ऑड वाट (भाग-६)

Inspirational story of marathi medium girl.

ऑड वाट (भाग-६)

© प्रतिक्षा माजगावकर 

(सदर कथा पूर्णतः काल्पनिक असून, कथेतील नावे, घटना, स्थळे याचा वास्तवाशी काहीही संबंध नाही. काही संबंध आढळल्यास तो निव्वळ योगायोग समजावा.)
*************************
हेमा आणि निशा ने जाऊन शेतात रोपं लावायला बेसिक तयारी करून ठेवली. छान मांडणी केली आणि मग दोघी निघाल्या रोपं आणायला.... गावात एका आजोबांची नर्सरी होती... त्यांच्याकडेच सगळी रोपं मिळणार म्हणून दोघींची स्वारी तिकडे वळली... 

"आजोबा! आम्हाला ८०० रुपयांत जेवढी गुलाब आणि मोगऱ्याची रोपं येतील तेवढी द्या..." हेमा ने सांगितलं. 

"तू भुप्या ची लेक ना?" आजोबांनी हेमाला विचारलं. 

"हो! पण, तुम्ही मला कसं ओळखलं? आपण आधी भेटलोय का?" हेमा ने विचारलं. 

"तू जेव्हा बारकी होतीस तेव्हा यायचीस इथे... आणि आता तर सगळ्या गावभर ठाऊक आहे की तुम्ही दोघी कायतरी व्यवसाय करताय अन जे काही करणार आहात ते गावात राहून... म्हणून ओळखलं..." आजोबा म्हणाले. 

"हो! आम्हाला आपली भारतीय संस्कृती सातासमुद्रा पार ओळखली जावी म्हणून प्रयत्न करायचे आहेत..." हेमा म्हणाली. 

"छान छान... अशीच प्रगती करा... हि घ्या दोन्ही पंधरा पंधरा रोपं!" आजोबा ती रोपं दोघींच्या हातात देत म्हणाले. 

"अहो आजोबा! इथे जी किंमत लिहिली आहे त्या पेक्षा जास्त रोपं देताय तुम्ही..." निशा म्हणाली. 

"हो! हि जास्तीची रोपं माझा आशीर्वाद म्हणून घ्या... तुमच्या कामात माझा खारीचा वाटा! आमच्या पोरांना काही गावात राहून काम करता नाही आलं... तुम्ही दोघी आपल्या गावाचा मान वाढवणार त्या साठी शुभेच्छा स्वरूप घ्या हि रोपं!" आजोबा अगदी प्रेमाने जास्तीची रोपं देत म्हणाले. 

"थँक्यू आजोबा... आम्ही नक्कीच आपल्या गावात जे काही चांगले बदल करता येतील ते करू... असेच तुमचे आशीर्वाद राहूदे..." हेमा म्हणाली. 

आजोबांनी सुद्धा हात वर करून दोघींना आशीर्वाद दिले... दोघी पुन्हा शेतात आल्या... रोपांची लागवड करायला सुरुवात झाली... 

"सगळे किती आशेने आपल्याकडे पाहतायत, सगळ्यांचा खूप विश्वास आहे आपल्यावर... आपण त्यांना नक्कीच चांगले बदल घडवून दाखवायचे आणि एक नवीन आदर्श समोर मांडायचा...." निशा म्हणाली. 

"हो! आपण गावात राहून सुद्धा जी काही साधनं गावात उपलब्ध आहेत त्यातून सुद्धा काहीतरी छान करू शकतो हे सगळ्यांना समजलं पाहिजे... पैसे कमवायला फक्त मोठ्या शहरात जावं लागतं हि समजूत आपण मोडीत काढायची... हे रोप बघ कसं लावेल त्या जागी मोठं होतं! जिथे सूर्यप्रकाश असेल त्या बाजूला झुकून पण, स्वतःच्याच जागेवर... अगदी तसंच आपण करायचं!" हेमा रोप मातीत लावत म्हणाली. 

