकल च्या गर्दीत देखील एकांत अनुभवू शकशील . एकांतात आपण स्वतःला भेटतो आणि एकदा स्वतःशी ओळख झाली कि मग बाहेरील गोष्टी चे आघात चे असर कमी होतात आणि मग जगणे एक सेलिब्रेशन होते . "

मी भान हरपून ऐकत होतो . सॅम हसला आणि म्हणाला
" मनापासून केलेला सवांद देखील एकांत सारखा आनंददायी असतो , आता हेच बघ ना आपल्या बोलण्यात तुला ना लोकल च्या गर्दी ची जाणीव झाली ना बाहेर पडणाऱ्या पावसाची ना बाकीच्या कोणत्या विवंचनाची . आणि सगळ्यात महत्वाचे माझं स्टेशन आल्याची देखील जाणीव नाही झाली . चल पळतो ."

सॅम चटकन लोकल मधून खाली उतरला माझं स्टेशन आजून पुढे होतं . मी वेड्या सारखे त्याच्याकडे पाहत होतो . तो जाता जाता ओरडला
" एकांत शोध स्वतःला शोधशील नाही तर हरवून जाशील या गर्दीत . "

सॅम ने आज मला जगण्याचा एक नवा मंत्र दिला होता . आता मला शोधायचा होता एकांत ...........

समाप्त .