ऑड वाट (भाग-९)

Inspirational story of marathi medium girl.

ऑड वाट (भाग-९)

© प्रतिक्षा माजगावकर 

(सदर कथा पूर्णतः काल्पनिक असून, कथेतील नावे, घटना, स्थळे याचा वास्तवाशी काहीही संबंध नाही. काही संबंध आढळल्यास तो निव्वळ योगायोग समजावा.)
*************************
निशा तर तिच्या घरी गेली पण, हेमाच्या डोक्यात आता सगळा रजिस्ट्रेशन चा विचार घुमत होता! विचारा विचारात कधी संध्याकाळ झाली समजलं नाही.... निशा पुन्हा हेमाच्या घरी आली... 

"ए.. तू तर माझ्या सकाळच्या बोलण्याचा खूपच विचार करतेस! अगं एवढा नको विचार करुस... जे होईल ते चांगल्यासाठी! चल आता जेनिका दिदींना फोन करूया..." निशा हेमाला विचारत गढलेलं बघून म्हणाली. 

"हो... थांब मी करते फोन." हेमा मोबाईल हातात घेत म्हणाली.

एवढ्यात समोरून जेनिकाचाच व्हिडिओ कॉल आला. 

"हॅलो! शंभर वर्ष आयुष्य आहे तुम्हाला! आत्ता आम्ही तुम्हालाच फोन करत होतो..." निशा म्हणाली. 

"Ohh My god 100 years life!" जेनिका हसत हसत म्हणाली. 

"हो भारतात तुम्हाला हीच समजूत पाहायला मिळेल... ज्या व्यक्तीची आपण आठवण काढली आहे तीच व्यक्ती जर समोर आली तर असं म्हणतात..." हेमा म्हणाली. 

"ओके... Now tell me गेस्ट ना सगला आवडला ना?" जेनिका ने खूप उत्साहात विचारलं. 

"हो! ते खूप खुश झाले... पुढच्या वेळी सणाला नक्की या म्हणून आम्ही सांगितलंय त्यांना." निशा म्हणाली. 

"Very good! Keep it up... मला पन मेसेज आला त्यांचा... खूप एन्जॉय केला असा बोलले ते... पन, मला तुमच्या फेस वरचा हॅपीनेस बघायचा होता..." जेनिका अगदी आपुलकीने बोलली. 

निशा आणि हेमाने तिच्या कडे बघून एक छान स्माईल दिली... 

"असाच काम करा... आनि काहीपन हेल्प लागला तरी मला ऑर जॉन कोनाला पन कॉन्टॅक्ट करा..." जेनिका म्हणाली. 

"हो दिदी... Actually आत्ता आम्हाला एक हेल्प हवी आहे..." हेमा ने विषय काढला. 

"बोल ना... How can I help you?" जेनिका ने विचारलं. 

"ते आम्ही दोघी विचार करत होतो, हा बिजनेस आता लिगली रजिस्टर करूया... त्यासाठी काय काय करावं लागेल याचा सल्ला हवा होता..." हेमा ने विचारलं. 

"ग्रेट! पन मी आता हेच बोलेन थोडा थांबा... मी जॉन ला आज तुमचा पॉईंट ऑफ व्हियु बोलते... तो राईट सजेशन करेल..." जेनिका म्हणाली. 

"ओके चालेल... आम्ही हे सगळं दिवाळीत करायचा विचार केलाय... म्हणजे दिवाळीचा पाडवा एक शुभ मुहूर्त मानला जातो त्या दिवशी सगळं करता आलं तर बरं होईल." निशा म्हणाली. 

"ओके... I'll contact you before that.." जेनिका म्हणाली. 

नंतर थोडावेळ विल्सन कुटुंबियांच्या ट्रिप बद्दल बोलणं झाल्यावर हेमा ने फोन ठेवला. 

"आता खरंच बरं वाटतंय... जेनिका दिदींना आपण आपलं मत सांगितलं ना ते एकंदरीत बरं झालं! आता बघूया काय करायचं ते..." हेमा निश्चिन्त होत म्हणाली. 

"हो! बरं ऐक, विल्सन कुटुंबीय पोहोचल्यावर मेसेज करणार होते ना? आला का मेसेज?" निशा ने विचारलं. 

"अगं हो गं! अजून काही मेसेज नाही आला... मीच करू का मेसेज?" हेमा ने विचारलं. 

"हो कर..." निशा ने सुद्धा सहमती दर्शवली. 

हेमा ने रिम्पल ला 'पोहोचलात का?' म्हणून मेसेज केला... थोड्याच वेळात समोरून रिप्लाय आला; "Just we reach our home safely! Thank you for caring."

