Jan 23, 2022
वैचारिक

ऑक्टोबर : माझ्या नजरेतून

Read Later
ऑक्टोबर : माझ्या नजरेतून
# ऑक्टोबर : माझ्या नजरेतून


पारिजात फुलांचा वास आपल्याला वेड लावतो. पांढरेशुभ्र असलेल्या पाकळ्या आणि केशरी देठ असलेली ही फुले रात्री गळतात. काहीजणांचे आयुष्यपण या फुलांसारखेच कमी असते पण कमी आयुष्यातही ते आपला दरवळ सर्वत्र पसरवून टाकतात. " ऑक्टोबर " ही एक अशीच कहाणी आहे. वरुण धवन अभिनित हा सिनेमा सुजित सरकार यांनी दिग्दर्शित केला आहे. एका हॉटेलमध्ये इंटर्नशिप करणारा डॅन हा आपल्या कामामुळे खूप त्रस्त आहे. त्याला स्वतःचे नवीन हॉटेल सुरू करायचे आहे. बॉसचा राग सहन करण्यामध्ये त्याला अजिबात रस नाही. एका पार्टीत डॅनसोबतच इंटर्न करणारी " शिऊली " ही मुलगी " व्हेअर इज डॅन ?" हा प्रश्न विचारते आणि बिल्डिंगवरून खाली पडते. या अपघातामुळे ती कोम्यात जाते. मग डॅनला हाच प्रश्न पछाडतो की तिने त्याच्याबद्दल का विचारले असावे. डॅन शिऊलीला भेटायला जाऊ लागतो. तिला प्राजक्ताची फुले आवडतात म्हणून ती फुले आणून देतो. कोम्यात गेलेल्या मुलीच्या आईची भूमिका गीतांजली राव यांनी उत्तमप्रकारे साकारली आहे. ती खचून जात नाही आणि आपल्या मुलीला जगवण्यासाठी हवे तेवढे पैसे खर्च करते. अधूनमधून डॅनही पैसे खर्च करतो. डॅनमुळे शिऊलीच्या प्रकृतीमध्ये सुधार येतो. पण हॉटेलमध्ये ड्यूटी न केल्यामुळे डॅनला तिथून काढण्यात येते. शिऊलीच्या आईच्या आग्रहामुळे डॅन ते शहर सोडून दुसरीकडे जॉब करतो. शिऊलीची तब्येत पुन्हा ढासळते. डॅन पुन्हा तिला भेटायला येतो. पण एका रात्री शिऊलीची प्राणज्योत मावळते. वरुण धवनने आपल्या उत्कृष्ट अभिनयाने हा चित्रपट एकट्याच्या खांद्यावर पेलला आहे. त्याने सशक्त अभिनय केला आहे. चित्रपटात कुठेही नृत्य , देहप्रदर्शन किंवा रोमँटिक सीन्स नाहीत. तरीही त्याने हा वेगळ्या धाटणीचा चित्रपट स्विकारला. शिऊलीची भूमिका बनिता सांधू हिने साकारली आहे. तिला मोजून चार डायलॉग असावेत. पण तरीही कोम्यातून हलकेसे बाहेर आल्यावर तिचा केलेला अभिनय जिवंत वाटतो. ( शिऊली कोम्यातून बाहेर येते पण पूर्णपणे बरी कधीच होत नाही. ) चित्रपट वरकरणी रटाळ वाटत असला तरी अधूनमधून बरेच विनोद पेरलेले आहेत. म्हणजे चित्रपटाचे गांभीर्य पण जाऊ नये आणि प्रेक्षकांना रटाळ पण वाटू नये या तऱ्हेने ही रचना केली आहे. जसे वरुण धवनचे नर्स , हॉस्पिटल स्टाफ , मित्रांसोबतचे संवाद चेहऱ्यावर छोटेसे हसू आणतात. " हम नर्स लोगो से कोई शादी नहीं करता क्योंकि हम किधर भी टच करते. लोग हमारे कैरक्टर पर शक करते. " हे वास्तव एक नर्स डॅनला सांगते. डॅन चोरून शिऊलीची थ्रेडींग पण करवून घेतो. आपण या डॅन भूमिकेच्या प्रेमात पडतो. शिऊलीच्या मृत्यूनंतर तिचा भाऊ ट्युशनला जाऊ का अशी परवानगी मागतो आणि आई ती परवानगी देते. हे आजच्या जगाचे सत्य आहे की कुणीच कुणासाठी थांबत नाही. जिथे भाऊ असा वागतो तिथे डॅन मात्र दिवसरात्र शिऊलीची काळजी घेतो आणि करीयरचीही पर्वा करत नाही. मी अमेझॉन प्राईमवर चित्रपट पाहिला पण मला त्यात गाणे दिसली नाहीत. पण चित्रपटात तीनचार गाणे आहेत. " ठेहेर जा " , " मनवा " , " तब भी तू " , " चल " अशी काही सुंदर गाणी तुम्ही युट्युबवर बघू शकतात. ही सर्वच गाणी सुंदर आहेत. त्यातले " तब भी तू " गाणे माझ्या अतिशय आवडीचे आहे. गाण्याचे लिरिक्स खूप जीवनातले खोल अर्थ सांगणारे आहेत. चित्रपट हळुवारपणे मनाचा ताबा घेतो आणि आपण संयम बाळगून डॅनच्या प्रवासात सहभागी होतो. कुठेही स्कीप करून शेवट बघण्याची घाई होत नाही. हा चित्रपट नुसती एकतर्फी प्रेमकथा नाही तर माणसाचे गुणदोष रेखाटणारा हा चित्रपट आहे. डॅन कधीच शिऊलीशी मैत्री करायचा प्रयत्न करत नाही पण ती कोम्यात जाताच तिच्या प्रेमात पडतो. जणू आपण माणसांची किंमत ती निघून गेल्यावरच करतो. शिऊलीचे काका तिचे उपचार थांबवावे या विचाराचे असतात पण तिची आई शेवटपर्यंत शिऊलीला जगवते. डॅन पण तिला साथ देतो. सर्वजण डॅनला प्रॅक्टिकल होण्याचा सल्ला देतात पण तो ऐकत नसतो. शिऊलीच्या मृत्यूनंतर डॅन त्याच हॉटेलमध्ये पुन्हा नोकरी करतो. शेफ बनतो. कसल्याच तक्रारी करत नाही. त्याला आयुष्याची क्षणभंगुरता कळते. एकीकडे जुडवा 2 सारखे सिनेमे शंभर कोटी कमावतात आणि लोक वरुण धवनवर टीकास्त्र सोडतात. मग हाच अभिनेता जेव्हा " ऑक्टोबर " सारखे सिनेमे करतो तेव्हा ती फ्लॉप होतात. यात दोष कोणाचा ? असो. सर्वांनी हा सिनेमा एकदा तरी अनुभवावा असे मला वाटते. " तब भी तू " गाण्याच्या लिरिक्स खाली टाकून मी तुमची रजा घेतो. धन्यवाद.

सजदे की तरह फिर आँखें झुकी
फिर पलकें नमाज़ी हुई
तेरे ज़िक्र में थी कुछ ऐसी नमी
सूखी साँसें भी ताज़ी हुईं
जब उम्र की आवारा बारिश
सब रंग मेरे धो जायेगी
तब भी तू मेरे संग रहना

~ पार्थ ✍️


ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
Circle Image

पार्थ

Student

माझ्या सर्व साहित्याचे अधिकार राखीव आहेत. कॉपी केल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.