ओढ :- भाग 3

Ashwin And Amruta Are Comment Close To Each Other
ओढ:- भाग 3

©® अमित मेढेकर

आज परत संध्याकाळ झाली आणि तिची जायची वेळ जवळ आली. निघायच्या वेळेस चुळबूळ तिची सुरू व्हायची आणि अस्वस्थ हा व्हायचा. त्याला जाणवायचे की आपल्या जवळील काहीतरी लांब जात आहे. त्या क्षणाला त्याला प्रचंड अस्वस्थता वाटायला लागली. पूर्ण दिवस काम करता करता कसा गेला हे त्याला कळले नाही. आता ती जाणार म्हणल्यावर त्याला एकटेपणा वाटायला लागला..जाणाच्या आधी तिने काल सारखा चहा केला आणि पिळाची खारी त्याच्यासमोर आणून ठेवली. चहा घेत असताना त्याने पेशंट तपासला नाही आणि तिला बघत राहिला..

"काय झाले डॉक्टर, चहा आवडला नाही का?"
"आवडला ना! छान झाला आहे..."
"मग, तुम्ही काही न बोलता नुसते बघत आहात?"
"आता तू जाणार ना...मग माझी कामे मलाच करावी लागणार... त्याचा विचार करतोय"
"2 दिवसांपूर्वी तुम्ही तुमची कामे करत होता की डॉक्टर..तेव्हा कुठे मी होते?"
"पण आता आहेस ना..."
"मला येऊन आज दिवस होत आहेत डॉक्टर, आणि मी उद्या येणार आहेच परत.."
तो काही न बोलता तिच्याकडे पाहत राहिला...
चहा झाला आणि तिच्या जाण्याची वेळ आली..
ती गेली आणि त्याच्या पुढच्या पेशंटकडे बघणे आणि त्याला औषध देणे एवढेच काम त्याच्याकडे राहिले...
पेशंट येत होते आणि जात होते....तो डॉक्टर रुपी भूमिका चोख निभावत होता व मनात अमृताचा विचार ठेऊन!

रात्री 9 वाजले आणि त्याची पावले खानावळी कडे वळली.. हे असे एकटे जीवन जगण्याची सवय झाली असताना अमृताचा प्रवेश त्याच्यासाठी त्याचे पूर्ण आयुष्य बदलवू पहात होता...
खानावळीत जेवताना आज त्याची बोटे गरम आमटीत पडून पोळली... पाण्यात त्याने पोळी बुडवून खाल्ली..भात आणि मीठ नुसते तोंडाला लावले...
खानावळीच्या काकू फार प्रेमळ होत्या आणि एवढा मोठा डॉक्टर स्वतः आपल्या कडे जेवायला येतो म्हणल्यावर त्या जातीने लक्ष घालायच्या...
आज त्याचे जेवणातील गोंधळ पाहून त्या त्याच्या समोर बसल्या आणि त्यांनी गप्पांचे विषय काढायला सुरुवात केली...
त्या समोर बसल्या म्हणून अश्विन थोडे नीट जेवू शकल्या नाहीतर आज त्याचा सक्तीचा उपवास होता..

जेवण करून तो घरी आला आणि त्याने ठरवले की ती यायच्या आत आपण उठायचे...तिचाच विचार करत तो बऱ्याच उशीरा पर्यंत जागा होता नंतर मात्र झोपून गेला...

सकाळी कसल्या तरी आवाजाने जाग आली आणि त्याने डोळे उघडले...समोर काळ्या रंगाचा ड्रेस घातलेली ज्यावर पिवळा आणि लाल रंगाचा सुंदर काश्मिरी कशिदा होता, केस सुटे सोडलेली, एका हातात बांगड्या दुसऱ्या हातात घड्याळ अशी ती त्याच्या साठी चहा घेऊन उभी होती...आणि तिच्या गोऱ्यापान रंगावर हा काळा रंग अतिशय खुलून दिसत होता..
तो फक्त तिच्याकडे पाहत राहिला...
एवढी सुंदर मुलगी त्याने आधी पाहिली नव्हती...
"तू आलीस अमृता...?" त्याने विचारले..
ती खदखदून हसत म्हणाली, " हो मी आले...विश्वास बसत नाही आहे का?"
हसताना विलग झालेले तिचे कमानिदार ओठ आणि त्यातून दिसणारे पांढरे शुभ्र दात तिचे सौन्दर्य अजून वाढवत होते...
त्याने तिच्या हातातून चहा घेतला आणि पिणार तेवढ्यात तिने सांगितले, "डॉक्टर, ब्रश प्लिज..."
तो तसाच मान डोलवत बाथरूम मध्ये गेला आणि ब्रश करून आला...
तिच्या हातचा अमृततुल्य चहा पिऊन तो तरतरीत झाला...

