ओढ:- भाग 5

Ashwin And Amruta Felt A Soulful Bonding Between Each Other

ओढ:- भाग 5


©®अमित मेढेकर

एका हाताने तिचा हात धरून दुसऱ्या हाताने स्टिअरिंग आणि गियर असे दोन्ही मॅनेज करत अश्विन ने अमृता सोबतचा तो 40 km चा प्रवास त्या अभूतपूर्व साहसाने पूर्ण केला. गियर बदलताना सुद्धा तो स्पीड कमी करून उजव्या हातानेच गियर बदलायचा पण तिचा हात काही सोडायचा नाही..ती थक्क होऊन त्याचे ड्रायव्हिंग कौशल्य पाहत होती आणि तो तिला पाहत होता...आजच्या दिवसाची ही नवीन सकाळ सगळ्याच अर्थाने अपूर्व भासत होती.

ते क्लिनिक ला पोहचले पण त्या दोघांचीही मने आज वेगळ्या पातळीवर होते. दोघांनाही काम असले तरी मन मात्र एकमेकांच्या अवतीभोवती पिंगा घालत होते. त्याच्या मनातील प्रेम भावना त्याने बोलून दाखवली होती तर तिच्या मनातील ईच्छा त्याला कळल्या होत्या, त्यामुळे वागण्यामध्ये सहज सुलभता जाणवत होती. ती सुध्दा आज स्वतःच्या घरी आल्यासारखे वागत होती. तिच्या वागण्यातून प्रत्येक क्षणाला हे जाणवत होते की आपल्याला पुढे याच घरी येऊन संसार थाटायचा आहे.

जसे पेशंट यायला सुरवात झाली तसे ते आज दोघे एकमेकांशी नजरेने सुद्धा बोलत होती. एकमेकांचा होणारा तो हलकासा स्पर्श, तिच्याशी काही सांगताना, तिच्याशी बोलताना तिच्याकडे एकटक बघत राहणे, इशाऱ्याने काही बोलणे, तिने काही विचारले की खुर्ची वळवून तिला डिटेल मध्ये सांगणे हे असे अश्विनचे सुरू होते. तिच्यासोबतीचा प्रत्येक क्षण तो तिला डोळ्यात साठवून घालवत होता. आज त्याने तिला बाहेर जाऊच दिले नाही.. काम करणाऱ्या बाई कडूनच दोघांना चहा मागवला तर खानावळीत फोन करून जेवण तिथेच मागवले..तिला घरकामासाठी सुद्धा उठवले नाही.
तिला समोर बसवून तो फक्त प्रत्येक क्षण एन्जॉय करत होता....अर्थात त्या अश्या एक जागी बसण्याने ती थोडी अवघडली होती. पण काही झाले तरी तो आज ऐकणार नव्हता.. आज त्याची ईच्छा होती की तिने घरीच जाऊ नये इथेच थांबावे.
अधून मधून त्याने तिला विचारले सुद्धा "अमृता ततुझे बाबा खरच येणार आहेत का? आणि तुला जावेच लागेल का?"
काहीही न बोलता ती यावर फक्त हसत होती.

"असे काहीतरी कर ना की आज गाडी सुरूच होणार नाही आणि ते आजच्या ऐवजी उद्या येतील."
त्याच्या या बोलण्यावर आधीच मोठे डोळेअसणारी ती अजून डोळे मोठे करून बघायला लागली आणि तिच्या या रिऍकशन वर त्याला हसू आवरेना.

दोघांचे इशारे जर कोणी निरखून पाहिले असते तर पक्के समजले असते इतके ते तीव्र होते. अर्थात कोणाचे असे लक्ष नव्हते त्यामुळे गोष्टी तश्याच चालू होत्या...
दुपारी जेवताना त्याने मुद्दाम विचारले " काय मॅडम, मग नक्की आहे ना तुमचं?"
"कशाबद्दल"
"हेच जे मला सांगितले काल संध्याकाळी!"
"मी काय सांगितले ? मी तर काहीच नाही सांगितले."
"हो का? बरं, मग तो दुसरा डॉक्टर चांगला असेल तर तसा नवराही चालेल ना तुला?"

