ओढ:-भाग 7

Ashwin Was Not Getting Any Information About Amruta
ओढ:- भाग 7

©® अमित मेढेकर

संपूर्ण रात्र सरली पण त्याचे विचार नाही संपले..., तो तिथेच वाळूत बसून होता. सकाळ झाली तसेकाहीतरी ठाम निश्चय करून तो उठला. एव्हाना सूर्याची कोवळी किरणे पसरायला लागली होती, त्या किरणांच्या स्पर्शाने त्याला त्याच्या अस्तित्वाची आणि इतर काही गोष्टींची जाणीव करून दिली.
काल दिवसभर त्याने काहीच खाल्ले नव्हते त्यामुळे खरे तर त्याचा प्रचंड शक्तिपात झाला होता.
तरीही काही नेटाने आणि जोमाने मनाशी ठरवत तो गाडीजवळ आला आणि त्याने गाडी स्टार्ट केली. त्याचा प्रवास सुरु झाला...40 kmचे ते अंतर त्याने एक वेगळ्याच विचारांमध्ये पार करायला सुरुवात केली. कसेही करून त्याला लवकरात लवकर घरी पोहचायचे होते, थोडी रफ गाडी चालवत तो आज निघाला.

घरी पोहताच क्षणीच त्याने खानावळीत फोन केला " काकू खूप भूक लागली आहे, लवकरात लवकर थालीपीठ, घावन आणि पोहे पाठवा."
लगेच तो बाथरूममध्ये शिरला आणि 4 बादल्या पाणी अंगावर घेऊन त्याने स्वच्छ अंघोळ केली. थोडं फ्रेश वाटलं तसे लगेच चहा करून घेतला आणि सोबत प्लेट मध्ये त्याची आवडती पिळाची खारी घेतली.
तेवढ्यात त्याने काकुंकडून मागवलेला ब्रेकफास्ट आला. तो खाण्यावर एकदम तुटून पडला, समोर पोहे, चटणी- घावन आणि थालीपीठ दही होते.
ते पोटात गेल्यावर त्याला जरा बरे वाटले, बाहेर पेशंट आलेत हे त्याच्या लक्षात आले तसे तो क्लिनिक कडे गेला आणि पेशंट तपासायला लागला.

आज तो एकटाच असल्याने त्यालाच सगळे करावे लागणार होते त्यामुळे तो पूर्णपणे फोकस राहिला. आपण एक डॉक्टर आहोत आणि ही आपली सगळ्यात महत्त्वाची जवाबदारी आहे की पेशंट ला बरे करणे ना की स्वतः रुग्ण होणे हे त्याने स्वतःला खडसावून सांगितले होते.

नसेल यायचं अमृता ला तर नको येऊ देत, नसेल बोलायचं तर नको बोलू देत, माझं काम मी करत राहणार. माझं कर्तव्य मला पार पडायचे आहे... मी एक डॉक्टर आहे हा ठाम विचार त्याने मनाशी केला आणि त्याच्या कामाला लागला.

पेशंट येत होते... तो त्यांना तपासुन औषधे देत होता, तेवढ्यात त्याचे लक्ष गेले ते आत येणाऱ्या पेशन्ट कडे जो अमृताच्या गावाचा होता. मागल्या वेळी जेव्हा तो आला होता तेव्हा अमृता ने त्याला ओळखले होते त्यामुळे तो त्याच्या चांगला लक्षात राहीला होता.
अश्विन ने त्याला तपासले आणि औषध दिले तसा तो म्हणाला, " डॉक्टर साहेब आज अमृता मॅडम दिसत नाहीत कोठे? आज आल्या नाहीत का त्या?"
"हम्म" इतकेच तो बोलला.
"काल मी पाहिले की तुम्ही गावात आले होते. मला हे पण माहीत आहे की तुम्ही का तिथे आला होतात."
अश्विन ने त्याच्याकडे डोळे रोखून बघितले.
"तुम्ही अमृता मॅडम ला शोधायला आला होतात ना?"
तो काहीच न बोलता शांत बसला.
"माहिती आहे का डॉक्टर, त्या कुठे आहेत ते...?"
" मला नाही माहिती म्हणून तर काल दिवसभर तिथेच थांबलेलो ना मी.....का? तुम्हाला माहिती आहे का की ती कुठे गेली आहे ती?"
"नाही, पण आमच्या गावात नाही आहे हे नक्की."
क्षणभर अश्विन तसाच शांत राहिला...
"डॉक्टर, मला काही कळले तर मी तुम्हाला कळवतो.."
इतके बोलून तो पेशंट निघून गेला.....

