ऑड वाट (भाग-२)

Inspirational story of marathi medium girl.

ऑड वाट (भाग-२)

© प्रतिक्षा माजगावकर 

(सदर कथा पूर्णतः काल्पनिक असून, कथेतील नावे, घटना, स्थळे याचा वास्तवाशी काहीही संबंध नाही. काही संबंध आढळल्यास तो निव्वळ योगायोग समजावा.)
*************************
शेतात जाण्यासाठी हेमाच्या बाबांनी बैलगाडी तयार केलेलीच होती... सगळे बैलगाडीपाशी आले.... 

"या बसा सगळ्यांनी..." हेमाचे बाबा बैलगाडीत चढत म्हणाले. 

जेनिका, जॉन, निशा आणि हेमा बैलगाडीत बसले.... 

"हेमा! Can you please shoot our video? I'll show you... Don't worry.." जेनिका ने विचारलं. 

हेमाने मानेनेच हो म्हणलं... जेनिकाने तिला कॅमेरा मध्ये व्हिडिओ कसा काढायचा हे शिकवलं आणि कॅमेरा तिच्या हातात दिला... हेमाने जसा व्हिडिओ काढायला सुरुवात केली तशी जेनिका बोलू लागली; "Hello! Now we are in an oxcart! This is an Indian traditional vehicle which is used today also! This is too much fun... Here, you feel the fresh air and sound of nature." 

जेनिका बोलायची थांबली तसा हेमाने व्हिडिओ बंद केला... एव्हाना आता ते शेतात पोहोचले होते... सगळे बैलगाडीतून उतरले... 

"Wow.... Just an amazing look!" जॉन म्हणाला. 

"अहो हे तर काहीच नाही... पुढे चला जरा.. छान कालवे, हवेच्या झुळकीवर डोलणारी पिकं, मोठी चिंचा बोरांची झाडं खूप काही बघायला मिळेल..." निशा म्हणाली. 

"Sounds good!" जॉन म्हणाला. 

आजूबाजूचा परिसर न्याहाळत, वाटेत दिसणाऱ्या जंगली पण सुंदर फुलांचे फोटो काढत जेनिका आणि जॉन या तिघांच्या मागून चालत होते... थोडं आत चालत गेल्यावर समोर हिरवंगार शेत दिमाखात उभं दिसलं, पाण्याचा मंद खळखळ आवाज, आजू बाजूच्या शेतात गाणी म्हणत काम करणारे इतर शेतकरी आणि त्यांच्या सुरात सूर मिसळून गाणारे विविध पक्षी! 

"Wow! Such an amazing experience! This is called real peace! Now I got why India is beautiful! Such a beautiful nature, helpful people like you and your feelings towards guests! Only this can make India excellent!" जेनिका सगळं निसर्ग सौंदर्य डोळ्यात साठवत म्हणाली. 

"बरोबर आहे तुमचं... आमच्याकडे पाहुण्यांना देव मानतात... 'अतिथी देवो भव' हि परंपरा तर खूप जुनी आहे... पाहुण्यांचा आदर सत्कार करणे, त्यांना हवं नको ते बघणे हे आमचं परम कर्तव्य आम्ही मानतो! भारतात जेवढ्या संस्कृती तुम्हाला पाहायला मिळतील तेवढ्या इतर देशात मिळणार नाहीत! वेगवेगळ्या जाती - धर्माचे लोक इथे गुण्यागोविंदाने राहतात... एकमेकांच्या सुख - दुःखात सामील होतात, प्रत्येक सण इथे जल्लोषात साजरा होतो... " हेमा म्हणाली. 

"Yes! मनून आमाला इंडिया आवडतो! Every year आमी इते फिरायला येतो! मनून तर मराठी समजतं आनि बोलायला जमत! आज first टाइम व्हिलेज मदे आलो! आता every year तुजाकडे येनार! चालेल ना?" जॉन म्हणाला. 

"हो चालेल ना! आता आपण त्या झाडाखाली बसूया... मी तुम्हाला अजून काही गोष्टी दाखवते..." हेमा आंब्याच्या झाडाकडे बोट दाखवत म्हणाली.

