ऑड वाट (भाग-४)

Inspirational story of marathi medium girl.

ऑड वाट (भाग-४)

© प्रतिक्षा माजगावकर 

(सदर कथा पूर्णतः काल्पनिक असून, कथेतील नावे, घटना, स्थळे याचा वास्तवाशी काहीही संबंध नाही. काही संबंध आढळल्यास तो निव्वळ योगायोग समजावा.)
*************************
आज सुद्धा सगळे चांदण्यांच्या सहवासात बाहेरच झोपले! दुसऱ्या दिवशी हेमा ची आई नेहमी पेक्षा जरा लवकरच उठली! पाहुण्यांना एवढ्या लांब जायचंय तर सगळं अगदी नीट पार पडावं म्हणून लवकर कामाला लागली! 

"Good morning! शांत झोप झाली ना?" हेमा ने जेनिकाला उठताना बघून विचारलं. 

"Good morning! Yes, जाला आमचा जोप!" जेनिका म्हणाली. 

जेनिका आणि जॉन त्यांचं आवरायला गेले... ते दोघं लगेच निघणार म्हणून हेमाच्या आई ने तयारी करून ठेवलेलीच होती! 

"हे घ्या! चहा आणि हे मस्त गरमा गरम कांदा पोहे! पोट भर खाऊन घ्या... नाहीतर प्रवासात सारखी भूक लागेल." हेमाची आई त्यांना चहा नाश्ता देत म्हणाली. 

"हो! तुमी नका टेन्शन घेऊ! फ्लाईट मदे खायला देतात..." जॉन म्हणाला. 

"हो का! मग ठीक आहे... पण, घरचं खाल्लेलं चांगलं! तुम्ही खावा..." हेमाचे बाबा म्हणाले. 

त्या दोघांनी फक्त मानेने हो म्हणलं आणि स्मित करून नाश्त्याला सुरुवात केली.... 

"चला uncle, aunty आमी आता जातो..." जॉन म्हणाला. 

"एक मिनीट! जेनिका जरा बसा इथे..." हेमाची आई जेनिकाला पाटाकडे बोट दाखवत म्हणाली. 

जेनिका पाटावर बसली.... हेमाच्या आई ने तिची ओटी भरली. 

"Aunty, हे काय आहे?" जेनिका ने विचारलं. 

"भारतीय संस्कृती प्रमाणे घरातून सवाष्ण निघताना तिची ओटी भरतात... शुभ असतं ते! आणि जॉन तर आता मुलासारखे म्हणजे तुम्ही आमच्या सुनबाई ना!" हेमाची आई म्हणाली. 

"Means?" जेनिका ने विचारलं. 

"सवाष्ण म्हणजे married women! आणि सुनबाई म्हणजे Daughter in law" हेमाने सांगितलं. 

"ओके.. चला आता आमी जातो... बाय" जेनिका बॅग हातात घेत म्हणाली. 

"जातो नाही, येतो म्हणावं! आणि हे घ्या दही साखर..." हेमाची आई दोघांच्या हातावर दही साखर देत म्हणाली. 

"ओके... आमी येतो.. बाय uncle, aunty... हेमा, निशा आमचा कॉन्टॅक्ट मदे राहायचा... जेवा तुमचा ऑफिस ओपन करनार तेवा आमी पन येनार! ओके?" जॉन म्हणाला. 

"हो नक्कीच! कधीतरी सणाच्या वेळी सुद्धा या... तुम्हाला खूप आवडेल इथे..." निशा म्हणाली. 

"Ya! Sure!" जेनिका म्हणाली. 

ते दोघं जायला निघाले.... हेमाचे बाबा त्यांना थोडं पुढ पर्यंत सोडायला गेले... हेमाची आणि निशाची आई पुन्हा त्यांच्या रोजच्या कामाला लागल्या. हेमा आणि निशा तिथेच गप्पा मारत बसल्या. 

"हे दोन दिवस आले पण, आपल्याला एक नवीन मार्गच दाखवून गेले ना!" हेमा निशाला म्हणाली. 

"हो गं! आपण एवढा मोठा निर्णय घेतलाय, घरी सुद्धा बोलून दाखवलं आहे पण आता सुरुवात कुठून आणि कशी करायची?" निशा ने विचारलं. 

"काल आता आपण review चा व्हिडिओ पोस्ट केला ना? आता पुढे आपण गावात काय काय धमाल करता येते, काय काय असतं जे शहरात अनुभवायला मिळत नाही किंबहुना भारताशिवाय दुसरीकडे अनुभवता येत नाही या बद्दल ३० सेकंदाचे व्हिडिओ काढायचे..." हेमा म्हणाली. 

"हो चालेल! आत्ताच लागूया कामाला..." निशा सुद्धा उत्साहात म्हणाली. 