तिच्या कामाचा आवाका फार अफाट होता...
त्याचे आवरून होईस्तोवर त्याने सगळी आवराआवर आणि साफसफाई करून ठेवली होती..
सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे तिने क्लिनिकच्या गोष्टींना नीट आवरून ठेवायला सुरुवात केली...
त्याने अस्तवस्त ठेवलेल्या वस्तू ती नीट ठेवायला लागली...
क्लिनिक सुरू झाल्यावर प्रत्येक पेशंट ची प्राथमिक चौकशी करणे आणि त्यांची माहिती लिहून काढणे याला तिने सुरुवात केली. असे दिवस सुरू होते आणि फटाफट जात सुद्धा होते.

तिला येऊन आता जेमतेम आठवडा झाला होता पण त्याच्या क्लिनिक चे रूपच पालटले,सगळे शिस्तबद्ध झाले होते.
पेशंट आत जाण्यापूर्वी त्याची हिस्ट्री ती तयार ठेवत असे, त्याने सांगितले की लगेच ती हवी ती औषध काढून देत असे. त्याने फक्त हात पुढे करायचा अवकाश की ही पटकन काय हवे हे ओळखून लगेच त्याच्या हातात ती गोष्ट देत असे. दुपारी जेवणाचा डबा आला की पटकन लंच टाईम ची स्वहस्ते लिहिलेली पाटी पुढे करत असे आणि त्याला जेवायला बसवत असे.

मधेच घरात जाऊन काय हवे काय नाही याकड़े लक्ष देऊन त्यालाच त्याची यादी देत असे आणि बाईकडून सगळी कामे सुद्धा करून घेत असे.
घर आणि क्लिनिक दोन्हीचे रूप एका आठवड्यात एकदम पालटले होते .तो स्वतःही शिस्तीत आला होता.. थोडं त्याच्यावरील एकप्रकारे हक्क गाजवणे त्याला खूप सुखावत होते.
रोज लवकर उठून तो तिच्या येण्याची वाट पाहू लागला. ती आली की चोरून तिच्याकडे कटाक्ष टाकत असे. कामाच्या वेळी एकमेकांना होणारा स्पर्श त्याला सुखावत असे. तिच्या असण्याची त्याला इतकी सवय झाली होती की तिच्याही नकळत तिने त्याच्या आयुष्यात महत्वाचे स्थान मिळवले होते.

ती सोबत असताना त्याला जणू आयुष्यात खूप काही गवसल्याची भावना जाणवत असे, तिचे ते साधे पण कॉन्फिडन्स असलेलं रूप तो निरखून न्याहाळत असे. काम करताना मध्येच ती एका हाताने गालावर आलेली बट मागे सारी तेव्हा हा खुदकन हसत असे. तिचे मोठे डोळे खूप काही बोलतात हे त्याला नेहमीच जाणवत असे.

ती सुद्धा त्याच्यासोबत काम करताना त्याला जवळून अनुभवत होती. त्याला काय हवे काय नको याची काळजी घेत असे,त्याच्या जेवायच्या वेळा पाळत असे. तिच्यासाठी तो खूप आदरणीय व्यक्ती होता त्यामुळे त्याच्याबद्दल मनात जरी काही आले तरी ते कधीच ओठावर ती येऊ देणार नव्हती.

त्यांच्या एकमेकांच्या सहवासातील दिवस भराभर पुढे सरकत होते. गेले 3महिन्यात ती बरोबर सकाळी 7 वाजता यायची आणि संध्याकाळी 6 वाजता परत जायची..या 3 महिन्यात एकही दिवस तिने सुट्टी घेतली नव्हती का मागितली नव्हती...
अश्विनकडे रोजच पेशंट ची रीघ असे त्यामुळे त्याला रविवार आणि इतर दिवस सारखेच असायचे..