तसे ती एकदम उभी राहून थोडी मोठ्याने म्हणाली,
" डॉक्टर ..."
"अग हो...डॉक्टर च म्हणतोय मी."
ती पटकन उठली आणि त्याच्या जवळ जाऊन त्याच्या तोंडावर हात ठेवून म्हणाली,"प्लिज आशु, असे काहीच बोलू नकोस."
त्याने हळूच तिचा हात हाती घेतला आणि म्हणाला " मग नक्की आहे का नाही?"
तिने खाली बघत मान फक्त हलवली.
तिच्या प्रेमाचे ते वेगवेगळे विभोर रूप दाखवत होती आणि त्याला आतून उल्हासित करत होती. त्याला प्रकर्ष पणे जाणवत होते की कसही झालं आणि काही झाले तरी लवकरात लवकर अमृताला या घरी आणायचे.

दुपारचे जेवण झाले आणि आज कधी नव्हे ती त्याला झोप यायला लागली. रात्री त्याचे जागरण झालेच होते, तो म्हणाला," आज माझ्या ऐवजी तूच तपास ना पेशंट, अमृ...तसेही तुला बरेच कळते आता औषधामधील"
"नाही आशु, पेशंट तुला भेटायला येतात..तुझ्या उपचारावर त्यांचा विश्वास आहे...तुलाच तपासायला लागतील.."
तिचा ठामपणा त्याला आवडला...अर्थातच तोच सगळे पेशंट तपासणार होता...
एक एक पेशंट तपासत जवळजवळ 4.30 झाले आणि ती मुद्दाम चहा करायला उठली...
ती उठली तसे तो काही बोलला नाही....5 मिनिटातच तिच्या हातात चहाचा कप होता...
तिने 10 मिनिटे पेशंट बाहेर थांबवले आणि त्याला चहा दिला तसे त्याने तिचा हात हातात घेतला. आज दिवसभरात जेव्हा जेव्हा चान्स मिळाला तेव्हा तो तिचा हात हातात घेत होता.
हात हातात धरत तो म्हणाला," तू आज जाऊच नको ना अमृ, इथेच थांब."
"आणि घरी काय सांगू?"
"त्यात काय...तुझे बाबा आले की त्यांना पण इथेच थांबवून घेऊ" सहजतेने तो म्हणाला.
"आणि ते इथे असल्यावर काय?"
"मला नको वाटतंय तू इथून जाणे, असे वाटते तू इथेच थांबावे"
"आणि?"
"मी तुला असं पाहत राहावं!"
"आणि?"
" हा वेळ इथेच थांबावा"
"आणि?"
"एकमेकांच्या सहवासात प्रत्येक क्षण जावा..."
"आणि?"
"आणि काय? खूप सारे पेशंट यावेत आणि तुला नि मला अजिबात वेळ नाही मिळावा एकमेकांसाठी" सात्विक रागाने चिडून तो म्हणाला.
त्याच्या बोलण्यावर ती जोरजोराने हसायला लागली आणि उठायला गेली तसे त्याने हातावरील पकड घट्ट केली आणि तिला जवळ ओढले.
ती त्याच्या अगदीच जवळ होती. दोघेही एकमेकांच्या डोळ्यात न बोलता फक्त पाहत होते...
काही क्षण असेच एकमेकांच्या सानिध्यात गेले आणि अचानक तिला बाहेरून बाबांचा आवाज आला "अमृता...अमृता! आहेस का? आलोय बघ मी"
तशी ती एकदम सावरून बाजूला झाली आणि दारावर जाऊन बाबांना आत क्लिनिक मध्ये घेत म्हणाली...
"बाबा आलात, या बसा ना".
अश्विन ने ही पटकन खुर्ची ची दिशा बदलत त्यांचे स्वागत केले आणि गाडी बद्दल चौकशी केली.
"झाली का गाडी दुरुस्त..?"
"हो डॉक्टर, झाले काम, फ्यूएल पाईपच्या इथे काही प्रॉब्लेम झाला होता त्यामुळे सप्लाय होत नव्हता, ते नीट करून घेतले." ते म्हणाले.
"तुम्हाला उगीच त्रास झाला".
"त्रास कसला? उलट तुम्ही काल आमच्या गावात आलात आणि त्यामुळे आमच्याकडे लोकांना फार छान वाटले."
अश्विन फक्त हसला.
अमृताने थोडा चहा वडिलांना पण दिला,चहा घेऊन झाला तसे ते म्हणाले "चला डॉक्टर साहेब आम्ही निघतो मग आता."
वडिलांच्या पाठोपाठ ती सुद्धा निघाली पण जाताना सारखी मागे वळून बघत होती.
तो सुद्धा तिच्या मागे बघण्याकडे पाहत बाहेर उभा होता अगदी ती जीप जाऊन दिसेनाशी होईस्तोवर!

