ओढ भाग :- 1

Story Of A Doctor And A Village Girl


ओढ:- भाग 1

©® अमित मेढेकर

अश्विन एकटाच समुद्रकिनारी शांतपणे चालत होता. मध्येच त्याची नजर त्या फेसळणाऱ्या लाटांकडे जायची आणि त्याच्या मनातील सुरू असलेल्या त्या तेवढ्याच खोल वादळामुळे त्याचे मन हेलावून जायचे.
जसा वरून शांत दिसणारा समुद्र हा कायम एक वादळ सोबत घेऊन पसरलेला असतो त्याच प्रमाणे आज अश्विन शांतपणे चालत असला तरी प्रचंड खळबळ मनात होती आणि विचारांची उलथापालथ सुरू होती.
"का तिने असे केले?" "माझे काय चुकले?"
"कुठे असेल ती?" जशी अचानक आली तशी निघून पण गेली, मग का माझ्या आयुष्यात आली?"
असे अनेक विचार त्याला भेडसावत होते.

त्या ओलसर, मऊ वाळूत चालत असताना पायाच्या तळव्यांना आल्हाददायक वाटत होते. निदान ते तरी सुखावत होते पण अचानक पायाला काहीतरी टोचले,एक अष्पस्ट कळ त्याच्या चेहऱ्यावरून क्षणात आली आणि निघून गेली. वाकून पाहिले तर एक अर्धवट तुटलेला शंख आणि त्याची बाजूची आलेली टोकदार कड त्याला टोचली होती. पायातून रक्ताचे थेंब पटकन बाहेर आले तसे तो कडवट हसला आणि म्हणाला " मनातून वाहणारे रक्त दिसत नाही कुणाला आणि नाही दिसत ती झालेली जखम..दिसतात सगळ्या जखमा शारीरिक फक्त!"

थोडासा लंगडत तो बाजूला येऊन वाळूत बसला आणि त्या अथांग पसरलेल्या समुद्राच्या रंगाच्या दिसणाऱ्या वेगवेगळ्या छटा निरखीत होता.
"कसे ना, आपल्या आयुष्यात सुद्धा अश्याच सुखदुःखाच्या लाटा पसरल्या आहेत.. आपल्या व्यापामध्ये असेच वेगवेगळे लोक येतात.. त्यांचे असणे, वागणे, त्यांचे अनुभव हे असेच वेगळ्या रंगसंगतीच्या छटा आणि लाटा निर्माण करतात" मनाशीच तो बोलत होता.

हीच ती जागा जिथे मी माझ्या आयुष्यात रंग भरण्यासाठी आलो, अगदी अचानक! मला माहिती पण नव्हते की असे काही घडेल आणि ते घडले. एक रुपेरी स्वप्न! हो स्वप्नच ते जे भंगले. खिन्न हसला आणि त्याने अलगद डोळे मिटले.

"आशु, ये ना रे असे काय करतो" तो आवाज त्याला ऐकायला आला, धडपडत त्याने आजूबाजूला पाहिले पण नाही ती नाहीच येणार क्षणात मन म्हणाले.

अश्विन एक समाजसेवक पण व्यवसायाने डॉक्टर. MBBS पूर्ण केले अगदी मन लावून अभ्यास केला, कधीही कोणाच्या सोबतीने कुठल्या फंदात पडला नाही की मित्र मैत्रिणी मध्ये अडकला नाही. परिस्थिती ची जाणीव पूर्णपणे त्याला असल्याने आपले स्वप्न हे एकच आणि तेच एक ध्येय म्हणत त्याने टॉप करत त्याचे वैद्यकीय शिक्षण पूर्ण केले.
इंटर्नशिप ला असताना अनेक मोठ्या हॉस्पिटलमध्ये काम करायच्या संधी त्याला येत होत्या पण त्याचे ते ध्येय नव्हतेच. त्याने MD केले. त्याला कार्डिओलॉजी मध्ये इंटरेस्ट होता...एक यशस्वी कार्डिओलॉजिस्ट म्हणून त्याला आयुष्य घडवायचे होते. अर्थात त्याला पेश्याने डॉक्टर व्हायचे होते असे नाही. स्वतःला लोकांच्या भल्यासाठी जगायचे ही जी शपथ त्याने घेतली होती ती त्याला पूर्ण करायची होती.
तो एक अनाथ मुलगा होता, त्याला आपले आई, वडील फॅमिली याबद्दल काहीच माहीत नव्हते.
जेव्हापासून त्याला आठवत होते तेव्हापासून त्याला ऍना सिस्टर आठवत होती जिने त्याला बोटाला धरून चालायला शिकवले.
ऍना सिस्टर ने त्यांच्या मिशनरी ट्रस्ट तर्फे शिक्षणाची व्यवस्था केली, मुळातच हुशार असलेल्याअश्विन ला फारसे काही करावे लागले नाही. प्रगती होत गेली. त्याचा स्पार्क त्याला स्कॉलरशिप मिळवून देत होता आणि तो पुढे जात होता.
त्याच्या हातावर अश्विन हे नाव कोणीतरी लिहिले होते हे सिस्टर सांगायची...पण कोणी ते त्यांना पण माहीत नव्हते.