दोघींनी आधी शेतात जाण्याचं ठरवलं... सकाळच्या वेळचं निसर्गाचं सौंदर्य मोबाईल मध्ये टिपत दोघी चालत होत्या... 

"हेमा! मला ना अजून एक कल्पना सुचतेय... बघ हा म्हणजे तुला कसं वाटतंय..." निशा विचार करत करत बोलली. 

"बोल ना... एवढा विचार का करतेयस?" हेमा म्हणाली. 

"बघ म्हणजे आता आपण टुरिस्ट चा व्यवसाय करायचा हे नक्की केलेलंच आहे तर, सगळं अगदी साग्रसंगीत करायचं! म्हणजे बघ, अगदी घरच्या दाराला नवीन तोरणांपासून ते शेतात सुद्धा काही नवीन करता येईल का हे पाहू आपण..." निशा ने तिची कल्पना बोलून दाखवली. 

"हो गं! छानच कल्पना आहे! मी एकदा टीव्ही वर ऐकलं होतं, शासनाच्या उपक्रमामधून आपण शेतातली माती टेस्टिंग ला देऊ शकतो आणि त्या मातीत कोणतं पीक चांगलं येईल त्या नुसार लागवड केली की, आपल्याला फायदा होतो! आपण मातीची टेस्टिंग करून त्यात कोणती फुलं चांगली येतील हे पाहूया... पिकांबरोबर फुलांची सुद्धा शेती होईल आणि अजून छान दिसेल शेत!" हेमा म्हणाली. 

"हो ना! आता तसंही जोवर कोणी आपण दिलेल्या लिंक वरून फॉर्म भरत नाही तोवर आपल्याला वेळ आहे ही कामं करण्याचा! आपल्याला जेवढं आपल्या पाहुण्यांना देता येईल तेवढं द्यायचं! 'अतिथी देवो भव' या संज्ञेला जागायचंच!" निशा मूठ घट्ट करून निश्चय केल्यासारखी म्हणाली. 

ठरल्याप्रमाणे दोघी कामाला लागल्या.... मृदा परीक्षणासाठी काय काय करावं लागेल, घरात छोटे छोटे कोणते बदल करता येतील, गावात अजून स्वछता कशी राखता येईल यासाठी दोघी सतत झटत होत्या... दिवसामागून दिवस चालले होते.... एक आठवडा होऊन गेला होता... 

"हेमा! मला आता भीती वाटतेय गं! बघ ना अजून एकही बुकिंग झालं नाहीये आपल्याकडे..." निशा हताश होत म्हणाली. 

"नको काळजी करुस! इकडे बघ माझ्याकडे, माझं मन मला सांगतंय लवकरच आपल्या टुरिस्ट चं पहिलं बुकिंग होणार आहे... व्यवसाय हा संयम ठेवूनच करायचा असतो गं! आत्ताशी कुठे फक्त आठवडा झालाय.... जर आपण सातत्य ठेवलं तर आपल्याला यश हे मिळणारच! आपण आपलं काम करत राहायचं! बघ, आपण जे रोज फोटो, व्हिडिओ पोस्ट करतोय त्याचा फायदा नक्की होणार! काल आपल्या गावात जी जत्रा झाली त्यानंतर आपण जे व्हिडिओ टाकले आहेत त्याचे लाईक्स बघ... भारतीय संस्कृतीला अजून मोठं करायचं, गावातल्या लहान सहान उद्योगांना चालना द्यायची हा आपला प्रामाणिक हेतू आहे ना, मग तर आपण यशस्वी होणारच! तू नको काळजी करुस! व्यवसायात कसं असतं माहितेय, आपल्याला नक्की माहित नसतं आपण कधी यशाची शिडी चढायला सुरुवात करणार आहोत! कदाचित उद्याच यश येणार असेल किंवा एक आठवड्याने पण, घाईत जर आपण सगळे प्रयत्न सोडले तर आपण आत्ता पर्यंत जे कष्ट घेतलेत ते माती मोल होतील... याचा अजून एक फायदा बघितलास का तू? गावात आता आधी पेक्षा जास्त स्वछता होतेय, सगळे शेतकरी मृदा परीक्षण करून नवीन नवीन उत्पादन घेण्याचा विचार करतायत... सगळ्यांनी आपल्यावर विश्वास टाकलाय... सगळे आपल्याला खूप पाठिंबा सुद्धा देतायत... आणि सगळ्यात महत्त्वाचं कारण; मुंबई ला आपल्याला त्या ऑफिस मध्ये इतर उमेदवारांकडून जे ऐकावं लागलं त्यांना हे एक उत्तर असेल आपल्याकडून..." हेमा निशाचा हात घट्ट धरत विश्वासाने म्हणाली. 

