Login

ओ मेरे राजकुमार (भाग १६)

Love story

दुसरा दिवस असाच जातो. माया काहीशी हिरमुसली असते. सुरेश आणि सुगंधा तिला समजावत असतात पण आपल्या हीरो ने सगळा गोंधळ केला ना.. माया काही पण करेल पण खोटं सहन करणार नाही..
मध्यरात्री देशमुखांची बेल वाजते.. निता आणि सलील उठून माजघरात येतात. इतक्या रात्री बेल ऐकुन कोण आलं असेल असा प्रश्न पडतो. 
“सलील.. वॉचमेन ने असं कोणाला सोडलं असेल आत मध्ये?”
“थांब ह्याची काही खैर नाही झोपा काढत असेल तो.” असं म्हणून सलील गेट वरच्या इंटर कॉम वर फोन करतो. 
“काय रे.. कोण तरी आत येऊन बेल वाजवतंय आणि तू काय झोपा काढतोय का? कोण आलंय बघ ..”
“साहेब छोटे मालक आलेत.. त्यांना कसा अडवू..”
“अरे मग एक फोन करायचा ना. पुढच्या वेळी लक्षात ठेव.” सलील फोन ठेऊन देतो आणि दार उघडायला जातो. 
“सलील कोण आलं आहे?” निता विचारतच असते की सलील दार उघडतो तर समोर तिला समीर दिसतो..
“समीर………” ती पुढे होऊन त्याला मिठीच मारते. समीर ला कळतं निता रडत असते. तो तिला हलकेच दूर करतो.
“आई.. काय झालंय?? रडतेस कशाला?”
“काय झालंय विचारतोस? सगळं तर माझ्यामुळेच झालं. मी इतके दिवस आस लाऊन होते सुनेची आणि कधी नव्हे ते तू मनावर घेतलंस. पण मी चुकले. आय एम सॉरी..” 
“आई….” तो एक नजर फक्त सलील कडे बघतो आणि सलील बघ रे आता तूच असं डोळ्यांनी सांगत खांदे उडवतो. “अगं तू काही केलं नाहीस. हे सगळं तिला एक ना एक दिवस कळणार होतं. मला वाटलं होतं लवकरच कळेल कारण ऑफिस मधलं कोणी ना कोणी सांगणार ना? पण खूप वेळ गेला मधे.. चूक असेल तर ती माझी कारण मी तिच्यापासून ही गोष्ट लपवली.” समीर खूप भावूक होतो आणि सोफ्यावर बसतो.
“ मग आता काय करायचं??” निता डोळे पुसत विचारते. “ पुढे काहीतरी करणं भाग आहे आपल्याला. मला माया ला ह्या घरात घेऊन यायचं आहे सून म्हणून!”
“आई आत्ता तरी मला काहीच सुचत नाही.. काय करू मी ते सुद्धा समजत नाही.. माझा फोन ब्लॉक केला आहे मायाने. तिच्या घरच्या कोणाचाही नंबर नाही माझ्याकडे…” असं म्हणून डोक्याला दोन्ही हात लाऊन खाली बघत बसतो..
तेवढ्यात सलील त्याचा पाठीवर थाप मारून बोलतो, “ यंग बॉय.. असं हरून कसं चालेल? अरे तुझ्याकडे नंबर नाही पण पत्ता तर आहे.. उद्या आपण तिघांनी जायचं मायाच्या घरी..”
“ बाबा अरे पण तुला बंगलोर ला जायचं आहे उद्या माहिती आहे ना…”
“नो.. मला काही माहीत नाही. काम गेलं खड्ड्यात! असली १०० कामं येतील आपल्याकडे आणि एक काम गेलं तर काही फरक नाही पडत. माझी सुनबाई महत्त्वाची आहे मला.. चला आता झोपा. समीर तू पण दमून आला आहेस जा जाऊन झोप..”
“ समीर तुला खायला आणू का काही? का कॉफी घेतोस??” निता विचारते.
“नको. मी खाऊनच निघालो. मला आराम करायचा आहे. मी जातो खोलीत. गुड नाईट.”
असं म्हणून तो जातो.
“मॅडम चला आता. उद्या फ्रेश वाटलं पाहिजे ना? सुनबाई ना मनवायला जायचं आहे… चला!”
आता मात्र मगा पासून रडणारी निता हसते..
“चला! कुठल्या का कारणाने होईना. मी एक तक्रार दूर केली..”
