Jun 15, 2021
प्रेम

ओढ: - भाग 10

Read Later
ओढ: - भाग 10

ओढ - भाग 10


©®अमित मेढेकर

"त्या दिवशी तुम्ही गावात आलात आमच्याकडे राहिलात. सकाळ झाली तसे तुम्ही आणि अमृता तुमच्या दवाखान्यात परत गेलात."

खरंतर आजीने सांगायला सुरुवात केली तेव्हा अमृता चा जीव खाली वर होत होता. तिला सांगायचे पण होते पण तरीही बोलता येत नव्हते, शेवटी न राहवून आजीने पुढाकार घेतला होता आणि बोलायला सुरुवात केली होती.....
कानात प्राण आणून अश्विन ऐकायला तिच्या समोरच जमिनीवर मांडी घालून बसला.

तिचे बोलणे थोडे ग्रामीण होते...पण अश्विन जीवाचे रान करून एक एक शब्द समजून घेत होता.....

"तुम्ही गेलात....मग मी पण भाकरी बांधून देत होते, हीचा बा पण त्याचे आवरून शेताकडे जायला निघत होता आणि मनोहर नुकताच झोपेतुन उठला होता तेवढ्यात आमच्या बंद दारावर बाहेरून थाप पडली.

खरे तर यावेळी कोणी येणार जाणार अशी वेळ नव्हती त्यामुळे आम्हाला थोडे नवल वाटले. हीचा बा म्हणाला" बघ रे मनोहर कोण आलं या वेळेला, जा दरवाजा उघड."

दरवाजा उघडला तर बाहेर आमच्या बाजूचा निल्या होता आणि त्याच्या सोबत गावातील आणखी काही लोकं दिसत होती. त्यांनी सांगितले की मनोहर तुझ्या बा ला बाहेर पाठव. तस मनोहर मागे वळून बाला बाहेर बोलावले म्हणून सांगितले. काय झाले की इतकी माणसं आली मला भी नवल वाटत हुते आणि तशाच विचारात हिचा बा बाहेर गेला. मी पण लगेच दरवाजाच्या मागे उभी राहून काय झालं ते बघायला गेले.

"अमृताचे काय चालू आहे रे?" निल्या बोलला.
"काय म्हणजे मी समजलो नाही?" तिचा बाबा म्हणाला.

"तो डॉक्टर आपल्या गावातील लोकांना बरे करतो, असेल चांगला डॉक्टर असेल पण हे जे सुरू आहे ते काही ठीक नाही आहे"

"नीट सांग ना रे बाबा,का जीवाला घोर लावतो"

"काल रातच्याला अमृता आणि तो डॉक्टर घरामागे झाडात गेले होते"

शॉक बसल्यासारखा तिचा बाबा त्याचे तोंड बघत राहिला, त्याचा विश्वास बसत नव्हता....तो म्हणाला, " कसं शक्य आहे? ती तर घरात झोपली होती आणि डॉक्टर इथे माझ्या न तुझ्या मध्ये झोपले होते ना रे..."

"तेच तर सांगतो आहे. रात्री अमृता बाहेर आली आणि डॉक्टर जवळ गेली. थोड्या वेळाने दोघे भी मागल्या बाजूला झाडीत गेले. बराच वेळ होते तिथे काय करत होते त्यानाच ठाऊक पण जसा तू हालचाल केली तसं डॉक्टर पटकन त्याच्या जागेवर आला. मग तुम्ही काहीतरी बोलले तोवर ती घरात गेली आणि मग डॉक्टर झोपले."

आपण डॉक्टर शी रात्री बोललो हे त्याला आठवलं तस त्याच मन चलबिचल झालं.


"हे दोघे उठले तसा मी भी त्यांच्या मागे गेलो होतो... त्यांना कळलं भी नाही की मी त्या दोघांना पाहात आहे ते...."

त्याचे ऐकून एक गावकरी बोलला "अरे अशानं कस चालेलं? तो डॉक्टर आहे मोठा माणूस. कोणास माहीत काय करत असेल दिवसभर तिथे. अमृता रोज तिथे जाते, दिवसभर त्याच्या सोबत असते. काय करत असेल तिथे देव जाणे."

दुसरा म्हणला" अरे, त्याचे घर भी तेच आणि दवाखाना भी. कोणास ठाव पोरगिला काय करायला सांगत असेन तिथे. आपण लहान माणसे आणि आपली पोरीची बाजू, उद्या काही..........?"

तसा हीचा बा एकदम कानावर हात ठेवून ओरडला. "बास! बास !"