"निशा हे बघ आला त्यांचा मेसेज पोहोचले ते..." हेमा निशाला मेसेज दाखवत म्हणाली. 

"चला बरं झालं!" निशा म्हणाली. 

नंतर दोघी थोडावेळ गप्पा मारत बसल्या. तेवढ्यात पुन्हा रिम्पल चा मेसेज आला... त्यांनी तिथे जे काही अनुभवलं होतं त्या फोटोंचा व्हिडिओ बनवून त्यांनी त्यांचा review बनवून पाठवला होता... हेमाने निशाला सुद्धा तो व्हिडिओ दाखवला... "Thank you very much" असा रिप्लाय सुद्धा केला आणि त्यांच्या परवानगी ने तो पोस्ट सुद्धा केला. 

"चला मॅडम... आता मी निघते... पुढचा काही रिस्पॉन्स येई पर्यंत आपण दिवाळीची तयारी करू... मला खात्री आहे दिवाळीत नक्की जास्त काम मिळणार..." निशा म्हणाली. 

"तुझ्या तोंडात साखर पडो... भेटूच उद्या." हेमा म्हणाली. 

आता या सगळ्यात रात्र झालीच होती... आता अजून काय काय करता येईल याच्या विचारातच ती झोपली! दुसऱ्या दिवशी सगळी कामं आटोपल्यावर निशा आलीच! दोघी काय काय करता येईल याचा विचार करत बसल्या. दिवाळीच्या वेळी गेस्ट कसे जास्त एन्जॉय करतील याची आखणी झाली... तीन दिवस असेच गेले... चौथ्या दिवशी दुपारच्या सुमारास हेमाच्या मोबाईल ची नोटिफिकेशन टोन वाजली... 

"निशा! हे बघ.... एकदम दोन कुटुंबांचं रजिस्ट्रेशन झालंय... एक मुंबईतले आहेत आणि एक जपान मधले!" हेमा निशा ला मोबाईल दाखवत आनंदाने म्हणाली. 

"येस! खरंच आपण बरोबर निर्णय घेतला..." निशा सुद्धा आनंदात म्हणाली. 

"पण, या वेळी आता इथे एक कुटुंबं आणि तुझ्या इथे एक अशी व्यवस्था करावी लागेल... जागेचा प्रॉब्लेम होईल नाहीतर..." हेमा म्हणाली. 

"एवढंच ना! चालेल की मग... आणि आपण असे बाजू बाजूला तर राहतो... कुठे चार घरं सोडून लांब आहे..." निशा हेमाला निश्चिन्त करत म्हणाली. 

"बरं मग ते लोक दोन दिवसांनी येतायत चार दिवसाच्या मुक्कामाला तुझ्या घरी पण सगळं आवरावं लागेल ना? चल मी येते मदतीला..." हेमा म्हणाली. 

दोघी निशाच्या घरी गेल्या.... सगळ्या तयारीत दोन दिवस संपले... पाहुणे सुद्धा आले... जशी मजा जेनिका, जॉन आणि विल्सन कुटुंबीयांनी केली तशीच या सगळ्यांनी सुद्धा केली! चार दिवसात स्वतःचं घर विसरून ते गावात चांगले रममाण झाले.... निघताना छान छान आठवणींची, गावकऱ्यांच्या प्रेमाची आणि त्यांनी दिलेल्या खाऊ ची शिदोरी घेऊन खूप आनंदी होऊन घरी गेले सुद्धा! 

"किती छान वाटतं ना जेव्हा आपल्याला कोणाला तरी आनंद वाटता येतो..." हेमा म्हणाली. 

"हो! ते तर आहेच! ए हा तुझ्या आनंद वाटण्यावरून आठवलं, दिवाळी दोन आठवड्यांवर आली आहे... पुढची बुकिंग मिळे पर्यंत आपण फराळ आणि बाकी तयारी ला लागू.... भाजणीचं सामान बाजारातून आणण्यापासून तयारी आहे अजून..." निशा म्हणाली. 

"हो! चालेल मग आपण उद्या एकत्र जाऊ खरेदी ला..." हेमा म्हणाली. 

"चल मग मी येऊ... उद्या भेटूया..." निशा म्हणाली. 

"नाही! जरा दोन मिनिटं ऐक! आत्ता आपण दोन कुटुंबं होती तर निभावून नेलं पण, जर आपल्याला कॅपॅसिटी वाढवायची असेल तर आपण काय करू शकतो? म्हणजे किती दिवस फक्त दोनच फॅमिली चं रजिस्ट्रेशन स्वीकारणार? आपण जी लिमिट सेट करून ठेवली आहे त्यामुळे अजून कोणाला यायची इच्छा असेल तर त्यांना बुक च करता येत नाही... यावर काही उपाय सुचतोय का तुला?" हेमा ने तिच्या मनात असणारी सल बोलून दाखवली. 