“तक्रार??” निता विचारते.
“ हो मग. आमच्या मॅडम ची तक्रार असते की आम्ही त्यांना हसवत नाही. मुळात आम्हाला ते जमत नाही. आता काय आहे ह्या तरुण मुलांसारख रोमँटिक होणं ह्या वयात जमणार नाही. पण आपल्या रोमान्स च्या व्याख्या वेगळ्या आहेत जरा.. पण आज हसलीस की नाही..”
“हो हो.. बास आता. एका दिवसात….. नाही रात्रीत इतकं नको. रोज थोडं जपून ठेव माझ्यासाठी..”
दोघंही खळखळून हसतात आणि रूम मध्ये जातात. समीर वरून हे सगळं पहात असतो. थोडा वेळ त्याचं दुःख विसरून आई बाबांनी ह्या वयातही प्रेम कसं टिकवून ठेवले आहे त्याचा धडा घेतो..
…………………………….,……………………..,……….,.............
 सकाळी तिघही छान आवरून मायाच्या घरी जायला निघतात. नीताने मायासाठी डिझायनर ड्रेस आणि हिऱ्यांचा हार घेते. समीर बाबाच्या समजावण्यामुळे उत्साही असतो. 
(मायाच्या घराजवळ गाडी थांबते.)
बाबा आई तुम्ही थांबा मी गाडी पार्क करून येतो. निता आणि सलील मायाच्या इमारती थांबून आजूबाजूचा परिसर बघत असतात. तेवढ्यात सुरेश बाहेर पडतात. तो ह्या दोघांना बघतो आणि त्यांना वाटतं की हे घर शोधत आहेत. गेट उघडताना ते विचारतात..
“ तुम्ही घर शोधताय का कोणाचं?”
“ नाही. घर माहिती आहे आम्हाला.. म्हणजे आमच्या मुलाला.. तो गाडी पार्क करून येत आहे. येईलच.”
“ बरं..” असं म्हणून सुरेश पुढे निघतात. तेवढ्यात समीर त्यांच्यासमोर येतो.
“काका…”
सुरेश त्याचाकडे पाहतात. समीर थोडा शरमेने मान खाली घालतो. त्याला वाटतं सुरेश काहीतरी बोलतील किंवा रागावतील.. पण ते काहीच बोलत नाहीत. पाठी वळून बघतात आणि विचारतात, “ हे तुझे आई वडील का?”
“ हो.. आम्ही तिघेही आलो आहोत तुमच्याकडे..”
त्यांचं बोलणं चालू असताना सलील पाहतो आणि त्याला हाक मारतो, “ समीर…. अरे चल..”
“ हो आलोच.. काका चला ना आम्हाला महत्त्वाचं काही बोलायचं आहे..”
“अर्थात बोलायची गरज आहेच.. चला वरती..”
असं बोलून दोघंही गेट मधून आत निघतात..
“समीर तू ह्यांना ओळखतोस का? ह्यांनी आम्हाला विचारलं घर शोधताय का.. आपल्याला बिल्डिंग चा अनुभव नाही पण किती तयार असतात ना लोकं मदतीला.. मी इंप्रेस झालोय खूप.. आपलं नाव काय म्हणालात??”
“ नमस्कार. मी सुरेश हेमंत कर्णिक..”
“ओक्के.. कर्णिक.. थांबा कर्णिक म्हणजे..”
सलील समीरकडे पाहतो.. समीर मानेनेच हो खुणावतो. तेव्हा त्याला लक्षात येतं.
“ नमस्कार.. मी पाहिलं नाही ना तुम्हाला त्यामुळे जरा जास्तच बोलून गेलो..”
निता ला समजत नाही आधी पण लक्षात येतं की कर्णिक म्हणजे मायाचे बाबा..
“ चला या घरी जाऊ आणि बोलू. या..” असं म्हणून सुरेश पुढे होतात.
“समीर मी काही चुकीचं नाही बोललो ना? हे तर फार गंभीर वाटले..”
“नाही रे बाबा. ते तसे शांत आहेत पण घाबरुन जाऊ नको.. चला जाऊया..”
सुरेश वर जाऊन बेल वाजवतात. सुगंधा दार उघडते. 
“हे काय परत का आलात? काही विसरलात का?”
“काही विसरलो नाही. देशमुख आले आहेत भेटायला.”
“देशमुख.. अहो देशमुख काय म्हणता. समीर म्हणा की. मायामुळे तुम्ही चिडू नका हा त्याचावर. त्याची बाजू समजून घेऊ आधी.”