तरी निल्या बोलतच होता " तू जास्ती मोकळी सोडली पोरीला. तुला काय ठाव तिच्या भी मनात काय ते? नको ते होईल. आपलं गाव छोटं त्यात एकीने असे केलं तर बाकीच्या काय करतील. तोंडाला काळ फासतील तुझ्या आणि आपल्या गावाच्या भी. लगाम घाल, आवर तिला वेळीच नाहीतर तोंड दाखवायला जागा राहणार नाही".

तो डोकं धरून खालीच बसला,मी पण घाबरून गेली आणि मनोहर मागे येऊन ऐकत बसलेला...त्याला नीट काही कळत नव्हते आणि काही सुचत नव्हतं तसं नुसता बसून राहिला होता.

बराच वेळ अशा चर्चा सुरू होत्या, शेवटी थोड्या वेळाने सगळे आपापल्या घराकडे गेले पण हिचा बा काही जागचा उठेना मग मी अन मनोहर ने त्याला हाताला धरत घरात आणलं आणि पाणी दिलं प्यायला.
तरी त्याला खरे वाटत नव्हते कारण तुमच्याबद्दल आदर होता आणि अमृता बद्दल चा विश्वास.
थोड्या वेळाने उठला अन 4 लोक घेऊन तुमच्या गाडी पाशी गेला....तुमची गाडी नीट केली आणि एकटाच तुमच्या गावाकडे निघाला.
त्याचं भी मन जाग्यावर नव्हतं, तसाच तुमच्या दवाखान्याकडे आला. गाडी बाहेर लावून आला ...पाहतो तर पेशंट बाहेर उभे होते....चहाची वेळ होती म्हणून....हा अलगद मागच्या दारातून गेला अन बघितले तर तुम्ही दोघे भी एकमेकांच्या डोळ्यात डोळे घालून जवळ उभे. तिचा हात तुमच्या हातात अन तुमचा तिच्या.... आणि त्या क्षणाला कसलंच भान नाही...हा क्षणभर तिथे थांबला पण हा तिथं आला हे तुमच्या बी ध्यानात आलं नाही.
शेवटी तो माघारी फिरला आणि पुढून आला...त्याने मुद्दामून मोठ्याने "अमृता मी आलो" असे म्हणत आवाज दिला तवा कुठं तुम्ही दोघ भी जाग्यावर आले.
पण हे पाहून त्याला गावच्या लोकांचं सारे म्हणणं आठवलं अन पटलं भी. पण त्याने तिथे तसं दाखवलं नाही का तर तुमचा अपमान नको म्हणून अनं हिला घेऊन घराकडं आला.

इथं येताच त्यानं हिला घरात घेतली आन दाराला कडी घातली. हिला भी कळेना की बा ला काय झालं. त्यानं हिला समोर उभी केली अन विचारला " रातच्याला डॉक्टर सोबत झाडीत गेली होती का?"

ही घाबरून माझ्याकडं पाहत होती पण मी भी काही बोलू शकत नव्हती. ती रडवेली झाली अन म्हणाली "बाबा.."

"मी काय ईचारले ते सांग.."

"हो बा पण......."

त्यानं हिला पुढं बोलूच दिलं नाही. समोर कुऱ्हाड व्हती ती उचलली अन स्वतःवर मारायला गेला तसं मनोहर आणि हीने त्याचा हात धरला.

"बा ऐकून तर घे….."

"तुला मी हवा... तुझा बा हवा... त्याची इज्जत हवी..... का तो डॉक्टर?"

ती खूप रडत व्हती पण तो ऐकून घेत नव्हता,त्यानं एकच सांगितलं "आजच्या आज गाव सोडून जा नाहीतर माझं मेलेलं तोंड पहा"

मला बी काही सुचेना...ती रडून रडून बेशुद्ध पडली अन मनोहर गप्प जाग्यावर बसून व्हता. तिच्या तोंडावर पाणी मारून तिला उठवली अन पुन्हा तेच बोलला
तिला एक शबुद भी बोलू दिला नाही... तशी बिचारीने मान हलवली. तिला स्वतःची शपथ घातली की तुला फोन केला तरी बी जीव देईल म्हणून......

