ओढ मातृत्वाची

मातृत्वाची कथा

शितल ठोंबरे......(हळवा कोपरा )

ओढ मातृत्वाची 

रमेश आणि नेहा च्या लग्नाला आज दहा वर्ष पूर्ण झाली.रमेश एका बँकेत मॅनेजरच्या पोस्ट वर तर नेहा शाळेत शिक्षिका.राजाराणी चा सुखाचा संसार चालला होता ;पण या राजाराणीच्या संसारात एकच कमी होती, त्यांच्या संसारवेली अजून फूल उमललं नव्हतं. सर्व डाॅक्टरी उपाय केले.दोघांच्या ही चाचण्या झाल्या पण काही उपयोग झाला नाही.डाॅक्टरांनी सांगितले दोष दोघातही नाही.आज नाही तर उद्या तुमच्या घरात पाळणा नक्की हलेल आणि तो एक चमत्कारच असेल पण तो आज उद्या रमेश आणि नेहाच्या आयुष्यात डोकवायला काही तयार नव्हता.लग्नाला दहा वर्षे पूर्ण झाली वरवर आनंदी, सुखी दिसणारी दोघंही आतून आपल्या बाळाच्या चाहुलीसाठी झुरत होते.डाॅक्टरांचे सर्व उपाय करून थकल्याने अखेर घरच्यांच्या आग्रहाखातर त्यांनी देवधर्म सुद्धा करुन पाहिले.पूजाअर्चा केल्या.नवसायास  केले.सर्व जागृत देवस्थानांच्या पायरया झिजवल्या पण पदरी पडली ती फक्त निराशा.

सर्व प्रयत्न करुन नेहा आणि रमेश हताश झाले. आपल्याला मूलं होणार नाही कदाचित देवालाही आपल्याला आईबाप होण्याच सुख द्यायच नाही असा विचार करून दोघानीही हार मानली.अश्यातच नेहाच्या अगदी जवळच्या मैत्रिणीने तिला बाळ दत्तक घेण्याबद्दल सुचवल.तेव्हा नेहा म्हणाली,' अगं हा विचार  मी आणि रमेशने कधी केलाच नाही कारण आम्हाला आमचं मूलं हव होत.आज न उद्या आपणही आई बाबा होऊ या आशेवर जगत होतो ग आम्ही.आपल बाळ या जगात येईल, ते बाळ ज्यात आमचा अंश असेल.पण आमचं बाळ बहुतेक आमच्या नशीबात नाही.'अस म्हणून नेहाला रडूच कोसळल.तिने आजवर आपल मन रमेश शिवाय कोणा पुढेच मोकळं केल नव्हतं पण आज तिला तिच दुःख अनावर झाल.मैत्रिणीने तिला दिलासा दिला आणि आपल्या सल्ल्यावर विचार करण्यास सांगितले.

बाळ दत्तक घेण्याचा विचार दिवसभर नेहाच्या मनात रुंजी घालत होता.संध्याकाळी घरी जाताच याबद्दल बोलायच अस तिने मनाशी पक्कं केल.घरी जाताच तिने रमेशला आपला विचार बोलून दाखवला.दोघानी यावर रात्रभर चर्चा केली.कोणताही निर्णय घाईत न घेता पूर्ण विचारांती घेण्याच ठरवल. बाळ दत्तक घेण्याचा निर्णय पक्का होताच ते आपल्या फॅमिली डॉक्टर ला भेटले.त्यांंच्या मदतीने एका अनाथाश्रमात गेले.आईबापाविना पोरकी असलेली अनेक मुले त्या ठिकाणी त्यानां भेटली.एकिकडे आपण मातृत्वाच्या सुखासाठी आसुसलेलो आहोत,तर दुसरीकडे जन्मदात्यांनीच या पोरांना अस वारयावर सोडलय.ती मूलं,त्यांचे ते केविलवाने चेहरे पाहून नेहा आणि रमेशच हृदय पिळवटल.त्यांना समजेना इथे निष्ठूर कोण आहे? ईश्वर की मनुष्य.

