ओढ पंढरीची

विठू रायाची ओढ आणि त्यानेच केलेली पूर्तता
अंगणात रोज पाऊस पिंगा घालायचा. कोरड्या, भेगाळलेल्या जमिनीला केवढा ओलावा मिळत होता त्यामुळे. शुष्क झालेल्या मृत्तिकेच्या कणाकणात पावसाचा प्रत्येक थेंब जसजसा एकरूप  होत होता, तसतसा तीचा सुगंध दूरवर पसरत होता.
पंढरीच्या ओढीने जीव कासावीस होत होता, गेली पस्तीस वर्षे ह्यांच्या सोबत न चुकता वारी केलेली.
तुळशी ला डोक्यावर घेऊन मिरवत नाचत वारी करायचो.
नवीन लग्न झालेले ते एक वर्ष सोडलं तर त्यानंतर सासूबाई सोबत हट्टाने ती सावळ्याला भेटायला जायची. सासू सासरे, नणंद, दिर, जावा आणि आमचे हे. केवढा तो लवाजमा, त्यात थोरल्या दिरांची मुलं ही असायची कधीतरी. फुगड्या घालत, नाचत वारी करताना जे सुख असायचं ते कशातच नाही. तेव्हा तहान, भूक सारं काही विठ्ठलाला पाहिल्यावर शमून जायची.
पण आता मात्र मुलं पाठवत नाहीत, मन खिन्न होतं. त्यांची पण चूक नाही म्हणा, हे होते तेव्हा सोबत होती, आता कुठे एकटीला जाता येणार? असो, त्या विठुरायाची ईच्छा.
आई जेवायला या, जेवण वाढलंय. सुनेच्या हाकेने ती भानावर आली. भरलेलं ताट, आणि बसायला पाट. कसली कमी नाही ठेवलेली, पोरा सुनांनी माझ्यासाठी. सर्व कस आयत मिळतं. पण मला मेलीला हे नको ते देवाच वेड. त्याला ते तरी काय करणार.

"आई ,जेव ना". बघत काय बसली?
हो हो, जेवते की. सुनबाई वांग्याचं भरीत छान जमलं हा.
"आई, पण तुमच्या हातची चव नाही हा". अस म्हणत सुनेने अजून एक भाकरी, मी नको म्हणत असताना वाढली.पोट तर भरत होतच पण मन मात्र दुसरीकडे धावत होतं.

"आजी हे बघ, मी आज शाळेत चित्र काढलं, तुझ्या आवडीचं". नातवाच्या हातात खरच कला होती.
सोन्या रे तो माझा, किती सुंदर काढलं रे चित्र!
अगदी पंढरपूर च्या गाभाऱ्यातला माझा विठू दिसतोय रे.

अग आजी, कुठे आहे विठूराया? तू काही पण बोलते.
अग मी तर, गणपती बाप्पा च चित्र काढलंय.
सर्वजण अवाक होतात. पण त्यावेळी सुनेला सासूची तळमळ कळते, आणि ती स्वतःच्या मुलाला ओरडू लागते.
संजू चल पळ इथून आजीला जेवू दे, तू नंतर सर्व दाखवा त्यांना.
आई, जेवा तुम्ही.
पदर डोळ्याला लावत दोन घास खाऊन ती माऊली उठते.
दिवस असेच जात होते, गावातील कोणी ना कोणी वारीसाठी प्रस्थान करत होते. सध्या गावात तीच लगबग होती.
शांता, येते काय ग? आमच्या सोबत वारीला?
नको ग शामले. तू जा आपली. मागे वारीत भोवळ आलेली, तेव्हापासून नाही ग जमत.
बरं, मग आम्ही निघतो.
अर्ध अधिक गाव रिकामं झालेलं. टाळ, मृदंग, चिपळ्या ह्यांचे आवाज कानावर पडत होते. पण...नाही जाऊ शकत होती ती, भजनं म्हणायला, नाही पाहू शकत होती ती फुगड्या. कुंडीतली तुळस ही मला ने म्हणत होती, पण शक्यच नव्हतं.
आई, दोन दिवसात दादा वहिनी येणार आहेत मुंबईवरून.
काय सांगतो? अक्षय आणि कुंदा येणार?
पण अचानक कशाला? पोरांच कॉलेज असणार.
ते नाही माहीत ग आई, काही बोलले नाहीत.
बरं बरं असू दे. बघू काय म्हणतात ते.