त्यानं लागलीच मुंबई ला फोन लावला मित्राला अन सांगितलं की, या दोघी सकाळच्या गाडीत बसतील,तो त्यांना उतरून घे अन राहायची सोय कर.... न नोकरी च पहा. तोवर तुझ्या घरी ठिव अन 1 वरीस तरी त्या इथे येता कामा नये.
लगंच मनोहर ला सांगितले की तुम्हाला फोन करून सांगायला की , ताई उद्यापासून येणार नाही असे कळव..\"

कसेतरी तिचे न माझे कपडे थैलीत भरले अन आम्हांला पहाटेच्या पहिल्या बस मध्ये बसवलं.
रातच्याला गाडी मुंबैसनी पोचली...त्यो मानुस आला व्हता स्टँड वर....त्याच्या घरी घेऊन गेला...सुरवातीला 8 दिवस त्याच्या घरात व्हतो आमी दोगी बी....

पोरगी खात नव्हती का पित नव्हती पण बा जीव देईल ही भीती तिच्या मनात व्हती..... त्यानं हिला विचारलं काय काम जमेलं तसं ही भी बोलली की दवाखान्यात काम केलं आहे तर जमेल करायला म्हणून.
त्याने ओळखीतून एक हॉस्पिटलमध्ये हिला नर्स चे काम करायला लावून दिले आणि आम्हा दोघींसाठी ही जागा शोधली....

तवापासून आज 3 महिने झालं आम्ही हीथंच हाओत. हास्पिटलात जाते पोरगी अन येते... आम्ही इथंच राहतो. रोज सांजच्याला तेचा फोन येतूया ईचारायला की ही तुला फोन करते का अन आम्ही कसे हाओत ते.
आता भी आला व्हता बघ तुझ्या समोर...."
इतकं बोलून आजी थांबली.

सुन्न झालेला अश्विन आजीच्या ग्रामीण भाषेतील बोलणे फक्त ऐकत होता आणि तिच्याकडे बघत होता.इतके सगळे घडले आणि आपण अनभिज्ञ होतो... मनोहरला पण खूप विचारून सुद्धा तो काही बोलला नव्हता.
बराच वेळ असाच गेला ती अजूनही रडत होती पण त्याच्याशी एक शब्द बोलली नाही. आता तोही समजून गेला की ही तोवर नाही बोलणार जोवर हीच बा हिला सांगत नाही.

तो उठला आणि आजी जवळ गेला " आजी मला खरच अमृता आवडते आणि खूप जीव आहे माझा तिच्यावर. मला तिच्याशी लग्न करायचे आहे."

त्याच्या वाक्यासारशी तिने एकदम त्याच्याकडे पाहिले, तिच्या डोळ्यात त्याला फक्त प्रेम दिसत होते पण ओठ मात्र हलत नव्हते. स्तब्ध ती मूर्तीसारखी बसून होती.

आजी ने त्याच्याकडे एक नजर पाहिले आणि त्याच्या डोक्यावर हात ठेवून म्हणाली " डॉक्टर... माझं भी केस असेच नाही पिकले....कळतंया मला भी... तुझ्या भी डोळ्यात दिसतंय.... पण हिच्या बा ला समजावणं सोपं नाही बघ. तू आता आला हे भी तेला कळून उपयोग नाही बघ. तू जा तुझ्या घरला.... जरा उगी ऱ्हा,बोलेलं मी तुझ्याशी नंतर. तू जेवलास का?"

त्याने मानेनेच नाही म्हणले तसे आजीने तिच्याकडे पाहिले.
ती उठली आणि तिने स्टोव पेटवला.

पटकन तिने उपमा केला आणि आजीच्या हातात प्लेट दिली. आजीने त्याला नको नको म्हणत असताना प्रेमाने खाऊ घातले. नंतर छानशी कॉफी पण दिली....

" डॉक्टर तू थोडा येळ इथंच थांब पण उजेडाच्या आधी जा तुझ्या घरला. तिच्या बाला काही बोलू नगस पुनंदा सांगते. शांत ऱ्हा.... उगाच अजून राडा व्हइल, त्येला जर कळलं की तू इथे आला व्हता तर....तवा जरा दमाने घे आन काळजी घे स्वतःची बी" प्रेमाने त्याच्या डोक्यावर हात फिरवून म्हणाली.

त्याने एकदा अमृता कडे पाहिले ती खाली मान घालून बसली होती. त्याने आजीला वाकून नमस्कार केला आणि म्हणाला " आजी पुन्हा सांगतो मला अमृता आयुष्यभर माझी बायको म्हणून हवी आहे. मला आई बाबा नातेवाईक कोणीच नाही, त्या सगळ्यांवर असेल इतकं सगळ प्रेम माझं अमृतावर आहे."

