ओढ नात्यांची..

ओढ बहिणीची भावासाठी..


ओढ नात्यांची..

गोष्ट छोटी डोंगराएवढी
विषय रक्षाबंधन

" यापुढे जर तुला माझ्यासोबत संबंध ठेवायचे असतील तर तुझ्या माहेरचे तुला मेले म्हणून समज.." निखिल रागाने बोलत होता.
" अहो असे अभद्र का बोलताय? काय एवढे झाले?"
" काय झाले? साधा जावयाचा मान राखता येत नाही? एवढे मोठे लग्न केले तुझ्या भावाचे आणि मला काय दिले? एक अंगठी?"
" अहो पण, दोन वर्षापूर्वी आपले लग्न झाले तेव्हा बाबांनी किती खर्च केला. मागच्या वर्षी माझे सिझेरियन. थाटामाटात बारसे. त्याआधी वर्षभर सगळे सण. अजून किती आणि काय देणार?"
" दिले तर काय झाले? एकच तर मुलगी आहे.. कुठे वर घेऊन जाणार का तो पैसा?"
" तुम्हाला जे बोलायचे ते मला बोला. म्हणजे बोलता आहातच. पण माझ्या घरातल्यांना बोलायची काय गरज आहे?"
" बोलणार.. खूप बोलणार. आणि परत एकदा लक्षात ठेव.. यापुढे तुझे माहेर संपले." निखिल रागात तिथून निघून गेला. स्वाती एकटी तिथे रडत होती. तिच्या रडणार्‍या लेकीचा आवाज ऐकून ती उठली. तिला कुशीत घेऊन ती स्वतःशीच बोलली.. \"दुसर्‍यांच्या लेकीचे माहेर तोडताना स्वतःला लेक आहे हे मात्र विसरलास..\"
स्वाती आणि निखिल.. दोघांचेही ठरवून झालेले लग्न. त्यामुळे लग्नाआधी निखिलचा स्वभाव समजलाच नाही. नंतर मात्र त्याच्या हट्टी स्वभावाचे अनुभव येत गेले. पण यावेळेस मात्र हद्द झाली होती. स्वातीच्या भावाच्या लग्नात त्याला खूपच जास्त मानपानाची अपेक्षा होती. स्वातीच्या आईबाबांनी दिलेली अंगठी म्हणजे अपमान वाटत होता. भर लग्नातच कर्णपिशाच्चाने जणू सांगावे तसे यावेळेस स्वातीची आई तिला बोलली होती जावई काही बोलले तर मनावर घेऊ नकोस. तुझे सासर सांभाळ आधी. स्वातीपुढे दुसरा उपायच नव्हता. तिची वहिनीसोबत तार जुळली होती. माहेरी जाणे हे सुख होतेच , तसेच राहिल असे वाटत असताना निखिलने गोंधळ केला होता. तिचे माहेर बंद केले असले तरी तिचे ऑफिस तो बंद करत नव्हता. तिच्या मिळणाऱ्या भरमसाठ पगारासाठी. मग स्वातीनेही त्याच गोष्टीचा फायदा उचलायचे ठरवले. तिचे सगळे नातेवाईक तिला ऑफिसजवळ भेटायचे. प्रिशाला, तिच्या लेकीला भेटण्यासाठी त्यांचा जीव तडफडायचा.. पण काही उपाय नव्हता. निखिलचे आईवडील त्याला समजावत होते, पण तो ऐकायलाच तयार नव्हता. सगळ्यांनीच त्याच्यापुढे हात टेकले होते.
स्वाती बाहेर तिच्या माहेरच्यांना भेटते हे त्याला माहीत होते. याचा बदला म्हणून तो रक्षाबंधन आणि भाऊबीजेच्या दिवशी मुद्दाम घरी थांबून रहायचा. ना तिला बाहेर पडू द्यायचा ना स्वतः जायचा. उलट स्वतःच्या बहिणींना घरी बोलवायचा. स्वातीच्या माहेरी हे दोन सण दणक्यात साजरे व्हायचे. सख्खी, चुलत, आते, मामे सगळी भावंडे वर्षातले हे दोन दिवस जिथे असतील तिथून एके ठिकाणी ठरवून भेटत. आणि नुसती धमाल चालत असे. स्वातीचा जीव नुसता कासावीस व्हायचा पण निखिलच्या ह्रदयाला पाझर फुटायचा नाही. तिच्या आईनेही संसार तोडू नको सांगितल्यामुळे ती या कारणासाठी घटस्फोटही घेऊ शकत नव्हती. एकदोन वर्षे हे असेच सुरू राहिले. रक्षाबंधन जवळ आले म्हणून निखिलने बहिणींना फोन करायला सुरुवात केली.
" दाजी, कधी येऊ न्यायला ताईला?"
" यापुढे तुमची ताई तुम्हाला मेली. हा नंबर पण डिलीट करून टाका. याच्यापुढे इथे फोन करायचा नाही."
" अहो, पण का? काय झाले काय?"
" जास्त बोलायचे काम नाही. सांगितलेले लक्षात ठेवायचे." फोन समोरून कट झाला. हतबुद्ध निखिलने दुसर्‍या बहिणीला फोन केला. तिथे पण हाच अनुभव आला. त्याला धक्काच बसला. खरेतर त्याचे दोन्ही भावजी चांगले होते. अचानक त्यांना काय झाले तेच त्याला समजेना. त्याने कसेतरी ही बातमी त्याच्या आईबाबांना सांगितली.
