ओ मेरे राजकुमार (भाग १५)

Love story

ऑफिस मधून बाहेर पडल्यावर माया तडक घरी जाते. तशीच रागारागाने रडत आपल्या खोलीत जाऊन दार लाऊन घेते. सुगंधाला कळतच नाही काय झालंय ते. ती दाराजवळ जाऊन मायाला हाक मारते, “ माया काय झालं?? रडत आलीस आणि मी समोर असून माझ्याकडे पाहिलं पण नाहीस. मगाशी गेलीस ना ऑफिसमध्ये? अचानक आलीस काय? रडतेस काय? सांगशील का?”
“आई मला जरा वेळ एकटं सोड.”
“अगं पण सांग तर काय झालंय! माझ्या जिवाला घोर नको लाऊस ग.”
“आई फार मोठं काही नाही. कृपा कर मला एकटं राहू दे. काही विचारू नकोस आत्ता.” 
सुगंधा काळजीत पडते झालं तरी काय ह्या मुलीला? शेवटी काळजीने ती सुरेशना ला फोन करते.
……………………………………………………. ……………. ………..
ऑफिस मध्ये काम चालू असतं. नीताला कळतं की आपण काहीतरी मोठा गोंधळ केला आहे. ती बाहेर मायाला बघायला येते तर माया तिच्या जागेवर नसते आणि तिचं सामानही नसतं.
ती चौकशी करते तर माया तडक सगळं सामान घेऊन ऑफिस मधून गेल्याचं तिला कळतं.. ती लगेच समीर ला फोन लावायचा प्रयत्न करते पण त्याचा फोन लागत नाही.. निता केबिन मध्ये येते तर सलील काम आटपून निघायच्या तयारीत असतो.
“निता.. चल निघू.. “
“अरे सलील! खूप गोंधळ झाला आहे माझ्यामुळे. मगाशी तू सावरून घेतलंस खरं पण मायाला सगळं कळलं की समीर नक्की कोण आहे. ती निघून गेली आहे रे ऑफिस मधून. समीरला फोन लावते तर लागत नाही. काय करू?”
“ तुला त्याने सांगितलं होतं. तुला फार हौस असते ना सुनेची. आता मुलगा आणत होता तर घातलास गोंधळ. किती एक्साईट व्हायचं? आता समीरला कळलं तर तो कसा वागेल तुझ्याशी? प्रत्येक वेळेला सांगत होता तो धीर धर पण नाही. तुला घाईच प्रत्येक गोष्टीची..”
“हो हो.. किती बोलशील मला झाली चूक माझी पण आता नीट करायला हवं ना हे सगळं??”
“हो तेही आहेच. चल आधी घरी जाऊ जरा आराम करू मग मला सुचेल काहीतरी.”
असं म्हणून दोघंही घरी जायला निघतात..
……………………………………………………………………………..
समीर त्याचं काम संपवून एक नजर मोबाईलवर टाकतो. फोन बंद झालेला असतो त्यामुळे आता हॉटेल वर जाऊन चार्ज करु असं म्हणून तो निघतो. हॉटेल वर फोन चार्जिंग ला लावतो आणि बघतो तर निताने खूप वेळा फोन केलेला असतो. काय झालं असेल ह्या विचाराने हॉटेल च्या फोन वरून नीताला फोन करतो.
“हॅलो, अगं किती फोन केलेस तू. काय झालं?”
“समीर….. अरे एक मोठी चूक झाली आहे माझ्याकडून. मला माफ कर.”
“काय झालं ते तर सांग आधी..”
“समीर.. तू कोण आहेस हे मायाला कळलं…” आणि घडलेला सगळा प्रकार निता समीरला सांगते. “ सॉरी बेटा.. मी मुद्दाम काही नाही केलं रे. तुझ्या बाबाने सांभाळून घेतलं पण तिला कळलंच शेवटी.”
“आई शांत हो.. एक ना एक दिवस तिला कळणारच होतं मी सुद्धा खूप वेळा सांभाळून घेतलं ऑफिस मध्ये. ह्यात तुझा दोष नाही. चूक असेल तर ती माझी कारण मलाच वेळेत गोष्टी उलगडून सांगता नाही आल्या. पण एक नक्की मायाच्या स्वभावानुसार आता हे सगळं गुंतागुंतीच होणार. आई बहुतेक माझं प्रेम मला नाही मिळणार.. मी येतोय परवा मग बोलू आपण..” निराशेच्या सुरात समीर फोन ठेऊन देतो.. त्याचा फोनमध्ये मायाचा व्हॉट्स ऍप मेसेज बघतो तर शेवटी सकाळीच तिने समीरला मेसेज केला असतो की लवकर परत ये.. तो पाहून समीरच्या डोळ्यात पाणी तरळते. त्याला जाणीव होते की वेळेत का नाही सांगितलं आपण तिला! कदाचित आत्ताही तिचा राग जाऊ शकतो. कॉल करून पाहू का? असं म्हणून मायाला कॉल करायला घेतो पण एकही कॉल उचलला जात नाही….
……………………………………………………,………………