तो गेल्यावर याच्या मनात पुन्हा तिचे विचार येऊ लागले. तो तिच्या असण्याचा अनुभव, तिचा स्पर्श, तिचा वावर ती असती तर आत्ता काय केले असते, तिचा नीटनेटके पणा... तिच्या आठवणी! सगळे पुन्हा त्याला आठवायला लागले.
पुढच्या पेशन्ट ला तपासायला लागला होता पण मनात अमृता चे विचार होते. त्याला माहित होते की हे खूप अवघड जाणार आहे कारण तो तिच्यात गुंतला होता.
त्याचे चित्त पुन्हा तिच्याकडे वळले होते, काय झालं असेल? कुठे असेल ती?
तिला तर माझा फोन नंबर माहीत आहे तिने का कॉल केला नसेल?
तिच्याकडे फोन नाही त्यामुळे मला कॉल करणे शक्य नाही हे तर तिला पण माहिती आहे पण ती तर मला संपर्क करू शकते. अशी जगाच्या पाठीवर ती कुठे गेली असेल की तिने कळवले सुद्धा नाही? काही वेडेवाकडे झाले असेल का? की आपणच पोलिसांना सांगावे? काही ओळख काढावी का? ह्या सगळ्या विचारात च
दुपार झाली...जेवणाच्या वेळी डबा आला होता....पण सकाळी हेवी खाल्ले होते त्यामुळे त्याला भूक नव्हती. नंतर जेवावे असे मनात आले पण लगेच त्याला तिचे बोलणे आठवले," डॉक्टर आपण जेवायची वेळ ही पाळलीच पाहिजे, तरच आपण पेशंट ना सांगू शकतो ना!."

मुकाटपणे त्याने जेवायचं समोर घेतले, पण घास काही घशाखाली जाईना... हृदय पिळवटून त्याला अमृता ची आठवण येत होती, तीच आजूबाजूला असणे हेच त्याला खूप प्रेरणादायी होते आणि आता ती नाही आहे हेच खूप जड जात होते.
ती येणारच नाही हा विचार त्याला खूप त्रास देत होता आणि त्या विचारासरशी तो आतून तुटत चालला होता.
तो यातून सावरेन की नाही याची भिती त्याला वाटू लागली आणि या विचारासरशी त्याला या गोष्टीची जाणीव झाली की आपण खूप जास्ती इनव्हॉल्व होतो आहे....आपण थांबले पाहिजे!

जेवण झाले आणि त्याने पुन्हा पेशन्ट तपासायला सुरवात केली...आज नेमके तिच्या गावचे पेशन्ट जास्ती दिसत होते. सगळे त्याच्याकडे बघत होते पण बोलत असे काहीच नव्हते. मागच्यावेळी हसणारे, बोलणारे लोक एकदम शांत होते. त्याचा शांतपणा त्याला त्रास देत होता, राहून राहून आपले काही चुकले हाच विचार त्याच्या मनात येत होता. इतके असे काय घडले आहे की ही लोक अशी वागत आहेत? नक्की काय झाले?
एक क्षण त्याला दुर्लक्षित केल्याचे फिलिंग आले... प्रकर्षाने त्याला वाटत होते की आपण प्रत्येकाला हलवून विचारावे की नक्की काय झाले आहे?
शेवटी प्रॅक्टिकली त्याने ठरवले की आपण पण दुर्लक्ष करावे... काही विचारायला नकोच. होईल सगळे नॉर्मल, एक सवयच असते जी सगळ्यात जास्ती त्रास देते. आज तिची असण्याची सवय आहे आता तिची नसण्याची पण सवय होईल...मी डॉक्टर आहे आणि माझे कर्तव्य महत्वाचे आहे जे मला केलेच पाहिजे असे म्हणून तो पुन्हा कामला लागला.

काल क्लिनिक बंद असल्याने आज जास्ती लोक आली होती,पेशन्ट संपायला बराच उशीर झाला. रात्री आपण जेवायचे नाही असे त्याने ठरवले त्यामुळे खानावळीकडे न जाता तो घरातच थांबला.

शरीर आणि मन याने दमलेला तो खुर्चीत रेलून बसला होता, डोळे मिटून स्वतःला शांत करायचा प्रयत्न करीत होता तेवढ्यात त्याचा फोन वाजला.