काळ पुढे जात होता, आज अश्विन एक प्रगल्भ डॉक्टर होता ज्याने प्राविण्य मिळवून स्वतःच स्थान निर्माण केले होते.

सामाजिक व्यवस्था आणि लोक कल्याण ह्या विचाराने भारावलेला अश्विन ने कोकण ही आपली कर्मभूमी ठरवत तिथे आपले कार्य सुरू केले. सोमवार ते शुक्रवार तो आपला दवाखाना चालवत असे आणि शनिवार रविवार तो आजूबाजूच्या छोट्या गावांमध्ये जाऊन गोरगरिबांना मोफत उपचार करत असे.

कोकणात अनेक गावांत अश्विन जाऊन गोरगरिबांवर उपचार करत असे. खूप कमी दिवसात त्याने उत्तम नाव कमावले. त्याच्या हाताच्या गुणांने त्याचे नाव सर्वदूर पसरले. रात्री बेरात्री सुद्धा लोक त्याच्याकडे उपचाराला यायचे.

ती रात्र त्याला आठवली....कोकणात पाऊस भरपूर. त्या रात्री पावसाचा जोर खूपच जास्त होता..या अंधाऱ्या रात्री पावसातच एक गाडी अश्विनच्या घराबाहेर थांबली. रात्रीचे 11 वाजले होते...अश्विन जागाच होता...घराच्या ओसरीवर लेंगा आणि बनियान वर बसून पुस्तक वाचत होता.
गाडीतून एक काळी छत्री बाहेर आली आणि मग एक माणूस त्या छत्रीच्या आत आला. पटकन अश्विन पाशी येऊन त्याने विचारले, "डॉक्टर आहेत का झोपले?"
"आहेत- जागे आहेत" अश्विन हसून म्हणाला.
तो माणूस धावत पळत गाडीपाशी गेला आणि त्याने हात धरून कोणाला तरी बाहेर काढले.
अश्विन ने पाहिले तर एक 20-22 वर्षाची मुलगी त्या माणसाचा हात धरून उतरली. चेहऱ्यावर वेदना आणि चालताना थोडासा त्रास तिला होत होता. अंगावर शाल पांघरलेली ती पावसात चालत चालत आत क्लिनिक मध्ये आली.
अश्विन तोपर्यंत शर्ट घालून आणि स्टेटोस्कोप घालून तयार झाला होता...त्याला पाहून तो माणूस म्हणाला,
" डॉक्टर... तुम्ही?....?
अश्विन हसला आणि काही न बोलता त्याने त्या मुलीला तिथे बेडवर चेक करण्यासाठी झोपायला सांगितले..

"ही माझी मुलगी....काय झालंय काही कळत नाही डॉक्टर हिला...पोट दुखत आहे म्हणून, संध्याकाळी एकदम जमिनीवर गडबडा लोळायला लागली...नंतर शुद्ध हरपली...आता गरम गरम शेकले आहे पोटाला...ओव्यांचा अर्क पण दिला आहे...पण अंग गरम आहे..काही कळत नाही...हिची आजी घरी माझ्या लहान मुलाबरोबर थांबली आहे..तुमचे नाव ऐकून 40 किमीवरून आलो आहे..हिला बरे करा डॉक्टर..." तो माणूस हात जोडत म्हणाला...

अश्विन ने काही न बोलता तिला चेक करायला सुरुवात केली...फूड पॉयझनिंग आणि त्यामुळे इन्फेक्शन असे दिसत होते...इन्फेक्शन होते म्हणून ताप ही होता..त्याने लगेच जवळचे इंजेक्शन दिले...काही गोळ्या आपल्या जवळच्या दिल्या आणि पुढचे 3 दिवस गोळ्या घ्यायला सांगितले...