अनाथाश्रमात दोन दिवसापूर्वीच दिड महिन्याची मुलगी दाखल झाली होती.तिला पाहून नेहा आणि रमेश ने निश्चीत केल हिलाच दत्तक घ्यायच.अनाथाश्रमाचे सर्व सोपस्कार पार पाडून त्यानी बाळ आपल्या ताब्यात घेतलं.मोठ्या थाटामाटात त्यानी तिचा गृहप्रवेश केला.नामकरण विधी करून तिच जान्हवी नाव ठेवण्यात आल.नेहा आणि रमेश च्या संसार वेलीवर अखेर जान्हवी नावाच फूल बहरल.या फूलाने आपल्या सुगंधाने सर्व घर मोहून टाकलं.तिच्या रडण्याने घर दुमदुमल.घराला खरया अर्थाने आज घरपण आल.जान्हवी ला सांभाळण्यासाठी नेहाने  नोकरीही सोडली.जान्हवीच सर्व काही करण्यात नेहा आणि रमेश हरवून गेले.आपल बाळ आपल्या हातात खेळतय यासारख दुसर सुख कोणते?नेहा आणि रमेश आईबाबाची भूमिका भरभरून जगू लागले.
आज जान्हवीचा पहिला वाढदिवस. मोठ्या थाटामाटात करायचं ठरवला त्यांनी.पै पाहुणे आले.नेहा आणि रमेश च सुख पाहून सगळे आनंदले.सगळ्यांनी या सुखी कुटुंबाला भरभरून आशीर्वाद दिले.केक कापण्या साठी उभे राहिले असताना नेहाला अचानक भोवळ आली.वाढदिवसाच्या तयारीत जरा जास्तच दगदग झाली म्हणून भोवळ आली असेल असा समज सगळयांचा झाला. नेहा ला शुद्धीवर आणून कसाबसा वाढदिवस साजरा केला.

रात्री उशिरापर्यंत पाहुणे आपापल्या घरी निघून गेले.आता फक्त नेहा,रमेश,जान्हवी आणि रमेशची आई जी गावाहून आली होती एवढेच राहिले.दुसरया दिवशी रमेश कामावर गेला पण इकडे नेहा ला दिवसभर खूप अस्वस्थ वाटत होत आज दिवसभर तिला उलट्या ही होत होत्या.संध्याकाळी रमेश कामावरुन येताच नेहाला घेऊन डाॅक्टर कडे गेला.डाॅक्टरने नेहाला तपासले आणि सोनोग्राफी करायला सांगितले.सोनोग्राफीचे रिपोर्ट आले नेहा आई होणार होती.त्यांचा आनंद गगनात मावेना.आकाशही या क्षणी त्याना ठेंगण वाटू लागल.डाॅक्टर म्हणाले तेच खर झालं. चमत्कार खरचं हा त्यांच्या साठी एक चमत्कारच होता.मातृत्वानेच मातृत्वाच सुख दिल.दोघेही खूप खुश होते. घरी जाताच त्यांनी ही आनंदाची वार्ता रमेश च्या आईला दिली.रमेश ची आई मूल दत्तक घेण्याच्या आधीपासूनच विरोधात होती.पण मुलगा आणि सूनेपुढे तिच काहि चालल नाही.नेहाची आई होण्याची बातमी ऐकताच त्या म्हणाल्या," आता खरया अर्थाने आपली वंशवेल वाढेल.जान्हवीत कितिही केल तरी तुमच रक्त नाही.मी तर म्हणेन तुमचं स्वताच मूल झाल्यावर तुमच जान्हवी कडे दुर्लक्ष होईल.मग तुम्ही तिला जिथून आणली तिथे सोडून का नाही देत."

नेहा आणि रमेश ला धक्काच बसला आणि आईच्या बोलण्याचा रागही आला.जवळच खेळत असलेल्या जान्हवीला त्यानी आपल्या जवळ बोलावल.इवली इवली पावल टाकत जान्हवी आपल्या आई बाबांजवळ गेली.आ आ आ करत दोघांना बिलगली.दोघानी जान्हवीला घट्ट मिठी मारली." जान्हवी तूच आमचं पहिलं मूलं आहेस. तुझ्यामूळे आम्ही आई बाबा झालो.हा तुझाच पायगगुण आहे की या घरात पुन्हा एकदा पाळणा हलणार.तुझ्या सोबत खेळायला कोणीतरी येणार.तू आमच्या आयुष्यात आलीस आणि आम्हाला जगण्याच कारण दिलस. तुझी जागा कोणीच घेऊ शकणार नाही आम्ही ती कोणाला देणार ही नाही".
           आणि काही महिन्यातच एक आनंदी,हसर चौकोनी कुटुंब पूर्ण झाल......

(कथा आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर पण लेखिकेच्या नावासहीत...)