ओ मेरे राजकुमार (भाग ५)

Love story

दुसऱ्या दिवशी सकाळी समीर लवकर आवरून तयार होतो. आज त्याला निता सोबत आश्रमात जायचं असतं त्यामुळे ऑफिस ला सुट्टी घेतलेली असते.. समीर प्रचंड प्रामाणिक माणूस की स्वतः च ऑफिस असूनसुद्धा सुट्टी साठी अर्ज टाकायचा.. ह्या अशा स्वभावामुळे आपोआप ऑफिस मध्ये सगळे शिस्तीत असायचे म्हणून समीर ला जास्त कष्ट घ्यावे लागायचे नाहीत.. स्टाफ ही समीरचा आदर करायचा कारण तो कधीच चिडायचा नाही. प्रत्येक गोष्ट समजून घेऊन मार्ग काढायचा.. आपल्यामध्ये एक होऊन आपला बॉस काम करतो त्यामुळे सगळ्यांना कामात उत्साह यायचा. असा प्रेमळ समीर आश्रमात नेहमी भेट द्यायचा.. आज आश्रमात नीताने कार्यशाळा आयोजित केली असते. त्यातून मुलींना, बायकांना कापसाच्या वाती कश्या बनवल्या जातात, त्याचे मशीन ह्याची माहिती आणि प्रात्यक्षिक देण्यात येणार होते.. दोघेही घरातून निघतात. आज समीर गाडी चालवत असतो. नाहीतर एरवी रघु काका ड्रायव्हर म्हणून काम बघतात.
“ समीर, आपण गणपतीच्या देवळात जाऊ वाटेत. दर्शन घेऊन मग आश्रमात जाऊ. ह्या माझ्या आजच्या कामामुळे आश्रमातल्या सगळ्यांना नवीन आधार मिळू दे अशी प्रार्थना करणार आहे मी.. आणि तुझं लग्न होऊ दे असही सांगणार आहे बाप्पाला..”
समीर आईकडे फक्त एकदा निर्विकार चेहऱ्याने पाहतो..” आई मला नाही किमान देवाला तरी सोड ग.. माझं लग्न होईल नक्की पण आत्ता नाही हा.. मला अजुन खूप काम करायचं आहे .”
“बघू रे. देवाला सांगून ठेवायला काय हरकत आहे.. लगेच तो मुलगी देणार आहे का इथे”
असं म्हणत दोघंही देवळात जातात.. देवाचं दर्शन घेऊन आश्रमात जातात.. दिवसभर आश्रमात घालवून संध्याकाळी घरी परत येतात..
………………………………………………………………………………………..
माया सकाळपासून खूप बिझी असते. सगळी माहिती एकत्र करणं, कोणाला काय काम द्यायचं त्याचा लिस्ट, फाईल्स आणि बरंच काही ह्यात ती बुडालेली असते. घरी नाश्ता नं करता ती ऑफिस मध्ये जाते.. गेले दोन दिवस ती धड आई बाबांशी बोललेली  नसल्यामुळे समीर बद्दलचा राग अजूनच वाढत असतो.. पण करणार काय पापी पेट का सवाल हैं ना.. आणि खरं तर सलील ग्रुप मध्ये काम करायला मिळणं ही तिच्यासाठी एक चांगली संधी असते.. पण मॅडम ने गैरसमज करून घेतला असतो..
काम आटपून ती घरी येते.. सुगंधा तिला छान कॉफी करुन देते..
“माया, फारच दमली आहेस ग. ऑफिस मध्ये फार काम आलंय का? काही अडचण तर नाही ना?”
“आई.. अडचण नाही ग. पण मी परवा जे प्रेझेंटेशन दिलं ते काम आमच्या कंपनी ला मिळालं.”
“अरे वा मस्तच..”
“हो पण मला आता सलील ग्रुप मध्ये कामाला जायचं आहे ह्या प्रोजेक्ट साठी.. मला नाही जायचं ग आई. तो समीर आहे तिथे प्रोजेक्ट हेड मला तो वेगळा वाटतोय.. काहीतरी झोल आहे त्याचा. माहित नाही पण तो जरा जास्त फ्रेंडली वागत होता माझ्याशी आणि त्याची ब्लॅक मर्सिडीज.. आई फक्त एक प्रोजेक्ट हेड आहे तो.. आणि नखरे बघ किती..”
“ अग पण तू असा विचार का करतेस.. जास्त फ्रेंडली म्हणजे वाईट तर वागला नाही ना? आणि गाडीची शुल्लक गोष्ट आहे ही.. त्याने मेहनती ने घेतली असेल. तुला सगळी माहिती आहे का? नाही ना? असं एकदम मत बनवायचं नाही कोणाबद्दल…  लक्षात ठेव. आपण ज्या नजरेने पाहतो तशीच माणसं असतील असं नाही..”
“ बरं आई मी जेऊन झोपते आता. उद्या पासून सगळं बदलणार आहे माझं. सो आज मला शांत झोप घ्यायची आहे. बाबांना सांग मी लवकर जेऊन घेतलं.. आणि त्यांच्याशी धड बोलले ही नाही. उद्या पासून सगळं मार्गी लागेल..”