त्याला वेगवेगळ्या गावातून मेडिकल कॅम्प साठी बोलावणे यायचे..तो अश्या वेळेस आता अमृता ला घेऊन जायचा. आता तर त्याचे तिच्याशिवाय पान हलत नसे. तिच्या असण्याची सवय आता पेशंट लोकांना पण झाली.
त्याच्यासोबत ती आजूबाजूच्या गावात सुद्धा जात असे ते डॉक्टर सहेबांची असिस्टंट म्हणून! त्याच्या आणि लोकांच्या मनात तिने पक्की जागा मिळवली होती.

असेच एकदा ते एका गावावरून परत येत होते,संध्याकाळची वेळ झाली होती आणि त्याने तिला विचारले,

"अमृता "
"काय सर?"
"तू खरच खूप हुशार आहेस आणि चंट सुद्धा !आज तुला 3 महिने झालेत मला जॉईन करून. मेडिकल बॅकग्राऊंड नसताना सुद्धा तू सगळं छान शिकून घेतलेस.
खूप कौतुकास्पद आहे हे. एका छोट्या गावात असून सुदधा तुझे विचार, वागणे , समजून घेणे खूप प्रशंसनीय आहे."

त्याने अनपेक्षित पणे केलेल्या कौतुकाने ती लाजली, क्षणात तिचे गाल आरक्त झाले. त्या क्षणाला तिला आभाळ ठेंगणे वाटत होते तर तिचे ते मोहक सौंदर्य बघण्यात तो तल्लीन झाला. त्याचे बघणे तिला जाणवत होते पण मान वर करण्याची हिंमत काही तिला होत नव्हती.
काही क्षण गेले... थोडं सावरत ती म्हणाली " सर मला हे सगळे तुम्ही शिकवलेत. उलट मीच तुमची आभारी आहे की तुम्ही मला हा गोल्डन चान्स दिला."
"असे नसते गं, तू शिकलीस म्हणून तुला जमले, याचे श्रेय तुझे आहे."
तो असे बोलत होता आणि अचानक त्याची गाडी बंद पडली.

"अरे काय झाले अचानक गाडीला? तू बस इथेच मी बघतो" म्हणत तो उतरला. बघतो तर समोर इंजिन मधून धूर येत होता. त्याने बोनेट उघडून प्रयत्न केले पण त्याला काही ते काम जमले नाही. थोडा हताश होत तो मागे वळला आणि बोनेट बंद करून बघतो तर अमृता गाडीत नव्हती.
थोडे घाबरून त्याने इकडे तिकडे पाहिले तर ती दिसेच ना. धावत तो आजूबाजूला तिला हाका मारत होता पण नो रिस्पॉन्स!
तेवढ्यात त्याला पाण्याच्या खळाळण्याचा आवाज आला त्या दिशेने तो गेला आणि बघतो तर काय समुद्राच्या किनाऱ्याला असलेल्या एका छोट्या खडकावर ही बसलेली. नकळत त्याची पावले त्या दिशेने चालायला लागली.

आकाशातील विविध छटा बघण्यात ती गुंग होती, मध्येच एखादा खडा पाण्यात फेकत होती. आपल्यातच मग्न ती गाणे गुणगुणत होती. संध्याकाळच्या वेळेतील त्या सोनेरी प्रकाशाच्या छटा तिच्या रुपाला उजळून टाकत होत्या. त्या आकाशातील सप्तरंगांची उधळण जणू तिच्या सर्वांगावर झाली होती आणि नाजूक अशी एकटी खडकावरती बसलेली ती त्याला जलपरी भासत होती.

हळूच तो पावलांचा आवाज न करता तिच्या जवळ गेला...वाऱ्याने भुरभुरणारे तिचे केस त्याने क्लच काढून पूर्ण मोकळे केले तसे तिने दचकून मागे पाहिले. एकदम आश्चर्य आणि गोड हसू तिच्या चेहऱ्यावर फुलले.

तिचे ते रूप न्याहाळताना तो एकदम तिच्या बाजूला आला आणि बसला तसे तिचे हृदय जोराने धडधडू लागले. आधीच त्याचे ते बघणे क्लच काढताना त्याच्या बोटांचा मानेला झालेला हलकासा स्पर्श यामुळे ती मोहरून निघाली होती.