"या जन्मातली पापे याच जन्मात फेडायची असतात. तू स्वातीचे माहेर तोडलंस.. त्या पापाचे भागीदार म्हणून त्याची शिक्षा आम्हाला पण मिळते आहे." आईने जळजळीत नजरेने निखिलकडे पाहिले. या वर्षी पहिल्यांदाच निखिलच्या बहिणी रक्षाबंधनला आल्या नव्हत्या. सगळ्यांचे स्टेटसला आपल्या बहिणींसोबतचे फोटो बघून आपल्या हाताला राखी नसल्याचे दुःख जास्त जाणवत होते. आज पहिल्यांदाच त्याला स्वातीचे दुःख जाणवले. \"आपण तर तिला तिच्या भावाचा फोटोही स्टेटसला ठेवू दिला नाही. त्याला आठवले त्याचे लग्न ठरले तेव्हा सुमेधची आणि स्वातीची किती मस्करी चालायची. त्या दोघांचे प्रेम समजायचे. लग्नात सगळ्यात जास्त तोच रडला होता. मग कसा राहिला असेल तो ही दोन वर्ष रक्षाबंधनच्या दिवशी बहिणीकडून राखी बांधून न घेता? त्याला आठवले स्वाती राखी बांधेपर्यंत काहीच खायची नाही. माझा भावासाठी उपवास आहे म्हणायची. गेले दोन वर्ष तिने रक्षाबंधनला काहीच खाल्ले नाही. कसे दिसले नाही आपल्याला.. दिवाळीत ती फराळालाहात लावत नसताना आपण मुद्दाम तिला चिडवून खायचो. किती वाईट वागलो आपण.. आणि आता जर दाजींनी ताई आणि अक्काला पाठवले नाहीतर आपल्याला आपली भाचरे पण दिसणार नाहीत.. मग प्रिशाला न बघता सुमेध कसा राहिला असेल?\" निखिलला स्वतःचीच लाज वाटली.
" स्वाती आवरून तयार रहा. आपल्याला बाहेर जायचे आहे." त्याने स्वातीकडे पाहिले.. तिचे डोळे रडून लाल झाले होते. तो मान खाली घालून तिथून निघाला. गाडीत बसून ते दोघे निघाले. स्वाती स्वतःच्याच विचारात दंग होती. ते दोघे घराबाहेर थांबले. आपले घर बघून स्वातीला आश्चर्य वाटले. निखिलने तिला आत जायची खूण केली. ती दाराबाहेर उभी राहिली. आत गलका चालू होता.
" ए डफर, तुला स्वीट्स आणायला कोणी सांगितले होते. तुला माहित आहे ना, स्वाती येत नाही तर आपण कोणीच गोड खात नाही." स्वातीच्या डोळ्यांना धारा लागल्या.
" ताई, राख्या तरी बांधायच्या ना?"
" नाही.. असेही हे कोणी बांधून घेणारच नाहीत. फक्त औक्षण करू. राख्या सांभाळून ठेवतील."
" कधी ग संपणार हे सगळे ताई?" एक रडवेला आवाज आला.
" अग, आपली एक बहिण तिकडे एकटी असताना आपल्याला सण तरी सुचेल का? आपण भेटतो तेच खूप आहे." हे ऐकून स्वातीला रहावले नाही. ती आत घुसली. सगळे तिला बघून आनंदाने ओरडले. सगळेच हसत हसत रडायला लागले. अनेक वर्षांनी त्यांची रक्षाबंधन साजरी होत होती. निखिलने सगळ्यांची माफी मागून सगळ्यांना मिठाई भरवली. त्याला आश्चर्य वाटत होते या गोंधळातही प्रिशा न घाबरता सगळ्यांकडे जात होती. त्यांना ओळखत होती..
" तू यांना कशी ओळखतेस?" त्याने न राहवून विचारले..
" तुम्ही नसताना आई रोज रडत या मामा मावशींचे फोटो दाखवायची.. मला हे सगळेच माहित आहे.."
निखिल घरी आला. उद्या जाऊन दाजींची माफी मागायची असा तो विचार करत होता. तर घरी दोघीही बहिणी, दाजी आणि भाचे आले होते..
" काय मग कशी झाली रक्षाबंधन?" ताईने विचारले..
" म्हणजे?"
"त्याचे काय आहे सालेसाब, तुम्ही सरळ भाषेत ऐकत नव्हता म्हणून जरा कडू गोळी दिली."
" मग काय? तुझ्या फालतूच्या रागापायी स्वातीवर अन्याय केलास तू. दरवर्षी तिचे लाल डोळे आम्हाला बघवायचे नाहीत. अरे सणासुदीला भाऊ असतानाही त्याला राखी बांधायची नाही, औक्षण करायचे नाही. त्या बहिणीला काय त्रास होतो ते तिला आणि तिच्या भावालाच माहित." अक्का म्हणाली..
स्वातीने दोन्ही नणंदाना मिठी मारली..
" थॅंक यू ताई.. तुमच्यामुळे मला माझे माहेर परत मिळाले."
" थॅंक यू काय.. उलट आम्हाला माफ कर. दोन वर्षांनी हे केल्याबद्दल."

आई आपल्या एका छोट्याश्या नाटकाने स्वातीचे माहेर परत मिळाले या आनंदाने डोळे पुसत होती..


कथा कशी वाटली नक्की सांगा..
सारिका कंदलगांवकर
दादर मुंबई