मोठं आंब्याचं घनदाट झाड तिथे होतं! सगळे तिथे आले... झाडाखाली आल्या आल्या छान गारवा जाणवला... त्या झाडाच्या सावलीत खालीच सगळे बसले. सकाळची प्रसन्न वेळ! मधेच एखादी भूपाळी कानी पडत होती... गावात वासुदेव आल्याच्या खुणा सुद्धा स्पष्ट ऐकू येत होत्या.... कोवळं ऊन आणि त्यामुळे पडणाऱ्या सोनेरी उजेडामुळे पीक अगदी सोन्यासारखं चमकत होतं! 

"Wow! What an amazing look! इंडिया सारखा नेचर कुठेच नाय बघायला मिलणार...." जॉन समोरचं दृश्य कॅमेरात टिपत म्हणाला. 

"हो! भारताची हीच तर खासियत आहे! इथे दर चार महिन्यांनी वेगळा ऋतू अनुभवायला मिळतो! प्रत्येक ऋतूची वेगळी कहाणी, वेगळे सण आणि त्या प्रमाणे शेतीतलं पीक सुद्धा!" निशा म्हणाली. 

"पोरींनो तुम्ही बसा इथे, मला जरा कामं आहेत" म्हणत हेमाचे बाबा उठून शेतातली कामं करायला जाऊ लागले. 

"हेमा! Can we also do some work?" जेनिका ने विचारलं. 

"चालेल! पण, हे सोपं काम नाही हा..." हेमा म्हणाली. 

"Ok! तरी पन आमाला ट्राय करायचं!" जॉन म्हणाला. 

जेनिका आणि जॉन साठी हा कुतूहलाचा विषय आहे म्हणून त्यांची इच्छा नको मोडायला असं वाटून त्यांनी गाईच्या गोठ्यात जाण्याचं ठरवलं. सगळे गोठ्यात आले... 

"इते काय काम करायचं?" जॉन ने विचारलं. 

"सांगते! चुलीत टाकायला शेणाच्या गोवऱ्या लागतात त्या बनवायच्या आहेत!" हेमा ने सांगितलं. 

"सेनाच्या गोवरा मंजे?" जेनिका ने विचारलं. 

हेमाने त्यांना एक शेणाची गोवरी करून दाखवली आणि म्हणाली; "जमेल ना? घाण नाही वाटणार ना तुम्हाला?" 

"No! No! तसं काय नाय वाटनार! आमी करनार हे.." जॉन म्हणाला. 

त्या दोघांनी त्यांच्या हातातली अंगठी, ब्रेसलेट आणि घड्याळ काढून ठेवलं! जॉन ने हे क्षण सुद्धा कॅमेरात टिपायला हेमाला सांगितलं! हेमाने सांगितल्या प्रमाणे त्या दोघांनी सुद्धा गोवऱ्या बनवल्या. नंतर गोठा स्वच्छ केला, गाईला अंघोळ घातली आणि चारा सुद्धा! हि सगळी कामं करता करता सहज दोन ते तीन तास निघून गेले... 

"इंडिया मदे cow ला god मानतात राईट?" जेनिका ने विचारलं. 

"हो! असं म्हणलं जातं, गाईच्या पोटात तेहतीस कोटी देव वास करतात.... गाईचे दूध औषधी असते! त्यापासून तयार केलेले तूप खूप सात्विक मानले जाते.... यामध्ये सुद्धा औषधी गुणधर्म असतात! एवढंच नाही तर गोमूत्र सुद्धा पवित्र कार्यांमध्ये वापरले जाते, शेणाचा उपयोग सुद्धा जमीन सारवायला आणि जळणावळाला केला जातो! मग का नाही गाईला देव मानणार!" हेमा सगळं व्यवस्थित सांगते. 

"Really! Only Indians have this feelings towards nature!" जॉन म्हणाला. 

"चला आता तुम्ही खूप दमलेले दिसताय... तिथे विहीर आहे! तिथे जाऊन थोडं पाणी प्या, तोंडावर पाणी मारा तोपर्यंत आई जेवण घेऊन येतच असेल!" हेमा म्हणाली. 

सगळे एका विहिरी जवळ आले.... निशा ने विहिरीतून पाणी काढून दिलं! छान गार पाणी तोंडावर मारल्यावर दोघांना बरं वाटलं. ओंजळीत पाणी घेऊन त्यांनी मनसोक्त पाणी पिलं! त्या पाण्याची चवंच काही वेगळी होती... एखाद्या प्युअर पाण्याला सुद्धा लाजवेल एवढं स्वच्छ पाणी होतं! 