"हो! आता मी नाही खचणार पुन्हा! मला तू जेव्हा हा सगळा प्लॅन सांगितलास ना तेव्हाच अंदाज आला होता, तुला त्या लोकांचं बोलणं मनाला लागलं आहे आणि म्हणूनच तू पुन्हा कधीच इंटरव्यू देणार नाही असं ठरवलंस!" निशा म्हणाली. 

"हो! जाऊदे आता ते सगळं जुनं! हे बघ मी लोकरीच्या तोरणांचे काही डिजाईन्स शोधले आहेत हे आपण बनवूया.... छान वाटतील..." हेमा म्हणाली. 

एवढ्यात हेमाच्या मोबाईल ची नोटिफिकेशन टोन वाजली... हेमाने मेसेज चेक केला... 

"हे बघ निशा! एका कुटुंबाने आपल्या 'अतिथी देवो भव' मध्ये बुकिंग केलं! तीन दिवसांनंतर ची तारीख आहे... चार लोकं येणार आहेत.... तेही अमेरिकेमधून... हे बघ, त्यांनी व्हाट्सअप वर सुद्धा मेसेज केला; 'Hello! We are Wilson family! Jenika give us your reference! We will coming in India in three days for one week stay.... I hope we enjoy in your village... Thank you!' हेमाने निशाला मेसेज दाखवला... "Welcome to India, we are glad to serve you!" हेमाने रिप्लाय दिला.

"ए लगेच जेनिका ताईंना मेसेज कर ना..." निशा म्हणाली. 

"अगं मेसेज कशाला, थांब व्हिडिओ कॉल करूया..." हेमा म्हणाली. 

हेमाने लगेच जेनिका ला व्हिडिओ कॉल लावला... 

"हॅलो! कश्या आहात तुम्ही?" निशा ने विचारलं. 

"मी चान आहे... तुमी सगले कसा आहेत?" जेनिका ने विचारलं. 

"आम्ही सगळे पण छान आहोत! तुमच्या रेफरन्स ने विल्सन फॅमिली तीन दिवसांनी आठवडाभर इथे राहायला येतेय हे सांगायला फोन केला... थँक्यू तुम्ही अगदी आठवणीने आमचा रेफरन्स दिला! आमची हि पहिली बुकिंग आहे.... We will do our best!" हेमा ने खूप आनंदी होऊन अगदी कृतज्ञतेने जेनिकाचे आभार मानले. 

"That's my pleasure! Mrs. Wilson is my best friend... तिने मी इंडिया मदे किती एन्जॉय केला याचा सगळा फोटो व्हिडिओ बघितला... Then she also attracted towards Indian culture! So, मी तिला तुमचा रेफरन्स दिला! Mrs. Wilson like your way of work, pricing and all so, she immediately got ready to book with 'अतिथी देवो भव'!" जेनिका म्हणाली. 

"खरंच खूप खूप थँक्यू! तुम्हाला जमणार असेल तर पुढच्या महिन्यात या ना इथे... पुढच्या महिन्यात दिवाळी आहे... खूप धम्माल असते इथे... दिव्यांचा सण असतो तो! सगळीकडे लायटिंग, आकाशकंदिल, पणत्या आणि छान छान फराळ.... खूप मजा येते..." निशा म्हणाली. 

"Waw! We will try... जर आमाला ऑफिस मदून सुटी मिळाला तर surely येनार!" जेनिका म्हणाली. 

"ओके.. पण नक्की प्रयत्न करा हा... आणि तुमच्यासाठी दिवाळी बोनस म्हणून ती ट्रिप फ्री मध्ये..." हेमा म्हणाली. 

"Then आमी नाय येनार! प्रॉपर बुकिंग करून जर आलो तरच येनार!" जेनिका लटक्या रागात म्हणाली. 

"बरं... चालेल... पण या नक्की..." निशा म्हणाली. 

"ओके... Definitely try करनार.... आता मला ऑफिस वर्क आहे... बाय... Uncle, aunty ला हॅलो बोला... And, All the best for your first booking! Take care..." जेनिका म्हणाली. 

हेमा आणि निशा ने सुद्धा हात हलवत बाय केला... आणि फोन ठेवला... 

क्रमशः.....
*************************
आता पुढच्या तीन दिवसांत हेमा आणि निशाची पुन्हा कामाला सुरुवात होईल... यावेळी विल्सन फॅमिली ला भारतीय संस्कृतीची ओळख करून देताना कोणत्या कल्पना या दोघी वापरतील? आणि इंटरव्यू च्या दिवशी या दोघींना कोण काय बोललं असेल म्हणून त्यांनी हा असा निर्णय घेतला असेल पाहूया पुढच्या भागात... तोपर्यंत तुम्हाला आजचा हा भाग कसा वाटला हे नक्की सांगा.  

🎭 Series Post

View all