त्या माणसाने परत विचारले, " आता बरे वाटेल ना..."
"निश्चिन्त राहा..."
अश्विन ला नमस्कार करून तो माणूस त्या मुलीला घेऊन गाडीकडे निघाला पण पावसाचा जोर खूप वाढला होता. या पावसात गाडी चालवता येणे अशक्य होते..ते दोघे तसेच ओसरीवर थांबले..
अश्विन ला कळले की या पावसात 40 किमी जाणे योग्य नाही...तो त्या माणसाला म्हणाला, "आजची रात्र तुम्ही दोघे इथेच राहा...सकाळी पाऊस थांबला की जा..."

आपल्या मुलीकडे आणि नंतर पावसाकडे पाहात त्याने मान डोलावली...
अश्विन ने दाखविलेल्या रूम मध्ये त्याने आपल्या मुलीला झोपवले, आणि तो स्वतः बाहेरच्या हॉल मध्ये येऊन थांबला..
अश्विनच्या कॅलक्युलेशन प्रमाणे ती पुढच्या 10 मिनिटात झोपणार होती...
त्याने त्या माणसाला एक चादर दिली आणि तो स्वतः हॉल मधल्या खुर्चीवर डोके ठेऊन बसला...

"साहेब, तुमचे खूप उपकार बघा आमच्यावर.."
"अहो त्यात काय...माणुसकी आहे ही..."

"डॉक्टर साहेब 20 वर्षांपूर्वी हिची आई गेली...हिच्याहून लहान भाऊ आहे त्याला जन्म दिला आणि काही दिवसांनी गेली...तिचे पण पोट फार दुखायचे..मी म्हणायचो बाळंतपणानंतर दुखत असेल... एक दिवशी खूप गडबडा लोळली जमिनीवर... आणि त्यानंतर गेली...कायमची....! आज हिला असे लोळताना पाहिले आणि शेजारच्या पाटलाकडून गाडी घेतली आणि तसाच धावत आलो..मला वाटले हिला काही झाले तर..." असे म्हणून तो रडायला लागला...
अश्विन ला त्याच्या भावना कळल्या..त्याने फक्त काळजी करू नका असे सांगितले...

रात्री दोघेही आपापल्या खुर्चीवर झोपले...काहीवेळाने त्या मुलीला जाग आली...ती उठून बाहेर हॉल मध्ये आली तर तिला डॉक्टर आणि तिचे वडील खुर्च्यांवर झोपलेले दिसले...ती तिच्या वडिलांपाशी आली...
"बाबा....उठा बाबा..."
तिच्या आवाजाने अश्विन पहिले उठला...त्याने बाजूचा दिवा लावला आणि तिच्याकडे पाहिले...
अप्रतिम! केवळ एकच शब्द तिला सूट होत होता...
जवळजवळ पाच सहा वर्षांनी ती त्याच्यापेक्षा लहान होती..
उजळ कांती, उभा चेहरा, लांब केस, मोठे डोळे आणि सरळ रेषेतील नाक, आणि एक रेषेतील दात...इतकी मोहक मुलगी त्याने पहिली नव्हती...तो स्तिमित होऊन तिच्याकडे पहात होता...
मगाशी डॉक्टर म्हणून तिला तपासताना त्याचे पूर्ण लक्ष तिला बरे करण्याकडे होते..पण आत्ता एका निवांत क्षणी तिला पाहात असताना तो पूर्णपणे मंत्रमुग्ध झाला होता.

"बाबा....." तिचे उठवणे चालूच होते.
तो माणूस धाडकन उठला..
"काय झाले...काय झाले? पोट दुखत आहे का?"
"नाही हो बाबा ...आता बरे वाटत आहे..." ती हसत म्हणाली...
"मग?"
"भूक लागली आहे खूप.." तिची एक्सप्रेशन्स फारच लक्षणीय होती...
"अगं, जरा वेळ काळ बघ की..आपण आपल्या घरात नाही आहोत...हे डॉक्टरांचे घर आहे.." जरा दटावत तिला म्हणाले..
"अहो बाबा पण...."