"एकदम बरोबर बोललीस.... चल आता आपण आपलं काम उरकुया मग पुन्हा वडाच्या पारंभ्या एकत्र करून त्याचा झोपाळा करायचा आहे...." निशा सुद्धा रोप मातीत रुजवत म्हणाली. 

व्यवस्थित रांगेत रोपं लावून झाल्यावर दोघींनी मिळून त्यांना पाणी घातलं, वडाच्या पारंभ्या एकत्र बांधून त्याचे झोपाळे केले आणि रस्त्याने बिट्ट्या गोळा करत दोघी घरी आल्या.... असेच तयारीत दोन दिवस कधी संपले कळलं नाही... विल्सन फॅमिली गावात येण्याचा दिवस उजाडला! त्यांना भारतातील सार्वजनिक वाहतुकीचा सुद्धा अनुभव हवा असल्यामुळे ते मुंबई वरून बस ने गावात येणार होते... हेमा ने त्यांना गावाचे नाव आणि स्टॉप नंबर मेसेज करून ठेवला होताच! पाहुणे कधीही येतील म्हणून गावकरी सुद्धा पटापट तयारीला लागले... त्यांच्या स्वागतासाठी हार आणि तोंड गोड करायला हलवाई काकांनी पेढे आणले... गावचे सरपंच हेमा, निशा आणि तिच्या बाबांबरोबर बस स्टॉप वर त्यांना आणायला गेले... गावातली लहान मुलं ढोल घेऊन त्यांच्या मागे गेली... 

"पोरींनो सगळी व्यवस्थित तयारी केली आहे ना तुम्ही?" गावचे सरपंच हेमा आणि निशा कडे बघत म्हणाले. 

"हो सरपंच काका... नका काळजी करू..." हेमा म्हणाली. 

"काळजी नाही गं! तुमच्या दोघींवर सगळ्या गावाचा विश्वास आहे... पण, पहिल्यांदा विदेशातून आपल्याकडे पाहुणे येतायत... म्हणून म्हणलं... काहीही मदत लागली तरी नक्की सांगा." सरपंच म्हणाले. 

एवढ्यात मुंबई वरून येणारी बस आली. पाहुणे आले पाहुणे आले.. सगळ्यांनी एकच गोंधळ केला... बस थांबल्यावर पाहुणे खाली उतरले. सरपंचांनी त्यांच्या गळ्यात हार घातला, मुलांनी ढोल वाजवायला सुरुवात केली आणि हलवाई काकांनी त्यांना पेढे दिले... 

"Welcome to India and our village Aamgaon." हेमा म्हणाली. 

"सुस्वागतम्! आमगाव चा सरपंच या नात्याने मी तुमचं आमगाव मध्ये सहर्ष स्वागत करत आहे..." सरपंच फुलांचा गुच्छ त्यांच्या हातात देत म्हणाले. 

"Please come with us." निशा म्हणाली. 

हेमाच्या बाबांनी आणि दोन गावकऱ्यांनी त्यांचं सामान घेतलं. हेमाच्या घराबाहेर आल्यावर हेमाच्या आई ने त्यांच्या पायावर पाणी घातलं, चूळ भरायला पाणी दिलं आणि एक भाकर तुकडा ओवाळून टाकला... ते चौघं तिथे असलेल्या खाटेवर बसले.... निशा ने पटकन जाऊन तांब्या भांडं आणि वाटीत गुळ आणला. 

"गुळासोबत पाणी पिलं की ठसका लागत नाही... आधी गूळ तोंडात टाका आणि मग पाणी प्या." हेमाची आई म्हणाली. 

"Okey!" रॉबिन म्हणाला. (Mr. Wilson)

"तुम्हाला पण मराठी येतं का? बरं झालं!" हेमा एक सुटकेचा निश्वास सोडत म्हणाली. 