"चान वाटला... खूप फ्रेश फीलिंग आली..." जेनिका म्हणाली. 

"गावच्या पाण्यात आहेच हि ताकद! चला आता थोडावेळ सावलीत बसा... तुम्हाला कामाची, उन्हाची सवय नाही उगाच त्रास नको व्हायला.." निशा म्हणाली. 

हेमाने सुद्धा तिच्या बोलण्याला सहमती दिली आणि सगळे पुन्हा झाडाखाली आले.... थोड्या अजून गप्पा झाल्या... बोलता बोलता निशा आणि हेमाच्या शिक्षणाबद्दल, पुढे काय करणार या बद्दल सुद्धा चर्चा सुरु झाली... 

"मला तुमची मदत हवी होती!" हेमाने विचारलं. 

"Yes! Why not! तू मला यंगर सिस्टर सारखी आहे! करनार तुला सगळा हेल्प बोल..." जॉन म्हणाला. 

"ते.. मला आणि निशाला सोशल मीडिया वापरायला शिकायचं आहे... आम्हाला फक्त व्हाट्सअप वापरता येतं!" हेमा थोडी बिचकत म्हणाली. 

"Ok chill! We will tech you... You are smart so, you can learn it quickly!" जेनिका म्हणाली. 

"Thank you!" हेमा स्मित करत म्हणाली. 

एवढ्यात हेमाची आई दुपारचं जेवण घेऊन आली.... दुसरीकडून हेमाचे बाबा सुद्धा आले... सगळे एक गोल करून बसले! हेमाच्या आई ने टोपलीत बांधून आणलेली झुणका भाकरी उघडली. आणि प्रत्येकाच्या हातात दिली. 

"What is this? जे सकाली ब्रेकफास्ट ला खाल ते?" जॉन ने विचारलं. 

"नाही! याला झुणका भाकरी म्हणतात! खाऊन बघा... तुम्हाला आवडेल..." हेमा म्हणाली. 

हेमाच्या बाबांनी हाताने कांदा फोडला आणि तो सुद्धा त्याच्या बरोबर दिला! जेनिका आणि जॉन ने पहिला घास खाल्ला! 

"Wow! Really testy!" जेनिका म्हणाली. 

सगळ्यांनी छान जेवण करून घेतलं... थोडावेळ गप्पा मारल्या... हेमा आणि निशाला दोघांनी मिळून सोशल मीडिया चा कसा वापर करायचा हे सुद्धा शिकवलं! ऊन डोक्यावर आलं होतं तरीही मंद हवेची झुळूक थंडावा देत होती.... नुकतंच जेवण सुद्धा झालं होतं आणि त्यात गार वाऱ्याच्या झुळुकेने डोळ्यावर झापड यायला लागली होती... 

"चला आता तुम्ही घरी... थोडावेळ झोपा!" हेमाची आई म्हणाली. 

"आमी इतेच जोपतो! इथे चान हवा येतो... इंडिया मदे व्हिजिट केला की नेचर मदे राहता येत.. मनून.. एव्हिनिंग ला हेमाच्या डॅड सोबत घरी येणार..." जेनिका म्हणाली. 

"हो आई! आम्ही येतो संध्याकाळी... संध्याकाळी सुद्धा जेव्हा सूर्य मावळतीला जाईल तेव्हाच दृश्य सुद्धा बघण्यासारखं असेल... ते सगळं यांना दाखवून येऊ आम्ही... आणि घरी आल्यावर तुला मदत करेन मी! उगाच एकटी नको सगळं करत बसू..." हेमाने आई ला सांगितलं. 

"बरं... काळजी घे त्यांची... ते गावात नवीन आहेत! त्यांना एकटं सोडू नकोस.." आई ने सुद्धा सुचना केल्या आणि ती घरी जायला निघाली. 

झाडाच्या सावलीत जेनिका आणि जॉन ला छान झोप लागली... ते दोघं शांत पणे झोपले आहेत हे बघून निशा आणि हेमा बोलायला थोड्या बाजूला गेल्या... 