अश्विन ते पाहत आणि ऐकत होता....तोच म्हणाला, "भूक लागली म्हणजे बरे झाली ती...मी बघतो स्वयंपाक घरात काही मिळते आहे का?"
तो स्वयंपाक घरात गेला तसे त्याच्या मागे ती पण आली...
"डॉक्टर साहेब, मी काही मदत करू का?"
"अगं, नाही नाही...मी बघतो, तू बस बाहेर...तुला आत्ता कुठे बरे वाटत आहे..मी आणतो काय आहे ते..."
त्याच्या या बोलण्याने सुद्धा ती तिथेच घुटमळत राहिली...अश्विनला कोणी स्त्री त्याच्या किचन मध्ये येण्याची पहिलीच वेळ होती..तिच्या अस्तित्वाने तो मात्र गोंधळला..
घरात टोस्ट होते ते त्याने प्लेट मध्ये काढले..काही केळी होती ती पण काढली...
"एवढेच आहे आत्ता...आणि तुला सुद्धा जपून खाल्ले पाहिजे..."
तिने मान डोलावली.
ते अन्न घेऊन तो बाहेर हॉल मध्ये आला...हॉल मध्ये स्टूल वर त्याने ठेवले आणि तिला म्हणाला, "हळूहळू खा..."
ती खाण्यावर तुटून पडली आणि अश्विन ला गंम्मत वाटली...
मुलगी अश्या पद्धतीने तो प्रथमच पहात होता..आणि खरं सांगायचं तर त्याला ती मुलगी आवडली होती...कुठून आलेली, नाव पण माहिती नसलेली ती, तिच्या अल्लड स्वभावामुळे त्याला लोभस वाटली होती.
तिला आजूबाजूचे काही भान नव्हते ती फक्त खात होती आणि अश्विन एका वेगळ्याच नवीन अशा भावनेने तिच्याकडे बघत होता.
"अग दमाने की जरा, कधी मिळालं नाही अशी काय करते" तिच्या वागण्याने ओशाळून तिचा बाबा बोलला. तिने फक्त एक नजर त्याच्याकडे पाहिले आणि मग अश्विन कडे, थोडी लाजेने तिने मान खाली केली आणि रिकामी प्लेट ठेवायला ती उठली तसे अश्विन ने तिच्यासमोर पाण्याचा ग्लास धरला.
पहाट व्हायला आली होती आणि पाऊस पण आता जरा थांबला होता.
अश्विन ने कुतूहलाने तिची चौकशी करायला विचारले" हीचे नाव काय? काय करते?"
तिचा बाबा म्हणाला" अमृता... BA केले आहे हिने, आता काहीतरी नवीन करायचं म्हणते पण काय ते कळत नाही. साहेब पोरगी खूप हुशार आहे पण पुढे काय करायचे ते काही कळत नाही."

अश्विन ने तिच्याकडे पाहिले " खरचं! अमृता ही पहाटेची सुंदरते सारखी आहे " मनाशीच तो बोलला.
स्वतःबद्दल त्याला नवल सुद्धा वाटले. ती आत्मविश्वासाने त्याच्याकडे बघत होती क्षणात भानावर येऊन म्हणाला " तुला काय करायला आवडेल अमृता?"
"खरं सांगायचं डॉक्टर साहेब तर मला तुमच्यासारखी लोकांची सेवा करायला आवडेल..तुम्ही करत असणाऱ्या कार्याचा भाग व्हायला मला आवडेल".
"माझ्याबद्दल तुला काय माहीत?"
"अहो साहेब, इथे आजूबाजूच्या काय आणि आमच्या गावात काय तुम्ही देवासारखे मानले जाता. कित्येक गरीब जीव तुमच्यामुळे आज जगत आहेत, तुमचे उपकार आहे आमच्या सर्वांवर."
ती बोलत होती आणि हा एकटक तिच्याकडे बघत होता.

"साहेब आम्ही निघू का आता, नाही म्हणले, झुंजूमंजु व्हायला लागले आहे. शेतावर जावे लागेल कामाला आणि पाटलाची गाडी भी द्यायची आहे."
उपकार बघा तुमचे" म्हणत तिचा बाबा त्याच्या पाया पडायला आला तसे त्याने पटकन वरच्यावर त्याला थांबवले.

"आभारी आहे डॉक्टर साहेब" म्हणत हात जोडून तिने हसत आभार मानले आणि निघाली तसे त्याला काहीतरी जवळचे लांब जातंय असे जाणवले.

"साहेब एक विनंती आहे, आमच्या राणी नगर ला आले की आमच्या घरी नक्की या. गावातील मारुती मंदिराजवळ आहे आमचे घर. तिथे नारायण देशमुख विचारले तर कोणी पण सांगेल."
तो हसून "हो" म्हणाला.

ते गेल्यावर त्याने रोजचे त्याचे आवरले आणि क्लिनिक मध्ये जाऊन बसला. नेहमीप्रमाणे गर्दी होती कामात व्यस्त होता पण आज मन अमृताच्या अवतीभवती फिरत होते.