"No! No! I'm only able to understand Marathi." रॉबिन म्हणाला. 

"ओके... तुम्ही आता पाच मिनिटं बसा... तोपर्यंत आम्ही तुमच्या नाश्त्याचं बघतो.." हेमा म्हणाली. 

विल्सन कुटुंबीय आपापसात बोलत होते... तिथे निशा होतीच! निशाने तिची आणि बाकी काही गावकऱ्यांची ओळख करून दिली... त्यांचीही नीट ओळख करून घेतली आणि रॉबिन ची दोन मुलं; जेनी आणि जॅक शी गप्पा मारत बसली. एवढ्यात हेमा आणि तिची आई नाश्ता घेऊन आल्या! चहा सोबत तांदळाचे गरम गरम घावने तव्यावरून सरळ ताटात येत होते... चौघांनी मस्त पोट भर खाऊन घेतलं... 

"Wow Mom! So delicious... I like it!" जेनी तिच्या आई ला म्हणाली. 

"Say Thank you to that ma'am.. she made this..." जेनी ची आई जेनी ला म्हणाली. 

"तुम्ही आमच्या पैकी कोणालाच मॅडम नका म्हणू... ते खूप फॉर्मल होतं! इथे भारतात तुम्हाला सगळीकडे घरच्या सारखंच वातावरण दिसेल! मामा - मामी, काका - मावशी, काकू, आत्या, ताई किंवा दिदी असं काहीतरी म्हणायला सांगा या छोट्या पिल्लांना!" निशा जेनी च्या डोक्यावर हात फिरवत म्हणाली. 

रॉबिन आणि जेनी ची आई (रिम्पल) आपापसात काहीतरी बोलले... 

"Okey! Jenny say thank you to Aunty and hema didi.." रिम्पल म्हणाली. 

"Thank you" जेनी गोड हसत दोघींना थँक्यू म्हणाली. 

"तुम्ही आजच आला आहात तर आज पूर्ण दिवस आराम करा.. उद्या पासून आपण गावात फिरू..." हेमा म्हणाली. 

रिम्पल आणि रॉबिन ने अंगठा उंचावून चालेल म्हणलं... पण, या दोन लहान मुलांना कुठे गप्प बसवतं! त्या दोघांना मनोरंजन म्हणून गावातल्या काही लहान मुलांना त्यांच्याशी खेळायला बोलावलं... सगळे तिथेच अंगणात बसून त्यांच्याकडे पाहत होते... निशा, हेमा आणि इतर मुलं त्या दोघांना गोट्या, लंगडी, दोरी उडी खेळायला शिकवत होते... दोघांनी खूप एन्जॉय केलं... पण, सवय नसल्यामुळे दोघं लवकर दमले आणि त्यांच्या आई - बाबांजवळ येऊन बसले... निशा ने त्यांना लिमलेट आणि श्रीखंडच्या गोळ्या खायला दिल्या... थोड्याच वेळात त्या दोघांची हेमा आणि निशाशी चांगलीच गट्टी जमली.... आजचा दिवस असाच गप्पा आणि ओळखीत गेला... प्रवासाच्या दगदगीमुळे पचायला हलकं जावं म्हणून रात्री मुगाच्या डाळीच्या खिचडीचा बेत होता... 

"चला आता जेवायला या..." हेमाच्या आई ने सगळ्यांना बोलावलं. 

निशा ने त्यांना बसायला सतरंजी अंथरली... चौघं येऊन बसले... गरम गरम खिचडी, त्यावर तुपाची धार, भाजलेला पापड, कांदा - टोमॅटो ची कोशिंबीर आणि कैरीचं लोणचं! असं सगळं पान सजलं... पापड आणि लोणचं तोंडी लावत सगळ्यांनी खिचडी फस्त केली... लहानग्या जेनी आणि जॅक ला सुद्धा तूप घातलेली खिचडी फार आवडली... जेवणं झाल्यावर बरोबर झोपायच्या अर्धा तास आधी हेमाची आई दूध हळद घेऊन आली.... 