"हे माझ्या पण मनात आलं होतं गं! पण, आपल्या बजेट बाहेर जातील सगळ्या जागा... कर्जाचे हप्ते पण परवडणार नाहीत आपल्याला..." निशा म्हणाली. 

"ते आहेच गं! शेतात जर जागा असती तर तिथे व्यवस्था लावता आली असती... तसंही आपण एरवी अंगणात झोपतो, पावसाळ्यात आपली पंचाईत होईल आणि नेमकं पावसात निसर्गाचं सौंदर्य खुलून येतं तेव्हा जास्त लोक येण्याची शक्यता आहे..." हेमा म्हणाली. 

"Be positive.. सगळं नीट होईल..." निशा हेमाला समजावत म्हणाली.

"दरवेळी चांगला विचार करणं म्हणजे पॉसिटीव्ह नाही... जी परिस्थिती आहे तीचा स्वीकार करून मार्ग शोधणं म्हणजे सुद्धा सकारात्मक विचार करणं असतं! आता यातून काहीतरी मार्ग शोधावा लागेलच!" हेमा म्हणाली. 

त्या दोघींचं हे बोलणं हेमाच्या आणि निशाच्या आई ने ऐकलं! 

"माझ्या कडे आहे तुमच्या प्रश्नाचं उत्तर..." निशाची आई म्हणाली. 

"काय?" निशा ने विचारलं. 

"तुझ्या बाबांनी एक छोटा जमिनीचा तुकडा ठेवलाय... त्यावर काही शेती होईल एवढा तो नाहीये... पण, तुझ्या लग्नाच्या वेळेला उपयोगी येईल म्हणून तो आहे अजून... तिथे काही करता आलं तर बघा..." निशा ची आई म्हणाली.

"थँक्यू आई... आज खूप मोठं टेन्शन गेलं!" निशा आनंदात म्हणाली. 

"अहो पण निशाच्या लग्नासाठी ठेवलाय ना तुम्ही तो?" हेमाच्या आई ने विचारलं. 

"आता त्याची गरज नाही... पोरगी स्वतःच्या पायावर उभी राहतेय हे महत्त्वाचं! ती आता तिच्या लग्नासाठी बचत करू शकेल..." निशाच्या आई ने सांगितलं. 

"आई! पण, या बद्दल तू कधी काही सांगितलं का नाही?" निशा ने विचारलं. 

"तेव्हा तू खूप लहान होतीस... तुला काय कळणार होतं आणि नंतर तू मोठी झालीस तेव्हा असा काही विषय निघाला नाही तर माझ्याही डोक्यातून गेलं! बरं आता उद्या आपण जमीन बघायला जाऊया... तिथे तुम्हाला काय करायचं ते करा..." निशा ची आई म्हणाली.  

"हो चालेल!" निशा म्हणाली.

"हेमा! तू का गप्प आहेस?" निशाच्या आई ने हेमाला गप्प पाहून विचारलं. 

"काही नाही... आज तुम्ही मदत केली नसती तर यातून आम्ही कसा मार्ग काढला असता? थँक्यू मावशी..." हेमा म्हणाली. 

"मावशी म्हणतेस ना? मग हे असं का बोलतेस? तू पण माझ्या लेकीसारखीच आहेस! तुम्ही दोघी जे करताय ना त्यासाठी गावातल्या कोणीही तुम्हाला मदत केली असती!" निशाच्या आई ने हेमाला समजावलं. 

हेमाने एक स्मित केलं.... 

"चला आता उद्या जमीन बघण्यात आणि तिथलं आवरण्यात दिवस जाईल... मग परवा पासून दिवाळीच्या तयारी ला लागायचं!" निशा ची आई म्हणाली. 

"हो चालेल! आपण दिवाळीत भूमी पूजन करूया तेव्हा जेनिका दिदी आणि जॉन दादांना पण बोलवूया..." हेमा म्हणाली.

"मस्त! मी पण हेच म्हणणार होते..." हेमाची आई म्हणाली.

सगळे आज खूप खुश होते... हेमा आणि निशाच्या सगळ्यात मोठ्या प्रश्नाचं अर्ध उत्तर तरी सापडलं! निशा आणि तिची आई घरी गेल्या. 

क्रमशः.... 
**************************
हेमा आणि निशा ला जागा तर मिळाली पण, त्यावर बेसिक बांधकाम कसं होणार? जेनिका आणि जॉन दिवाळीला भारतात येतील? त्यांना लिगली बिजनेस रजिस्टर करायचा आहे तो होईल? पाहूया पुढच्या भागात.... 

🎭 Series Post

View all