आजीने तिचा मोबाईल नंबर पण त्याला दिला आणि सांगितले की काही वाटले तर फोन कर ह्या नंबर वर....

तो निघाला तिथून तेव्हा पहाटेचे 4 वाजले होते...मागे वळून एकदा दोघींकडे पाहिले आणि तो चालता झाला तशी ती आजीला बिलगून रडायला लागली,आजीने मायेने हात तिच्या डोक्यावर ठेवला...."नगं काळजी करू..सगळं छान होईल...तो डॉक्टर करेल बघ न सगळे...."

अश्विन खालती आला तर गाडीतल्या डॉक्टर ला झोप लागली होती...त्याने त्याला उठवले आणि विचारले की " आमदार साहेब आहेत मुंबईत की गेले गावाला परत...?

त्याने सांगितले की, " नाही गेले साहेब अजून ...थांबले आहेत तुमच्यासाठी... मला सांगितले आहे की तुम्ही जसे इथून निघाले की तसे तुम्हाला साहेबांच्या बंगल्यावर घेऊन जायचे..."

अश्विन काही न बोलता गाडीत बसला... गाडी निघाली...रस्त्यांवर बरीच माणसे होती...पहाटे मुंबईला भरपूर जाग आली होती...अश्विन शांतपणे काय करता येईल याचा विचार करत बसून होता...
थोड्या वेळाने ते लोक आमदार साहेबांच्या बंगल्यात पोचले....
तिथे आता बरीच वर्दळ होती...
साहेब स्वतः लवकर उठायचे त्यामुळे ते उठलेले होते....
जसा अश्विन आला तसे त्यांनी त्याला लगेच हॉल मध्ये बोलवून घेतले....
"डॉक्टर साहेब, तुम्ही मस्त फ्रेश होऊन घ्या....मी वाट पाहतो तुमची चहा साठी...."
अश्विन ने मान डोलावली आणि स्वतःचे आवरायला गेला...त्याच्यासाठी एक मऊसूत पांढरा सलवार कुर्ता ठेवला होता...तो घालून अश्विन आमदार साहेबांकडे आला....

"या डॉक्टर....बसा निवांत..."
अश्विन बसला.... तो बराच दमला होता पण आता अंघोळ केल्यावर त्याला जरा बरे वाटत होते....
समोर चहा, बिस्किटे, सामोसे, कचोरी, शेव असे ठेवले गेले...
"घ्या डॉक्टर... तुम्हाला लागले तरी तुम्ही जेवला नाहीत काल...तसेच बसून होता....तुम्हाला खाल्ले पाहिजे..."
अश्विन काही न बोलता खायला लागला....
साहेबांचे फोन चालू होते...
जसा चहा संपला तसे साहेबांनी विचारले....
"डॉक्टर साहेब, मला आपले माना आणि सगळे सांगा काय झाले ते...माझी माणसे तुमच्या सगळ्या हालचालींबद्दल मला कळवत होती....म्हणून मी कालचे जाणे रद्द केले....मला कळू दे काय झाले आहे तुमच्या बाबतीत...मग ठरवूयात पुढे..."

अश्विन प्रथम संकोचला पण आमदार साहेब हे खूप चांगले होते त्यामुळे त्याने सांगायला सुरुवात केली...
ज्या रात्री अमृता आणि तिचे बाबा त्याच्या कडे तिचे पोट दुखत आहे म्हणून आलेले ते कालच्या गिरगावातील रात्री पर्यंत सगळे सांगितले...

त्याचे सांगून झाल्यावर आमदार साहेब उठले आणि म्हणाले, "डॉक्टर साहेब, तुम्ही फक्त सांगा काय करायचे आहे ते...आपण करूयात..."

"नाही साहेब, मला हे स्वतःच केले पाहिजे...स्वतःच लढले पाहिजे आणि अमृताला जिंकले पाहिजे...तुम्ही फक्त सोबत असा..."

"या आमदाराचा तुम्हाला शब्द आहे डॉक्टर, माझा 100 टक्के पाठिंबा तुम्हाला आहे...!"

त्यांच्या या बोलण्याने आश्वस्थ झालेल्या अश्विन च्या डोळ्यात काहीतरी ठाम निश्चय झळकत होता, सकाळच्या उगवत्या सुर्याबरोबर त्या निश्चयाचे तेज तिथे पसरत होते!

©®
अमित मेढेकर
Circle Image

Amit Medhekar

Professional

I have completed my MS in psychotherapy and counseling and work mainly in REBT and CBT. I basically work on people's mind. Simple Living and High thinking is my motto!