दिवस गेला.. रात्री आज खानावळीत दोन घास कसेतरी खाल्ले. दिवसभराच्या दगदगीने थकला होता पण तिचा चेहरा सतत डोळ्यासमोर येत होता.
कुठलीतरी अनामिक हुरहूर त्याला अस्वस्थ करत होती..दोन दिवसाने त्याने तिच्या गावाकडील दौरा काढलाच. गावात पोचला तर जेमतेम सकाळ होत होती, त्याच्या रस्त्यात मारुती मंदिर येत होते. त्याने गाडी थांबवली इकडे तिकडे पाहिले आणि दर्शनाच्या निमित्ताने देवळाकडे आला.
दर्शन घेवून बाहेर येतो नाही तर एक मुलगा त्याची वाट पाहत होता म्हणाला " डॉक्टर साहेब जरा या की माझ्यासोबत".
"तू कोण आहेस आणि का मला बोलावतोस?"
"साहेब मी मनोहर, अमृता ताईने तुम्हाला चहा ला बोलावले आहे."
तिचे नाव ऐकताच मनोमन सुखावला आणि हृदयाची धडधड अशी त्याला जाणवली. मनासारखेच झाले असा विचार करत त्या मुलाच्या मागोमाग त्याच्या घरी आला.

दारात त्याच्या हातपाय धुवायला पाणी ठेवले होते, लगेच त्याला पुसायला पंचा समोर आला तसे त्याने वर पाहिले तर हसतमुखाने अमृता समोर उभी होती.
त्याने पण तितक्याच उत्साहाने तिला स्माईल दिली आणि घरात प्रवेश केला.

तिचे बाबा, एक म्हातारी स्त्री आणि मनोहर होते. सगळ्यानी हात जोडून त्याचे स्वागत केले.तिचे बाबा म्हणाले " तुमची गाडीच हिने ओळखली,ती अंगणात सडा शिंपत होती. मला बोलली की तुम्ही आहेत म्हणून लगेच मी मुलाला पाठवले."

औपचारिक ओळख आजीशी झाली, आतून अमृता पोह्यांची प्लेट घेऊन आली. सोबत पोह्याचे तळलेले पापड आणि हिरवी चटणी सुद्धा होती.

ते पाहून तो म्हणाला, " याची काय आवश्यकता होती? "
ती हसली आणि म्हणाली " डॉक्टर साहेब थोडी आमच्याकडून तुमची सेवा. तुम्ही लोकांची करताच, नाही म्हणू नका."

तसे तिचे बाबा पण आग्रह करू लागले मग फारसे आढे वेढे न घेता त्याने खायला घेतले. "खूप चविष्ट झालेत पोहे" तो म्हणाला.
"आमची अमृता सगळंच छान बनवते. आता तीच करते सगळं" कौतुकाने बाबा म्हणाला.

खाणे झाले, चहा झाला तसे आभार मानत तो जायला निघालो तसे ती म्हणाली " डॉक्टर साहेब एक विचारू का?"
"हो विचार ना!"

"तुम्ही एकटे सगळे पेशंट तपासता त्यांना जवळ असलेलं औषध देता, लोकं पण खूप असतात मग कोणाला मदतीला का घेत नाही?"

"तसे विश्वासू असे मला कोणी मिळाले नाही."

"मी जर तुम्हाला मदत केली तर चालेल का तुम्हाला?"

मनाच्या कोपऱ्यात त्याला आनंद झाला की जर हो म्हटले तर ही रोज भेटेल आपल्याला पण तसे न दाखवता तो म्हणाला " तू तुझ्या घरी विचारले आहे का? आणि हे इतके सोपे नाही आहे. तू तसे शिक्षण पण घेतले नाही, ही मोठी जवाबदारी आहे. त्यातून तू दररोज गावातून ये जा काशी करणार?"

तिने बाबा कडे पाहिले तसे त्यांनी मान डोलावली
"डॉक्टर साहेब मला मान्य आहे की मी शिकले नाही आहे पण मी नक्की शिकेन! जे आणि जसे तुम्ही सांगाल अगदी तसे. तुम्ही शिकवलेत तर दिलेली जबाबदारी मी नक्की पार पाडू शकेल आणि इथून सकाळी ST आहे 6 वाजता ती तुमच्या गावात येईल 7 वाजता.. येताना तिथून सुदधा 6 वाजता आहे म्हणजे घरी संध्याकाळी 7 ला घरी परत येईल"

"बघतो" म्हणून तो गाडीकडे निघाला तशी ती मागोमाग येत म्हणाली " आज येते मी तुमच्या सोबत, जर तुम्हाला वाटले की मी काही करू शकेल तर नक्की संधी द्या नाहीतर राहीले " भोळेपणाने ती म्हणाली.

"ठीक आहे. तू तयार हो आपण 15 मिनिटांनी निघुयात. त्याच्या या बोलण्याने आनंदित झालेली ती आवरण्यासाठी घराकडे निघाली.

क्रमशः:-

©®अमित मेढेकर