“अगं बाबा दुपारीच गुजरात ला गेले आहेत. कंपनी च काम आलं तिकडे. त्यांना लगेच पॅकिंग करून जावं लागलं.. त्यांचं सर्व्हिस डिपार्टमेंट माहिती आहे ना तुला? कधीही जा सांगतात.. ते म्हणाले माया घरी आली की सांग तिला ,कामात असेल पोरगी”
“बरं आई आपण त्यांना उद्या फोन करु.”
माया झोपायला जाते.. आज खूप दमली असल्यामुळे तिला लगेच झोप लागते..
सकाळी नेहमीप्रमाणे सुगंधा तिला उठवते.. 
“माया उठ अगं.. आज तुला दुसऱ्या ऑफिस ला जायचं आहे लक्षात आहे ना???”
ती दचकून उठते..
किती वाजले? 
“७.३० झालेत उठ आणि आवर आता”
घाईने माया आवरायला जाते आणि आपली बॅग घेऊन हॉल मध्ये येते. आई लवकर ग मला उशीर होतोय.. हो ग तुझा डब्बा तयार करायला वेळ लागला आज..”
सगळं बॅग मध्ये भरून घेताना अचानक तिला आठवत
“आई, आज मला स्वप्न पडलं नाही ग..”
“अग आधी ऑफिस ला जा.. तुला राजकुमार बसला असेल तिकडे घड्याळ घेऊन..”
“काय??”
“अग म्हणजे जा आता..”
माया घराबाहेर पडते तोच पावसामुळे अंधारून आलं असतं. तिने बुक केलेली कॅब येते आणि पावसाला म्हणते प्लीज आता तरी पडू नकोस.. मी ऑफिस मधे असताना हवा तेवढा कोसळ.
नेहमी वेळेत जाणाऱ्या मायाला आज नवीन ठिकाणी जायला उशीर होतो.. समीरच्या टीम मधला एक मुलगा तिची ऑफिस जवळ वाट पाहत असतोच.
“मिस माया?”
“येस.. मीच माया”
“हॅलो, मी शुभम. समीर सर तुमची वाट पाहत आहेत. चला तुम्हाला उशीर झाला.”
माया आणि शुभम एकत्र ऑफिस मध्ये शिरतात. समीर च्या केबिन मध्ये जातात.. 
“हॅलो माया.. वेलकम टू ऑफिस. बस. काय घेणार? कॉफी ना?”
“ नको. मी घेऊन आले आहे.. आपण कामाला सुरुवात करायची का?”
“हो नक्कीच पण एक कप कॉफी घेऊया मग.. शुभम तू कॉफी सांग आणि तुझ्या कामाला लाग..”
“ओके सर.”
“तर माया.. तुला इथे जे हव ते दिलं जाईल, तुझं क्युबिकल, कॉफी, जे तुला लागेल ते. पण इथे उशिरा आलेलं चालत नाही. आज तुला ६ मिनिट उशीर झाला.. काळजी घे परत असं करू नकोस.. आपल्या कंपनी चे मालक फार खडूस आहेत. त्यांना हे चालत नाही. काढूनच टाकतात उशिरा आलं कोणी तर. बघ म्हणजे तू ठरव. काय आहे तुझ्या कंपनी च भविष्य तुझ्या हातात आहे..”
समीर मनातल्या मनात हसत असतो. आयुष्यात पहिल्यांदा तो अशी कोणाचीतरी मजा करत असतो. कारण त्याला माहीत असतं माया त्याला कंपनी मधला एक प्रोजेक्ट हेड च समजत असते. पण ह्या ऑफिस मध्ये तर सगळ्यांना माहीत असतं समीर कोण आहे…
“हो सर.. मी कायम वेळेत येते पण..”
“नो एक्स्प्लनेशन.. यू कॅन गो.. बाहेर शुभम ला विचार पुढचं तो सांगेल सगळं.”
माया खुर्चीतून उठते.. खरं तर जाम वैतागली असते पण काही करू शकत नाही. समीर मात्र मनात अजून हसतच असतो. 
“वाह कुठे अडकले मी देवा. काय वाईट होते माझ्या ऑफिस मधे. नीट बोलणं तर सोडाच पण साधं माझी बसायची जागा पण नाही दाखवली ह्याने. तुला तर मी बघून घेईन मिस्टर समीर”
केबिन च्या बाहेर उभी राहून ती स्वतःशीच बोलत समीर कडे बघत असते. समीर च लक्ष जातं आणि तो काय? अशी खूण तिला करतो.. तेव्हा ती काही नाही असं डोकं हलवून सांगते आणि नाराजीने हसते. तेव्हाच बाहेर विजांचा गडगडाट पाऊस सुरू होतो..

क्रमशः
( पुढे काय घडेल? मायला सत्य कशा प्रकारे समजेल? का माया काही गडबड करेल? आणि ते एकमेकांचा प्रेमात कसे पडतील? त्यासाठी पुढील भाग वाचा.)
(मी पहिल्यांदा कथामालिका लिहीत आहे. कथा पूर्ण काल्पनिक आहे तरी चूकभूल माफ असावी. तुम्हाला ही कथा आवडली तर लाईक करा, कमेंट करा. नाही आवडली तरी कमेंट करा. तुमच्या कमेंट मुळे लिहायला हुरूप येतो)

© स्वराली सौरभ कर्वे

🎭 Series Post

View all