Login

ओ मेरे राजकुमार (भाग ३)

Love story

(मागच्या भागात आपण पाहिले की माया आणि समीर कॅन्टीन मध्ये जेवायला जातात. आता पुढे)

दोघंही जेवण आटपून येतात. समीर केबिन मध्ये मायाच्या बॉस बरोबर थोडं बोलत असतो आणि माया आपल्या खुर्चीत.. तिला समोर समीर दिसत असतो. अगदी तंद्री लागल्या सारखं ती त्याचा कडे बघत राहते. अचानक दोघांची नजरानजर होते. समीर तिच्याकडे पाहून हसतो तेव्हा मॅडम जाग्या होतात. ती गरकन मान फिरवून स्वतः लाच टपली मारते. राज आणि प्रिया दुरून तिला ' क्या बात है' अशी खूण करतात मग काय माया त्यांना नाक उडवून दाखवते.
      ऑफिस मधून निघायची वेळ होते तेव्हा सगळे निघून जातात. पण माया ला थांबावं लागतं कारण समीर अजूनही तिच्या बॉस बरोबर काही डिस्कस करत असतो. शेवटी बॉसचा फोन येतो
 “मिस माया यू कॅन लिव्ह. तुमचं काम झालं आहे.”
“ गुड नाईट सर”
ती एकदा आत पाहते तर समीर अजूनही बोलण्यात गुंग असतो. सगळं आवरून डेस्क क्लोज करून निघते. कॅब बुक करायची असते पण होतच नसते. अचानक जोरात पाऊस येतो.. आता मात्र माया भलतीच चिडते. 
“इथे एकतर कॅब बुक होत नाही आणि हा पाऊस. नेमका ऑफिस मध्ये येण्याचा किंवा जाण्याचा वेळेलाच पडतो. पडत नाही बदाबदा कोसळतो. शी!! ह्या अॅप ला पण आत्ताच स्लो व्हायचं होतं. एकतर मी आज खूप दमले आहे. “ अशी वाक्य स्वतः ला ऐकवत माया रेनकोट, छत्री, स्कार्फ, मोबाईल कव्हर, रेनकोट कॅप अशी (हत्यार) काढत असते. 
बाजूला वॉचमन हसत असतो तिच्या बडबडीवर. कारण त्याला हे पाठ झालेलं असतं. 
“काय दादा? हसत काय बसलाय? माझ्यासाठी रिक्षा बघा प्लीज.”
“हो मॅडम आत्ता थांबवतो”
पण रिक्षा काही थांबत नव्हत्या. ह्या गडबडीत एक काळी मर्सिडीज कार ऑफिस पार्किंग मधून बाहेर येते आणि तिच्या समोर थांबते. माया आधीच चिडून इकडे तिकडे रिक्षा दिसते का ते पाहत असते. समोर गाडी थांबल्यावर कोण मूर्ख माणूस आहे अशी गाडी थांबवली आहे मधेच असं बोलणार तेवढ्यात पाठच्या सीट ची काच खाली होते. 
“ माया… काय झालं?? इथे का उभी आहेस अशी?”
माया बघते तर आतमध्ये समीर असतो.. 
“ रिक्षा ची वाट बघतेय. कॅब बुक होत नाही.. आणि हा पाऊस माझा अंत पाहतोय.” 
“ ह्म्म्म, मी सोडू का तुला? म्हणजे तुला प्रॉब्लेम नसेल तर..”
“ नो थॅंक यू. मी जाईन.”
“ नक्की का?”
“हो”
“ओके गुड बाय देन” आणि समीर निघून जातो.
माया बघतच बसते आणि विचार करते हा साधा कंपनी चा प्रोजेक्ट हेड आणि ह्याचाकडे मर्सिडीज आहे?? अशक्य आहे ही गोष्ट. काहीतरी फसवेगिरी करत असेल हा.. असू दे आपल्याला काय करायचं आहे? त्याचा कडे गाडी तरी आहे आत्ता पावसात भिजत नाही तो.. नाहीतर मी.. हाय मेरी किस्मत..
…………………………………………….,………………………….
समीर आपल्या घराकडे जात असतो. काळी मर्सिडीज दिमाखात एका बंगल्याचा आत शिरते. आता तुम्हालाही प्रश्न पडला असेल माया सारखा की एका कर्मचाऱ्याकडे हे एवढं सगळं?? 
तर आपला हीरो समीर म्हणजे दुसरा तिसरा कोणी नसून समीर सलील देशमुख; सलील ग्रुप चा एकुलता एक वारसदार!
गाडी दरवाज्याजवळ थांबते आणि समीर आत येतो. 
“हॅलो माय यंग बॉय. झाली का मीटिंग?”
सलील आपला चष्मा सावरत चहाचा एक घोट घेत समीर ला विचारतात.
“ओह बाबा.. एकदम मस्त. कंपनी च काम खूप चांगलं आहे. आपण हे डील नक्की करु शकतो. “
“ ते जाऊ दे रे आधी कॉफी तर घे.”
“ बाबा मी फ्रेश होऊन येतो मग घेतोच कॉफी. आलोच”