माया खोलीत फक्त रडत असते. सुरेश येतात आणि लगेच मायाच्या खोलीकडे जातात.
“माया..” दारावर तदोन तीन थाप मारतात.. “माया दार उघड. काय झालंय सांगशील का? आम्हाला काहीच कळत नाही. तुझी आई इथे रडवेली झाली आहे. मी ऑफिस सोडून पळत आलोय इथे.. काही सुचत नव्हतं मला कारण तुझ्या आईने सांगितलं दार लावून रडत आहेस तू. कारण काय? माहीत नाही.. आमच्या वयाचा तरी विचार कर आता काय झालंय नक्की??”
 एवढं ऐकल्यावर माया दार उघडते आणि समोर बाबांना पाहून त्यांचा कुशीत शिरून रडायला लागते. सुरेशना आपल्या मुलीचं रडणं पाहवत नसतं. 
“माया काय झालंय आता तरी सांगशील का??”
“बाबा.. समीर खोटं बोलला माझ्याशी. तो इतका खोटारडा असेल असं वाटलं नव्हतं मला. मी माझ्या स्वप्नातला राजकुमार त्याचात पाहिला पण त्याने माझी फसवणूक केली..”
“नक्की काय केलं त्याने? तुला काही केलं नाही ना?” सुरेश काळजीने विचारतात.
“काहीतरीच काय. किती चांगला आहे तो. मुळात तो बाहेर नाही का गेलाय? मग हिला कसं काय करेल ?” सुगंधा समीरची बाजू घेते.
“आई त्याने मला काही केलं नाही पण खोटं बोलून चीड आणली आहे. तो काही सलील ग्रुप मध्ये प्रोजेक्ट हेड नाही.. उगाच नाटकं आहेत ती..”
“म्हणजे?? मग तो त्या ऑफिस मध्ये कसा? असं कोणालाही ठेऊन घेतात का ऑफिस मध्ये?”
“बाबा तुम्ही बरोबर बोलत होता. नीट चौकशी करायला हवी होती मी. आई तो सलील ग्रुप चा भावी मालक आहे. समीर सलील देशमुख. फार काही लपवलं त्याने. खूप गोष्टींमध्ये मला संशय यायचा पण त्याने गोड बोलून, वेळ मारून कसही करून त्याची ओळख लपवली.. तो खोटारडा आहे..”
सुरेश मायकडे बघतच बसतात.. सुगंधा मात्र हे ऐकुन खुशच होते. “अगं म्हणजे तो मालकच ना.. असेल त्याला तिथे नोकरी करायची. त्यात तो काय इतकं खोटं बोलला? वडिलांच्या जीवावर नसेल काही करायचं त्याला..”
हे ऐकुन माया चिडते. “आई तो माझ्याशी खोटं बोलला.. तुझ्या मुलीशी आणि तू त्याची बाजू काय घेतेस? असं किती ओळखते तू त्याला ?”
“बरं म तू नाही का ओळखायच आधी?”
सुरेश आता मात्र चिडतात.. “काय चाललंय तुमचं? जरा गप्प बसा. माया तुला हे कोणाकडून कळलं? समीर तर इथे नाही.. 
माया सगळं सांगते. ऑफिस मध्ये निता आणि सलील येतात आणि तिला सगळं कसं कळतं..
ते ऐकून सुगंधा तिला जवळ घेते. “माया तुझी बाजू घेत नाही असं नाही पण तू समीरची बाजू ऐकून घेतलीस का? आपल्याला समोर दिसतं तसं नसतं अगं.. त्याची काही कारणं असतील. तू सांग त्याची फसवायची इच्छा असती तर तो काहीही करू शकला असता ना..” 
“आई हे त्याचा खोटेपणा ला झाकू शकत नाही. त्याची बाजू काहीही असो. बरोबर असो किंवा नाही पण खोटं तर बोलला ना? बस.. आता ह्या पुढे मी तिकडे पाय पण ठेवणार नाही. विषय संपला.”
असं बोलून ती खोलीत निघून जाते. सुगंधा सुरेश ना बोलते, “ अहो, तुम्हाला काय वाटतं?”
“एक सांगू का सुगंधा.. मला नाही वाटत आपली मुलगी चूक करत आहे. आपल्या संस्कारात तिला खोटं बोलायचं नाही असं शिकवलं आपण आणि आता त्याचा विरुद्ध कसं वागायला सांगायच? समीर चांगला मुलगा असेलही पण खोटं हे कायम खोटंच असतं ना? तिचा निर्णय तिला घेऊ दे.. मी निघतो आता परत ऑफिसमध्ये जायला हवं.” असं म्हणून निघून जातात. सुगंधा मायाच्या खोलीकडे एकदा पाहते आणि तिच्या कामाला निघून जाते..

क्रमशः

( माझ्या प्रिय वाचकांना नमस्कार आणि मनापासून माफी मागते. माझ्या लहान काही महिन्यांचा बाळाला सांभाळून मी कथा लिहिते तरी वाचकांनी सांभाळून घ्या.. बाळाचं करता करता कथा सुचून ती लिहिणे ह्यात फार मोठी कसरत आहे ज्यावर सुद्धा एक कथामालिका होईल.. तुमच्या प्रेमापोटी आज मला भाग लिहायला भाग पाडलंय तुम्ही त्याबद्दल धन्यवाद!)

© स्वराली सौरभ कर्वे

🎭 Series Post

View all