आई, कशी आहेस? असे म्हणतच अक्षय आणि कुंदा, म्हणजेच शांताबाई चा मोठा मुलगा आणि सून पाया पडायला वाकतात.

अरे उठा दोघे, मला मेलीला काय झालंय? हा विकास आणि रेखा माझी काय कमी काळजी घेतात? तुम्ही पोरं खुश म्हणजे मी पण खुश.
चला आत, प्रवासातून दमून आला आहात. पोरं कशी आहेत तुमची? एकटी राहतील ना?
हो हो, त्यांची नको काळजी.

वाह काय मस्त फक्कड चहा? आणि गरमागरम धपाटे. आहा मस्त ताव मारणार मी.
मोठ्या दिराच्या ह्या बोलण्याने शांतेच्या धाकट्या सुनेला खूप बरं वाटलं. सर्वजण मस्त चहा नाश्ता करतात.
मोठ्या काकाने आणलेली सायकल आणि खाऊ पाहून संजू पण खुश होतो. अगदी भरलेल्या गोकुळाला ही लाजवेल अस कुटुंब हसत होत.
दिवस कधी सरला कळलं पण नाही. तुळशी पुढे दिवा लावताना, शांताबाई आपल्या मोठ्या लेकाला बोलली, आला आहेस ते आता दोन दिवस राहून जा. परवा एकादशी आहे, पंढरपूर ला नाही, निदान इथे तरी एकत्र सर्व साजरे करू.
हो हो का नाही? थांबू आम्ही. तू नको काळजी करू. फक्त एक काम कर. उद्या साठी एक सुंदर साडी आताच काढून ठेव. पहाटेला निघायचं आहे आपल्याला.
मोठ्या मुलाच्या बोलण्याने ती अचंबीत होते.
निघायचय? पण कुठे? ते पण सर्वांना म्हणजे?
आई, सांगतो सर्व, ऐक.
आई, विकास आणि रेखा  आम्हाला सांगायचे, की आई शरीराने बरी आहे पण मनाने नाही. पंढरपूर च्या सावळ्याची ओढ तीला स्वस्थ बसू देत नाही.
मग मी आणि कुंदाने इकडे तिकडे चौकशी केली, आणि पास मिळतात का ते पहिले. तर त्या विठ्ठलाच्या कृपेने हवे तसे सहा पास मिळाले. मग काय? आम्ही ठरवलं आणि आलो इकडे. विकास आणि रेखा पण तयार झाले यायला. आपली गाडी तर आहेच. उद्या पहाटे निघू आणि पर्वा संध्याकाळी येऊ.
काय सांगतोस तू? खरच जायच आपण? अस म्हणत शांताबाईने डोळे पुसले.
हो आई, चल आता आवर. तुला आम्ही वारीत जायला नाही देणार, ते पण तुझ्या वयामुळे. पण तुला तुझ्या विठलाला भेटण्यास नक्कीच मदत करणार.
"माझ्या सावळ्याची कृपा" म्हणतच शांताबाई मुला सुनांसोबत पंढरपूरला अगदी मार्गस्थ झाल्या.
पोरांनी खरच माझ्या इच्छेला मान दिला. धन्य झाले मी सावळ्या. धन्य झाले. असे मनोमन म्हणत त्याचे आभार मानत राहिल्या.
#कृष्णवेडी
सौ.प्राजक्ता हेदे