समीर आपल्या खोलीत जातो आणि मस्त आवरून खाली येतो. 
“ शांताताई कॉफी आणा एक. ह बोल आता समीर.. अरे तुला त्या मीटिंग ला जायची काय गरज होती? असली बारीकसारीक कामं तू नको करुस. आपल्याकडे चांगला स्टाफ आहे त्यासाठी. तू कंपनी चा भावी मालक आहेस. तसा तू आत्ताही आहेस पण तुझ्या हट्टापायी मला ऑफिसमधे जावं लागतं.. हे सगळं तू घे सांभाळायला आणि मला मोकळा कर रे बाबा..”
“बाबा मला नुसता मालक होण्यात इंटरेस्ट नाही रे.. मी एका साध्या एम्प्लॉइ ते बॉस असा प्रवास करणार.. मी तुला आधीच हे सांगितलं होतं.  मला लोकं जमवायला, त्यांच्याबरोबर काम करण्यात उत्सुकता असते. बॉसिंग काय कोणीही करु शकतं..”
“किती चांगले विचार आहेत माझ्या मुलाचे. अगदी माझ्यावर गेला आहे..” निता त्यांच्याजवळ येऊन बोलते.
“ या राणी सरकार.. झाली वाटतं तुमची कामं.. काय मग तुझ्या लाडक्या लेकी, बहिणी कशा आहेत?? आणि हो नात कशी आहे तुझी??”
“एकदम मस्त सगळ्या.. नातीचं नाव परी ठेवलं. गोंडस आहे हो पोर.जीव लावला आहे सगळ्यांना तिने. त्यामुळे सगळ्या बायका एकदम बिझी असतात.” समीर एकुलता एक मुलगा असला तरी निताच एक मोठ्ठ कुटुंब होतं  आधार आश्रम.. अनेक अनाथ मुली, वेड्या झालेल्या म्हणून नवऱ्याने सोडून दिलेल्या बायका, काही गतिमंद मुली ज्यांचा समाजाने फायदा घेऊन त्यांना वाऱ्यावर सोडलं असतं, त्यांची मुलं असा मोठा कुटुंब कबिला होता आश्रमाचा.. काही मुलींची लग्न निताने लाऊन दिली होती ,काही शिकत होत्या तर बाकी सगळ्या जणींना तिने आश्रमा मार्फत उद्योगामध्ये गुंतवून ठेवले होते.
“बरं समीर कसं होतं प्रेझेंटेशन? आवडलं का तुला? नाही म्हणजे मूड छान दिसतो आहे म्हणजे आवडलं असणार..”
“हो आई.. मायाने खूप छान प्रेझेंटेशन दिलं.. तिची स्टाईल, कॉन्फिडन्स, सेन्स जबरदस्त आहे.. आधी थोडी हरवली होती कुठेतरी.. मला वाटलं प्रेझेंटेशन मुळे मनात भीती असेल पण तसं नव्हतं.. आम्ही एकत्र कॉफी घेतली, जेवण घेतलं. मी लिफ्ट बद्दल पण विचारलं पण ती काय म्हणतात ते इंडिपेंडंट निघाली”
“अरे हो हो.. मी तुला प्रेझेंटेशन च विचारलं माया बद्दल नाही.. बाय द वे.. कोण ही माया? चांगली आहे का दिसायला? बोलणी करूया का लग्नाची?”
निताच्या या प्रश्नाने समीर गोंधळला.. आपण हे काय बोलत गेलो, आईचा प्रश्न काय त्याला समजलंच नाही.. 
“आई झालं तुझं सुरू? आम्ही आज कामाच्या निमित्ताने ५-६ तास भेटलो फक्त. मला तिचं पूर्ण नाव ही नाही माहिती आणि परत भेट होईल का नाही ते ही नाही माहिती.. “
“ मग असच भेट परत सहज..”
“यू अँड बाबा जस्ट इम्पॉसिबल.. एक लग्नाच्या पाठी आणि एक मी बॉस व्हावं या पाठी.. बाय मी वर जातो..”
……………………..,……,……………,………………,…
इकडे माया घरी पोहचते. सगळं पॅक करून सुद्धा भिजलेली असते. मग सुगंधा काही न बोलता मस्त कॉफी करुन तिला देते.. पावसामुळे आणि कामाच्या थकव्यामुळे तिला झोप लागते.. पहाटे अचानक तिला दचकून जाग येते आणि ती विचार करत बसते हे काय नविन पाहिलं मी…..
क्रमशः
(मायाला वेगळं स्वप्न काय दिसलं असेल? आपल्या कथेतील पात्रांची प्रेम कहाणी सुरू होणार का काही वेगळंच घडणार? त्यासाठी कथा वाचत रहा.. )
(मी पहिल्यांदा कथामालिका लिहीत आहे. कथा पूर्ण काल्पनिक आहे तरी चूकभूल माफ असावी. तुम्हाला ही कथा आवडली तर लाईक करा, कमेंट करा. नाही आवडली तरी कमेंट करा. तुमच्या कमेंट मुळे लिहायला हुरूप येतो)

© स्वराली सौरभ कर्वे

🎭 Series Post

View all