"डॉक्टर साहेब"
"कोण?"
"मी मनोहर बोलतोय"
तसा तो एकदम ताठ झाला,"मनोहर,? काय झाले?"
"काल तुम्ही आलात पण मी नीट बोललो नाही. तुम्हाला एक सांगायचे राहिले"
"काय" थोडं अधीर होत त्याने विचारले.
"जाताना माझी ताई माझ्याशी आणि बाबांशी एक शब्द पण नाही बोलली...आम्हाला काही कळण्याच्या आधीच...चेहऱ्यावर तिच्या खुप करारी भाव होते आणि ती एकटीच निघाली होती...पण आजीने ऐकले नाही आणि त्यामुळे ती आजी बरोबर निघून गेली..."

तो एकदम उभा राहिला" काय सांगतोस? कुठे आहे ती मनोहर? कुठे गेली आहे?"

"साहेब मला खरच माहीत नाही."

"कोणाला माहीत आहे तिच्याबद्दल?"
"बहुतेक बाबांना माहिती आहे"
"मग याबद्दल तुझ्याशी ते का बोलले नाहीत ?"

"मला माहित नाही, आणि तिने जाताना आमच्या आजूबाजूच्या सगळ्या लोकांना सांगून ठेवले आहे की तिच्या जाण्याबद्दल कोणाशीही एक शब्द बोलायचा नाही...नाहीतर ती परत कधी घरी येणार नाही"

"पण एवढे काय झाले म्हणून ती असे वागली? कसला एवढा राग? कसला एवढा करारीपणा?"
"डॉक्टर साहेब मला नाही माहिती... मला वाटले हे सगळे तुम्हाला सांगावे म्हणून मी फोन केला..." एवढे बोलून त्याने फोन ठेऊन दिला.

आता त्याला पुन्हा सगळं असह्य वाटायला लागलं? नक्की काय झाले असेल? कुठे असेल ती?
मी कसे तिला कॉन्टॅक्ट करू? विचारांनी त्याचे मन बेचैन झाले तसा तो समुद्राकडे निघाला.
याच समुद्राचे तीन दिवसात तीन रूप त्याने बघितले होते.
एक प्रेमळ आनंदी, तर दुसरे भकास आणि आज होते त्रासदायक!
आज समुद्रावर जाण्याची आज त्याची लागोपाठ तिसरी रात्र होती.
तिथल्या थंड वाळूत तो बसला आणि जोरात ओरडला... "अमृता..." .....
क्षणभर वाट पाहत परत त्याने समुद्राकडे बघत आरोळी ठोकली...
"अमृ..."
तिच्या आठवणीने त्याचे ह्रदय पिळवटून निघाले...त्याचे न ऐकता डोळ्यातील पाण्याने बाहेर येण्याची हिम्मत केलीच...मग त्यानेही अडवले नाही त्या पाण्याला...
पडू दिले तसेच बाहेर बऱ्याच वेळ ...थोडयावेळाने डोळ्यातील पाणी समुद्राच्या पाण्यात मिसळले गेले आणि त्यालाच कळेना जास्त खारटपणा कुठल्या पाण्याला आहे...

समोरच्या अथांग पसरलेल्या समुद्राला पहात तो म्हणाला, "आज माझ्या आठवणींचा समुद्र तुझ्यापेक्षा जास्त मोठा आहे...पण माझ्या त्रासाची आजची शेवटची रात्र...गेल्या 3 रात्री मी तुला दिल्या...कारण माझ्या मनातील \"अमृत\" बाहेर पडायला वेळ लागत होता....पण आता या अश्विन कडे अमृताचा प्याला नाही आहे....आहे ती जीवनातील खारट चव...जी मागच्या 3 दिवसात माझ्यात भिनली आहे...उद्यापासून या अश्विनच्या मनात भावनांना जागा नाही...आता डॉक्टर अश्विनचे फुल्ली प्रोफेशनल रूप सगळ्यांना दिसेल...फक्त काम...अफाट काम...नुसते काम... सगळ्यांना बरे करणे...या पंचक्रोशीतील सगळ्यात मोठा डॉक्टर होणे...येतोय मी ..माझ्या नवीन रुपात... दिसेल सगळ्यांना.... कोण आहे मी ते!" असे म्हणून तो घराकडे चालायला निघाला.

क्रमशः

©®अमित मेढेकर