"हेमा! तू यांच्याकडून मोबाईल का शिकून घेतला? सकाळी काय सांगत होतीस? नीट सांग बघू आत्ता!" निशा ने विचारलं. 

"अगं आपण काल इंटरव्ह्यू देऊन घरी परत येत होतो तेव्हा मी खूप विचार केला! आता आपण पुन्हा कोणत्याच इंटरव्ह्यू ला जायचं नाही..." हेमा बोलत होती... पण, तिला मधेच तोडत निशा म्हणाली; "काय? पण का? अगं तूच मला काल खूप समजावत होतीस ना? आता काय झालं?" 

"पूर्ण ऐकून तर घे! सकाळी मला एक कल्पना सुचली आहे... मी आत्ता हे सोशल मीडिया का शिकून घेतलं माहितेय? कारण, याच्याच बळावर आपण आता आपला स्वतःचा व्यवसाय सुरु करणार आहोत!" हेमा खूप उत्साहात निशाला सगळं सांगत होती... 

"कसला? आणि त्यासाठी पैसे कुठून आणायचे?" निशा ने तिची चिंता बोलून दाखवली. 

"अगं नाही लागणार काही पैसे! आपण टुरिस्ट चा व्यवसाय करणार आहोत! बघ, आत्ता हे दोघं रस्ता चुकले म्हणून गावात आले! पण, आपण आता सोशल मीडिया चा वापर करून आपल्या भारताची संस्कृती, गावचं जीवन सगळं सातासमुद्रा पलीकडे पोहोचवायचं! आपल्याला जशी विदेशाची ओढ असते तशीच या लोकांना सुद्धा भारत बघायची ओढ असते! पण, गावाकडे जास्त सोयी नसतात म्हणून कोणतीही टुरिस्ट कंपनी इथे येत नाही... याचाच आपण फायदा घ्यायचा! जे जीवन आपण रोज जगतोय ते यांच्यासाठी खूप काहीतरी भन्नाट आहे! इथे एकही लॉज किंवा हॉटेल नाही म्हणून आपल्या घरात त्यांना स्थान द्यायचं! यामुळे त्यांना एक आपलेपणा सुद्धा वाटेल... रोज काहीतरी नवीन करायला मिळेल.. तूच विचार कर ना, नुसतं गाईड सोबत जाऊन सगळं बघण्यापेक्षा स्वतः गावच्याच लोकांसोबत हे अनुभवणं किती छान वाटेल त्यांना!" हेमा सगळं खूप पोटतिडकीने निशा ला सांगत होती... 

"खरंच खूप छान कल्पना आहे गं! पण, आपल्याला धड इंग्लिश बोलता येत नाही... त्याचं काय?" निशा ने पुढचा प्रश्न उपस्थित केला. 

"त्याचा सुद्धा विचार केलाय मी! आपल्याला इंग्लिश समजतं! बोलायचं म्हणशील तर आपण वाक्य रचत रचत बोलतो... फक्त एकदम सराईत येत नाही एवढंच ना! ते हळूहळू जमेल.. बघ ना हे दोघं सुद्धा भारतात यायला लागले तर मराठी थोडं फार शिकले ना... तसंच आपणही हळूहळू शिकू..." हेमाच्या डोक्यात सगळं काही आखलेलं होतं! 

बराच वेळ दोघींनी चर्चा केली... हेमाच्या डोक्यात सगळं तयार आहे, प्रत्येक प्रश्नाला उत्तर तयार आहे हे ऐकून निशाला सुद्धा आता हुरूप आला... 

क्रमशः..... 
************************
आपण गावात राहतोय, मराठी माध्यमातून शिकलोय, इंग्लिश नीट बोलता येत नाहीये म्हणून खचून न जाता उलट या अडथळ्यालाच यशाची शिडी बनवून हा हेमाचा प्रवास कसा होतोय हे आपण यातून पाहणार आहोत! 
हेमा आता पुढे कसं सगळं करेल? तिचा हा बिजनेस प्लॅन यशस्वी कसा होईल, तिने काय काय योजना आखून ठेवल्यात पाहूया पुढच्या भागात... तोपर्यंत तुम्हाला कथा कशी वाटतेय हे कमेंट करून नक्की सांगा. 

🎭 Series Post

View all