तो आत आला आणि शक्तिपात झाल्यासारखा फसदिशी खुर्चीत बसला.
यंत्रवत झालेला तो पेशंट तपासत होता पण मन सारख अमृताच्या सहवासाची आठवण काढत होत.
ती दिसायला निर्विवाद सुंदर होतीच. गोरा रंग, मोठे डोळे, लांब केस कोणीही प्रेमात पडेल अशीच.
पण त्याला फक्त हेच आवडलं नव्हते तर तिचे वागणे, बोलणे, समजून घेणे, तिचा स्वभाव आणि तिचे विचार हे त्याला आकर्षित करत होते.
ती आजूबाजूला असली की तो खुलायचा,त्याला जाणीव होत असे की तो कोणीतरी खास आहे.
इतके दिवस डाफटींग जगताना आपल्याला काय हवे हेच त्याला कळत नव्हते, पण गेल्या 3 महिन्यात सगळेच बदलून गेले होते.
आयुष्याचा नवीन पैलू त्याला खुणावत होता. एक स्त्री ही घरात आणि आयुष्यात कशी जादू करू शकते हे त्याला जाणवायला लागले होते.
सेवा हेच व्रत घेतलेला तो कधी लग्न हा विषय काढेल का हे त्याला सुदधा स्वतःला माहीत नव्हते.
अमृताच्या येण्याने, तिच्या सहवासाने तो पूर्ण बदलला होता. आता कधी अमृता या घरी येते हा एकच ध्यास त्याला लागला होता.

सगळे आटोपले तसा तो खानावळीकडे निघाला. त्याला जेवायला वाढून काकू स्वतः त्याच्या समोर बसून काय हवे नको ते पाहत होत्या. "काल आला नाहीत डॉक्टर साहेब तुम्ही?"
"काल गाडी बंद पडली होती त्यामुळे गावातच राहिलो" तो म्हणाला.
"कुठल्या गावात..?"
"अमृताच्या.."
"बरं, तुम्हाला दोघांना आज डबा कमी नाही ना पडला डॉक्टर?"
"नाही हो काकू, सगळं व्यवस्थित होतं".
" सावकाश जेवा हो" म्हणत त्यांनी त्याला सोबत केली.

तिथून निघाला तसं त्याला प्रकर्षाने जाणवले की फक्त आपल्याकडे मोबाईल असून उपयोग नाही तर अमृता कडे सुद्धा असायला हवा. त्याने मनाशी ठरवले की उद्या अमृता ला घेऊन जावे आणि तिला नवीन मोबाईल आणि सिम कार्ड घेऊन द्यावे.
या स्वर्गीय कोकणामध्ये त्याला कोकणातील सुवर्णकन्या मिळाली आहे हा त्याचा विश्वास ठाम होता. तो जसा घरी पोहचला तसा त्याचा फोन वाजला. फोनवर मनोहर होता, " डॉक्टर साहेब नमस्ते मी मनोहर बोलतोय".
त्याचा आवाज ऐकल्यावर तो एकदम खुश झाला म्हणाला " बोल मनोहर, हा नंबर कोणाचाआहे?"
"हा माझा नाही आहे, त्या बाजूच्या काकांचा आहे जे तुमच्या बाजूला काल झोपले होते ना त्यांचा"
"बरं बरं! बोल, ताई ठीक आहे ना?"
"मी तुम्हाला हे सांगायला फोन केला आहे की उद्यापासून ताई क्लिनिक ला येणार नाही आहे"
"काय?" चमकून अश्विन म्हणाला.
तसा मनोहर पुन्हा तेच बोलला आणि त्याने फोन ठेऊन दिला.
शॉक झालेला अश्विन पुन्हा फोन लावतो तर मोबाईल स्विच ऑफ आला.

जड मनाने आणि जड पावलाने अश्विन घरात शिरला,क्षणात त्याला कळेना की असे काय असे झाले. पण का? त्याचे मन साखे विचारत होते.
काहीही न काही करता दार तसेच सताड उघडे ठेवून तो लाईट बंद न करता तसाच खुर्चीत बसून राहिला.
कधी एकदा सकाळ होते आणि आपण तिच्या गावी जाऊन तिला भेटतो असे त्याला झाले होते.
"का?" हा प्रश्न त्याला त्या अंधाऱ्या रात्रीत आणि उघड्या डोळ्याने सतत भेडसावत होता!

क्रमशः

©®अमित मेढेकर