"Ee.. we don't like milk..." जॅक, जेनी कडे बघत तोंड वाकडं करत म्हणाला. 

"No! That's not milk.. test it.. you are good boy or bad boy?" हेमा त्याला समजावत म्हणाली.

जॅक आणि जेनी ने चमच्याने एक एक घोट पियून बघितलं! त्यांना दुधाची चव लागलीच नाही... त्यांना ते फार आवडलं आणि दोघांनी पटकन पूर्ण कप संपवला... थोड्याच वेळात दोघं झोपले... 

"You do a miracle! Jack and Jenny even don't like a smell of milk..." रिम्पल म्हणाली. 

"यात काही मिऱ्याकल नाहीये.... हे घरचं ताज दूध आहे... त्यात खडीसाखर, हळद टाकल्यामुळे त्याला छान चव येते त्यामुळे दोघांना हे दूधच आहे हे समजलं नाही..." हेमा म्हणाली. 

"Okey!" रिम्पल म्हणाली. 

"चला आता लवकर झोपा... उद्या लवकर उठायचं आहे, व्यायाम करायचा आणि मग फिरायला जायचं... काय आणि कसं ते उद्याच समजेल..." निशा म्हणाली. 

"We are excited for tomorrow... Good night!" रॉबिन म्हणाला.

बाहेर अंगणातच अंथरूण घातलं होतं! डास चावू नये म्हणून बाजूला कडुलिंबाच्या पाल्याचा धूर केलेला होता... मधेच येणाऱ्या हवेच्या गार झुळकीने त्यांना छान झोप लागली.... दुसऱ्या दिवशी हेमा, तिची आई आणि बाबा लवकर उठले आणि त्यांचं आवरून घेतलं! निशा सुद्धा लवकर आली... अजूनही पाहुणे उठत नाहीत म्हणून हेमाने त्यांना हाक मारून उठवलं... 

"Good morning! After so long time we got peaceful sleep!" रॉबिन म्हणाला. 

रिम्पल ने सुद्धा त्याच्या बोलण्याला सहमती दर्शवली.... नंतर त्यांनी मुलांना पण उठवलं आणि आवरून आले... 

"आज आता चहा नाश्त्या आधी व्यायाम करायचा आहे... मग अर्ध्या तासाने बाकी सगळं!" निशा म्हणाली. 

हेमा आणि निशा ने मिळून त्यांच्याकडून सूर्य नमस्कार आणि काही योगासनं करून घेतली आणि त्याचं महत्व सुद्धा सांगितलं! नंतर तुळशीला पाणी घालून पूजा, अंगण सारवणे, त्यावर सडा आणि रांगोळी सुद्धा काढायला थोडं थोडं शिकवलं... तोवर निशाची आई गरमा गरम चहा आणि उपमा घेऊन आली.... 

क्रमशः.....
***************************
विल्सन कुटुंबीयांचा गावातला पहिला दिवस सुरु झाला आहे.... त्यांना सुद्धा हे सगळं करायला मजा येतेय... हेमा आणि निशा चा हेतू हळूहळू पुढे सरकतोय.... पूर्वापार चालत आलेली भारतीय संस्कृती मोठी करणं, गावात राहूनच स्वतःचं अनोखं करियर करणं, स्वतः बरोबर सगळ्यांना मोठं करणं हा प्रामाणिक हेतू घेऊन दोघी कामाला लागल्या आहेत! आता आठवडाभर हे विल्सन कुटुंबीय भारतीय संस्कृती विषयी काय काय शिकतील आणि हेमा ने हि ऑड वाट का निवडली असेल याची दुसरी बाजू पाहूया पुढच्या भागात... तोपर्यंत तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळवा... 

🎭 Series Post

View all