"अमृता" तो इतकेच म्हणाला.
ती काहीच न बोलता फक्त मान वर करून त्याच्याकडे पाहिले आणि क्षणात तिची नजर खाली वळली. त्याने हाताने तिची हनुवटी वर केली पण तिने पटकन डोळे मिटले.
हा क्षण काहीतरी खास आहे याची दोघांनाही जाणीव झाली होती. आज अश्विन फक्त अश्विन होता ना की एक डॉक्टर.

"अमृता, मला तू खूप आवडतेस" तो तिच्या डोळ्यात बघत बोलला. क्षणात तिचे गाल त्या सोनेरी प्रकाशापेक्षा आरक्त झाले.
"अमृता मला तू हवी आहेस कायमची! माझी साथ देशील का? तुझे असणे हे माझे अस्तित्व बनले आहे, तू आजूबाजूला नाही हा मी विचारही करू शकत नाही. तुला मी आवडतो का?"

निशब्द, स्तब्ध अशी ती फक्त त्याच्या डोळ्यातील भावना बघत होती. किती निर्मळ, प्रेमळ होती ती नजर जी तिला बांधत होती. तिने काहीच न बोलता फक्त त्याच्या खांद्यावर डोकं टेकले तसं त्याने समाधानाने हसून तिच्या डोक्यावर हात फिरवला.
काही न बोलता पण खूप काही सांगणारे ते निशब्द क्षण ती दोघेही अनुभवत होती.

" माझ्यासारख्या सामान्य मुलीला तुम्ही इतके महत्व देऊ करत आहात यापेक्षा मला काय हवे?"मान वर न करताच ती म्हणाली तसे हसत त्याने तिच्या चेहऱ्याला वर केले आणि तिच्या डोळयात पाहिले...
ती पण त्याच्याकडे पाहत होती...
बराच वेळ ती दोघे एकमेकांकडे बघत त्या समुद्राच्या साक्षीने खूप काही न बोलता सांगत होती.
संध्याकाळ सरून अंधार पडायला लागला तरी ते एकमेकांच्या साक्षीने तसेच बसलेले...

तेवढ्यात त्याचा फोन वाजल्याने ते भानावर आले.
"हॅलो डॉक्टर, अमृता निघाली का? अजून घरी पोचली नाही..मी तिचा बाबा बोलतोय"
त्याने फोन अमृताकडे दिला..

"हॅलो बाबा.."
"अमृता अगं, आज तुला उशीर होणार आहे का?"
"बाबा अहो आज आपल्या गावापासून जवळच्या गावात एक मेडिकल कॅम्प होता..तिथून येत होतो आम्ही...पण सरांची गाडी बंद पडली आहे..आम्ही आत्ता सोनरे गावच्या किनाऱ्यापाशी आहोत बाबा"
"ठीक आहे बेटा तुम्ही थांबा तिथेच मी बघतो काहीतरी सोय" असे म्हणत त्यांनी फोन ठेवला.

"अमृता, तुला नक्की काही प्रॉब्लेम नाही ना माझ्या सोबतीत?"
"असे का विचारता आहेत सर?"
"मी बघ एकटाआहे. पैसे कमावणे हे मला गराजेपुरतेच जमेल पण म्हणून माझ्या या अशा स्वभावात तुझी स्वप्न अपुरी राहायला नकोत म्हणून बोललो"
"सर"
"नाही मला \"आशु\"म्हण"
ती लाजली " अहो नाही जमणार मला ते"
"प्रयत्न तर कर"
लाजत डोळे मिटत तिने हिम्मत करत "आशु" अशी हाक मारली आणि पटकन त्याला बिलगली.

"आशु, व्यक्ती हा फक्त महत्वाचा असतो बाकी सगळे असते टेबअवडंबर. मला तुम्ही हवे आहेत आणि जसे आहेत ते आणि तसेच! सुख हे तुमच्या सोबत असण्यात आहे ना की वस्तूंमध्ये किंवा पैशात. प्रेमाला गरज असते ती भावनेची ना की सुखसोयीची" ती फक्त बोलत होती आणि तो मनोमन सुखावून ते ऐकत होता.

आज समुद्राच्या आणि सूर्यास्ताच्या त्या साक्षीने त्या दोघांनी एकमेकांना स्वीकारले होते. त्यांची मने तर कधीच जुळली होती त्यांच्या एकमेकांवरील विचारांचा आणि विश्वासाचा आज प्रत्यक्षात स्वीकार त्यांनी केला होता.

क्रमशः
©®अमित मेढेकर