“अगं देशमुख म्हणजे अख्खं कुटुंब आलंय.. तो आणि त्याचे आई बाबा. मी काय तुला मूर्ख वाटतो का? आधीच चिडेन का मी??”
तेवढ्यात समीर दारात उभा राहतो, “ येऊ का आत?”
“या या..” असं म्हणत दोघंही पुढे जातात..
सलील निता जरा बिचकत आत येतात. सगळे बसतात पण कोणीच काही बोलत नसतं. समीरची नजर मायाला शोधत असते. शेवटी काहीतरी सुरुवात म्हणून सलील बोलतो.
“ नमस्कार मी सलील देशमुख समीरचा बाबा आणि ही निता समीरची आई..”
“हो झाली ओळख मगाशी आपली.. ही माझी बायको सुगंधा.”
सुगंधा तेवढ्यात बोलते, “ अगं बाई पाणी राहिलं द्यायचं. तुम्ही काय घेणार? चहा , कॉफी?? समीरला कॉफी आवडते ना पण तुम्हाला काय?”
“ कॉफी चालेल.” निता त्यांना सांगते.
सुगंधा आत जाताना मायाच्या खोलीत जाते. 
“माया अवतार आवर जरा तुझा.. देशमुख आले आहेत..बाहेर ये..”
“कोण? समीर? हिम्मत कशी केली त्याने? मी फोन उचलत नाही म्हणून आला इथे लगेच.. मी येणार नाही.त्याला सांग निघून जा..”
“ अगं त्याचे आई बाबा पण आले आहेत.. असं काय करतेस..”
“वाह त्याचा आई बाबांना घेऊन आला लगेच.. स्वतः मध्ये खरं बोलायची हिम्मत नाही म्हणून आई बाबा लागतात..”
“अगं ए हळू बोल की जरा.. आणि हिम्मत नसायला काय झालं? तू त्याला बोलू दिलंस तर कळेल ना? त्याचं काही ऐकायचं नाही आणि बोलत नाही म्हणून हिम्मत नाही असं म्हणायचं.. उठ आवर..” असं म्हणून ती कॉफी करायला निघून जाते.
माया विचार करते की ही माझी आई आहे का त्याची? कशाला आले आहेत हे लोकं? चुकीवर पांघरूण घालण्यासाठी?
तेवढ्यात तिला सुरेश हाक मरतात.
“माया.. बाहेर ये”
आता मात्र बाहेर जायलाच लागतं.
“हा बाबा . काय हवंय तुम्हाला? मला हाक मारलीत ना?” 
समीर तिला पाहता क्षणी खुश होतो..
“मला काही नको आहे. हे तुला भेटायला आले आहेत.”
ती एक नजर समीरकडे पाहते. समीरच्या डोळ्यातलं पाणी फक्त खाली पडायचं बाकी असतं. तो तिला नजरेनेच माफ कर ग मला असं बोलून जातो पण ही इतकी हट्टी असेल असं वाटलं नव्हतं. पट्ठी अजिबात लक्ष न दिल्याचा आव आणत सलील कडे बघते. 
“हॅलो सर.. तुम्ही परवा खूप सांभाळून घेतलंत पण मला खरं कळलं. खोटं बोलून काही होत नाही. मला अश्या लोकांची खूप चीड आहे. मग तो सामान्य माणूस असो आमच्यासारखा किंवा एखाद्या कंपनी चा भावी मालक!” 
समीरला कळतं की हा टोमणा त्याला उद्देशून आहे.
“माया.. मी खोटं नाही बोललो ग.. मी फक्त लपवलं तुझ्यापासून. मला सांगायचं होतं तुला हे पण धीर होत नव्हता. प्लीज एकदा ऐकुन घे माझं.. आपण बाहेर जाऊन बोलुयात का जरा??”
“काही नको.. मी माझं म्हणणं सांगितलं आहे. मला पुढे काही ऐकायचं नाही किंवा सांगायचं नाही. तुम्ही कॉफी घ्या मला काम आहे मी निघते. आई मी जरा बाहेर जाऊन येते.. बाबा आलेच मी..” असं म्हणून निघून पण जाते. 
समीरला आता रडूच येतं. कोणाला काय वाटेल ह्याची पर्वा न करता आसवांना वाट मोकळी करून देतो.
सुगंधा आणि सुरेश पाहतच राहतात. कोणाला बोलायचं सुचतच नाही..

क्रमशः

© स्वराली सौरभ कर्वे